हे महान नेत्यांनो

Submitted by बेफ़िकीर on 20 September, 2014 - 23:54

*************************************!!श्री!!*********************************************

दिनांक - २१ सप्टेंबर, २०१४

प्रती:

आदरणीय शरद पवार साहेब
आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब
आदरणीय अमित शहा साहेब
आदरणीय उद्धव ठाकरे साहेब

तसेच अंधानुकरणीय दादा, आबा, राजसाहेब व इतर,

शिसानविवि!

दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चौदा ही उमेदवारीचे अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. उघड आहे की उमेदवारीचे अर्ज दाखल करण्याची तारीख त्या आधीची असावी. तसेच ऑक्टोबरच्या तिसर्‍या आठवड्यात महाराष्ट्राच्या घाटपठारावरील राजकीय धूळ, दबावतंत्रांच्या कर्कश्श्य आरोळ्या, पक्षबदलाच्या आर्त किंकाळ्या, जागावाटपाच्या भयावह अफवा आणि अनागोंदीच्या अभद्र जाणिवा नष्ट होऊन एक स्वच्छ प्रशासन नियुक्त होणार हे आयोगाने ठरलेले आहे.

हे महान नेत्यांनो, निवडणूकीच्या कार्यक्रमाच्या ह्या सुस्पष्ट पार्श्वभूमीवर गेले दहा दिवस जो राजकीय गदारोळ तुम्ही सर्व मिळून घालत आहात तो पाहून तुमच्यापैकी एकालाही मत देऊ नये अशी तीव्र इच्छा मनात येत आहे.

राजकारणाचे इतके हिडीस स्वरूप पाहण्यात नव्हते असे नाही, पण प्रेताच्या टाळूवरील लोणी ही म्हण कमी पडावी असे सध्याचे वर्तन दिसत आहे.

एक मोदी काय जिंकले, जणू सगळे पालटलेच! आता जणू पुढील काही वर्षे मोदींशिवाय कोणी येणारच नाही असे समजून समीकरणे जुळवली जात आहेत. 'जर सरकार मोदींचेच येणार तर आपण एकमेकांबरोबर तरी राहायचे कशाला' हा प्रश्न राकाँ आणि काँ ह्यांना पडत आहे. जर मोदींच्या करिष्म्यावर एकट्या भाजपला स्पष्ट बहुमत मिळणारच नसेल तर युती आत्ता केली काय आणि निवडणूकीनंतर केली काय, फरक काय पडतो असा प्रश्न मातोश्रीला पडत आहे. अख्ख्या 'हिंदुस्थानात' निव्वळ मोदी ह्या नावाने क्रांती होऊ शकते तर महाराष्ट्र किस झाड की पत्ती आणि हव्यात कशाला माना तुकवायला स्थानिकांपुढे, ही भाजपला तीनचारच महिन्यांत जमलेली अरेरावी! खुद्द मॅडम तर परदेश दौर्‍यावर आहेत. दस्तुरखुद्द मोदींना भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर भारत सोडून सगळ्या देशांकडे लक्ष देण्याची गरज वाटू लागली आहे. राजसाहेबांनी स्वतःच्या संघटनेला अजूनही कोणताही प्रेरणादायी संदेश दिल्याचे ऐकिवात आलेले नाही.

हे महान नेत्यांनो, वीज, रस्ते, पाणी, शिक्षण आणि रोजगारवृद्धी ह्या निकषांवर अजून खूप काम करायचे राहिलेले असावे असे आम्हा पामरांना उगाच वाटत असते. त्याचे काय आहे, मोठमोठे शब्द वापरले की आपण सर्वांगीण विकासाची भाषा बोललो असे इतरांना वाटते हे आमच्या वृत्तीत जोपासले गेलेले आहे तुमच्या वर्षानुवर्षांच्या स्फुर्तीदायक (फक्त) भाषणांमुळे!

एकमेकांवर रोज वेगवेगळे दबाव टाकणार्‍या धुरंधरांनो, दर जात्या दिवसाला तुमच्या प्रतिमेची कधी नव्हे ती दुरावस्था होत चाललेली आहे.

