कांचनाबुरी व्याघ्रमंदिर, थायलंड

Submitted by सुमुक्ता on 23 September, 2014 - 04:35

थायलंड च्या पश्चिमेस एक छोटेसे गाव आहे - कांचनाबुरी. छोटेसे असले तरी तेथील व्याघ्रमंदीरासाठी (Tiger Temple) जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानच्या युद्धाकैद्यांनी क्वाय नदीवर बांधलेल्या रेल्वे पुलामुळे सुद्धा ते प्रसिद्ध आहे. कांचनाबुरी ची आमची भेट अविस्मरणीय झाली ती व्याघ्रमंदिरामुळे. एका बौद्ध मठात (monastery) अनेक अनाथ आणि सुटका केलेले वाघ तेथील धर्मगुरूंनी पाळले आहेत. तो मठ म्हणजेच हे व्याघ्रमंदिर. बौद्ध धर्मामध्ये धर्मगुरूंना दान करणे खूप मोठ्या पुण्याचे काम समजले जाते. थाई लोक आधुनिक असूनही फार धार्मिक आहेत. धर्मगुरूंना थाई समाजात फार मनाचे स्थान आहे. १९९९ मध्ये काही गावकऱ्यांना वाघाचे एक छोटेसे अनाथ पिल्लू सापडले. त्याला पाळणे त्या लोकांस शक्य नव्हते म्हणून त्यांनी त्या पिल्लास ह्या मठात आणून सोडले. धर्मगुरूंना "दान" केल्याचे पुण्यही त्यांना मिळाले आणि त्या पिल्लास आसरा मिळाला. हळूहळू अशी अनेक अनाथ पिल्ले त्या मठात येऊ लागली आणि तेथील धर्मगुरू त्या वाघांचे संगोपन करू लागले. जुलै २०१४ मधील माहिती नुसार आता तेथे १३५ वाघ रहात आहेत.

ह्या व्याघ्रमंदिरातील वाघांना भेट द्यायला आम्ही आलो. थंडीचे दिवस असूनही टळटळीत दुपार होती त्यामुळे प्रचंड गरम होत होते. त्यात आमच्या सारखे अनेक पर्यटक होते, खूप मोठी रांग होती. मी फारच वैतागले होते. वाटायला लागलं कि जाऊदे ते वाघ आपण आपले परत जाऊ. पण मग थोड्या वेळाने झाडांच्या सावलीत बसलेले १५-२० वाघ दिसले. आरामात वामकुक्षी काढत होते. जे काही जागे होते त्यांनी थोडीशी गुरगुर जरी केली तरी उरात धडकी भरत होती. सगळेच वाघ इतके उमदे, सुंदर आणि ताकदवान होते की माझी नजर हटतच नव्हती. थोड्याच वेळात व्याघ्रमंदिरातील कर्मचारी आले त्यांनी पर्यटकांचे ४ गट केले. हे चारही गट एकेक करून मठातील खिंडीमधून वाघाबरोबर चालणार होते. प्रत्येक पर्यटकास एकदा वाघाचा पट्टा धरून फोटो काढायला मिळणार होता. आणि त्यानंतर एका बंदिस्त ठिकाणी वेगवेळ्या वाघांबरोबर फोटो काढायला मिळणार होते. प्रत्येक गटास सूचना मिळू लागल्या.
१. जोरात बोलू नका.
२. कोणत्याही वाघाच्या चेहेऱ्यास अथवा शेपटीस हात लावू नका.
३. कोणत्याही वाघाकडे पाठ करू नका - नैसर्गिक प्रेरणेमुळे ते पाठीवर उडी मारू शकतात.
४. अतिशय शांत आणि संयत हालचाली करा.
५. पळापळ करू नका.
६. तुमच्या बरोबरील कर्मचारी तुम्हाला हाताला धरून वेगवेळ्या वाघांपाशी नेतील व तुमचे फोटो काढतील.
७. त्या कर्मचाऱ्याचा हात सोडू नका. त्याच्या परवानगीशिवाय कोठेही जाऊ नका.
८. तुमचा कॅमेरा त्या कर्मचाऱ्याजवळ द्या.
९. तुमच्या हातात काहीही ठेवू नका कॅमेरा, पर्सेस, सनग्लासेस अशा सर्व गोष्टी एक सुरक्षित ठिकाणी ठेवा.
१०. ह्या वाघांना माणसाची सवय असली तरीही ते जंगली प्राणी आहेत हे लक्षात ठेवा.

