Ice Bucket Challenge -एक खूळ

Submitted by कूटस्थ on 17 September, 2014 - 00:04

मा बो वर माझी ही पहिलीच पोस्ट. चू. भू. क्षमा असावी.
-
मध्ये काही दिवसांपूर्वी 'शीतपात्र आव्हान' (ice bucket challenge- दुसरा शब्द सुचला नाही..आणि त्यावर विचार करावा इतकाही तो महत्वाचा वाटला नाही. असो.) नावाचा खुळचटपणा एका 'थोबाडपुस्तिका' (Facebook) नावाच्या एका प्रचलित सामाजिक देवाणघेवाणीचे स्त्रोत असलेल्या केन्द्रस्थळावर सुरु होता. नंतर याची 'टिवटिव' इतर केन्द्रस्थळावर (जसे की Twitter ) ही सुरु झाली. यामध्ये सुरुवातीला आव्हान स्वीकारणारा तो हा सर्व खटाटोप कशासाठी करत आहे हे केवळ एका वाक्यात पुटपुटतो (पहिल्यांदी पाहणाऱ्यास काहीच समजत नाही तो भाग वेगळा) आणि पुढे सुरु होतात वयास आणि विषयास सोडून असलेल्या त्याच्या मर्कटलीला! काय म्हणे तर एक बादली भरून बर्फ किंवा तत्समान थंड पाणी डोक्यावर ओतायचे आणि एकतर आपली कातडी गेंड्याची आहे आणि आपण इतके थंड पाणी विनासायास सहन करू शकतो असा आविर्भाव आणण्यासाठी मख्ख चेहरा करायचा किंवा अचानक थंड पाणी पडल्यावर आपण जरी माकडाचा माणूस जरी झालो असलो तरी पुन्हा किती सहजपणे माकड होवू शकतो अश्या उड्या मारायच्या. त्यात इथेच न थांबता आपल्या ३-४ माकडमित्रांनाही असा प्रकार २४ तासाच्या आत करून दाखवण्याचे आव्हान द्यायचे आणि न जमल्यास काही रक्कम एका सेवाभावी संस्थेला दान द्यायची. (आता हे माकडचाळे करण्याआधी सुरुवातीला हा माणूस जे बडबडतो त्याच्या आणि या सेवाभावी संस्थेचा काहीतरी संबंध आहे हे समजण्यास माझ्यासारख्या 'ढ' माणसाला थोडा वेळ लागला एवढेच). कालांतराने हा प्रकार कोणत्यातरी ALS नावाच्या दुर्धर रोगाविषयी जनजागरुकता निर्माण करण्यासाठी केला गेला आहे हे समजल्यावर मी डोक्याला हात मारला.

कोणीतरी बड्या(?) असामीने या प्रकाराची सुरुवात केली असावी असे मला वाटते. कोण ते मलातरी ठाऊक नाही. मी तरी सर्वप्रथम याचा video 'थोबाडपुस्तिका' केन्द्रस्थळावर त्याच्याच संचालकाने (मार्क झकरबर्ग त्याचे नाव) प्रसारित केलेला पहिला. नंतर त्याने काही प्रतिथयश व्यावसायिकांना नामनिर्देशन करून अनुकरण करावयास सांगितले आणि नाही केल्यास काही रक्कम दान करायची असाही नियम घातला.
अश्या video मधून ALS बद्दल अल्पशीही माहिती मिळत नाही. यावरून जनजागरुकता निर्माण करणे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखे आहे. आता ALS हा रोग अगदी सर्दी खोकल्यासारखा तुमच्या आमच्या सामान्य माणसाचा परवलीचा शब्द नसणार एवढे व्यवहारचातुर्य या प्रतिथयश व्यवहारचतुर व्यावसायिकांना कसे नाही याचे कोडे आजतागायत मला उलगडलेले नाही. तसेच हा खटाटोप निधी गोळा करण्यासाठी होता की न करण्यासाठी होता हया कोड्यात मी काय तर लहान मुलगाही नाही पडला तरच नवल. कारण एक बादली पाणी वा बर्फ डोक्यावर टाकणे हा चांगल्या कार्यासाठी दान न करण्याचा परवानाच होता. त्यात पुन्हा आव्हानापायी प्रतिष्ठा देखील पणाला लागलेली. तरीही काही व्यक्तींनी दोन्ही गोष्टी (दान आणि बर्फाच्या पाण्याने स्नान) करायचा समंजसपणा दाखवला हीच ती काय जमेची बाजू.
असेच आव्हान स्वीकारणाऱ्या एका प्रतिष्ठीत व्यक्तीने त्याच्या vedio मध्ये केवळ डोक्यावरून पाणी ओतण्यासाठी तयार केलेल्या यंत्राचा (?) आराखडा आणि ते यंत्रही दाखवले. तो आराखडा पाहून अचानकपणे मला देवाने तयार केलेला देहरूपी यंत्र किती किचकट असावा आणि ते तयार करण्यासाठी त्याला किती कष्ट करावे लागले असावे याचा तसेच त्याच्या कल्पक बुद्धीचा साक्षात्कार झाला आणि त्याबद्दल मनोमन मी त्याचे गुणगान ही गायले.( न्युटन ला केवळ सफरचंद डोक्यावर पडण्यावरून गुरुत्वाकर्षणाचा साक्षात्कार झाला होता त्यामुळे मला झालेला साक्षात्कार हा जगावेगळा नाही हे वाटून थोडा सुखावलो). कालांतराने हे प्रस्थ फोफावाल्यावर मूळ उद्देश्य बाजूलाच राहून आपण किती वेगळ्या प्रकारे बर्फाचे पाण्याने अंघोळ केली ही कल्पकता दाखव्ण्याकडेच सर्वांचा कल राहिला.