एकमेकांना धमक्या देणार्‍या मुत्सद्द्यांनो, खरोखर हिंमत असेल तर लढाच स्वबळावर, पण हे आधी जाहीर करा की नंतरही युती करणार नाही.

तुमच्याकडून शिकल्यामुळे आम्ही सामान्य मतदारही एक पोकळ धमकी देऊन पाहू इच्छित आहोत.

"हे महान नेत्यांनो, आमचा अंत पाहू नका, अधिक ताणलेत तर आम्हाला मतदान करायला घराबाहेर पडायला वेळच मिळणार नाही. तुम्हालाही प्रचाराला वेळ मिळणार नाही. आणि मतमोजणीनंतर जर घरोबे केलेत तर हा मतदार स्वप्नात तरी नक्कीच तुमच्या विचारधरणांमध्ये मुतेल आणि एक दिवस तुम्हाला रस्त्यावर आणेल"

कटावे, लोभ नसावा!

आपला,

एक मतदार!

=================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इब्लिस, पोस्ट आवडली.

एक गोष्ट माझ्या मनासारखी झाली. युती, आघाडी तुटली. सगळेच लैच टिवटिव करत होते, आता कळेल कुणी किती पाण्यात आहे!

या सगळ्यात एक अत्यंत वाईट गोष्ट अशी की,पंचरंगी किंवा काही ठिकाणी तर ६-७ तुल्यबळ उमेदवारांत लढत होत असल्यामुळे केवळ २० ते २२% मते घेऊन उमेदवार निवडून येईल,याचा अर्थ त्या मतदारसंघातील सुमारे ७५ ते ७८% लोकांना तो उमेदवार त्यांचा प्रतिनिधि म्हणून नामंजूर असेल.हेच आपल्या निवडणुकांचे दुर्देव आहे.
युती आणि आघाडी तुट्ल्यामुळे प्रचारातील टिकेच्या तोफाही आपल्या दिशा वळवतील,कदाचित भाजप-शिवसेना आणि
काँग्रेस-रा.काँग्रेस मध्येच शब्द्युद्ध रंगेल.आपापले खरे प्रतिस्पर्धी विसरून चारही जण आपापल्या आघाड्या व युत्या कोणामुळे तुटल्या याचेच स्पष्टीकरण देत बसतील यात निश्चितच जनतेचे खरे प्रश्न्,समस्या मागे पडणार आहेत.
अर्थात मतदारांपुढे 'मनसे'चा पर्याय आहे परंतु अस्पष्ट भूमिका,मर्यादित संघटन आणि नाशिकमधील नाट्यामुळे त्यांना किती समर्थन मिळते हा प्रश्नच आहे.तरीही मतदारराजा आपले हित जाणतो आणि तो विचारपूर्वक मतदान करेल अशी आशा करुया.

महाराष्ट्रातले लोक जर आघाडीच्या १५ वर्षांच्या राज्याला कंटाळले असतील तर जिथे भाजप बलवान तिथे भाजपला आणि भाजप कमजोर असेल तिथे शिवसेनेला मतदान करतील.

आणि नसतील कंटाळले तर पुन्हा आहेतच ___ धरणे भरायला आघाडी वाले.

धरणे भरायला आघाडी कशाला ?

नाहीतरी तुमच्या पुराणानुसअर. अगस्ती मुनी मुतल्याने पृथ्वीवर पाणी तयार जाले ना ?

हे महान नेत्यांनो,

४८ तासांनी तुमची पुढील पाच वर्षांची राजकीय कारकीर्द कशी असू शकेल हे स्पष्ट होईल.

आमच्याकडून आम्ही मतदान केलेले आहे. जनता तिचा कौल देऊन मोकळी झालेली आहे. आता मतमोजणीनंतर निकालांचा कल जाहीर होऊ लागेल.

मात्र नवीन समीकरणे जुळवताना खालील गोष्टी विचारात घ्या अशी नम्र विनंती:

१. जनतेचा खरा कल लक्षात घ्या, केवळ एक अधिक एक बरोबर दोन असे उत्तर येते म्हणून सत्तास्थापनेचा दावा करू नका.

