पंत...माणूसकी...सहस्त्रभोजने

Submitted by बेफ़िकीर on 9 September, 2014 - 11:21

दोन कावळे रोज आमच्या घरी जेवायला येतात. खरे तर एकूण आठ कावळे आहेत, पण बाकीचे सहा किंचित चोखंदळ आहेत. अंड्यांचा पिवळा भाग, पपईची लहान फोड, असे काही खास पदार्थ असले तरच ते झेपावतात. अन्यथा ह्या नेहमीच्या दोघांना चरू देतात. मी त्या दोघांना नीट ओळखू शकतो. कावळा हा पक्षी माणसाला चेहर्‍यावरून ओळखू शकणारा एकमेव पक्षी आहे असे वाचले होते. दोन कावळ्यांना चेहर्‍यावरून ओळखणारा कोथरूड विभागातील मी एकमेव माणूस असावा असे तूर्त वाटते.

हे जे दोन कावळे आहेत ते एकमेकांचे कोणीही नाहीत. त्यांचे एकमेकांशी भांडणही नाही, सख्यही नाही आणि संबंधही नाही. एक येऊन गेला की दुसरा निवांत येतो. त्याला आधीच्याने काय खाल्ले ह्याच्याशी घेणेदेणे नसते. तो आक्रोश करून स्वतःसाठी वेगळा खाना मागवतो.

आमच्याकडे न्याहारी, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण असे तीनवेळा ठरलेले आहार असून त्यातील रात्रीच्या जेवणापैकी अर्थातच कावळ्याला काही ठेवले जात नाही. न्याहारीची प्लेट प्रथम आईच्या फोटोला दाखवून, नंतर देव्हार्‍यासमोर दाखवून मग त्यातील एक भला मोठा घास मी खिडकीत ठेवतो. मी किचनमधून हॉलमध्ये येईपर्यंत तो घास खाल्ला गेलेला असतो.

एका कावळ्याचे नांव आम्ही 'पंत' ठेवलेले आहे आणि दुसर्‍याचे 'माणूसकी'! हा पंत सकाळपासून घराण्याच्या मूळपुरुषासारखा खिडकीत असतो. त्याला भात, बिस्किट, कालचे राहिलेले, खराब झालेले, जस्ट बनवलेले, अंडर प्रोसेस, रॉ मटेरिअल ह्यातले काहीही कितीही चालते. पंत मोठ्या मनाचा आहे. तो काहीही खातो आणि कधी नाक मुरडत नाही. त्याचे अस्तित्व जाणवून देण्याची त्याची शैलीही एकदम नावीन्यपूर्ण आहे. तो बराच वेळ नुसताच खिडकीत येऊन आत बघत बसतो. खाली एक फोटो दिलेला आहे त्यात तो जसा बसलेला आहे तसाच बसलेला असतो खिडकीत. मग त्याची कीव आली की त्याला काहीबाही दिले जाते. त्याची कीव येण्याच्या प्रमाणाचा ग्राफ सकाळपासून दुपारी चार वाजेपर्यंत एस्कलेट होतो आणि चार ते सहामध्ये डिक्लाईन होत जातो. गॅसपाशी कोणी आलेले आहे किंवा कसे वगैरेशी पंताला घेणेदेणे नसते. त्याला भूक लागली की तो येऊन बसतो. आपले लक्ष गेले की त्याला काहीतरी द्यायचे इतकेच! तो गेला की केव्हा येईल हे सांगता येत नाही. तरी दिवसातून सहा ते सात वेळा तो खिडकीत एखाद्या गरीब मजूरासारखा बसून राहतोच.