आता या सगळ्या गोंधळात सामान्य मनुष्य उतरला नाही तर तो सामान्य कसला? तसेही आजच्या पिढीला शिवराय, सावरकर यांच्या आदर्शापेक्षा 'सेलेब्रिटी'चे अनुकरण करण्यातच जास्त धन्यता वाटते. मध्ये एक मित्र म्हणाला "यार, रोज सेलेब्रिटी'चे, मित्रांचे ice bucket challenge चे video पाहतोय. मला मात्र कोणीच nominate करत नाहीये." त्याने विचारले, "तू करशील का मला nominate?" मी म्हणालो, "दुर्दैवाने ( खरे तर मला सुदैवाने म्हणायचे होते... कारण समजण्यास तुम्ही वाचक सुज्ञ असालच.) मलाही अजून कोणीही nominate केले नाही आणि सुरुवात स्वतःहून करायची माझी इच्छा नाही " हे ऐकून तो आनंदित झाला आणि मी बुचकळ्यात पडलो. पण त्याचा तो आनंद मीही त्याचा सम:दुखी आहे म्हणून नसून माझ्याकडून नकळतपणे मिळालेल्या एका भन्नाट कल्पनेमुळे होता हे मला काही दिवसानंतर थोबाडपुस्तिकेवरील त्याच्या भिंतीवर टाकलेल्या त्या दहा सेकंदात उरकलेल्या आंघोळीच्या video वरून समजले. पठ्याला nominate कोणी केले याबद्दल उत्सुकता चाळवली म्हणून पहिले तर साहेबांनी अस्तित्वात नसणाऱ्या मित्राचे नाव उगाचच घेवून आपली हौस भागवली होती. नंतर मात्र मला हे सत्य कळले हे समजल्यावर त्याने तब्बल तीन आठवडे माझ्याशी संवाद टाळला. माझ्या काही महाभाग मित्रांनी बाथरूम मध्ये केवळ अंतर्वास्त्रावर हा कार्यक्रम केलेला त्यांचा video पाहून आश्चर्य वाटले पण त्यांचा तो प्रकार रोगाविषयी जन जागरुकतेबद्दल नसून मैत्रीणीमध्ये आपल्या पिळदार शरीरयष्टीविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी होता हे मला त्यावर आलेल्या प्रतिक्रियेवरून समजले. परंतु बर्फाचे पाणी उघडबंब देहयष्टीवर पडताच शारीरिक प्रतिक्षेप क्रियेमुळे निर्माण झालेले त्यांचे नृत्य हे प्रख्यात बौलीवूड नृत्यकार श्री. सनी देओल यांनाही लाजवणारे होते याचा मात्र त्यांना मुलीच खेद नव्हता.