२. प्रचारात ज्यांच्याबद्दल विषारी फुत्कार सोडलेत त्यांच्याशी नाते जुळवायला जाऊ नका. कार्यकर्ते निराश होतील आणि जनता संतापेल. तुम्हाला दिलेले मत हे जनतेने तुम्हाला दिलेले आहे, तुम्ही इतर कोणाशी मतमोजणी पश्चात युती करावीत म्हणून दिलेले नाही.

३. मतमोजणी ही मनमोजणी आहे हे लक्षात ठेवा. किती मने आपल्या बाजूने आहेत ह्याचे भान ठेवा. सरकार स्थापन करू शकलात तर आश्वासनांवर कामे सुरू करा. विरोधी पक्ष बनलात तर भरीव व सकारात्मक विरोधाचे कार्य करा.

४. एवढे करून जर अतर्क्य समीकरणे जुळवलीतच तर सत्तेत याल पण जनतेला नाराज करून सत्तेत आलेला असाल हे लक्षात ठेवा. अशी सत्ता तुम्हाला पचणार नाही हा शाप जनता देत असेल हे ध्यानात ठेवा.

धन्यवाद!

हे महान नेत्यांनो,

२६ सप्टेंबर २०१४ रोजी आम्ही वर्तवलेल्या भाकितांपैकी ही दोन भाकिते खरी ठरत आहेतः

>>>निकाल विभागून लागतील, पण एकुणात भाजप व सेनेकडे मतदानाचा कल असल्याचे स्पष्ट होईल. अर्थात तसे दावे प्रत्येकच बाजूने होतील. स्टॅटिस्टिक्सचा आधार फक्त बोलबच्चनांना मिळतो ही उक्ती प्रथमच खोटी ठरू शकेल. प्रदीर्घ चर्चाफेर्‍यांनंतर बहुतेक समीकरण असे असेल. <<<

>>>शिवसेनेला प्रथमच बाळासाहेबांची अनुपस्थिती म्हणजे काय असते ते जाणवेल.<<<

>>>ह्यावेळी शरद पवारांचे राजकारण खर्‍या अर्थाने सुरू होईल. कोणाच्या खिजगणतीतही नसलेली समीकरणे प्रत्यक्षात आणण्यासाठी पवारसाहेब आपले वजन वापरतील. <<<

त्याचबरोबर, ही भाकिते चुकीची ठरत आहेतः

>>>भाजप हे सेनेशिवाय व सेना भाजपशिवाय कोणाशीही हातमिळवणी करणार नाही. तसेच दोन्ही काँग्रेस एकमेकांना सोडून अजिबात दुसरीकडे तोंड वळवणार नाहीत. अश्यात मनसे, अपक्ष व आत्ता तुटलेल्या युतीतील लहान घटकपक्ष ह्यांना सोन्याचा भाव येईल<<< (शरद पवार साहेबांनी भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याचे जाहीर केल्याने आमचे हे भाकीत खोटे ठरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे)

>>>अमित शहांच्या कारकीर्दीवर मोठा काळा डाग बसेल. एकुणातच भाजपची प्रतिमा मलीन होईल<<< (भाजपाला मिळत असलेल्या जागा बहुमतासाठी पुरेश्या नसल्या तरीही आहेत त्याही जागा खूप आहेत ह्याचेच अप्रूप मानून अमित शहांच्या टोपीत पीस)

बाकी ह्या भाकितांचे काय होणार ते उद्या परवापर्यंत समजेलचः

>>>आपापले बालेकिल्ले सांभाळून जिंकलेले दादा, आबांसारखे व राणे, कदमांसारखे दिग्गज अत्यंत कडवट भूमिका घेऊन वक्तव्ये करू लागतील<<<

>>>मोदी तेव्हाही प्रधानसेवक बनल्याच्या धुंदीत वेगळेच काहीतरी करत असतील. सोनिया व राहुल आपापली स्टेटमेंट्स देऊन पटकन् मोकळे होतील<<<

माझे फेसबूकवरील स्टेटस येथेही डकवत आहे.