'माणूसकी' मात्र भलताच अ‍ॅक्टिव्ह आहे. तो त्याचे आगमन कर्कश्य ओरडून जाहीर करतो. माणूसकीचा फोटो सध्या नाही आहे, पण दोन वेगळ्याच कावळ्यांचा फोटो खाली दिला आहे ते बहुधा माणूसकीच्या परिवारातील असावेत. माणूसकी सहसा अंड्याच्या आतील भागावर वहिवाटीचा हक्क सांगतो. त्याशिवाय, त्याला जे नको असते ते पारव्यांना मिळावे ह्या भूतदयेने तो काही पारव्यांना तेथे ओरडून आमंत्रणही धाडतो. म्हणूनच त्याचे नांव माणूसकी! माणूसकीची खासियत ही आहे की त्याचा अनुल्लेख केला तर तो चित्रविचित्र आवाज काढून दखल घ्यायला लावतो. त्याचे ते आवाज ऐकून पूजा करत असताना माझे बाबा वैतागलेले असताना त्यांनी चार सहा वेळा माणूसकीला हाकलण्याचा अपयशी प्रयत्नही केलेला आहे. पण माणूसकी सगळ्यांना पुरून उरतो.

पंत खिडकीत असताना खिडकीच्या आसपासही वावरण्यास घाबरणारे पारवे माणूसकीच्या उपस्थितीत मात्र बिनदिक्कतपणे तेथे येऊन आहार करतात.

माणूसकी येईलच असे नसते आणि पंत येणार नाही असे कधी होत नाही.

मध्यंतरी एकदा गंमतच झाली. माझी बायको अंडाकरी आणि कोल्हापूरी मिसळ अतिशय भारी करते. स्वतः मात्र अंडे खात नाही. 'स्वतः खात नाही' हे उगीचच सांगितले, माझ्याबद्दल आस्था वाटावी म्हणून! तर आम्ही सगळी भावंडे एकदा एकदिवसीय सहलीला जाणार होतो तेव्हा तिने सर्वांसाठी अंडाकरी बनवली. बॉईल्ड एग्ज ती वेगळ्या डब्यात ठेवते आणि ऐनवेळी करीत घालून सर्व्ह करते. आम्ही इतके आठवून आठवून सगळे पदार्थ सहलीला नेले की ऐनवेळी अंड्यांचा डबाच घरी विसरलो. मग आल्यानंतर आठवडाभर रोज तीन उकडलेली अंडी नेमाने खिडकीत ठेवत होतो. पंत एक वेगळाच, पण माणूसकी आणि त्याचा परिवार त्यावर तुटून पडत होता. नंतर त्यांना वाटू लागले की हे नेहमीच असा डबा विसरत असावेत. पण हा भ्रम आहे हे त्यांना नंतर समजले.

पंत आणि माणूसकी ह्यांचा कधीही वाद होत नाही.

वाद होतो पारव्यांमध्ये! खाली दिलेल्या फोटोंमध्ये एका फोटोत काही पारवे आहेत आणि एका फोटोत एकच पारवा! त्या एका पारव्याचे नांव सहस्त्रभोजने आहे. रोज सकाळी टेरेसवरती टाकण्यात येणारे दाणे, उरलेसुरले, नको असलेले, भूतदया म्हणून टाकलेले, कंटाळा म्हणून टाकलेले ह्या सर्वातील सर्वाधिक वाटा आपलाच असावा ह्या हेतूने हा सहस्त्रभोजने इतर पारव्यांना हाकलून देत दाणे टिपू पाहतो. पण आजकालची पिढी मोठी बिलंदर! लहान लहान पिल्ले त्याची नजर चुकवून टेरेसमध्ये उतरतात. त्याच्या चारही बाजूला इतर पारवे आल्यावर हाकलणार कोणाला आणि कसे? ह्या द्विधा मनस्थितीत शेवटी मग सहस्त्रभोजने 'आपल्याला मिळते तितके भरून घेऊ' ह्या तडजोडीच्या भूमिकेवर येतो. हीच 'काँप्रमाईझिंग पोझिशन' त्या दुसर्‍या फोटोत टिपलेली आहे. वेल, सहस्त्रभोजनेला मी फक्त त्याच्या दादागिरीमुळेच ओळखू शकतो.

पुण्यात मोबाईल टॉवर्समुळे चिमण्या हल्ली राहात नाहीत. ऑटोमोबाईल हब, एज्युकेशन हब, आय टी हब ह्या कारणांमुळे पुणे न सोडणार्‍या जगभरातल्या नागरिकांच्या तुलनेत ह्या चिमण्या फारच त्यागी म्हणायला हव्यात. अश्या काही चिमण्या मला जेजुरीला सापडल्या. त्यातील एका चिमणीचा फोटोही खाली दिलेला आहे.

