हे महान नेत्यांनो

Submitted by बेफ़िकीर on 20 September, 2014 - 23:54

*************************************!!श्री!!*********************************************

दिनांक - २१ सप्टेंबर, २०१४

प्रती:

आदरणीय शरद पवार साहेब
आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब
आदरणीय अमित शहा साहेब
आदरणीय उद्धव ठाकरे साहेब

तसेच अंधानुकरणीय दादा, आबा, राजसाहेब व इतर,

शिसानविवि!

दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चौदा ही उमेदवारीचे अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. उघड आहे की उमेदवारीचे अर्ज दाखल करण्याची तारीख त्या आधीची असावी. तसेच ऑक्टोबरच्या तिसर्‍या आठवड्यात महाराष्ट्राच्या घाटपठारावरील राजकीय धूळ, दबावतंत्रांच्या कर्कश्श्य आरोळ्या, पक्षबदलाच्या आर्त किंकाळ्या, जागावाटपाच्या भयावह अफवा आणि अनागोंदीच्या अभद्र जाणिवा नष्ट होऊन एक स्वच्छ प्रशासन नियुक्त होणार हे आयोगाने ठरलेले आहे.

हे महान नेत्यांनो, निवडणूकीच्या कार्यक्रमाच्या ह्या सुस्पष्ट पार्श्वभूमीवर गेले दहा दिवस जो राजकीय गदारोळ तुम्ही सर्व मिळून घालत आहात तो पाहून तुमच्यापैकी एकालाही मत देऊ नये अशी तीव्र इच्छा मनात येत आहे.

राजकारणाचे इतके हिडीस स्वरूप पाहण्यात नव्हते असे नाही, पण प्रेताच्या टाळूवरील लोणी ही म्हण कमी पडावी असे सध्याचे वर्तन दिसत आहे.

एक मोदी काय जिंकले, जणू सगळे पालटलेच! आता जणू पुढील काही वर्षे मोदींशिवाय कोणी येणारच नाही असे समजून समीकरणे जुळवली जात आहेत. 'जर सरकार मोदींचेच येणार तर आपण एकमेकांबरोबर तरी राहायचे कशाला' हा प्रश्न राकाँ आणि काँ ह्यांना पडत आहे. जर मोदींच्या करिष्म्यावर एकट्या भाजपला स्पष्ट बहुमत मिळणारच नसेल तर युती आत्ता केली काय आणि निवडणूकीनंतर केली काय, फरक काय पडतो असा प्रश्न मातोश्रीला पडत आहे. अख्ख्या 'हिंदुस्थानात' निव्वळ मोदी ह्या नावाने क्रांती होऊ शकते तर महाराष्ट्र किस झाड की पत्ती आणि हव्यात कशाला माना तुकवायला स्थानिकांपुढे, ही भाजपला तीनचारच महिन्यांत जमलेली अरेरावी! खुद्द मॅडम तर परदेश दौर्‍यावर आहेत. दस्तुरखुद्द मोदींना भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर भारत सोडून सगळ्या देशांकडे लक्ष देण्याची गरज वाटू लागली आहे. राजसाहेबांनी स्वतःच्या संघटनेला अजूनही कोणताही प्रेरणादायी संदेश दिल्याचे ऐकिवात आलेले नाही.

हे महान नेत्यांनो, वीज, रस्ते, पाणी, शिक्षण आणि रोजगारवृद्धी ह्या निकषांवर अजून खूप काम करायचे राहिलेले असावे असे आम्हा पामरांना उगाच वाटत असते. त्याचे काय आहे, मोठमोठे शब्द वापरले की आपण सर्वांगीण विकासाची भाषा बोललो असे इतरांना वाटते हे आमच्या वृत्तीत जोपासले गेलेले आहे तुमच्या वर्षानुवर्षांच्या स्फुर्तीदायक (फक्त) भाषणांमुळे!

एकमेकांवर रोज वेगवेगळे दबाव टाकणार्‍या धुरंधरांनो, दर जात्या दिवसाला तुमच्या प्रतिमेची कधी नव्हे ती दुरावस्था होत चाललेली आहे.