ह्या सूचना ऐकून उत्साहित होण्याऐवजी मला भीतीच वाटायला लागली. तरीही एवढ्या लांबवर आलो होतो तेव्हा ठरविल्याप्रमाणे फोटो वैगेरे मिळाल्यावरच परत जायचे असा निश्चय मी केला. आमच्या गटात आम्ही रांग लावून उभे राहिलो थोड्या वेळाने एक धर्मगुरू आणि एक कर्मचारी एका वाघास घेऊन आले. रांगेतले लोक एकेकदा पट्टा धरून वाघाबरोबर फोटो काढायला लागले. तो पट्टा खरंतर नावालाच होता. एक हिसका वाघाने दिला असता तर पट्टा धरलेला कर्मचारी त्याने फरपटवला असता. रांगेत माझा नंबर लागला आणि कर्मचारी माझ्या हातात पट्टा द्यायला लागला. कुत्र्याला घाबरणारी मी वाघाचा पट्टा कसा धरणार होते? त्यामुळे माझा तिथे फोटो आलाचं नाही. दोन पावले वाघाबरोबर चालले इतकचं काय ते समाधान.

हे सगळे चालू असताना त्या वाघाला कशाचीच पर्वा नव्हती. कोणीही पट्टा धरा फोटो काढा, तो आपल्या त्याच्याच मस्तीत अगदी आत्मविश्वासाने चालत होता. आपल्याकडे सिनेमात दाखवितात, शूर हिरो वाघाशी दोन हात करून जिंकतो. पण इतक्या जवळून वाघाला पाहिल्यानंतर ही सगळी स्टंटबाजी हास्यास्पद वाटायला लागते. वाघाशी दोन हात करणे तर सोडाच पण नुसते उभे राहण्याची वेळ आली तरी पाय कापतात. एका अगदी लहान वाघाची शेपूटसुद्धा साडेतीन ते चार किलो वजनाची असते. वाघाच्या अंगावरून हात फिरविल्यावर त्याच्या बळकट स्नायूंची आणि त्याच्या ताकदीची कल्पना येते. तेथील एक स्वयंसेविका वाघाच्या पिल्लांची देखभाल करते. खेळता खेळता एका छोट्या पिल्लाचे दात तिला लागले तर ३ इंच खोल जखम तिला झाली होती. ह्यावरूनच मोठ्या वाघाच्या ताकदीचा अंदाज येतो. अगदी धिप्पाड माणूस सुद्धा अशा वाघासमोर यःकश्चित दिसेल. पण इतक्या उमद्या प्राण्याचे अस्तित्व माणसामुळेच धोक्यात यावे ह्या विचारानी मला फार वाईट वाटले.

यथावकाश खिंड पार करून आम्ही जिथे वेगवेळ्या वाघांबरोबर फोटो काढायला मिळणार होते तिथे आलो. तिथल्या काही स्वयंसेवकांनी (volunteers) आम्हाला वाघ ह्या प्राण्याबद्दल आणि तिथल्या विविध वाघांबद्दल महिती द्यायला चालू केली. काही वाघ खेळकर तर काही फारच भीतीदायक आणि फटकून वागणारे होते. एक वाघ बँकॉक मधील एका घरातून सुटका केलेला होता. बँकॉक मध्ये त्या वाघावर त्याच्या पुरुष मालकाने फार अत्याचार केले होते. तेव्हापासून तो वाघ पुरुषांचा तिरस्कार करतो. त्यामुळे पुरुषांना शक्यतोवर त्याच्याबरोबर फोटो काढता येत नाही. अशा अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा आम्हाला ऐकायला मिळाल्या.