यानंतर काही दिवसातच अश्या स्नानकृत्याला विरोध करून पाणीबचतीचा संदेश देणारे आपण कसे जागरूक आणि सुज्ञ नागरिक आहोत हे दाखविण्याचाही काहींचा प्रयत्न झाला. थोडक्यात काय तर सर्वांनीच या 'वाहत्या पाण्यात' हात धुवून घेतले!
सुदैवाने सध्या ह्या मर्कटलीला थोड्याफार प्रमाणात थांबल्या आहेत हे एक बरे. त्या पूर्ण थांबोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नाहीतर इयत्ता पहिली मधल्या "जगामध्ये सर्वात जास्त बर्फ कुठे पडतो?" या प्रश्नाचे पानचट विनोदी उत्तर "दारूच्या ग्लासात" असे बदलून "माणूस म्हणून घेणाऱ्या मर्कटांच्या डोक्यावर" असे करावे लागले असते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त खुसखुशीत विनोदांनी भरलेला लेख.
आणि आईस बकेट चालेंज हा निव्वळ बावळट पणा होता याबाबत सहमत.
मायबोलीवर स्वागत.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

>> "जगामध्ये सर्वात जास्त बर्फ कुठे पडतो?" या प्रश्नाचे पानचट विनोदी उत्तर "दारूच्या ग्लासात" असे बदलून "माणूस म्हणून घेणाऱ्या मर्कटांच्या डोक्यावर" असे करावे लागले असते.<<

हे व एकुण च लेख भारी लिहिला आहे !!!
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

मला तर मुर्खपणा वाटला तो प्रकार. म्हणजे चुल्लुभर पाणी ओतून घ्यायचे, आणि त्यात फक्त एखादा बशीभर खडे टाकून.

ऋन्मेऽऽष , फेसबूकावर अकाऊंट नाही़ किंवा तो काढावा असा आत्तापर्यंत मोह झाला नाही याबद्दल अभिनंदन ! काही अपवाद वगळता उगाच लोकांच्या खाजगी बाबीत लक्ष घालण्याची माझी इच्छादेखील संपत चालली आहे Happy

इयत्ता पहिली मधल्या "जगामध्ये सर्वात जास्त बर्फ कुठे पडतो?" या प्रश्नाचे पानचट विनोदी उत्तर "दारूच्या ग्लासात" असे बदलून "माणूस म्हणून घेणाऱ्या मर्कटांच्या डोक्यावर" असे करावे लागले असते >>>. मस्त लिहलय .....:P

Ice Bucket Challenge म्हणजे असा प्रकार होय ? मला वाटलं दोन मित्र गुत्त्यावर खंबा आणि बर्फाची बादली घेऊन बसणार आणि संपवणार . Wink Proud

ऋन्मेऽऽष , फेसबूकावर अकाऊंट नाही़ किंवा तो काढावा असा आत्तापर्यंत मोह झाला नाही याबद्दल अभिनंदन !
>>>>>>>>

खरे तर डबल अभिनंदन करा, कारण काढून, महिनाभर वापरून, मग ते उडवले आहे.
एकदा चव चाखून व्यसन सोडवणे जास्त कठीण असते.

मित्र म्हणाल तर शाळेपासूनचे सर्वच काँटेक्टमध्ये आहेत, अगदी भेटीगाठी होतात, त्यामुळे निव्वळ दैनंदिन अपडेट शेअर करायला फेसबूकची गरज वाटत नाही, आणि मायबोलीसारखे संकेतस्थळावर दिवसभर वाचून होणार नाही इतके मनोरंजक लिखाण पोस्ट प्रतिसाद पडत असताना त्याच त्याच पांचट विनोद आणि विडीओसाठी फेसबूकावर उगाचच्या उगाच चक्कर मारा लाईक करा या भानगडी करायची गरज अजूनपर्यंत भासली नाही. Happy

>>एकदा चव चाखून व्यसन सोडवणे जास्त कठीण असते.>>
एकदम बरोबर. सध्या मला फेसबुक चे व्यसन सोडून मायबोलीचे व्यसन धरावे असे वाटत आहे. मा.बो. फेसबुकपेक्षा नक्कीच मनोरंजक आणि उपयुक्त आहे असे सध्या तरी जाणवत आहे Happy

सध्या मला फेसबुक चे व्यसन सोडून मायबोलीचे व्यसन धरावे असे वाटत आहे. मा.बो. फेसबुकपेक्षा नक्कीच मनोरंजक आणि उपयुक्त आहे असे सध्या तरी जाणवत आहे>>> १००%