एकमेकांना धमक्या देणार्‍या मुत्सद्द्यांनो, खरोखर हिंमत असेल तर लढाच स्वबळावर, पण हे आधी जाहीर करा की नंतरही युती करणार नाही.

तुमच्याकडून शिकल्यामुळे आम्ही सामान्य मतदारही एक पोकळ धमकी देऊन पाहू इच्छित आहोत.

"हे महान नेत्यांनो, आमचा अंत पाहू नका, अधिक ताणलेत तर आम्हाला मतदान करायला घराबाहेर पडायला वेळच मिळणार नाही. तुम्हालाही प्रचाराला वेळ मिळणार नाही. आणि मतमोजणीनंतर जर घरोबे केलेत तर हा मतदार स्वप्नात तरी नक्कीच तुमच्या विचारधरणांमध्ये मुतेल आणि एक दिवस तुम्हाला रस्त्यावर आणेल"

कटावे, लोभ नसावा!

आपला,

एक मतदार!

=================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी मनातलं बोललात. जनतेच्या प्रश्नांविषयी कुठल्याच पक्षाला घेण देण नाही असच दिसतयं.
आघाडी सरकारविरूद्ध नाराजी आहे पण शिवसेना-भाजप दोघांनाही मुख्यमंत्रीपदाची हाव सुटली आहे.
एकाला झाकाव अन दुसर्‍याला काढावं. सगळेच साले चोर आहेत Angry

या निवडणुकीसाठी नेत्यांसहीत मतदारांमधे देखील प्रचंड निरुत्साह असल्याचे जाणवत आहे. लोकसभेला प्रचार इतका झाला की शेवटी नको नको झालं होतं. काँग्रेस ही निवडणूक पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेत्रुत्वाखाली लढवणार हे स्पष्ट झाल्याने नाराजांनी किती उमेदवार पाडायचे याची गणितं आताच पक्की करून ठेवली असणार. राष्ट्रवादी काँग्रेस देखील काँग्रेसचे काही उमेदवार नेहमीप्रमाणेच पाडणार. अनेक ठिकाणी राकाँची भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवाराशी छुपी युती असते. ते त्या त्या जिल्हातल्या स्थानिक राजकारणाप्रमाणे आणि नात्यागोत्याच्या राजकारणावर अवलंबून असते. प्रत्येक निवडणुकीत राकाँ + सेना + भाजपा किंवा यापैकी एक यांच्याशी निवडनूक पश्चात युतीची तयारी राकाँने ठवलेलीच असते. हे डावपेच ओळखून काँग्रेसनेही राकाँचे अनेक उमेदवार पाडायला सुरूवात केली आहे. पुण्यात विश्वजित कदमां ऐवजी शिरोळेंना मतदान करण्याचे आदेश दिल्यानंतर काँग्रेसनेही बारामतीत सुप्रिया सुळेंऐवजी कुठल्याही उमेदवाराला मत देण्याचे आदेश दिले होते. सेना भाजप युतीत इतका बेबनाव नाही. मात्र सेनेचे कार्यकर्ते काही ठिकाणी राकाँला मदत करतात हे लपून राहीलेले नाही. दिल्लीचा फॉर्म्युला महाराष्ट्रात चालत नाही. मतदारांमधे पंधरा वर्षे एकाच आघाडीचे सरकार असल्याने प्रचंड नाराजी आहे. पण जो एकमेव पर्याय दिसतो आहे त्याबद्दलही तो समाधानी नाही. त्यामुळं निरुत्साह आहे.

लोकसभेला माझे नाव यादीत होते. या खेपेला नाही. पण ते अ‍ॅड करण्यासाठी काही करावे हे त्यामुळंच वाटलेलं नाही.

नेता या शब्दाचा अर्थ नेतृत्व करणारा. लोकांना पुढे घेऊन जाणारा असा आहे.

तुम्ही वर उल्लेखिलेल्या गणंगांना नेते म्हणणे मला प्रशस्त वाटत नाही.

