पाचूच्या हिरव्या माहेरी

Submitted by Discoverसह्याद्री on 29 September, 2014 - 05:04

… पाचूच्या हिरव्या माहेरी - आमच्या मावळातल्या - पावसाळी भटकंतीचं मुक्त वर्णन…

पूर्वप्रकाशित:: http://www.discoversahyadri.in/2014/09/DisoveringMavalinRains.html

प्र.चि. क्रमांक १

-------------------------------------------------------------

यंदा पाऊस जरा जास्तंच लांबला...
जुलै महिन्यातही ऊन अग्गदी मनस्वी तापलेलं…
आभाळात विखुरलेले चुकार ढग मॉन्सून येण्याच्या तुता-या वाजवत नुस्तेच गडगडाट करताहेत …
सावली म्हणून तर या ढगांचा उपयोग नाहीच, पण आर्द्रतेने आणि तहानेने जीव अधिकंच व्याकूळ होत चाललेला…

प्र.चि. क्रमांक २: घननिळा बरसला (प्र. चि. साभार: साकेत गुडी)

अर्थात, ट्रेकर्सना घरी कसं बसवणार...
जिवलग मित्रांची साथ, उत्तम बाईक्स, पाठपिशवीत थोडका खाऊ आणि दाटून आलेले गच्च काळे ढग... पाचूच्या हिरव्या माहेरी – मावळातल्या सदाहरित अस्पर्शित ठिकाणांच्या घुमचक्करीला अजून काय हवं!

प्र.चि. क्रमांक ३

रेल्वे क्रॉसिंग अन पुढे दुथडी भरून वाहणा-या नदीवरचा पूल पार केला, अन शिरलो थेट मावळात. पाऊस ४-६ दिवस सलग बरसला, की नदीचं मातकट पाणी पूलाला गिळंकृत करतं आणि मग पुढच्या खो-यातल्या सगळ्या गावांचा संपर्कच तुटतो.

प्र.चि. क्रमांक ४

अर्ध-कच्च्या नागमोडी रस्त्यावरून हरीतगृहं मागे टाकत, मावळातल्या गावांना जोडणारा – झाडीभरला, वळणावळणांचा, छोटासा डांबरी रस्ता आणि त्याच्याशी लगट करणारे छोटे-मोठ्ठे ओहोळ.

प्र.चि. क्रमांक ५:: पाचूच्या हिरव्या माहेरी, ऊन हळदीचे आले

प्र.चि. क्रमांक ६:: थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर

वाट विचारायला जरा थबकलो, तर भेटली “पाहुने, कोन गाव आपलं...” अशी आपुलकीने चौकशी करणारा गुराखी, शेतकरी आणि खट्याळ धम्माल पोरं.

प्र.चि. क्रमांक ७

प्र.चि. क्रमांक ८

प्र.चि. क्रमांक ९

प्र.चि. क्रमांक १०

प्र.चि. क्रमांक ११

बघायला मंदिरं-लेणी-किल्लेच पाहिजेत असं काही नाही. नुस्तं निवांत भटकायला निघालेलो.. सोबत होती भातखाचरांची. समोर डोंगररांगेवरून झेपावणारा अस्सल ठेवणीतला जलस्तंभ धबाबा कोसळत होता.

प्र.चि. क्रमांक १२

डावी-उजवीकडे पहाड उंचावत, अन रस्त्याच्या जवळ येत गेले, खोरं अरुंद होत गेलं. अगदी रस्त्याला लागूनच छोट्या ओहोळांपासून ते अजस्त्र धबधब्यांपर्यंत नाना त-हा.. एका वळणावर करकचून ब्रेक मारला. समोरचा अशक्य वेड लावणारा कातळ आणि झेपावणारं शुभ्र वैभव.