ह्या सगळ्या पक्ष्यांना दाणे किंवा इतर काही टाकताना मनात विचार येतो, आपल्याला जेव्हा कोणीतरी नि:स्वार्थीपणे मदत करण्याची आत्यंतिक गरज भासेल तेव्हा आपल्याला कोण असेल?

===============

-'बेफिकीर'!

===============

पंतः

IMG_2526.JPG

माणूसकीच्या परिवारातील दोन सदस्यः

IMG_2524.JPG

सहस्त्रभोजने:

IMG_1416.JPG

सहस्त्रभोजने इन अ काँप्रमाइझिंग सिच्युएशनः

IMG_1477.JPG

जेजुरीची चिमणी:

IMG_2053.JPG

जेजुरीला खिडकीत आलेला हा एक वेगळाच पक्षी:

IMG_2169.JPG

धन्यवाद!

==============

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Very well written. you are lucky to have so many birds coming in.
i know so many is little exag word. but we dont happen to see anything apart from peogen.

बेफिकीर... नावं मस्तच आहेत.
मी लहानपणी अशीच नावं ठेवली होती, आमच्याकडे नियमीत येणार्‍या पशू पक्ष्यांना...
कावळा १ - खत्रुड ... मला मुळीच आवडायचा नाही. खड्डुस होता त्याचा चेहरा.
कावळा २ - भित्रुड ... (यमकं जुळवायची खोड जुनी आहे Happy ) .. घाबरट होतं येडं
चिमणी - टिमकी
एक कुत्री - बिस्किट (तिचा रंग तसा)

हे ! तुस्सी ग्रेट हो बेफिजी !! Happy

आमच्याकडेही रोज हाच प्रकार चालतो पण इतक्या सुंदर प्रकारे तो शब्दबध्द करणे काही जमले नसते बुवा !

या व्यतिरिक्त एक बुलबुलची जोडीही असते अधून मधून... मिलिंदने टेरेसमधे बसून बाहेरची गंमत बघत चार वाजताचा चहा वैगरे घेण्यासाठी एक छोटस टेबल बनवून घेतल होत ते आता तिथेच या पक्ष्यांच डायनिंग टेबल बनलं आहे. आमच्याकडची पारव्यांची जोडी जास्त स्मार्ट आहे . कावळे बिचारे काव काव करून सगळ्यांना बोलावून वाटून खायला जातात आणि हे दोघे पारवे येवून ताटातले दाणे टिपायचे सोडून कावळ्यांसाठी ठेवलेले पदार्थ इतस्तः विखरून टाकतात. कावळे अतिशय शिस्तबध्द आहेत ते फक्त टेबलावर ताटलीत सर्व्ह केलेले जिन्नसच उचलून नेतात खाली पडलेले नाहीत Happy कबूतरांचा प्रताप सूरू झाला की कावळे कर्कश्य ओरडून ओरडून कबूतरांना हाकलवण्यासाठी आपली हक्काने नेमणूक करतात !

सात्विक जेवणासाठी चार-दोन कावळे नियमाने वार लावून जेवतात पण अंड्याचा पिवळा भाग टाकला की हीच संख्या अचानक चौपट होते. काहीही खाल्यांवर पाणी प्यायला ही मंडळी कधी विसरत नाहीत, टोस्ट, ब्रेड हे बेकरी आईटम तसेच पोळीचे केलेले तुकडे चोचीने पाण्यात बुडवून मऊ करून खातात.
चिमण्या, साळूंख्या यांच्या जोड्याही अधून मधून या खानावळीचे मेंबर्स होतात पण कबुतर आणि कावळ्यांसारखे नियमीत कस्टमर म्हणता येणार नाही त्यांना

सकाळी कुणीही पहिल्यांदा स्वैपाकघरात गेल्याची खबर त्यांच्या काव काव करण्याने इतरांना लागते. एखाददिवशी उठायला उशीर झालाच तर एक डँबीस कावळा त्याचा डायनिंग हॉल सोडून बेडरूमच्या टेरेसमधे येवून आपली झोपमोड करायलाही कचरत नाही.