पुढे पुढे करतो तो पुढारी, (जो शब्द वाचून पेंढारी शब्दाची आठवण झाल्याशिवाय रहाणार नाही.) हा शब्द योजावा, व लेखात योग्य तो बदल करावा, ही विनंती.

पुरोगामी महाराष्ट्रात असे प्रतिगामी वाद या महान नेत्यांचे पाहुन असे वाट्ते कि, यांना सामान्य माणसांच्या प्रश्ना ऐवजी आपल्या स्वार्थाची जास्त चिंता आहे. Angry

नेता या शब्दाचा अर्थ नेतृत्व करणारा. लोकांना पुढे घेऊन जाणारा असा आहे.

तुम्ही वर उल्लेखिलेल्या गणंगांना नेते म्हणणे मला प्रशस्त वाटत नाही.
<<
<<
अगदि बरोबर.
दोन हाणा! पण नेता म्हणा, अशी गत आहे या सर्वपक्षिय ***ची.

महाराष्ट्रातलं राजकारण ऑल टाईम वर्स्ट झालं आहे.
बेफी, यावेळी तुम्ही अगदी मनातलं बोलून दाखवलंत बहुतेकांच्या.
काका दादांचं सरकार कुणालाच नकोय पण भाजपा आणि शिवसेना एकमेकांच्या ऊर॑वर बसण्याखेरिज काहीच कामाचं बोलायला तयार नाहीत.
यावेळी बहुदा मतदानही फारसं होणार नाही.
केंद्रात मोदी आहेत ना , मग आता महाराष्ट्रात पाच वर्ष राष्ट्रपती राजवट का होईना अशी बर्याच जणाची मांडणी आहे.

प्रत्येक जण आपल्या गल्लीचा दादा बनून हिंडतोय,
आणि गल्ली क्रिकेट लेवल वर जाउन गल्ली राजकारण खेळतोय ..

शिवसेना-भाजपाच्या भांडणात यंदा काँग्रेसविरोधी जो माहौल बनणे अपेक्षित होते तो कुठे दिसतच नाहिये सध्या.
जसे लोकसभेच्या वेळी झाले होते.

महिन्याभरापूर्वी युती सरकार सहज येईल असे जे वाटत होते ते आता युती झाली तरी सहज शक्य नाही वाटत कारण या मध्यल्या गोंधळाने युतीने विश्वासार्हता गमावल्यासारखे झालेय.

अगदी मलाही आता मतदान करावे की न करावी हा प्रश्न भेडसावू लागलाय. कारण यंदा काँग्रेसला करायचे नव्हतेच आणि युतील करायची इच्छा मरत चाललीय ..

मनातलं बोललात . पण भाजप काय आणि शिवसेना काय . सत्तेवर आल्यावर सगळे एकसारखाच वागतात . माझं confusion झालंय कोणाला मत द्यावं ते .
पण
दस्तुरखुद्द मोदींना भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर भारत सोडून सगळ्या देशांकडे लक्ष देण्याची गरज वाटू लागली आहे. >>>

हे काही आवडल नाही. त्याला परराष्ट्र धोरण असं म्हणतात . भारतासाठीच इतर देशांशी संबंध सुधारण चालू आहे न .

बेफी खरच मनातल्या भावना मांड्ल्यात्.रोज पेपर पाहते अजुन जागावाटप होत नाहीये.तसा तर ईतके दिवस उदधव जी च्या तोंडावरची माशी हलत नसे आजकाल जास्त भाव खायला लागलेत अस जानवतय.

हे महान नेत्यांनो,

तुमचा अजूनही निर्णय न झाल्याबद्दल अभिनंदन! आता आम्हा मतदारांसमोर असा प्रश्न उभा राहिला आहे की तुम्ही आम्हाला प्रचारात सांगणार तरी काय? की पंधरा दिवस आम्ही आपापसात तुफान भांडत होतो पण आत एक झालो आहोत आणि आम्हाला मत द्या. किंवा मग आम्ही अजूनही एक झालेलो नाही आहोत आणि आम्हाला मत दिलेत तर निवडणूकीनंतर आम्ही पुन्हा युतीचा प्रयत्न करू?