=======================================

शरद पवार साहेबांनी बाहेरून पठिंबा जाहीर केल्यावर प्रचंड गदारोळ सुरू झाला आहे. तो गदारोळ योग्यच आहे. पण एक समजत नाही. हा पाठिंबा भाजपने अजून स्वीकारलेला आहे का?

१. स्वीकारला तर माझ्यापुरता राजकारण हा विषय संपला. गेली वीस वर्षे मी मतदान करत आलो. त्यापूर्वीची सात वर्षे मतदानच करत नव्हतो कारण मनाला पटेल असा उमेदवार किंवा पक्षच वाटायचा नाही कोणी! भाजप व राष्ट्रवादीचे सरकार आले तर पुन्हा मतदान बंद करणार! आपले मत न देणे हाही माझा एक अधिकार आहे. आपले मत वाया न जाऊ देणे हाही माझा एक अधिकार आहे.

२. भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा नाकारला तर माझे राजकारणातील स्वारस्य शाबूत राहील.

ह्याशिवाय, खालील मुद्दे (जे इतरत्र चर्चेत वाचले ते) पटत नाहीत.

१. हा शरद पवार साहेबांचा मास्टरस्ट्रोक वगैरे आहे! हे मला पटत नाही. अगतिकतेतून घेतलेला निर्णय आहे तो. त्यात कसला मास्टरस्ट्रोक?

२. ही शिवसेनेची कोंडी करणे आहे, हेही मला पटत नाही. त्यात कसली कोंडी? उद्यापर्यंत कदाचित उद्धवजींनीही पाठिंबा जाहीर केला तर राष्ट्रवादीचा पाठिंबा कशाला हवा भाजपला?

माझे मतः

शरद पवार साहेबांसमोर दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसल्याने त्यांनी आधीच पाठिंबा जाहीर केला. हे करताना त्यांनी फक्त सोनिया काँग्रेसवर सूड उगवल्याचे समाधान प्राप्त केले इतकेच! ह्याशिवाय, राष्ट्रवादी आणि भाजपचे बाकीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते, तसेच पाठीराखे ह्यांचा प्रक्षोभ झाला तर तो प्रक्षोभ राष्ट्रवादी आणि भाजप कसा सहन करू शकतील?

-'बेफिकीर'!

आताच मी बावरा मन यांच्या पोस्ट ला प्रतिसाद दिला तोच इथेही अगदी समर्पक आहे.
राष्ट्रवादी आणि भाजप हि युती झाली तर ती मतदारांच्या गालावर दिलेली सणसणीत थप्पड असेल>>> अगदी, हा भाजपकडुन मतदारांचा केलेला फार मोठा अपेक्षाभंग असेल

भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा स्वीकारणे ह्याचा अर्थ आपल्या हजारो अनुयायांना आणि पाठिराख्यांना मुकणे!

मोदींमधील व्यावसायिक कदाचित हे होऊ देणार नाही अशी भाबडी आशा आहे.

तरीही, ते झालेच तर आपला तरी भाजपला रामराम ठरलेला!

अडवानी तर म्हणत होते की सेनेशी युती तोडायलाच नको होती व असेच आपण आधीसुद्धा म्हंटल्याचेही म्हणत होते.

भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा स्वीकारणे ह्याचा अर्थ आपल्या हजारो अनुयायांना आणि पाठिराख्यांना मुकणे!
------ निवडणुकीच्या पुर्वी राष्ट्रवादी मधुन बाहेर पडुन भाजपात शिरलेल्या उमेदवाराना पाठिराख्यान्नी स्विकारलेच ना?

राष्ट्रवादी कडे खुप काही पर्याय शिल्ल्क राहिलेला नाही आहे... मुल्यधिष्टित राजकारण कुठलाही पक्ष करत नाही, येथे प्रत्येकाला सत्ता प्रिय आहे. अनुयायी आणि पाठिराखे यान्चा विचार किमान ४ वर्षे तरी केल्या जाणार नाही.

Pages