सुमीतचे म्हणजे माझ्या नवऱ्याचे स्थळ मला आले तेव्हा माझ्या मनात पहिला प्रश्न रुंजी घालायला लागला "घरी कुत्रे आहे का?". पाळीव, रानटी अथवा भटके कोणतेही कुत्रे असो, माझ्याशी ह्या सर्व जमातीचा उभा दावा आहे. रस्त्यावर समोरून कुत्रे दिसले तर रस्ता क्रॉस करून त्या मी कुत्र्याला टाळायचा अतोनात प्रयत्न करते. पण दुर्देवाने नेहेमीच माझा प्रयत्न फसतो. आणि रस्त्यावरील सगळी कुत्री कट करून माझ्या अंगावर धावून येतात. असो.
तर आम्ही स्थळ पहायला निघालो. नवरा तेव्हा ऑस्ट्रेलिया मध्ये होता, तेव्हा त्याला भेटता येणारच नव्हते. नुसतेच घर बघणे आई-वडिलांना भेटणे ह्यातच वेळ जाणार होता. घराच्या खाली पोहोचलो आणि वर गच्चीकडे नजर टाकली. आमच्या स्वागतालाच हरिणीचे भुंकणे सुरु झाले. मी आईला तेथेच म्हटले की नाहीतरी मुलगा भेटणारच नाही तेव्हा आपण परतच फिरू आणि नंतर ह्या स्थळाला नकार कळवून टाकू. तर बाबा वैतागलेच. आता घरी कुत्रे आहे हे नकार देण्याचं कारण आहे हे काही माझ्या आई-वडिलांना पटेना. मी म्हटलं तुम्हाला कशाला पटेल? उद्या लग्न झाले तर इथे मला राहायचे आहे तुम्हाला नाही. पण दोघांनी दामटवून मला आत नेले. आत गेल्यानंतर माझ्या सासू सासऱ्यांनी आमचे यथोचित स्वागत केले. इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर माझ्या सासूबाई म्हणाल्या "तुला प्राण्यांची आवड आहे ना? कारण आमच्या सुमीतला प्राण्यांची फार आवड आहे आणि त्याला तशी आवड असणारी बायको पाहिजे". मी लगेचच "तशी फारशी आवड नाही" असे सांगून टाकले (सुंठीवाचून खोकला गेला तर बरेचं होईल!!!). मग त्या म्हणाल्या "आमच्याकडे कुत्रे आहे तुला पाहायचं आहे का?" मी लगेच नको म्हणून टाकले. एक तर ह्या मुलाशी लग्न होणार की नाही ते माहित नाही आणि उगीचंच ह्यांचे कुत्रे पहा आणि खोटे खोटे "फार छान आहे". वगैरे म्हणा!! कशाला पाहिजे असा विचार करून मी स्वस्थ बसून राहिले.
महिन्याभरानी सुमीत आला आणि मी त्यालाही भेटले. तत्पूर्वी ई-मेल, चॅट वगैरे सोपस्कार झालेले होते. प्राण्यांची आवड आणि घरी कुत्रे हे दोन मुद्दे सोडले तर मला सुमीतमध्ये नकार देण्यासारखं खरेच काही वाटले नाही. आणि मी लग्नानंतर ऑस्ट्रेलियाला जाणार होते. तिथे काही कुत्रं-मांजर किंवा इतर प्राणी पाळले नव्हते. ह्याचाच आधार घेऊन मी सुमीतला होकार दिला आणि त्यानी पण मला होकार दिला. झाले!! माझे लग्न ठरले…ते ही अशा घरात कि जिथे कुत्रे आहे. सासूसासरे, सासरची इतर माणसे कशी असतील ह्यापेक्षा माझ्यावर जास्त ताण हरिणीचा होता. ऑस्ट्रेलियाचा विसा येईपर्यंत सासरी राहायचे होते तेव्हा हरिणीशी ओळख करणे अत्यावश्यक होते. पण तिने तर जीवात जीव असेपर्यंत माझ्यावर भुंकायचे ठरवले होते. पुष्कळ वेळा ती माझ्या अंगावर धावून यायची पण मग घरातले कोणीतरी तिला control करायचे. मला वाटायचे की हे लोक तिला बांधून का ठेवत नाहीत. तर सुमीत म्हणायचा की "तू आलीस आणि तिला बांधले तर ती तुझा अजूनच राग राग करेल. तेव्हा तिला तुझी आणि तुला तिची सवय लवकरात लवकर व्हायला हवी." लग्न ठरल्यानंतर सगळे दिवस ही सवय करण्यातच गेले. लग्न झाले, सुमीत ऑस्ट्रेलियाला गेला आणि माझी सत्वपरीक्षा चालू झाली. अजूनही मला हरिणीची भयंकर भीती वाटायची. तिच्यापासून चार हात लांब राहणे मला सोपे वाटायला लागले. कमीतकमी वेळा आम्ही दोघी एकमेकींसमोर येऊ अशी काळजी मी घ्यायला लागले. पण कळत नकळत जशीजशी मी त्या घरात रूळत होते तशीतशी हरिणी बरोबर सुद्धा रुळत होते. तिलाही माझी हळूहळू सवय व्हायला लागली होती. आता माझ्यावर भुंकणे जवळजवळ बंद झाले होते. यथावकाश माझा ऑस्ट्रेलियाचा विसा आला आणि माझी जाण्याची तयारी सुरु झाली. खरेदी, सामान भरणे, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणीच्या भेटीगाठी. हे सगळं होताहोता जायचा दिवस आला.