प्र.चि. क्रमांक १३

मावळातलं एक साधं, पण कित्ती देखणं गाव!
प्र.चि. क्रमांक १४

प्र.चि. क्रमांक १५:: अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा

गावातच गाड्या लावल्या. घमघमणा-या भाताच्या शेताडीतून पाऊलवाट तुडवत निघालो.
प्र.चि. क्रमांक १६

‘शहा-यांचे रान आले एका एका पानावर’ असा माहोल.
प्र.चि. क्रमांक १७

भाताच्या खाचरात एकच लगबग चालू होती.
प्र.चि. क्रमांक १८:: मातीच्या गंधाने भरला, गगनाचा गाभारा

प्र.चि. क्रमांक १९

पावसाळ्यात दिसणारे खास कंद – गौरीचे हात आणि सापकांदा डोकावत होते. उंच डोंगरांच्या पायथ्याशी उठून दिसणा-या, काळ्या खडकात बांधलेल्या राऊळापाशी पोहोचलो. गाभा-यातल्या विशाल शिवपिंडीचं मनोमन दर्शन घेतलं अन ‘शंभो शंकरा’ गीताच्या धीरगंभीर स्वरांनी गाभारा ओतप्रोत भरून गेला...
प्र.चि. क्रमांक २०

मंदिरामागे खळाळणा-या आवाजाकडे गेलो, तर काय निसर्गाची किमया! भोवतालच्या सर्व डोंगरांवरच्या पाण्याचे लोट एका ओढ्यातून खळाळत निघाले होते. वर्षा-धारांचं दान कातळामध्ये घुमून-घुमून “कुंडं” तयार झाली होती. एक कुंडं भरलं की त्यानं अलगद दुस-या कुंडाकडे पाण्याची जबाबदारी सोपवावी; दुसरे कुंड भरले की त्याने तिस-या कुंडाला पाण्याचं दान द्यावं आणि शेवटी धबधब्याच्या रूपाने खोलवर झोकून द्यावं; अशी अनोखी रचना!
प्र.चि. क्रमांक २१

प्र.चि. क्रमांक २२

चिखलाळलेल्या वाटेने पहिल्या टेपावर पोहोचल्यावर पाठीमागे शेताडीमधली लगबग इतकी जिवंत अन लोभस वाटते, म्हणून सांगतो.
प्र.चि. क्रमांक २३

बहरलेल्या फुलांचं आणि समोरच्या गवतात कोळ्याच्या जाळ्यानं झेललेल्या पावसाच्या थेंबांच्या नक्षीचं कवतिक केलं...
प्र.चि. क्रमांक २४

प्र.चि. क्रमांक २५:: थेंबांवरी नक्षी

झुडुपांमधून डोकावणा-या ‘अग्निशिखे’चं दर्शन प्रसन्न करून गेलं.
प्र.चि. क्रमांक २६

माथ्यावरची दाट झाडं ढगात हरवलीत. आणि मगापासून ज्याचा आवाज आसमंतात घुमत होता, तो देखणा धबधबा कातळावरून झोकून देताना दिसला.
प्र.चि. क्रमांक २७

फोटो काढण्यात फार वेळ घालवून चालणार नाहीये. कारण, आता ढगांमुळे काळोख दाटून येतोय. पल्याडच्या खोऱ्यातून काळ्या ढगांचा लोंढा काही मिनिटात आम्हाला गाठणार होता.
प्र.चि. क्रमांक २८:: गतजन्मीची ओळख सांगत, आला गंधित वारा

अन् पावसाचे टप्पोरे थेंब पडू लागतात,
– टप्प-टप्प-टप्प... ताड-ताड-ताड... धों-धों-धों...
प्र.चि. क्रमांक २९

पाऊस आता ताडताड-ताडताड कोसळू लागला होता. पाण्याच्या ओढ्याला ‘ओढा’ का म्हणतात, याचा साक्षात्कार क्षण.
प्र.चि. क्रमांक ३०