तेथील वाघांच्या दिनचर्येबद्दल तेथील स्वयंसेवकांनी आम्हाला बरीच माहिती दिली. ह्या वाघांमध्ये आणि जंगली वाघांमध्ये बराच फरक आहे. येथील वाघ शिकार करीत नाहीत. त्यांना शिजवलेले मांस खायला दिले जाते. वाघांच्या जेवणाच्या, खेळण्याच्या आणि अंघोळीच्या वेळेस (थोडक्यात जेव्हा वाघ सक्रिय असतात तेव्हा) पर्यटकांना मठात प्रवेश दिला जात नाही. व्याघ्रमंदिरातील कर्मचाऱ्यांच्या आणि स्वयंसेवकांच्या जीवनशैली बद्दलसुद्धा आम्हाला माहिती मिळाली. तिथे राहणारे सर्व स्वयंसेवक आणि कर्मचारी हे बौद्ध धर्मगुरूंसारखी जीवनशैली पाळतात. सिगारेट व दारुस तेथे सक्त मनाई आहे. स्त्रिया आणि पुरुष वेगवेगळ्या वसतिगृहात राहतात. तेथे स्वतःचे अन्न शिजवता येत नाही. जे मठात दान दिले जाते तेच अन्न खावे लागते.

सगळी माहिती सांगून झाल्यानंतर जेव्हा फोटो काढायची वेळ आली तेव्हा आम्ही आमच्या सर्व वस्तू एक सुरक्षित ठिकाणी ठेवून, कॅमेरा तेथील कर्मचाऱ्या जवळ देऊन त्याचा हात धरून फोटो काढण्यासाठी निघालो. मी भीतीने गर्भगळीत, अर्धमेली जे काही असतं ते सगळं झाले होते. पण तरीही प्रत्येक वाघाच्या जवळ जाऊन त्याला हात लावून त्याच्याबरोबर फोटो काढून घेतले. आणि फोटो काढताना चेहेऱ्यावर एवढा आत्मविश्वास दाखविला कि ते फोटो पाहून मला खात्री पटली की मी उत्कृष्ठ अभिनेत्री होऊ शकते. तेथे काही लोकांनी वाघाचे डोके मांडीत वैगेरे घेऊन सुद्धा फोटो काढले. तेवढी हिम्मत मात्र माझी झाली नाही.

कांचनाबुरी व्याघ्रमंदिरावर आजपर्यंत अनेक टीका झाल्या आहेत. मुख्य म्हणजे तेथील वाघांना अफू दिली जाते (drugged), वाईट वागणूक दिली जाते अशी टीका होते. पण हे सर्व वाघ अतिशय निरोगी, ताकदवान आणि स्वच्छ आहेत. निदान आमच्यासमोर तरी त्यांना कोणतीही वाईट वागणूक दिली जात नव्हती. पुष्कळसे वाघ तेथील धर्मगुरुंबरोबर आनंदाने खेळत होते. अफू दिली जाण्याची टीकासुद्धा मला अयोग्य वाटते, कारण पर्यटक वाघांना दुपारी भेटतात. वाघ हा "मांजर" जातीचा प्राणी आहे त्यामुळे दुपारी खाणेपिणे झाल्यानंतर आणि उन्ह असल्यामुळे तो आळसावलेला असतो. हीच योग्य वेळ असते पर्यटकांनी त्याला भेटण्याची. वाघ जेव्हा सक्रिय असेल तेव्हा कोणत्याही माणसाची त्याच्या जवळ जायची हिम्मत होणार नाही. डिसेंबर २००८ मध्ये ABC News चे काही बातमीदार तीन दिवस तेथे राहून आले व त्यांनी वाघांना अफू दिली जाते अथवा वाईट वागणूक दिली जाते ह्या बातमी मध्ये काहीही तथ्य नाही असे सांगितले. कांचनाबुरी व्याघ्रमंदिराकडे व्याघ्रपालानासाठी आवश्यक असणारी थाई सरकारची परवानगी नाही, तेथील लोकांकडे व्याघ्रपालानचे कौशल्य नाही, तेथून लाओस या देशात वाघांची तस्करी केली जाते असेही अनेक आरोप ह्या मठावर आहेत. पण थाई सरकारने अजून कोणतीही कारवाई केलेली नाही. कदाचित ह्यातच सगळे आले.