मी निघण्याच्या दिवशी हरिणी एवढेसे तोंड करून बसली होती. तिला पाहून मला कसेसेच वाटायला लागले. माझ्या मनात विचार आला कि आम्हा दोघींना एकमेकींचा एवढा लळा कधी लागला?? आणि इतक्या दिवसा मध्ये मला हे कळले कसे नाही!! तिची भीती वाटणे जरी कमी झाले असले तरी असा तिचा लळा लागेल ही कल्पनाच मी केली नव्हती. त्यानंतर ऑस्ट्रेलियातून भारतात कधीही फोन केला की मी तिची आवर्जून चौकशी करत असे. स्काइप चालू झाल्यापासून तर ती आम्हाला दिसायला सुद्धा लागली. दरवर्षी भारतात जाताना तिच्यासाठी न विसरता आम्ही काही ना काही भेटवस्तू घ्यायचो. आम्ही घरी गेलो की ती आनंदाने नाचून घर डोक्यावर घ्यायची आम्ही नेलेल्या भेटवस्तू अगदी आनंदाने वापरायची (तिला त्यातील किती कळत होते हे तिलाच ठाऊक. पण आम्हाला मात्र फार आनंद व्हायचा). भारतात असेपर्यंत आमचा बराचसा वेळ तिच्याशी खेळण्यात जायचा. तिला घेऊन आम्ही बऱ्याचशा ट्रिप्स सुद्धा केल्या. बाहेर हिंडायला मिळालं की ती सुद्धा खूप खूष असायची
हरिणी भारतीय जातीची कारवानी कुत्री होती. सुमीतला भारतीय जातीचे कुत्रे पाळायचे होते आणि ते ही हाउंड. तिचे नावही मराठी असावे असा त्याचा आग्रह होता. जोरात पळणाऱ्या जातीची होती म्हणून तिचे नाव हरिणी ठेवले. तिला घरी कसे आणले हे लिहायचे असेल तर एक वेगळा लेख लिहावा लागेल. एवढेच सांगते की कुर्डूवाडी पासून जवळच शिंगेवाडी कारंगा नावाचं एक छोटे खेडेगाव आहे, तेथील धनगरांकडे ह्या जातीची कुत्री असतात. तेथून हरिणी आमच्या घरी आली होती. ह्या जातीची कुत्री दिसायला फार गोंडस नसतात. अगदी काटक अंगयष्टी असणारी ही कुत्री थोडी बावळट दिसतात पण पहारा द्यायला अतिशय तिखट असतात. आमच्या घराजवळ एक छोट्या मुलांची शाळा आहे तेथील मुले तिला बकरी म्हणून हाक मारायची. कारण त्यांच्या मते ती बकरी सारखी दिसायची. तिच्या अशा युनिक दिसण्यामुळे हरिणी आमच्या जवळपास च्या भागात फार प्रसिद्ध होती. एकदा एक वृद्ध नातेवाईक आमच्या घरी यायचे होते. रिक्षावाल्याला त्यांना धड पत्ता सांगता येईना. शेवटी ते म्हणाले "जवळपासची खूण माहित नाही पण त्यांच्या घरी एक हडकुळं काळं कुत्रं आहे." रिक्षावाला नेमका आमच्या घराजवळच्या भागातला होता. तो म्हणाला "मग असं सांगा ना आजोबा की हरिणीच्या घरी जायचं आहे". आणि त्यानी बरोबर आजोबांना आमच्या घरी आणून सोडले. आता घर आमचे राहिले नव्हते हरिणीचे झाले होते!!! अगदी थोड्याच कालावधी मध्ये हरिणी आमच्या कुटुंबातील एक प्रमुख घटक झाली होती. तिच्या दिनचर्येप्रमाणे आम्ही आमचे कार्यक्रम ठरवायचो. पहारा द्यायला सुद्धा ती अतिशय तिखट होती. ती असली की आम्हाला सासू-सासऱ्यांची काळजी नसायची, त्यांच्या सोबतीला कोणीतरी आहे हा दिलासा असायचा. तिच्यामुळे त्यांचाही वेळ मजेत आणि आनंदात जायचा.
हरिणीचे एकेक किस्से तर फार मजेशीर आहेत. ती आमच्या घरी नवीन होती तेव्हाची गोष्ट आहे. तिने आधी आरसा पहिला नव्हता. अचानक एक दिवस कपाटाच्या आरशात तिला स्वत:चे प्रतिबिंब दिसले. तिला वाटले आपल्या हद्दीत कोणता कुत्रा आला, म्हणून आरशा समोर उभे राहून जोरजोरात भुंकायला लागली. थोड्या वेळाने कपाटाच्या मागे जाऊन अंदाज घेतला, पुन्हा आरशा समोर उभी राहून भुंकायला लागली. दिवसभर हा खेळ चालू होता. मग तीच कंटाळली किंवा तिला कळले असेल की हे आरशातले कुत्रे काही बाहेर येणार नाही. मग आरशाचा नाद सोडला. घरातील माणसांच्या जवळ राहायला तिला फार आवडायचे. तिला एकटीला सोडले की भयंकर संताप यायचा. मग जवळ जे काही कागद मिळतील ते सर्व फाडून तुकडे करून घरभर पसरवायचे काम ती करायची आणि मग तिची समजूत काढत घर परत आवरायचे काम आम्ही करायचो. आम्ही गप्पा मारत बसलो की तिच्या अंगावरून सतत हात फिरवायचा असा नियम तिने आम्हाला घालून दिला होता. त्यात जरा जरी खंड पडला तर तिच्या नाकाने आपला हात उचलून ती आम्हाला आठवण करून द्यायची "हात फिरवायचे का थांबलात?". सकाळी उठून तिला Good Morning म्हणालो की Shake Hand केल्या सारखा एक पाय ती आमच्या हातात देऊन आम्हाला प्रतिसाद द्यायची. अशा असंख्य आठवणी आम्ही आमच्या मनात जपून ठेवल्या आहेत. पण १३ वर्ष आम्हाला साथसंगत केल्यानंतर आम्ही ह्यावर्षीच्या भारतभेटीवर असताना हरिणी आजारी पडली आणि त्या आजारपणातच अगदी ३-४ दिवसामध्येच ती गेली. आमचे पूर्ण कुटुंब अजूनही ह्या धक्क्यातून सावरत आहे.
हरिणी विषयी सुरुवातीला असणारी उदासीनता ते तिच्यावर जडलेली माया हा माझा प्रवास खूप महत्वाचा आणि फार छान होता. माझे बरेच समज-गैरसमज तिच्यामुळे दूर झाले. प्राणी जेव्हा प्रेम करतात तेव्हा त्यात कोणताही स्वार्थ नसतो आणि म्हणून प्राण्यांचा लळा खूप पटकन लागतो. प्राण्यांशी मैत्री केल्याने आपल्या सर्व नैसर्गिक भाव-भावनांना वाट मिळते. कोणीतरी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करत आहे ही भावना खूप दिलासा देणारी असते. पण त्याचबरोबर एक प्राणी संपूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे ही भावना जबाबदारीची जाणीवही करून देते. प्राणी पाळताना एक मानसिकता जपावी लागते. प्राणी घरातील एक सदस्य असतो त्याला तितके महत्व देणे आवश्यक असते. जेवढी काळजी आपण घरातील माणसांची करतो तेवढीच किंवा त्याहून अधिक काळजी घरातील प्राण्यांची घ्यावी लागते. त्यांच्या वेळा सांभाळणे, त्यांना प्रेम देणे, आजारपणामध्ये त्यांची सेवा करणे हे अतिशय महत्वाचे आहे. हरिणीने इतक्या वर्षात आम्हाला साथ देऊन खूप आनंद दिला. तिच्या खूप छान छान आठवणी आमच्या बरोबर आहेत. त्या आठवणी तर नेहेमीच आमच्या मनात राहतील पण तिने दिलेला आनंद आणि तिच्यामुळे शिकायला मिळालेल्या सर्व गोष्टी आम्हाला कृतज्ञतेची जाणीवही करून देत राहतील.
कारवानी शरीरयष्टी

खेळण्याच्या मूड मध्ये - १

खेळण्याच्या मूड मध्ये - २

टेहेळणी बुरुजावर आमचा पहारेकरी

क्लोज अप

मस्त लिहिले आहे. आणि काटकुळी
मस्त लिहिले आहे.
आणि काटकुळी बकरी वर्णनाने काहीतरी वेगळे डोळ्यासमोर आलेले. पण छान तरतरीत आहे की. खरेच हरिणी. सूट होते नाव.
धन्यवाद अर्चना
धन्यवाद अर्चना
छान लिहिलयं , आवडली हरिणी.
छान लिहिलयं , आवडली हरिणी.
>>>काटकुळी बकरी वर्णनाने
>>>काटकुळी बकरी वर्णनाने काहीतरी वेगळे डोळ्यासमोर आलेले. पण छान तरतरीत आहे की. खरेच हरिणी. सूट होते नाव.--
खरेच, सुरेख आहे हरिणी. तीच्या भितीने लग्नाला नकार द्यायचे विचार ते हे विचार. (पेट्स असेच आपल्याला बदलतात)
मस्त लिहिल आहे सुमुक्ता.
मस्त लिहिल आहे सुमुक्ता. आमच्या घरी पण एक कुत्रा नको असतांना आला आणि घरचाच होउन गेलाय
छान लिहीलंय. राहूनच गेलं होतं
छान लिहीलंय. राहूनच गेलं होतं वाचायचं.
सुंदर लिहिलंय टेहळणी
सुंदर लिहिलंय
टेहळणी बुरुजावरची हरिणी खरंच बकरीसारखी दिसतेय. नाव एकदम सूट होतंय.
सुंदर लिखाण..
सुंदर लिखाण..
फार छान, मलाही सुरवातीपासून
फार छान, मलाही सुरवातीपासून कुत्रा या प्राण्याची भीती वाटते.अजूनही ती भीती गेली नाही
आमच्याकडे आमची ‘वेधा’ आणि एक
आमच्याकडे आमची ‘वेधा’ आणि एक-दीड वर्षाचे ‘मांजरडू’ सुखाने एकत्र नांदत आहेत. वेधा आता साडेचार वर्षांची झाली आहे. सुरुवातीला मला कुत्र्याची प्रचंड भीती वाटायची. चौदा इंजेक्शनचा प्रसाद मिळाला होता. त्यामुळेही असेल कदाचित. पण एक दिवस ‘सरप्राईज’ म्हणून वेधाचा घरात आणि माझा कुत्र्यांच्या जगात चंचुप्रवेश झाला. कुत्र्यांची प्रचंड भीती ते आता भटक्या कुत्र्यांच्या देखील भावना वाचता येणे हा माझ्यातला चमत्कार वेधाने घडवला आहे. त्याविषयी कधीतरी लिहिनच.
मागे एकदा ती अर्धाएक तास हरवली होती. तेव्हा सर्वांचा जीव गोळा झाला होता. त्यामुळे हरिणीचे जाणे तुम्हाला कसे वाटत असेल हे नक्कीच समजतेय.
सुमुक्ता मागे एकदा हरिणीला पिल्ले झाली ती कथा इथेच वाचली होती. ती तुम्हीच लिहिली होती का? याच हरिणीची गोष्टी होती का ती? मला आजही ती संपूर्ण गोष्ट आठवते आहे.
मस्त लिहिलंय.हरिणी मस्त आहे.
मस्त लिहिलंय.हरिणी मस्त आहे.
मात्र आमचा पिंटू गेल्यानंतर आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला होता.कारण महाखतरनाक,चावरा कुत्रा होता.असो.
धन्यवाद नविन प्रतिसादांकरिता
धन्यवाद नविन प्रतिसादांकरिता
सुमुक्ता मागे एकदा हरिणीला पिल्ले झाली ती कथा इथेच वाचली होती. ती तुम्हीच लिहिली होती का? >>> नाही. आमच्या हरिणीला पिल्ले झाली नाहीत
कसला कमनीय बांधा आहे हरिणीचा.
कसला कमनीय बांधा आहे हरिणीचा..
मला वाटल मी दिलाय प्रतिसाद यावर कारण एक दोनदा वाचलाय हा लेख.. बघतो तर दिसला नाही म्हणुन हा प्रपंच..
छान लिहिलयस.. बरचस रिलेट झालं घरी कुत्रा होता त्यामुळे..
Pages