तुमचा अजूनही निर्णय न झाल्याबद्दल अभिनंदन! आता आम्हा मतदारांसमोर असा प्रश्न उभा राहिला आहे की तुम्ही आम्हाला प्रचारात सांगणार तरी काय? की पंधरा दिवस आम्ही आपापसात तुफान भांडत होतो पण आत एक झालो आहोत आणि आम्हाला मत द्या. किंवा मग आम्ही अजूनही एक झालेलो नाही आहोत आणि आम्हाला मत दिलेत तर निवडणूकीनंतर आम्ही पुन्हा युतीचा प्रयत्न करू?>>>खरोखरी उत्तम पोस्ट

मला अस वाटत : कॉगेसला माहित आहे आपन निवडुन नाहि येणार त्यामुळे ते प्रचार करनारच नाय्येत त्यांना आता वेळ घालवायचा आहे..नंतर म्हणता येईल जागावाटपाच्या गोंधळामुळे प्रचार करता आला नाहि...
आणि आता शिवसेना आणि भाजपा ला माहित आहे प्रचार नाहि केला तरि निवडुन आपनच येणार आहोत मग मुख्यमंत्री कोण यावर नंतर भांडनापेक्षा आताच भांडुन घ्यावे म्हणजे निवडनुकीनंतर लगेच कामाला लागता येईल...

फु बाई फु फुगडी फु, दमलास काय माझ्या उमेदवारा तू र उमेदवारा तू..

आत पोकळ बाहेर पोकळ सत्तेचा हा वेळू
म्हातारपण आले तरी खुर्चीवर डोळा ठेऊ बाई फुगडी फू

सत्तेची घण्टा वाजे ठणा ठणा ठणा
आले आले आबा आले, आणी पळ्त आले अण्णा बाई फुगडी फु..

आता भर घाला बर यात.:फिदी:

.

काल एका चॅनेलवर एका राजकीय विश्लेसषकाने अस मत मांडल कि महायुतीतील छोट्या घटक पक्षांनी अव्वाच्या सव्वा जागांची मागणी केली. त्यावर त्यांना ठिकाणावर आणण्यासाठी सेना-भाजप ने ही चाल खेळली.
त्यांच मत मलाही पटतयं. आणि राकॉ - कॉ आघाडी यांच्याकडे डोळे लावुन बसलीयं. ते एकत्र आले कि हेही येणार नाहीतर स्वबळावर.
जे काही चालवलयं या पक्षांनी ते अगदीच किळसवाणे आहे Angry

मतदानाचा टक्का घसरेल यावेळी अस वाटतयं.

धन्यवाद बेफिकीर. अतिशय उत्तम लेख. विं दा करंदीकरांनी १९५२ साली लिहिलेली एक कविता येथे देण्याचा मोह आवरत नाही. परिस्थिती अजुनही तशीच आहे.

सब घोडे बारा टक्के

जितकी डोकी, तितकी मते
जितकी शीतें, तितकी भुते

अ‍ॅडमीन महोदय,

आपल्याला बारीक सारीक बाबतीत त्रास देण्याची इच्छा नसल्याने मी आपल्याला कोणतीच विनंती केली नव्हती. पण तुम्ही ह्या धाग्यावरील अनावश्यक प्रतिसाद नष्ट करून हा धागा पूर्ववत केलात त्यामुळे आनंद झाला.

कृपया लोभ असावा.

-'बेफिकीर'!

इच्छुकांना योग्य वाटल्यास हा धागा आता 'महाराष्ट्रात काय होणार' ह्या विषयावरील चर्चेसाठी वापरला जावा अशी विनंती!

-'बेफिकीर'!

