पंत...माणूसकी...सहस्त्रभोजने

Submitted by बेफ़िकीर on 9 September, 2014 - 11:21

दोन कावळे रोज आमच्या घरी जेवायला येतात. खरे तर एकूण आठ कावळे आहेत, पण बाकीचे सहा किंचित चोखंदळ आहेत. अंड्यांचा पिवळा भाग, पपईची लहान फोड, असे काही खास पदार्थ असले तरच ते झेपावतात. अन्यथा ह्या नेहमीच्या दोघांना चरू देतात. मी त्या दोघांना नीट ओळखू शकतो. कावळा हा पक्षी माणसाला चेहर्‍यावरून ओळखू शकणारा एकमेव पक्षी आहे असे वाचले होते. दोन कावळ्यांना चेहर्‍यावरून ओळखणारा कोथरूड विभागातील मी एकमेव माणूस असावा असे तूर्त वाटते.

हे जे दोन कावळे आहेत ते एकमेकांचे कोणीही नाहीत. त्यांचे एकमेकांशी भांडणही नाही, सख्यही नाही आणि संबंधही नाही. एक येऊन गेला की दुसरा निवांत येतो. त्याला आधीच्याने काय खाल्ले ह्याच्याशी घेणेदेणे नसते. तो आक्रोश करून स्वतःसाठी वेगळा खाना मागवतो.

आमच्याकडे न्याहारी, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण असे तीनवेळा ठरलेले आहार असून त्यातील रात्रीच्या जेवणापैकी अर्थातच कावळ्याला काही ठेवले जात नाही. न्याहारीची प्लेट प्रथम आईच्या फोटोला दाखवून, नंतर देव्हार्‍यासमोर दाखवून मग त्यातील एक भला मोठा घास मी खिडकीत ठेवतो. मी किचनमधून हॉलमध्ये येईपर्यंत तो घास खाल्ला गेलेला असतो.

एका कावळ्याचे नांव आम्ही 'पंत' ठेवलेले आहे आणि दुसर्‍याचे 'माणूसकी'! हा पंत सकाळपासून घराण्याच्या मूळपुरुषासारखा खिडकीत असतो. त्याला भात, बिस्किट, कालचे राहिलेले, खराब झालेले, जस्ट बनवलेले, अंडर प्रोसेस, रॉ मटेरिअल ह्यातले काहीही कितीही चालते. पंत मोठ्या मनाचा आहे. तो काहीही खातो आणि कधी नाक मुरडत नाही. त्याचे अस्तित्व जाणवून देण्याची त्याची शैलीही एकदम नावीन्यपूर्ण आहे. तो बराच वेळ नुसताच खिडकीत येऊन आत बघत बसतो. खाली एक फोटो दिलेला आहे त्यात तो जसा बसलेला आहे तसाच बसलेला असतो खिडकीत. मग त्याची कीव आली की त्याला काहीबाही दिले जाते. त्याची कीव येण्याच्या प्रमाणाचा ग्राफ सकाळपासून दुपारी चार वाजेपर्यंत एस्कलेट होतो आणि चार ते सहामध्ये डिक्लाईन होत जातो. गॅसपाशी कोणी आलेले आहे किंवा कसे वगैरेशी पंताला घेणेदेणे नसते. त्याला भूक लागली की तो येऊन बसतो. आपले लक्ष गेले की त्याला काहीतरी द्यायचे इतकेच! तो गेला की केव्हा येईल हे सांगता येत नाही. तरी दिवसातून सहा ते सात वेळा तो खिडकीत एखाद्या गरीब मजूरासारखा बसून राहतोच.

'माणूसकी' मात्र भलताच अ‍ॅक्टिव्ह आहे. तो त्याचे आगमन कर्कश्य ओरडून जाहीर करतो. माणूसकीचा फोटो सध्या नाही आहे, पण दोन वेगळ्याच कावळ्यांचा फोटो खाली दिला आहे ते बहुधा माणूसकीच्या परिवारातील असावेत. माणूसकी सहसा अंड्याच्या आतील भागावर वहिवाटीचा हक्क सांगतो. त्याशिवाय, त्याला जे नको असते ते पारव्यांना मिळावे ह्या भूतदयेने तो काही पारव्यांना तेथे ओरडून आमंत्रणही धाडतो. म्हणूनच त्याचे नांव माणूसकी! माणूसकीची खासियत ही आहे की त्याचा अनुल्लेख केला तर तो चित्रविचित्र आवाज काढून दखल घ्यायला लावतो. त्याचे ते आवाज ऐकून पूजा करत असताना माझे बाबा वैतागलेले असताना त्यांनी चार सहा वेळा माणूसकीला हाकलण्याचा अपयशी प्रयत्नही केलेला आहे. पण माणूसकी सगळ्यांना पुरून उरतो.

