आता कशाला शिजायची बात - अरुंधती कुलकर्णी - मिंटी फ्रूट सॅलड

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 5 September, 2014 - 08:06
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ताज्या पुदिन्याच्या सुगंधाची व मिरमिरत्या चवीची महती काय म्हणून सांगावी! पुदिना पोटासाठी चांगला, जीभेला रुची आणणारा आणि सहज उपलब्ध होणारा! अशा या गुणी पुदिन्याच्या चटणीचे व लिंबाच्या रसाचे ड्रेसिंग वापरून केलेले फ्रूट सॅलड हे मिटक्या मारत खायचाच प्रकार! त्यात वरून थोडी आमचूर पावडर भुरभुरवा, आणि सॅलडची लज्जत आणखी वाढवा. अशा या मिटक्या मारत खायच्या ''मिंटी'' आंबट-गोड-तिखट फ्रूट सॅलडची ही पाककृती!

फळे :

सफरचंद - १
पेअर - १
डाळिंबाचे दाणे - १ ते २ टेबलस्पून (किंवा हवे असल्यास जास्त)

ड्रेसिंगसाठी :

लिंबाचा रस - ३ टेबलस्पून
मिरपूड - २ चिमटी
पुदिना चटणी - २ ते ३ टेबलस्पून
आमचूर पावडर - २ चिमटी

सजावटीसाठी :

कोबीची लहान आकाराची अखंड पाने - ३-४.

क्रमवार पाककृती: 

कोबीची पाने धुवून फ्रीजमध्ये बर्फाच्या पाण्यात ठेवून चांगली दोनेक तास गार करून घ्यावीत.

पुदिन्याची चटणी नेहमीप्रमाणे करून घ्यावी. (पुदिना, कोथिंबीर, ओले खोबरे, जिरे, हिरवी मिरची, मीठ, साखर). किंवा सणासुदीच्या दिवसांत ही चटणी बर्‍याच घरी केली जाते, त्यातलीच थोडी चटणी या पाककृतीसाठी वेगळी काढून ठेवावी.

02fru.jpg

लिंबांचा रस काढून त्यात मिरपूड मिसळून घ्यावी.

सफरचंद व पेअर धुवून, कोरडी करून, त्यांची साले न काढता बारीक फोडी करून घ्याव्यात व लगेच त्या लिंबाचा रस + मिरपूड मिश्रणात घोळवून घ्याव्यात. थोडा वेळ हा रस फोडींमध्ये मुरू द्यावा.

01fru.jpg

पाच-दहा मिनिटांनंतर पुदिना चटणी या मिश्रणात घालावी व भराभरा हे सॅलड मिसळून घ्यावे. वरून आवडीनुसार आमचूर पावडर भुरभुरावी. डाळिंबाचे दाणे घालावेत.

तयार झालेले फ्रूट सॅलड कोबीच्या पानांच्या द्रोणात घालून द्यावे किंवा आपल्या आवडीच्या काचेच्या बोलमध्ये वाढावे.

04fru.jpg

वाढणी/प्रमाण: 
३-४ माणसांसाठी (माणशी १ सर्व्हिंग धरल्यास)
अधिक टिपा: 

१. यात आवडीनुसार इतर फळे (पेरू, अननस, संत्रा फोडी इ.) घालू शकता.

२. मोड आलेले हिरवे मूग, पनीरचे छोटे चौकोनी तुकडे, स्वीटकॉर्न दाणे इत्यादी जिन्नस अगोदर पुदिना चटणीत मॅरिनेट करून या मिश्रणात घातल्यास वन-डिश मील होईल.

३. कोबीच्या पानांत हे फ्रूट सॅलड रॅप करून, चारी बाजूंनी घड्या घालून व त्यास टूथपिकने खोचून 'फ्रूट-सॅलड रॅप' तयार करता येईल.

४. हे फ्रूट सॅलड तयार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवून गारेगार करूनही खाऊ शकता.

माहितीचा स्रोत: 
प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

05fru.jpg

Lol त्या एररने इतकं पछाडलं मला की काय नाव द्यायचं हेच विसरून गेले!! थँक्स आशिका, रीया व सई.

सई, शेवटच्या फोटूलाच खूप प्रॉब्लेम येतो आहे. ''य'' वेळा तो अपलोड करून बघितला.

ज्या फोटोच्या नावात स्पेस कॅरॅक्टर आहेत ते दाखवायला अडचण येते आहे. स्पेस काढून (नाव बदलून) फोटो पुन्हा लावला तर अडचण येत नाही.
(ही अडचण का येते आहे ते माहिती नाही. शोध चालू आहे. पण तात्पुरता उपाय वर सांगितला आहे).

धन्यवाद वेबमास्तर! आपल्या सुचवणीप्रमाणे प्रयत्न केल्यावर फोटो अपलोड झाला एकदाचा आणि दिसूही लागला. Happy

थँक्स दिनेश., केश्विनी, प्रीति, जाई., तृप्ती रुनी! Happy

अरुंधती संपादक मोडातच स्पर्धक झाली होती बहुतेक, म्हणून ते नाव 'आता कशाला उद्याची बात' असं झालं होतं Proud

फोटो जबरी आहे. थंडगार सॅलड खाणार नक्की!

मंजूडी Proud