घरटी बांधण्यासाठी मात्र प्रत्येकाने आपापली जागा निवडून ठेवलेली आहे. साळूंख्यांनी आमच्या बेडरूमच्या गच्चीतील टेन्टच्या रॉडवर आमच्या गृहप्रवेशापासून आपल बस्तान बसवलय त्यांच्या नवीन घरट्यात ते आजतागायत.कबूतरांची जोडी जरा चोखंदळ आहे त्यांच्या अंडी घालण्याच्या ठिकाणाबद्दल, कधी बेडरूमच्या टेरेसवरल्या रिकाम्या कुंडीत तर कधी अडगळीच्या सामानातील विटांना लागून किंचित उलट्या करून ठेवलेल्या वॉशबेसीन खाली आलटून पालटून आपली अंडी घालतात आणि अक्षयच्या बेडरूमच्या खिडकीत रात्रभर पथारी पसरतात.

एक बुलबुलच्या जोडीने गेस्टरूमच्या खिडकीत घरट बनवायला घेतलय यंदा बघू किती पिल्ल होतायत त्यांना ते ! या पक्षांचा किलबिलाट माझ्या घरात जिवंतपणाच लक्षण टिकवून ठेवायच काम मात्र चोख बजावतोय सध्या.

धन्यवाद !

-सुप्रिया.

बेफी,

नेहमी प्रमाणेच छान लेख >>ह्या सगळ्या पक्ष्यांना दाणे किंवा इतर काही टाकताना मनात विचार येतो, आपल्याला जेव्हा कोणीतरी नि:स्वार्थीपणे मदत करण्याची आत्यंतिक गरज भासेल तेव्हा आपल्याला कोण असेल?<<
हे फारच पटले.

-प्रसन्न

आमच्याकडेही रोज हाच प्रकार चालतो पण इतक्या सुंदर प्रकारे तो शब्दबध्द करणे काही जमले नसते बुवा !>>सेम हिअर फक्त आमच्याकडे ३-४ पंत तर ७-८ माणुसकी आहेत...

बादवे मी कधी कधी खाण्याच्या आकारमानावरून बाबा, साबा नि साबु असा भेद करायचा प्रयत्न केला की आई म्हणते कावळे झाले की काय तिघे जण वर गेल्यावर!!

वॉव्...आमच्या घरि पण हेच होत पण पक्षांच्या बाबतित नाही तर मांजरांच्या बाबतीत्.आख्या सोसायटीची मांजरे दिवसातुन एकदा तरी हजेरी लावत्..सकाळपासुन चपाती खायला सुरवात होई ते रात्री झोपेपर्यंत (मी झोपेपर्यंत) कारण मी जागे असले तर मांजराला खाऊ घातल्याशिवाय मला चैन पड्त नसे.एकदा तर आमच्या घरातल दुध संपल होत शेजारुन मागुन आनुन दिला (रात्री १२:३०)
मी पण मांजरांना नावे दिली आहेत.
अ‍ॅश : कारण ही मांजर खुपच सुंदर होती आणि तीचे डोळे नीळे होते
चानी : ही अ‍ॅशची मुलगी होती पण हिचे केस वेगळे होते म्हणुन
मकू : हा बोका आहे पण खुप आघाव आहे
मन्या : हा पुर्ण काळा होता...
बाकीच्या मांजरांना मग घरमालकांची नावे मिळायची...मांजरांना पकडने हा माझा आवडता छंद होता..
आमची एक मांजर होती खुप खेळकर रात्री तीला बाहेर खेळायची हुक्की यायची आणि मला तिच्याशिवाय झोप यायची नाही मग माझी स्वारी हातात दोरि घेउन हलवत हलवत तीला शोधायला, तीला पण माहीत असायचे मी येणार म्हणुन ती दबा धरुन बसायची आणि दोरीवर हल्ला करायची ,मग त्याच दोरीने तीला लपेटुन घरी आनायच. घरात आल्यावर मग तीला अंथरुनात झोपवायच माझ्या समोर तरी पण तीचा खेळायचा मूड असे, मग माझा भाउ हळुच बोट वर करायचा मग ही करायची हल्ला शेवटी खुप वेळ झाला की आई ओरडायची मग मात्र गप.
बाप रे हे मार्जारपुराण संपनारे नाही खुप आहे