प्रत्येक माणसाचे ह्यावर वेगळे मत असेल. पण कांचनाबुरी व्याघ्रमंदिराचा अनुभव मला मात्र प्रभावित करून गेला. जमेल तेव्हा तिथे एक महिना स्वयंसेविका म्हणून राहण्याची माझी इच्छा आहे. माझी इच्छा पूर्ण होईल तेव्हा सत्य कळेलच पण तोपर्यंत हा अनुभव जगावेगळा म्हणून गाठीशी राहील.

Kanchanaburi Tiger Temple.JPGIMG_2261.JPGIMG_2262.JPGIMG_2266.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती.
डॉ. इंगळहाळीकरांनी पण या प्रकल्पावर टिका केली आहे. या वाघांना इतके माणसाळल्यावर ते आणि त्यांची अपत्ये, त्यांचे नैसर्गिक जीवन कधीही जगू शकणार नाहीत, म्हणून.

धन्यवाद नंदिनी, आशिका. बरेच फोटो आहेत संध्याकाळ पर्यंत अजून फोटो टाकेन.

दिनेश, हे वाघ नैसर्गिक जीवन जगतच नाहीत. शिजलेले मांस खातात. शिकार करीत नाहीत. अनाथ झालेल्या वाघांच्या पिल्लांचे संगोपन येथे होते. माझा ह्या विषयावर अभ्यास नाही. मी फक्त माझा अनुभव मांडायचा प्रयत्न केला. डॉ. इंगळहळ्ळीकरांच्या टीकेचे संदर्भ तपासायला नक्कीच आवडतील.

मस्त लेख आणी फोटो. अजून हवेत असल्यास.

दिनेशजी व्याघ्र्याजीनाकरता कुणी त्यान्ची शिकार करण्या पेक्षा ते असे जीवन जगलेले काय वाईट? निदान मोकळे फिरु तरी शकत आहेत.

खुप मस्त सुमुक्ता.
इथे स्लोव्हाकिया मधे आम्हि राहतो त्या ब्रातिस्लावा जवळ एक छोटोसे गाव आहे. तिथे हि असेच पण Siberian tiger चे oasis आहे, ह्या सायबेरियन टायगरची संख्या देखिल कमी होते आहे. त्यामुळे इथे हे लोक त्यांना सांभाळतात. आम्ही इथे नेहमी ह्या वाघांना भेटायला जात असतो. मागच्याच महिन्यात तिथे गेलो होतोत तेव्हा एका वाघाच्या पिल्लाला आणि एका मोठ्या वाघिणीला हात लावायला मिळाला. त्या वाघांना ज्याने लहानपणापासुन सांभाळले आहे, तो तिथे असेल तरच तो आपल्याला त्याच्या सोबत आत पिंजर्‍यात घेउन जातो.
अगदी वेगळा अनुभव होता हा.

अग मृणाल फोटो टाक की मग. आम्ही आपले नुसतेच एनजीओ आणी अ‍ॅनिमल प्लॅनेटवर बघतो हे सारे.

सुमुक्ता, आसमंत २ या पुस्तकात त्यांचा लेख आहे.
वाघांचे संवर्धन व्हायला पाहिजे याबद्दल दुमत नाही. आपल्याकडे ताडोबासारख्या प्रकल्पात चांगले काम होत आहे.
तसं बघायला गेलं तर बिबळ्याच्या तूलनेत वाघ नैसर्गिकरित्याच मागे पडत चालला आहे. हवामानातील बदलांना
अनुसरून स्वतःमधे बदल घडवणे त्याला जमलेले नाही. त्यांची संख्या वाढवायची तर त्यांना आवडेल असा मोठा नैसर्गिक प्रदेश मोकळा करून द्यायला हवा. तिथे त्याचे नैसर्गिक खाद्य त्याला मिळायला हवे आणि मानवासारख्या अनैसर्गिक शत्रूंपासून त्याचे संरक्षण व्हायला हवे.

पण असे वाघ पुढे शोभेचे प्राणी ठरतील. अन्नसाखळीतील सर्वात वरचा घटक म्हणून त्यांना आपले स्थान राखता येणार नाही. ( जिथे वाघांचा नैसर्गिक वावर असतो तिथले निसर्गचक्र उत्तम आहे, असे मानतात. ) मानवाच्या सोबतीशिवाय त्यांना जगणे शक्य होणार नाही. आपली आपण शिकार करणे जमणार नाही. वाघीणच पिल्लांना
शिकारीचे तंत्र शिकवते. जर तिलाच हे माहीत नसेल तर बछड्यांना ती काय शिकवणार ?