काही अंदाजः

पार्श्वभूमी:

कॉ व राकॉ च्या प्रदीर्घ शासनाचा जनतेला उबग आलेला होता. ह्या प्रशासनाने सर्व गोष्टी वाईट केल्या वगैरे म्हणून नव्हे तर तीच तीच नावे दिड दिड दशक समोर होती. बदल आवश्यक आहे असे जनमत तयार झालेले होते. महाराष्ट्र ह्या दोघांचा बालेकिल्ला समजला जात असला तरी येथे शिवसेना व भाजपलाही बर्‍यापैकी स्थान आधीपासून होतेच. शरदराव पवार हे आता इतके ज्येष्ठ झालेले आहेत की ते स्वतः ना कोणते पद घेणार ना राजकारण करत बसणार अशीही एक भावना जनमानसात निर्माण झाली असावी हा अंदाज आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकांमध्ये केंद्रातही सत्तापालट झाला व तीस वर्षांनी सुस्पष्ट बहुमत असलेला पक्ष सत्तेवर आला. ह्यामुळे 'हा पक्ष स्थैर्य देऊ शकेल' अशी एक प्रतिमा बहुधा उगाचच निर्माण झाली. तो पक्ष सत्तेवर येण्याची कारणे ह्या लेखात देण्याचा प्रयत्न केला होता. तेच वातावरण अजूनही आहे अशी धारणा किंवा भ्रम हे ह्या बदललेल्या राजकीय सारीपाटाच्या मुळाशी असलेले कारण असावे.

धारणा - काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ह्यांना भाजपच्या झपाट्याची मनातून निश्चितच भीती वाटत असणार. ह्याचे पडसाद काही पक्षबदल होण्यातून जसे दिसले तसेच 'आपली युती ठेवायची की नाही हे सेना-भाजपचे काय होते ह्यावर ठरवू' ह्या भूमिकेतही दिसले. वेळ आलीच तर ह्या दोघांची नंतरही युती होऊ शकते आणि वेळ आलीच तर मुद्यांवर विसंबून मनसेही ह्यांना पाठिंबा देऊ शकते हे आघाडीने ओळखले. समजा एखादा मतदारसंघ राकाँचा पारंपारीक मतदार संघ आहे. तेथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राकाँचा प्रचार करावा लागणे हे अपमानास्पद व लष्कराच्या भाकरी भाजण्यासारखे वाटणे साहजिक आहे. (तसेच काँग्रेसच्या मतदारसंघात राकाँच्या कार्यकर्त्यांना वाटणार) (असेच सेना-भाजपचेही). आजवर पंधरा वर्षे हे होत होते पण त्याचबरोबर सत्ताही मिळत होती. आता सत्ता मिळेलच असे नाही हे लक्षात आलेले आहे. त्यामुळे पराभवाची शक्यता वाढलेली असताना दुसर्‍या पक्षासाठी तरी का म्हणून प्रचार करायचा ही कार्यकर्त्यांची भावना जोर धरू लागली. खालून वर आलेल्या ह्या वैचारीक लाटेच्या दबावापुढे हायकमांडला मान तुकवणे केव्हातरी भाग पडणारच. त्यापेक्षा आपले आपले लढून आपली नेमकी ताकद किती ते जोखून त्या बळावर नंतरची घासाघीस करणे सोयीचे ठरले. ह्या सगळ्या विचारांच्या मागे 'अजूनही मोदी लाट आहे व भाजपची जादू चालणार' ही धारणा आहे असे वाटते.

