हरिणी

Submitted by सुमुक्ता on 12 September, 2014 - 06:04

सुमीतचे म्हणजे माझ्या नवऱ्याचे स्थळ मला आले तेव्हा माझ्या मनात पहिला प्रश्न रुंजी घालायला लागला "घरी कुत्रे आहे का?". पाळीव, रानटी अथवा भटके कोणतेही कुत्रे असो, माझ्याशी ह्या सर्व जमातीचा उभा दावा आहे. रस्त्यावर समोरून कुत्रे दिसले तर रस्ता क्रॉस करून त्या मी कुत्र्याला टाळायचा अतोनात प्रयत्न करते. पण दुर्देवाने नेहेमीच माझा प्रयत्न फसतो. आणि रस्त्यावरील सगळी कुत्री कट करून माझ्या अंगावर धावून येतात. असो.

तर आम्ही स्थळ पहायला निघालो. नवरा तेव्हा ऑस्ट्रेलिया मध्ये होता, तेव्हा त्याला भेटता येणारच नव्हते. नुसतेच घर बघणे आई-वडिलांना भेटणे ह्यातच वेळ जाणार होता. घराच्या खाली पोहोचलो आणि वर गच्चीकडे नजर टाकली. आमच्या स्वागतालाच हरिणीचे भुंकणे सुरु झाले. मी आईला तेथेच म्हटले की नाहीतरी मुलगा भेटणारच नाही तेव्हा आपण परतच फिरू आणि नंतर ह्या स्थळाला नकार कळवून टाकू. तर बाबा वैतागलेच. आता घरी कुत्रे आहे हे नकार देण्याचं कारण आहे हे काही माझ्या आई-वडिलांना पटेना. मी म्हटलं तुम्हाला कशाला पटेल? उद्या लग्न झाले तर इथे मला राहायचे आहे तुम्हाला नाही. पण दोघांनी दामटवून मला आत नेले. आत गेल्यानंतर माझ्या सासू सासऱ्यांनी आमचे यथोचित स्वागत केले. इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर माझ्या सासूबाई म्हणाल्या "तुला प्राण्यांची आवड आहे ना? कारण आमच्या सुमीतला प्राण्यांची फार आवड आहे आणि त्याला तशी आवड असणारी बायको पाहिजे". मी लगेचच "तशी फारशी आवड नाही" असे सांगून टाकले (सुंठीवाचून खोकला गेला तर बरेचं होईल!!!). मग त्या म्हणाल्या "आमच्याकडे कुत्रे आहे तुला पाहायचं आहे का?" मी लगेच नको म्हणून टाकले. एक तर ह्या मुलाशी लग्न होणार की नाही ते माहित नाही आणि उगीचंच ह्यांचे कुत्रे पहा आणि खोटे खोटे "फार छान आहे". वगैरे म्हणा!! कशाला पाहिजे असा विचार करून मी स्वस्थ बसून राहिले.

महिन्याभरानी सुमीत आला आणि मी त्यालाही भेटले. तत्पूर्वी ई-मेल, चॅट वगैरे सोपस्कार झालेले होते. प्राण्यांची आवड आणि घरी कुत्रे हे दोन मुद्दे सोडले तर मला सुमीतमध्ये नकार देण्यासारखं खरेच काही वाटले नाही. आणि मी लग्नानंतर ऑस्ट्रेलियाला जाणार होते. तिथे काही कुत्रं-मांजर किंवा इतर प्राणी पाळले नव्हते. ह्याचाच आधार घेऊन मी सुमीतला होकार दिला आणि त्यानी पण मला होकार दिला. झाले!! माझे लग्न ठरले…ते ही अशा घरात कि जिथे कुत्रे आहे. सासूसासरे, सासरची इतर माणसे कशी असतील ह्यापेक्षा माझ्यावर जास्त ताण हरिणीचा होता. ऑस्ट्रेलियाचा विसा येईपर्यंत सासरी राहायचे होते तेव्हा हरिणीशी ओळख करणे अत्यावश्यक होते. पण तिने तर जीवात जीव असेपर्यंत माझ्यावर भुंकायचे ठरवले होते. पुष्कळ वेळा ती माझ्या अंगावर धावून यायची पण मग घरातले कोणीतरी तिला control करायचे. मला वाटायचे की हे लोक तिला बांधून का ठेवत नाहीत. तर सुमीत म्हणायचा की "तू आलीस आणि तिला बांधले तर ती तुझा अजूनच राग राग करेल. तेव्हा तिला तुझी आणि तुला तिची सवय लवकरात लवकर व्हायला हवी." लग्न ठरल्यानंतर सगळे दिवस ही सवय करण्यातच गेले. लग्न झाले, सुमीत ऑस्ट्रेलियाला गेला आणि माझी सत्वपरीक्षा चालू झाली. अजूनही मला हरिणीची भयंकर भीती वाटायची. तिच्यापासून चार हात लांब राहणे मला सोपे वाटायला लागले. कमीतकमी वेळा आम्ही दोघी एकमेकींसमोर येऊ अशी काळजी मी घ्यायला लागले. पण कळत नकळत जशीजशी मी त्या घरात रूळत होते तशीतशी हरिणी बरोबर सुद्धा रुळत होते. तिलाही माझी हळूहळू सवय व्हायला लागली होती. आता माझ्यावर भुंकणे जवळजवळ बंद झाले होते. यथावकाश माझा ऑस्ट्रेलियाचा विसा आला आणि माझी जाण्याची तयारी सुरु झाली. खरेदी, सामान भरणे, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणीच्या भेटीगाठी. हे सगळं होताहोता जायचा दिवस आला.