पंत खिडकीत असताना खिडकीच्या आसपासही वावरण्यास घाबरणारे पारवे माणूसकीच्या उपस्थितीत मात्र बिनदिक्कतपणे तेथे येऊन आहार करतात.

माणूसकी येईलच असे नसते आणि पंत येणार नाही असे कधी होत नाही.

मध्यंतरी एकदा गंमतच झाली. माझी बायको अंडाकरी आणि कोल्हापूरी मिसळ अतिशय भारी करते. स्वतः मात्र अंडे खात नाही. 'स्वतः खात नाही' हे उगीचच सांगितले, माझ्याबद्दल आस्था वाटावी म्हणून! तर आम्ही सगळी भावंडे एकदा एकदिवसीय सहलीला जाणार होतो तेव्हा तिने सर्वांसाठी अंडाकरी बनवली. बॉईल्ड एग्ज ती वेगळ्या डब्यात ठेवते आणि ऐनवेळी करीत घालून सर्व्ह करते. आम्ही इतके आठवून आठवून सगळे पदार्थ सहलीला नेले की ऐनवेळी अंड्यांचा डबाच घरी विसरलो. मग आल्यानंतर आठवडाभर रोज तीन उकडलेली अंडी नेमाने खिडकीत ठेवत होतो. पंत एक वेगळाच, पण माणूसकी आणि त्याचा परिवार त्यावर तुटून पडत होता. नंतर त्यांना वाटू लागले की हे नेहमीच असा डबा विसरत असावेत. पण हा भ्रम आहे हे त्यांना नंतर समजले.

पंत आणि माणूसकी ह्यांचा कधीही वाद होत नाही.

वाद होतो पारव्यांमध्ये! खाली दिलेल्या फोटोंमध्ये एका फोटोत काही पारवे आहेत आणि एका फोटोत एकच पारवा! त्या एका पारव्याचे नांव सहस्त्रभोजने आहे. रोज सकाळी टेरेसवरती टाकण्यात येणारे दाणे, उरलेसुरले, नको असलेले, भूतदया म्हणून टाकलेले, कंटाळा म्हणून टाकलेले ह्या सर्वातील सर्वाधिक वाटा आपलाच असावा ह्या हेतूने हा सहस्त्रभोजने इतर पारव्यांना हाकलून देत दाणे टिपू पाहतो. पण आजकालची पिढी मोठी बिलंदर! लहान लहान पिल्ले त्याची नजर चुकवून टेरेसमध्ये उतरतात. त्याच्या चारही बाजूला इतर पारवे आल्यावर हाकलणार कोणाला आणि कसे? ह्या द्विधा मनस्थितीत शेवटी मग सहस्त्रभोजने 'आपल्याला मिळते तितके भरून घेऊ' ह्या तडजोडीच्या भूमिकेवर येतो. हीच 'काँप्रमाईझिंग पोझिशन' त्या दुसर्‍या फोटोत टिपलेली आहे. वेल, सहस्त्रभोजनेला मी फक्त त्याच्या दादागिरीमुळेच ओळखू शकतो.

पुण्यात मोबाईल टॉवर्समुळे चिमण्या हल्ली राहात नाहीत. ऑटोमोबाईल हब, एज्युकेशन हब, आय टी हब ह्या कारणांमुळे पुणे न सोडणार्‍या जगभरातल्या नागरिकांच्या तुलनेत ह्या चिमण्या फारच त्यागी म्हणायला हव्यात. अश्या काही चिमण्या मला जेजुरीला सापडल्या. त्यातील एका चिमणीचा फोटोही खाली दिलेला आहे.

ह्या सगळ्या पक्ष्यांना दाणे किंवा इतर काही टाकताना मनात विचार येतो, आपल्याला जेव्हा कोणीतरी नि:स्वार्थीपणे मदत करण्याची आत्यंतिक गरज भासेल तेव्हा आपल्याला कोण असेल?

===============

-'बेफिकीर'!

===============

पंतः

IMG_2526.JPG

माणूसकीच्या परिवारातील दोन सदस्यः

IMG_2524.JPG

सहस्त्रभोजने:

IMG_1416.JPG

सहस्त्रभोजने इन अ काँप्रमाइझिंग सिच्युएशनः

IMG_1477.JPG

जेजुरीची चिमणी:

IMG_2053.JPG

जेजुरीला खिडकीत आलेला हा एक वेगळाच पक्षी:

IMG_2169.JPG

धन्यवाद!

==============

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages