मी एक ओरीजिनल आयडी

Submitted by गण्या. on 14 September, 2014 - 05:44

मी आहे एक ओरीजिनल आयडी!

तुम्ही मला ओळखलंच असेल. आणि नाही ओळखलंत तरी बिघडत नाही. मी सदोदित एकाच नावाने व रूपाने मराठी भाषिक संकेतस्थळांवर भिरभिरत असतो. ( काय करणार ! इमेज , इमेज ) मला निरनिराळी रूपे धारण करता येत नसल्याने खूप नैराश्य येते. मनातील सारे सल, चिडचिड, संताप, हेवा, वैताग, मळमळ, गरळ.... जे काही म्हणून आहे ते या संकेतस्थळांच्या पानांवर ओतावेसे वाटत असते. पण जाणिवपूर्वक जपलेली इमेज आड येते. जे काम ड्युआयडिळा जमते ते मला का जमू नये असं वाटून माझी चिडचिड होते. माझ्या बडबडीला भलेभल्यांनी घाबरावं असं मला नेहमी वाटतं. पण इमेज !! मला व माझ्या वावराला इतर वाचकांनी घाबरावं ही इच्छा माझ्या मनात दबून राहतेय., मी हल्ला केला की इतरांनी गप्प बसावे आणि माझ्या अक्राळविक्राळ गर्जना ऐकल्या की धूम ठोकावी असंही खूप वाटतं ! पण... बरोब्बर इमेज हो इमेज. आम्ही आपले पापभीरू.

वपुंनी म्हटलंच आहे की पापभीरू म्हणजे पाप उघडकीला येईल या गोष्टीला भिणारा तो पापभीरू. मलाही वाटतं हो ड्युआयडी घ्यावा आणि यथेच्छ पापं करावीत. पण सांगितलं ना आम्ही पापभीरू. संधी मिळत नाही म्हणून पापभीरू. म्हणजे मिळत नाही असं नाही, पण भीड चेपली नाही ना म्हणून पापभीरू. ओरीजिनल !! एकदम १००% ओरीजिनल आयडी. सुद्ध देसी घी ! चान्स मिळाला नाही म्हणून भेसळ न झालेलं ओरीजिनल एगमार्क वालं म्हणजे आम्ही. मग जे केलं नाही ते करायला मिळत नाही म्हणून रडण्यापेक्षा आमच्या शुद्धतेचा टेम्भा मिरवत आम्ही प्रति पक्षाला आमच्या सात्वितकेचे दाखले देऊन गप्प करत असतो. ड्युआयडीला सपोर्टर्स नसतात. असलेच तर राजकीय भांडाभांडी करणारे कंपू असतात. पण इथे ते एक दोन तर आहेत. त्यांचे ते आपापल्या कार्यात मग्न असतात. कुणी लक्ष देवो न देवो, वाहत्या धाग्यावर त्यांचे युद्ध कायम जुंपलेले असते. एकजण कुणीतरी काहीतरी लिहीतो की दुसरा ते वाहवून टाकतो. तरी देखील ते तिथेच लढाई लढाई खेळत असतात. नवं मैदान बनवावं, ते पुरेसं मोठं असावं, तिथं सोयी सुविधा असाव्यात असं त्यांच्या मनात देखील येत नाही. मग वाहणा-या धाग्यावर फाऊल करणा-या योद्ध्याला रेफ्री शिट्टी मारून बाहेर काढतात. त्यांना त्याची सवय असते. ते लगेच जर्सी बदलून पुन्हा खेळायला हजर होतात.

आम्हाला त्यांचा खेळ पाहून हेवा वाटतो. पण तिथे काही लिहीता येत नाही. कारण इग्नोर करावे अशी इथली रीती परंपरा. ओरीजिनल आयडीने कसं वागावं याचे काही संकेत इथं ठरलेले आहेत. घरंदाज स्त्री ने कसं परपुरूषाकडे न पाहता आपला मार्ग तुडवावा तसं ओरीजिनल आयडीने देखील ड्युआयडींकडे लक्ष देऊ नये , त्यांच्या लिखाणाला दाद देऊ नये, विनोदाला हसू नये, वादविवादात युक्तीवादाला दाद देऊ नये असं वागावं लागतं. असं वागलं नाही की संपर्कातून मेल येतात धडाधड. त्या अमूक कडे लक्ष देऊ नकोस, चिखलात दगड मारण्यासारखं आहे असे मेसेजेस विपूत येऊन पडतात. नकोच ते !