भ्रम - शंभर सव्वाशे दिवस जरी सव्वाशे कोटीच्या देशातील सरकारच्या कामगिरीचा आढावा घ्यायला फारच अपुरे असले तरीसुद्धा मुळात मोदींनी भ्रमनिरास केला अशीही एक भावना समांतररीत्या जोर धरू लागलेली आहे. ही भावना निव्वळ विरोधकांच्याच मनात नव्हे तर स्वपक्षीयांच्याही मनात आहे असे वाटते. मोदींनी प्रभाव पाडण्यासाठी अवलंबलेली तंत्रे स्वस्त वाटू लागली आहेत. कोठे लाल कुर्ता घालणे, कोठे शाळेतल्या मुलांना भाषण ऐकायला लावणे, कोठे परदेश दौरेच काढत बसणे वगैरे! अमित शहा ही असामी राजकीय वर्तुळात अचानकच इतक्या महत्वाची झालेली असून तिच्याबाबतची प्रतिमा ठरवायला जनतेलाही अवधीही मिलालेला नसल्याने त्या असामीचा प्रभाव तूर्त तरी नकारात्मक वाटत आहे. त्यातच त्यांनी मातोश्रीला जाणे टाळण्याचा प्रयत्न करणे हे सेनेला दुखावणारे आहे. मुंडेंच्या अकाली निधनामुळे पडलेली पोकळी आणि पंकजाताईंचे अचानक राज्याच्या राजकीय क्षितिजावर उगवणे हे जनतेला फार काही उमेद देऊ शकत नाही आहे. मुख्य म्हणजे भाजपची देहबोली कधी नव्हे इतकी आक्रमक आणि असमर्थनीय झालेली आहे. त्यातच शिवसेनेला चटक लागली आहे 'नक्की मिळू शकणार्‍या सत्तेची'! बाळासाहेबांची आक्रमकता आणि स्फुर्तीदायकता माझ्यातही आहे हे दाखवण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न सेनेला आवडत असेलही, पण बाहेरच्यांना तो क्षीन व केविलवाणा वाटत आहे. मनसेचे इंजिन गेले काही महिने यार्डात दुरुस्तीसाठी थांबलेले आहे. शरद पवारांच्या देहबोलीतील आक्रमकता नावालाही उरलेली नसल्यासारखे वाटत आहे. ह्या सर्वामुळे भाजपची पुन्हा लाट येणार हा भ्रम / संभ्रम निर्माण झालेला आहे. ह्या भ्रमापोटी ही युती चालू ठेवण्याची काही एक गरज नसल्याचा आव ह्या दोन पक्षांना घेता आला आहे व हे दुर्दैवी आहे.

एकुण, दोन्ही युती मोडल्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेसमोर राजकारणाची खिल्ली उडालेली आहे हे धुरंधर राजकारण्यांना माहीत असले तरी ते बेदरकार आहेत कारण त्यांच्याशिवाय पर्याय उपलब्ध नाहीत. जनता मात्र कधी नव्हे इतकी खवळलेली असावी. किंबहुना, कोणताच पक्ष लायकीचा नाही असे मत सामान्यांकडून जेथे तेथे वारंवार बोलू दाखवले जात आहे.

जागावाटप -

जागावाटपाचा प्रश्न निकालात निघालेला असून आता जो तो स्वबळावर लढणार आहे. अर्थातच आता समीकरण 'जिंकू शकत असाल तर तिकीट' ह्या एकमेव निकषावर येऊन स्थिरस्थावर होईल.

प्रचार -

प्रचाराला कदाचित कधी नव्हे इतका जोर येईल. ह्याचे कारण आता जो तो 'प्रचार करून विजय मिळाला तर तो विजय आपला स्वतःचा असणार आहे' हे जाणून प्रचार करेल. ह्या प्रचाराच्या हल्लकल्लोळात आपली प्रतिमा टिकवण्याच्या उद्देशाने कदाचित भाजप व सेना एकमेकांबद्दल जपून बोलतील पण काँ आणि राकाँ हे मात्र पातळ्या ओलांडतील. तसेच, लोकसभेत निलेश राणेंनी जिंकू नये म्हणून राकाँने केलेले प्रयत्न (हे एक उदाहरण) हे आता ढळढळीतपणे केले जातील, छुपेपणाने नव्हे. मनसे चारही पक्षांवर अमाप तोंडसुख घेईल. पतंगराव कदम, राणे, छगन भुजबळ, आबा पाटील व उद्धव ठाकरे ह्यांच्या भाषणांनी वातावरण ढवळून निघेल. कदाचित प्रचारासाठी सर्वात कमी कालावधी उपलब्ध असलेल्या ह्या निवडणूकीतील प्रचाराची रणधुमाळी आजवरची सर्वात कर्कश्श्य व काही ठिकाणी प्रसंगी हिंसक वळण लागणारी ठरू शकेल.