मी निघण्याच्या दिवशी हरिणी एवढेसे तोंड करून बसली होती. तिला पाहून मला कसेसेच वाटायला लागले. माझ्या मनात विचार आला कि आम्हा दोघींना एकमेकींचा एवढा लळा कधी लागला?? आणि इतक्या दिवसा मध्ये मला हे कळले कसे नाही!! तिची भीती वाटणे जरी कमी झाले असले तरी असा तिचा लळा लागेल ही कल्पनाच मी केली नव्हती. त्यानंतर ऑस्ट्रेलियातून भारतात कधीही फोन केला की मी तिची आवर्जून चौकशी करत असे. स्काइप चालू झाल्यापासून तर ती आम्हाला दिसायला सुद्धा लागली. दरवर्षी भारतात जाताना तिच्यासाठी न विसरता आम्ही काही ना काही भेटवस्तू घ्यायचो. आम्ही घरी गेलो की ती आनंदाने नाचून घर डोक्यावर घ्यायची आम्ही नेलेल्या भेटवस्तू अगदी आनंदाने वापरायची (तिला त्यातील किती कळत होते हे तिलाच ठाऊक. पण आम्हाला मात्र फार आनंद व्हायचा). भारतात असेपर्यंत आमचा बराचसा वेळ तिच्याशी खेळण्यात जायचा. तिला घेऊन आम्ही बऱ्याचशा ट्रिप्स सुद्धा केल्या. बाहेर हिंडायला मिळालं की ती सुद्धा खूप खूष असायची

हरिणी भारतीय जातीची कारवानी कुत्री होती. सुमीतला भारतीय जातीचे कुत्रे पाळायचे होते आणि ते ही हाउंड. तिचे नावही मराठी असावे असा त्याचा आग्रह होता. जोरात पळणाऱ्या जातीची होती म्हणून तिचे नाव हरिणी ठेवले. तिला घरी कसे आणले हे लिहायचे असेल तर एक वेगळा लेख लिहावा लागेल. एवढेच सांगते की कुर्डूवाडी पासून जवळच शिंगेवाडी कारंगा नावाचं एक छोटे खेडेगाव आहे, तेथील धनगरांकडे ह्या जातीची कुत्री असतात. तेथून हरिणी आमच्या घरी आली होती. ह्या जातीची कुत्री दिसायला फार गोंडस नसतात. अगदी काटक अंगयष्टी असणारी ही कुत्री थोडी बावळट दिसतात पण पहारा द्यायला अतिशय तिखट असतात. आमच्या घराजवळ एक छोट्या मुलांची शाळा आहे तेथील मुले तिला बकरी म्हणून हाक मारायची. कारण त्यांच्या मते ती बकरी सारखी दिसायची. तिच्या अशा युनिक दिसण्यामुळे हरिणी आमच्या जवळपास च्या भागात फार प्रसिद्ध होती. एकदा एक वृद्ध नातेवाईक आमच्या घरी यायचे होते. रिक्षावाल्याला त्यांना धड पत्ता सांगता येईना. शेवटी ते म्हणाले "जवळपासची खूण माहित नाही पण त्यांच्या घरी एक हडकुळं काळं कुत्रं आहे." रिक्षावाला नेमका आमच्या घराजवळच्या भागातला होता. तो म्हणाला "मग असं सांगा ना आजोबा की हरिणीच्या घरी जायचं आहे". आणि त्यानी बरोबर आजोबांना आमच्या घरी आणून सोडले. आता घर आमचे राहिले नव्हते हरिणीचे झाले होते!!! अगदी थोड्याच कालावधी मध्ये हरिणी आमच्या कुटुंबातील एक प्रमुख घटक झाली होती. तिच्या दिनचर्येप्रमाणे आम्ही आमचे कार्यक्रम ठरवायचो. पहारा द्यायला सुद्धा ती अतिशय तिखट होती. ती असली की आम्हाला सासू-सासऱ्यांची काळजी नसायची, त्यांच्या सोबतीला कोणीतरी आहे हा दिलासा असायचा. तिच्यामुळे त्यांचाही वेळ मजेत आणि आनंदात जायचा.

हरिणीचे एकेक किस्से तर फार मजेशीर आहेत. ती आमच्या घरी नवीन होती तेव्हाची गोष्ट आहे. तिने आधी आरसा पहिला नव्हता. अचानक एक दिवस कपाटाच्या आरशात तिला स्वत:चे प्रतिबिंब दिसले. तिला वाटले आपल्या हद्दीत कोणता कुत्रा आला, म्हणून आरशा समोर उभे राहून जोरजोरात भुंकायला लागली. थोड्या वेळाने कपाटाच्या मागे जाऊन अंदाज घेतला, पुन्हा आरशा समोर उभी राहून भुंकायला लागली. दिवसभर हा खेळ चालू होता. मग तीच कंटाळली किंवा तिला कळले असेल की हे आरशातले कुत्रे काही बाहेर येणार नाही. मग आरशाचा नाद सोडला. घरातील माणसांच्या जवळ राहायला तिला फार आवडायचे. तिला एकटीला सोडले की भयंकर संताप यायचा. मग जवळ जे काही कागद मिळतील ते सर्व फाडून तुकडे करून घरभर पसरवायचे काम ती करायची आणि मग तिची समजूत काढत घर परत आवरायचे काम आम्ही करायचो. आम्ही गप्पा मारत बसलो की तिच्या अंगावरून सतत हात फिरवायचा असा नियम तिने आम्हाला घालून दिला होता. त्यात जरा जरी खंड पडला तर तिच्या नाकाने आपला हात उचलून ती आम्हाला आठवण करून द्यायची "हात फिरवायचे का थांबलात?". सकाळी उठून तिला Good Morning म्हणालो की Shake Hand केल्या सारखा एक पाय ती आमच्या हातात देऊन आम्हाला प्रतिसाद द्यायची. अशा असंख्य आठवणी आम्ही आमच्या मनात जपून ठेवल्या आहेत. पण १३ वर्ष आम्हाला साथसंगत केल्यानंतर आम्ही ह्यावर्षीच्या भारतभेटीवर असताना हरिणी आजारी पडली आणि त्या आजारपणातच अगदी ३-४ दिवसामध्येच ती गेली. आमचे पूर्ण कुटुंब अजूनही ह्या धक्क्यातून सावरत आहे.

हरिणी विषयी सुरुवातीला असणारी उदासीनता ते तिच्यावर जडलेली माया हा माझा प्रवास खूप महत्वाचा आणि फार छान होता. माझे बरेच समज-गैरसमज तिच्यामुळे दूर झाले. प्राणी जेव्हा प्रेम करतात तेव्हा त्यात कोणताही स्वार्थ नसतो आणि म्हणून प्राण्यांचा लळा खूप पटकन लागतो. प्राण्यांशी मैत्री केल्याने आपल्या सर्व नैसर्गिक भाव-भावनांना वाट मिळते. कोणीतरी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करत आहे ही भावना खूप दिलासा देणारी असते. पण त्याचबरोबर एक प्राणी संपूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे ही भावना जबाबदारीची जाणीवही करून देते. प्राणी पाळताना एक मानसिकता जपावी लागते. प्राणी घरातील एक सदस्य असतो त्याला तितके महत्व देणे आवश्यक असते. जेवढी काळजी आपण घरातील माणसांची करतो तेवढीच किंवा त्याहून अधिक काळजी घरातील प्राण्यांची घ्यावी लागते. त्यांच्या वेळा सांभाळणे, त्यांना प्रेम देणे, आजारपणामध्ये त्यांची सेवा करणे हे अतिशय महत्वाचे आहे. हरिणीने इतक्या वर्षात आम्हाला साथ देऊन खूप आनंद दिला. तिच्या खूप छान छान आठवणी आमच्या बरोबर आहेत. त्या आठवणी तर नेहेमीच आमच्या मनात राहतील पण तिने दिलेला आनंद आणि तिच्यामुळे शिकायला मिळालेल्या सर्व गोष्टी आम्हाला कृतज्ञतेची जाणीवही करून देत राहतील.

कारवानी शरीरयष्टी

harini5.jpg

खेळण्याच्या मूड मध्ये - १

harini1.jpg

खेळण्याच्या मूड मध्ये - २

harini2.jpg

टेहेळणी बुरुजावर आमचा पहारेकरी

harini3.jpg

क्लोज अप

harini4.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

kharech bakari disatey...
chaan aahe lekh, tumacha jeevhala janawala.