सही

मस्त लिहिलेय. वाचायला आवडले याचे एक कारण आमच्या घरीही असेच रोज कावळे, चिमण्या, साळूंक्या आणि पारवे येतात हक्क सांगायला. घरात आधीच दोन माण्जरेही आहेत. रोज या सग़ळ्यांसाठी जेवायची व्यवस्था करावी लागते. नाही केली तर कानांवर अत्याचार. Happy

येणा-या कावळ्यात एक जरा लहानसा कावळा आहे. आम्ही त्याला ऑटिस्टीक म्हणतो, पण ते योग्य नाही हे मला माहित आहे. त्याला ऑटिस्टीक म्हणायह्चे कारण हे आहे की तो कधीच् स्वतः चोचीने काहीही उचलुन खात नाही. तो इतर खाणा-या कावळ्यांमागे काव काव करत फिरतो. आणि मग ते कावळे याच्या चोचीत काहीतरी देतात ढकलुन तेव्हा हा खातो. असे हा का करतो माहित नाही पण गेल्या दोन-तिन महिन्यापासुन त्याचा हा दिनक्रम चालु आहे. अजुन स्वतःचे स्वतः खायला शिकला नाहीय.

शेवटचा फोटो सातभाईचा असावा. ते असेच नुकतेच झोपेतुन उठल्यासारखे पिसे पिण्जारुन बसलेले असतात.

ह्या सगळ्या पक्ष्यांना दाणे किंवा इतर काही टाकताना मनात विचार येतो, आपल्याला जेव्हा कोणीतरी नि:स्वार्थीपणे मदत करण्याची आत्यंतिक गरज भासेल तेव्हा आपल्याला कोण असेल?

काळजी करु नका. जे पेरु ते कधीनाकधी उगवतेच.

तुमचे हे आगळेवेगळे लिखाण अतीशय आवडले.:स्मित: आपल्या भोवताली लहापणापासुन असणारे हे पक्षी आपण कायम गृहीत धरतो, आणी काही काळानन्तर दिसेनासे झाले ( चिमण्या वगैरे) की मग आपल्याला त्यान्ची आठवण येते.

खालची वाक्ये जाम आवडली.:हाहा:

पंत एक वेगळाच, पण माणूसकी आणि त्याचा परिवार त्यावर तुटून पडत होता. नंतर त्यांना वाटू लागले की हे नेहमीच असा डबा विसरत असावेत. पण हा भ्रम आहे हे त्यांना नंतर समजले.

आणी साधनाचा हा प्रतीसाद आवडला.>>>>ह्या सगळ्या पक्ष्यांना दाणे किंवा इतर काही टाकताना मनात विचार येतो, आपल्याला जेव्हा कोणीतरी नि:स्वार्थीपणे मदत करण्याची आत्यंतिक गरज भासेल तेव्हा आपल्याला कोण असेल?

काळजी करु नका. जे पेरु ते कधीनाकधी उगवतेच.

सीमा तुझी मान्जरे भारीच दिसतात.:फिदी: मला आवडते मान्जरान्बरोबर खेळायला. पण पाळ्णे शक्य नाही.

सुरेख जमलाय लेख बेफी. <स्वतः मात्र अंडे खात नाही. 'स्वतः खात नाही' हे उगीचच सांगितले, माझ्याबद्दल आस्था वाटावी म्हणून> ह्यातल्या भावना पोहचल्या.
रश्मींना <काळजी करु नका. जे पेरु ते कधीनाकधी उगवतेच.> ह्यासाठी अनुमोदन.
ते अन्याकडे बघायच करा की जरा.

रान्चो अनुमोदन साधनाला द्या. तिने लिहीलाय तो आशावादी प्रतीसाद.:स्मित:

मला आवडले म्हणून मी परत कॉपी केले ते.

khup chhan....hi sagali mandala apalya jivanat ahet mhanun tar maja ahe....mazyakade pan 2 manjare ahet....tyana mazi office madhun ghari yayachi vel mahit zali ahe....kuthehi asu det...mazya activacha aavaj aala ki....gharat hajar....