मतदान -

मतदानाचा टक्का घटेल असे मात्र आत्ता सध्या वाटत नाही आहे. मतदान घसघशीत होईल पण पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी अर्थातच विभागली जाईल. किंबहुना, एखादवेळेस मतदार 'जीव खाऊन'ही मतदान करतील. पण पुढे काय होणार हा निराशाजनक विचार मतदाराच्या मनाच्या तळाशी असेलच. त्याचप्रमाणे, अनेक ठिकाणी फेरमोजणीचे दावे केले जातील. आरोप प्रत्यारोप नेहमीच झडतात पण ह्यावेळी राजकारणाचा अतिशय दुर्दैवी रंग समोर येण्याची शक्यता वाटते.

निकाल -

निकाल विभागून लागतील, पण एकुणात भाजप व सेनेकडे मतदानाचा कल असल्याचे स्पष्ट होईल. अर्थात तसे दावे प्रत्येकच बाजूने होतील. स्टॅटिस्टिक्सचा आधार फक्त बोलबच्चनांना मिळतो ही उक्ती प्रथमच खोटी ठरू शकेल. प्रदीर्घ चर्चाफेर्‍यांनंतर बहुतेक समीकरण असे असेल.

भाजप हे सेनेशिवाय व सेना भाजपशिवाय कोणाशीही हातमिळवणी करणार नाही. तसेच दोन्ही काँग्रेस एकमेकांना सोडून अजिबात दुसरीकडे तोंड वळवणार नाहीत. अश्यात मनसे, अपक्ष व आत्ता तुटलेल्या युतीतील लहान घटकपक्ष ह्यांना सोन्याचा भाव येईल. वरवर बोलायला धर्मनिरपेक्षता किंवा काँग्रेसमुक्त राज्य ह्या मुद्यांवर हातमिळवण्या होतील.

पश्चातकाल -

शिवसेनेला प्रथमच बाळासाहेबांची अनुपस्थिती म्हणजे काय असते ते जाणवेल. मनसेला कितीही भाव मिळाला तरी तळागाळात मनसेचे कार्यकर्ते हताश होतील. आपापले बालेकिल्ले सांभाळून जिंकलेले दादा, आबांसारखे व राणे, कदमांसारखे दिग्गज अत्यंत कडवट भूमिका घेऊन वक्तव्ये करू लागतील. ह्यावेळी शरद पवारांचे राजकारण खर्‍या अर्थाने सुरू होईल. कोणाच्या खिजगणतीतही नसलेली समीकरणे प्रत्यक्षात आणण्यासाठी पवारसाहेब आपले वजन वापरतील.

प्रतिमा -

मोदी तेव्हाही प्रधानसेवक बनल्याच्या धुंदीत वेगळेच काहीतरी करत असतील. सोनिया व राहुल आपापली स्टेटमेंट्स देऊन पटकन् मोकळे होतील. अमित शहांच्या कारकीर्दीवर मोठा काळा डाग बसेल. एकुणातच भाजपची प्रतिमा मलीन होईल. जल्लोध धड कोणालाच करता येणार नाही, पण दु:ख मात्र सगळ्यांनाच समान होईल.

-'बेफिकीर'!

कॉ व राकॉ च्या प्रदीर्घ शासनाचा जनतेला उबग आलेला होता. ह्या प्रशासनाने सर्व गोष्टी वाईट केल्या वगैरे म्हणून नव्हे तर तीच तीच नावे दिड दिड दशक समोर होती.
<<
काहीही बदल फुदल होणार नाहिये. तीच नावे वेगळ्या रंगाचे कपडे घालून लाल दिव्याच्या गाड्या बळकावून मंत्रालयात बसणार आहेत. तेच नेहेमीचे 'मध्यस्त' अन 'पीए' लोक तुमची लिगल्/इल्लीगल कामे करवून घेण्यासाठी पैसे चारत फिरणार आहेत.

आपण मात्र खड्डेदार रस्त्यांवरचे टोल भरत, ३-४ दिवसांतून एकदा येणारं जेमतेम पिणेबल केलेलं पाणी पिउन, ऐन उन्हाळ्यात गायब होणार्‍या विजेच्या लहरी सहन करत अच्छे दिन आलेत म्हणून इथे भांडण करत बसणार आहोत.

Pages