पण आज इथे मी माझ्या मनातली वेदना उघड बोलून दाखवणारच आहे! मला हे कधीपासून कोणाला तरी सांगायचे आहे... पण काय करणार! हवी तशी संधीच मिळत नव्हती. आता इथे हक्काचे व्यासपीठ मिळालेच आहे तर त्या संधीत हात-पाय धुवूनच काय, सचैल स्नानच करून घेतो! तर, ड्युआयडींना विसरता येत नाही. माझ्या मनात मनात त्यांची आठवण रेंगाळते. मला एका कुचकट, तर्कट, खवीस म्हातार्‍याचा अवतार आजही आठवतो. . काय घाबरायचे लोक त्यांच्या प्रतिक्रियांना! ते सतत घालून-पाडून, लागेल असे बोलायचे, टोमणे हाणायचे. ओतीजिनल आयड्यांची आंतरजालावरची पातके - प्रमाद खोदून त्यांच्या पुढ्यात त्यांचे माप घालायचे. लोक भीती-लाज-शरमेपोटी अर्धमेले व्हायचे, काहीजण तर अंतर्धानच पावायचे. निरनिराळ्या संकेतस्थळांची भूमी आजोबांनी या अवतारात पादाक्रांत केली आणि तिथे त्यांच्या जहरी अस्तित्वाचे निशाण फडकवले. पण त्यांचा हा विजय अनेकांच्या डोळ्यांत खुपला. त्यांनी त्या त्या स्थानांच्या प्रशासकांकडे तक्रार केली आणि त्यांची गच्छंती झाली! मला हे रूपडं खूप आवडलं होतं. असं व्हावंसं मला मनापासून वाटत होतं.

आमच्या नशिबी काय तर वादविवादात हिरीरीने भाग घेणे. मग कुणीतरी सेन्सीबल प्रतिसाद म्हणेपर्यंत प्रतिसाद देत राहणे. कधी कधी लोक फक्त छान लिहीलय असं म्हणतात. त्याने समाधान होत नाही. जोपर्यंत सेन्सीबल हा शब्द येत नाही तोपर्यंत मग प्रतिसाद दिले जातात. आणि एकदा तो शब्द आला की जितं जितं होऊन जातं. मग त्या शब्दाची नशा चढते आणि पुन्हा पुन्हा, पुन्हा पुन्हा प्रतिसाद दिले जातात. जग जिंकल्याचा आनंद मिळत असतो. अशा वेली एखादा ड्युआयडी येतो आणि एका वनलायनरने सगळ्या लिखाणातली हवा काढून घेतो. मला खात्री असते की जरी इग्नोर केलं तरी लोक मला हसत असतात. बोलून चालून ड्युआयडीच तो. त्याला ना कसली लाज, लज्जा, ना कसली तमा. आमच्या मात्र इमेजचा भाजीपाला होऊन जातो. अशा ड्युआयड्यांचा मला भारी राग येतो. जे ड्युआयडी इतरांची मज्जा करतात ते मात्र मला आवडतात.

एक ड्युआयडी कि नै एक माथेफिरू, सैरभैर सुटलेला नवतरुण बनला होता.. हवं तसं वागणारा, हवं ते बोलणारा... बाकीचे लोक आपल्या 'ज्येष्ठत्वा'चा गैरफायदा घेऊन त्याला पकवायला गेले की तो त्यांना अपमानित करत असे., त्यांची छीः थू केरत असे, त्यांना शाब्दिक चाबकांचे फटकारे देत असे.... पण तरी ही मंडळी आपसांत लागलंच नाही असं दाखवत '' जाऊ देत, लहान आहे तो अजून वयाने... कळेल त्याला हळूहळू...'' अशी चर्चा करू लागत. पण मला ही अवस्था चांगलीच माहीती आहे. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही असं त्याचं वर्णन केलं जातं. आपली फजिती होत असताना आपण हहगलो स्मायल्या टाकून मी किती खिलाडू आहे हे दाखवायचं असतं. छे ! पण यातला फोलपणा सर्वांनाच माहीती असतो. वाटतं... एक ड्युआयडी काढावा आणि वचपाच काढावा... पण काय करनार ? पापभीरू पडलो ना !