रश्मी.. | 10 September, 2014 - 06:06
सीमा तुझी मान्जरे भारीच दिसतात. मला आवडते मान्जरान्बरोबर खेळायला. पण पाळ्णे शक्य नाही.
>>>
मला पण आई पाळु देत नाही आता म्हणुन मग सोसायटीतल्या सगळ्यांनाचे माझे मानायची....

ललित छान आहे .. नावं एकदम आवडली .. Happy

पण .. Happy ह्या पक्ष्यांनां , विशेषतः कबुतरांनां (ज्यांचं पॉप्युलेशन सध्या एक्स्प्लोड होत आहे / झालेलं आहे) त्यांनां रोज खाणं देऊन माणसाळवणं योग्य आहे का, असा एक विचार आला मनात .. मला पूर्ण जाणीव आहे की आपण माणसांनीं त्यांच्या हॅबिटॅट्स वर अतिक्रमण केलेलं आहे .. आणि त्यांनां खायला देणं, त्यांच्याशी मैत्री करणं हा विरंगुळा ठरू शकतो, माणुसकी जिवंत ठेवतो .. पण ह्या पक्ष्यांचा न्युसन्स् खूप असतो .. आपल्याकडे ह्या बाबतीत नियम , अवेअरनेस नाही पण इकडे अमेरिकेत तर आपलं माणसाचं अन्न पेट्स ना, स्ट्रे (?) पक्ष्यांनां न घालण्याबद्दल संकेत आहेत .. त्याने त्या पक्ष्यांनां, प्राण्यांनां अपाय होऊ शकतो असं म्हणतात .. आता मी "अमेरिके"चा उच्चार केला म्हणजे त्यावरून वेगळे वाद सुरू होऊ शकतील .. पण अगदी प्रामाणिकपणे मी बढाई मारायला, किंवा आमच्या अमेरिकेत बघा कित्ती कित्ती ज्ञान आहे ह्याकरता हे लिहीलेलं नाही .. समजून घ्याल अशी अपेक्षा .. मागे पाळीव कुत्र्यांबद्दल चा बीबी तुम्हीच सुरू केलात ना?

मी म्हणतेय त्यात काही चुकीचं असेल तर जरूर सांगा ..

ह्या सगळ्या पक्ष्यांना दाणे किंवा इतर काही टाकताना मनात विचार येतो, आपल्याला जेव्हा कोणीतरी नि:स्वार्थीपणे मदत करण्याची आत्यंतिक गरज भासेल तेव्हा आपल्याला कोण असेल?>> कुत्रा.

छान लेख. आता तुमचं मन प्राणि जगताच्या बाबतीत ओपन झालं आहे. आवडलं आपल्याला.

इथे गुजराती कबुतरांना बर्ड सीड्स / बाजरी-ज्वारी व कावळ्यांना स्पेशल शेव गाठ्या घालतात. शेव व बुंदी मिक्स असे किलो किलोने नेउन गायीला घालतात. एकदा कुत्रे फिरवत असताना माझ्या अंगावर २५ का तीस मजल्यावरून टाकलेल्या शेवेचा अभिषेक झाला होता. ते ऐश्वरय मिरवीत घरी यावे लागले.

आमच्या गॅलरीत कबुतरे कायम शेल्टर घेत असतात पावसा पासून. सोफ्यावर पडून त्यांची नाटके बघायला फार मजा येते. पण ते काच बंद करूनच कारण कुत्रे एका फाइट मध्ये कबुतराचा जीव घेतात ते ब्रीडच तसे आहे.

जवळच एक घारीचे घरटे आहे त्यातले पिल्लू पहाटे पासून वेगवेगळ्या आवाजात कोकलत अस्ते.ऐकायला फार बरे वाटते. बारके पोर काहीतरी सांगत मागे फिरत असते तसे वाट्ते. परवा हपिसात बसले असताना एक वेगळीच बर्ड शीळ ऐकली व दहा मिनिटे तो रंगीत पक्षी बघत बसले. स्मार्ट फोन असता तर नक्की फोटो घेतला असता.

Pages