छान लेख..

तुमची हरिणी आवडली.. अगदी डोळयासमोर उभी राहीली.

फोटोही मस्तच आलेत..

हरिणी... कसं सुरेख नाव आहे. किती देखणी आहे तुमची हरिणी... होती म्हणावसं वाटत नाहीय Sad

छान लिहिलं आहे, सुमुक्ता.
लेख वाचून प्रतिसाद लिहिल्यवर परत एकदा हरिणीचे फोटो बघण्याची इच्छा झाली. खरच सुरेख.

सर्व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रोत्साहनामुळे पुढील लेखन करण्यास हुरूप आला.

हरिणी... खूप गोड नाव आहे. Happy खूप छान लिहीलं आहेस.
शेवटचा पॅरा अगदी महत्वाचा.

माझ्या माहेरी असाच एक गोंडस गोडूला होता.. मोती! जर्मन शेफर्ड!!! दिसा-वागायला रूबाबदार पण घरच्या माणसांसोबत अगदीच लहान मुलासारखा हळवा आणि कधी कधी तितकाच हट्टीपण!! आणलेला तेव्हा अगदीच पिल्लू होता कापसाच्या गोंड्यासारखा. अजूनही विसरू शकले नाही... Sad

प्राण्यांची अगदी लहान मुलांसारखी काळजी घ्यावी लागते. त्यांचं जीव लावणं आणि अचानक आपल्यातून निघून जाणं दोन्ही फार जीवघेणं असतं.

हृदयस्पर्शी आठवणी...

इथे मांडल्याबद्दल धन्यवाद. लिहीणं तरी त्यातल्या त्यात सोप्पंय. लळा लागलेल्या जीवाचा विरह अनुभवणं फारच त्रासदायक. मी फार पूर्वी रस्त्यावरचा एक अनाथ अडचणीत सापडलेला कुत्रा घरी आणला होता. चार दिवसच तो आमच्याकडे होता. मला त्याचा फार लळा लागला होता. पाचव्या दिवशी बाबा त्याला लांब सोडून आले. मला फार वाईट वाटले. बाबांनी सांगितले, "चार दिवसांच्या सहवासानंतरच्या विरहानं इतकं वाईट वाटतंय. नऊ दहा वर्षे त्याला आपल्याकडे ठेवल्यावर जेव्हा तो सोडून जाईल तेव्हा काय अवस्था होईल?" मला त्यांचं म्हणणं पटलं. मानवाचं सरासरी आयुष्य सत्तर वर्षांचं तर पाळीव प्राण्यांचं दहा बारा वर्षांच. तेव्हा विरहाशिवाय पर्याय नाहीच.

हे दु:ख टाळायचं तर साठीनंतर कुत्रा पाळावा.

अर्थात त्याही आधी आपली सांपत्तिक स्थिती बर्‍यापैकी सुधारली तर मी एक हत्तीचं पिल्लू पाळायचं ठरवलंय. दीर्घ काळ साथ देईल. माझ्यावर त्याचा विरह सहन करायची पाळी येणार नाहीच, उलट बहुदा त्यालाच माझा मृत्यू पाहावा लागेल.

अर्थात त्याही आधी आपली सांपत्तिक स्थिती बर्‍यापैकी सुधारली तर मी एक हत्तीचं पिल्लू पाळायचं ठरवलंय.
<<
<<
त्याऐवजी तुम्ही 'कासव' का नाही पाळत ते कमीत कमी दिडशे वर्षे तरी जगते.

विजय आंग्रे

<< त्याऐवजी तुम्ही 'कासव' का नाही पाळत ते कमीत कमी दिडशे वर्षे तरी जगते. >>

कासव पाळायला निदान भारतात तरी कायद्याने परवानगी नाही असे मी वाचले आहे.

खुप सुंदर सुमुक्ता.

माझ्या माहेरीसुद्धा पुण्याला कारवानी हाउंड्च आहे. माझ्या भावालाही भारतीय जातीचाच कुत्रा पाळायचा होता.
भावाने त्याचे नाव गुगल ठेवले आहे.आता १ वर्षाचा झाला आहे तो. अगदी सेम तुमच्या हरिणी सारखाच आहे. फक्त रंग पांढरा.

पुनःश्च सर्व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. हरिणी जरी आज आमच्या मध्ये नसली तरी तिचे कौतुक आम्हाला अजूनही आनंदित करते

चेतन, प्राणी नि:स्वार्थ प्रेम करतात त्यामुळे कदाचित प्राण्याचा मृत्यू मालक सहन करू शकतो पण मालकाचा मृत्यू प्राणी सहन करू शकत नाही असे माझे मत आहे.

मृणाल तुमच्या गुगलचा फोटो पाहायला निश्चित आवडेल.

Pages