पावसाचे बाण अन् पाण्याचे तुषार मुक्त उधळले होते. माथ्यापासून १०० मी खाली धबधब्याचं रौद्र रूप सामोरं आलं. मुक्तपणे खोल हिरव्याकंच दरीत झोकून देणा-या पाण्याचा मनस्वी हेवा वाटला. दणदण आदळणा-या पाण्याचा आवाज, भोवतीचा गर्द दाट रानवा, पावसाच्या सरीसोबत धाडधाड वाढणारं पाणी, अंगात हुडहुडी भरवणारी थंडी - असा जबरदस्त माहोल!
प्र.चि. क्रमांक ३१

माथा जवळ येवू लागला, तसं पाऊस ऊणावला.
एका झाडाला बिलगलेल्या ऑर्किडच्या चैतन्याने एकदम दिल खूष!!!
प्र.चि. क्रमांक ३२

माथ्याकडे बघितलं, झाडाची पानं एकमेकात हरवली होती.
प्र.चि. क्रमांक ३३:: पानोपानी शुभशकुनांच्या कोमल ओल्या रेषा

सात वर्षात एकदा फुललेली कारवी.
प्र.चि. क्रमांक ३४

भुंग्याची भूणभूण आणि त्याच्या अनोखे रंग..
प्र.चि. क्रमांक ३५

मगाचा पाऊस आता गायब झालेला, आणि आभाळ स्वच्छ झालेलं. माथ्याच्या अलीकडे पठारावर एक निवांत प्रसन्न क्षण.
प्र.चि. क्रमांक ३६:: रंगाच्या रानात हरवले ते स्वप्नांचे पक्षी

फ़ुललेला, बहरलेला, डवरलेला.. मज सखा - सह्याद्री!
प्र.चि. क्रमांक ३७

साध्या झुडुपात किती किती सुसंगती (सीमेट्री) साधावी... केवळ-केवळ-केवळ अशक्य!
प्र.चि. क्रमांक ३८

परतीच्या प्रवासात धबधब्यातला मनसोक्त दंगा, मंदिरात स्टोव्हवरची गरमागरम पावभाजी, कुंडापाशी रंगलेल्या गप्पा, अवचितच मोकळ्या झालेल्या ढगातून पल्याडच्या किल्ल्याच्या कातळमाथ्याचे झालेले दर्शन, ताड-ताड पावसाच्या तडाख्यानंतर कुंडातला तिप्पट झालेला रौद्र प्रवाह, परतीच्या प्रवासात बाईकची हरवलेली किल्ली... अश्या कितीतरी गोष्टींमुळे सहलीची रंगत वाढतच गेली होती...

आणि, मग आम्ही अनुभवला आयुष्यातला एक निखळ आनंदाचा क्षण... अन, ‘पाचूच्या हिरव्या माहेरी’ आम्ही आकंठ बुडून गेलो...
प्र.चि. क्रमांक ३९:: उलगडला झाडांतून अवचित, हिरवा मोरपिसारा

विशेष आभार: जिप्सी (योगेश जगताप) यांनी समर्पक शीर्षके सुचवली म्हणून...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्ननगरीची सैर करुन आणलीस रे अग्दी ... Happy काय सह्याद्रिचे वैभव आहे ...

प्र चि ३७ - Little Persian Violet म्हणजेच जांभळी चिरायत, म्हणजेच Exacum pumilum आहे का ?

कैलास बिलोणीकर
अनंतरंगी
विजय आंग्रे
kamini8
शैलजा
Rmd
सुनिधी
Mandar Katre
दादाश्री
माधव
नारु
नुतनजे
सुरेखा कुलकर्णी
पुरंदरे शशांक
मामी
सह्याद्रीची प्रत्येक ऋतूमधली रूपं वेगळी.. नाणेमावळ - आंदर मावळ – भामनेर परिसरातील फोटोज आहेत. ट्रेकला जाताना साध्या Point n’ shoot कॅमेरानी सहज फोटोज काढलेले...
प्रत्येकाला स्वतंत्र प्रतिक्रिया लिहित नाही, त्याबद्दल क्षमस्व... पण तुमची प्रत्येकाची - निसर्गप्रेमींची - प्रतिक्रिया वाचून मस्त वाटले..
खूप खूप धन्यवाद!!! Happy Happy

Pages