जिथे जिथे पक्षी प्राणी यांच्या संवर्धनाचे प्रयत्न होतात तिथे तिथे त्यांना त्यांचे नैसर्गिक जीवन जगण्यासाठीच तयार केले जाते.

याच प्रकल्पासाठी नव्हे तर एकंदरच थायलंडच्या धोरणाबाबत बरीच टिका होत असते. पर्यटकांना आवडेल असे
देण्यासाठी तो देश कुठल्याही थराला जातो. आपण सहसा अश्याच ठिकाणांना भेटी देतो पण त्यांच्या सामाजिक
जीवनावर प्रकाश टा़कणारी पुस्तके, सुदैवाने मराठीतही उपलब्ध आहेत. ( मिलिंद बोकिलांचे पण एक पुस्तक आहे. )

अरे असे आहे होय हे. धन्यवाद दिनेशजी. दुदैवाने आताच बातमी वाचली की दिल्ली प्राणी सन्ग्रहालयात वाघाच्या हल्ल्यात एक मुलगा ( मोठा ) गेला. फोटो काढताना तोल जाऊन पडला तो असे वाचले. अती उत्साह पण चान्गला नाही.:अरेरे:

दिनेश माहितीबद्दल धन्यवाद. निश्चितच प्रत्येक प्राण्यास नैसर्गिक जीवन जगण्याचा अधिकार आहे. ह्या विषयावर वाचन करायला मला नक्कीच आवडेल. मी आपण सांगितलेली पुस्तके नक्की वाचेन.

छान लेख!

निसर्ग साखळी तोडण्याचा परिणाम सगळ्यांनाच माहित आहे.
<<
<<

आताच ही बातमी वाचली प्राणीसंग्रहालयात वाघाच्या हल्ल्यात एका विद्यार्थ्यांचा मृत्यू

आधी हरिणी आणि आता थेट वाघ! मोठी झेप आहे. असो. लेख आवडला. मुख्य म्हणजे एकतर्फी नाही. अन्यथा कुणी कुठे जाऊन आले की इतके भारावून जातात आणि वृत्तांत लिहीताना त्या जागेचं १०० टक्के कौतूक (अतिरंजित) मांडतात. आपण तसं केलं नाहीत. दुसरी बाजूही मांडलीत. इतर लोक काय टीका करतात? वस्तुस्थिती काय आहे ह्याबद्दलचा आपला कयास / वैयक्तिक मत कुठलंही आग्रही विवाद / स्ट्राँग आर्ग्युमेंट न करता मांडलंत हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

इतरांची नकारात्मक प्रतिक्रिया देखील आपण अतिशय सहजतेने स्वीकारत त्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता दाखविली. ही शैली आदरणीय आणि या संकेतस्थळावरील इतर अनेक लेखक सदस्यांकरिता अनुकरणीय आहे.

सर्व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!!

चेतन, हरिणी माझ्या आयुष्यात आली नसती तर हा अनुभवसुद्धा मी भीती आणि उदासीनतेपोटी घेतलाच नसता. आणि वादविवादाचे म्हणाल तर टीका विधायक असेल तर त्यावर विचार करायला मला आवडते.

मस्त लेख ! आणि जबरदस्त अनुभव !

दिनेश यांच्या पोस्टने मात्र लक्षात न आलेला दुसरा अँगल दाखवला आणि अर्थातच त्याच्याशी शतप्रतिशत सहमत!
मग इथे अफूची शक्यता योग्यही वाटते. पण यात एक शंका - ते वाघ कंट्रोलमध्ये राहावेत, निरुपद्रवी व्हावेत यासाठी ते अफू काम करते का? म्हणजे म्हणून तसा आरोप आहे का?

सूमुक्ता,

छान लेख.

दिनेशदा यांच्याशी सहमत. थायलंडमध्यी नाही पण भारतात आणि इतरस्त्र वाघ्र्यप्रकल्प सुरु करणे सहज शक्य आहे. आपली इच्छाशक्ती कमी पडतेय.