वळीव

Submitted by संतोष वाटपाडे on 2 October, 2014 - 07:03

* वळीव * (सुमंदारमाला वृत्त)

अकस्मात आल्या सरी पावसाच्या मळ्यातील पोती भिजू लागली
गुरे धावली आसरा शोधण्याला उभी गारव्याने थिजू लागली
ढगातून पाणी असे येत होते जशा स्वैर लाटा समुद्रातल्या
कडाडून गेल्या विजा लख्ख काही जशा शुभ्ररेषाच चित्रातल्या...

खुले धान्य सारे करायास गोळा तिथे बापुड्या बायका धावल्या
गहू बाजरी मूग ज्वारी बियाणे परातीत काही भरु लागल्या
जरी सांडले धान्य घाईत थोडे कुणालाच नाही तमा वाटली
नको धान्य सारे कुजायास त्यांचे मनी हीच मोठी भिती दाटली...

कुणी लाकडे झाकली जाळण्याची कुणी जाउनी गोवर्‍या झाकल्या
गुरे बांधली ज्यात झापावरी त्या जुन्या फ़ाटक्या चादरी टाकल्या
घरातील भांडी घमेली कवाडी भरायास दारी खुली ठेवली
कुणी अंगणी छान आरास तेव्हा रित्या घागरींची तिथे लावली ...

कमी होत पाऊस थांबून गेला तलावापरी वावरे जाहली
खळ्यातून पाणी असे वाहिले की जशी काय येथे नदी वाहिली
हळू माणसे सर्व खोळंबलेली घराच्या दिशेने निघू लागली
वळीवात एका जणू वावरांची भविष्यातलीही तृषा भागली...

ढगांचा थवा पांगला दूर जेव्हा निळाई नभाची दिसू लागली
उन्हे तांबडी ओघळू लागल्याने धरा नाहलेली हसू लागली
मुले अंगणी खेळण्या सर्व आली चुली पेटल्या गंध ओलावला
निखार्‍यातुनी पांढरा धूर काही नभी झेप घेऊन फ़ैलावला...

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद निलिमाजी..... या निमित्ताने एक सुंदर लेख वाचायला मिळाला आज......पावलो !

हुबेहूब वर्णन ..... छानच..... चित्रदर्शी कविता.

कवितेच्या अखेरीस वर्णनापलिकडचे आणखी काहीतरी हवे होते असे मात्र वाटले..... वैम.