मग मी ड्युआयडींवरचा एक लेख वाचला. त्या महालेखात ड्युआयडींनी स्वतःवरच टीका केली होती. आपले किती आयडी आहेत हे मज्जा म्हनून सांगितले होते. कुणी कुणी तर मी एक्सेल शीट बनवलेले आहे असं सांगितलं होतं. त्यांचं ते हसणं खिदळणं मला सहन होईना. आमच्या संस्थळावर हसतात म्हणजे काय ? सभ्यपणा, शिष्टसंमत पद्धतीने वागणे कशाला म्हणतात हे यांच्या गावीही नसावं. मग मी तीच माहीती घेऊन त्याचं आरोपात रुपांतर केलं. त्यांच्या जगात ज्या गंमतीजमती होत्या त्या आमच्या जगात नीच कर्मं ठरत होत्या. ड्युआयडींच्या संघटनेच्या त्या बाफवरून पिंजून काढलेली माहीती मी बेमालूमपणे माझ्या लेखात वापरायचं ठरवलं. म्हणजे माझे बाण फुकट जाणार नाहीत ही खात्री होती. झालंही तसंच. त्यांचीच माहीती वापरून मारलेल्या बाणांनी अनेक ड्युआयडी विद्ध झाले. तसं काही ओरीजिनल आयडींनी कळवलं देखील.

पण मला प्रतिसाद काही मिळेनात. मला कळेना. असं का व्हावं. किमान ओरीजिनल आयड्यांनी तरी प्रतिसाद द्यावेत ना ! मी एक ओरीजिनल आयडी असल्याने प्रतिसादाचं हपापलेपण मला दाखवणे निषिद्ध आहे. प्रतिक्रिया पण धमाल वगैरे आल्याच नाहीत. का ब्बरं असं ? त्या ड्युआयड्यांच्या लेखावर कसे सगळे दात काढून हसत होते. आता एका ओरीजिनल आयडीने सात्विक भाषेत लिहील्यावर का बरं असं व्हावं ?

तर माझ्या संपर्कातून एका ड्युआयडीची मेल आली होती. तुला माझे आयडी माहीत आहेत असं दिसतंय. तरीही तू मला का झोडपलस ? नाव सांगत बसत नाही. ते तुला माहीतच आहे. आपल्या मैत्रीचं बक्षीस तू असं देशील हे मला माहीत असतं तर तुझ्या प्रतिसादांना कधीच सेन्सीबल म्हटलं नसतं असं एका निळ्या बाहुलीसकट कळवलं होतं. मी कपाळालाच हात लावला. अंधारात कुणा तरी सभ्य आयडीला पण बाण लागला होता. मला कसं तरी वाटू लागलं. दुस-या दिवशी सविस्तर उत्तर द्यावं म्हणून मेल बॉक्स ओपन केला तर आणखी असेच मेल्स येऊन पडले होते. सर्वच ओरीजिनल आयडिंनी त्यांच्या ड्युआयडीद्वारा तक्रारी केल्या होत्या.

नाही, याची मी निश्चितच अपेक्षा केली नव्हती. सभ्य आयडींचे पण ड्युआयडी असू शकतात ही शक्यता काही मनाला स्पर्शून गेलीच नव्हती.मला या आयडींच्या मागचा कुठलाच प्रतिष्ठीत आयडी माहीत नसल्याणे उत्तर द्यावं तरी पंचाईत, न द्यावं तरी पंचाईत अशी अवस्था झाली. काय करावं कळेना. माझी बाजू जर कळाली नाही तर इथून पुढे मला सेन्सीबल प्रतिसाद अशी दाद कोण देणार ?

आणि नाही कळाली बाजू तर आता हेच ड्युआयडी डूख धरणार...

मग विचार करकरून डोकं दुखायला लागलं. आता बाम चोळून झोपणार इतक्यात माझ्या डोक्यात वीज चमकली. येस्स ! हेच करायला हवं असं म्हणत गुणगुणत मी कीबोर्ड ओढला. त्याच्या मागे लिहून ठेवलेल्या आणीबाणीच्या ड्युआयडीचा पासवर्ड वाचला आणि नवा लेख लिहायला घेतला

" मी एक ओरीजिनल आयडी "

- गण्या, गणोबा, गणेश

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Proud

मी एक ओर्जिनल आयडी आहे असे छातीठोकपणे सांगणे हा अभिमान झाला.
माझे कित्येक डुआयडी आहेत हे फुशार्क्या मारत सांगणे हा माज झाला.

माझ्यामते डुप्लिकेट आयडी बनवणे वेस्ट ऑफ टाईम आहे. केलेले लिखाण/पोस्ट/प्रतिसाद आणि खर्चिलेला वेळ फुकटच जातो. या आंतरजालावर जे तुमच्या स्वताच्या नावासमोर लागत नाही ते तुमच्या स्वतासाठी तरी व्यर्थ आहे.

त्यामुळे अभिमानाने बोला, गर्व आहे मला एक ओर्जिनल आय डी असल्याचा Happy
...... (गर्व हिंदीतला)