आसनं समर्पयामि - नीधप

Submitted by संयोजक on 3 September, 2014 - 11:36

"या दगडातून काहीतरी करून दे बरं मला वायर वापरून!"
डिसेंबरमधे शूटच्या दरम्यान नदीकाठच्या लोकेशनवर एक दगड दाखवत आमचा डिओपी संजय मेमाणे म्हणाला. दगड होता अगदी गणपतीबाप्पाची आठवण करून देणारा.

01 Ganesha-stone.jpg

वायर रॅप हे तंत्र मी कोणे एके काळी 'सॅन्टा फे ऑपेरा'मध्ये काम करताना शिकले. गेली एक-दोन वर्षे तारा वळवून विविध प्रकारचे दागिने बनवण्याचे माझे प्रयोग चालू आहेत. कामानिमित्ताने जंगल, नदी फिरत असताना विविध आकार, रंग, पोताचे दगड गोळा करणे हा चाळा पहिल्यापासून होताच. या अश्या दगडांना वेगवेगळ्या प्रकारे तारांमधे गुंडाळून त्यातून कलाकृती, कलात्मक दागिने बनवणे यावर गेले काही महिने माझा भर आहे. मी बनवलेल्या काही वस्तू, काही दागिने संजयने नुकतेच बघितले होते. ते त्याला आवडले होते, त्यामुळे तो गणपतीच्या आकाराचा दगड मिळाल्यावर लगेच घरात ठेवायला त्या दगडाचे तारा वापरून मी काहीतरी करून द्यावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली.

दगडाला त्याचा आकार, रंग, रूप हे सगळं नैसर्गिकरीत्या प्राप्त होतं. जिथे तो दगड सापडला असेल तिथल्या वातावरणाचा, भौगोलिक परिस्थितीचा परिपाक म्हणून कुठलाही दगड तयार होतो. मी गोळा केलेले सगळे दगड कोकण-गोव्यातल्या नदीकाठचे. एकेक दगड हाताळताना, त्याचे रूप बघताना, त्याचा पोत अनुभवताना जाणवतं की हा एकेक दगड म्हणजे नदीच्या वाहण्याची कहाणी आहे! अश्या दगडांना तारांनी बांधून वस्तू तयार करणे म्हणजे नदीच्या वाहण्याच्या कहाणीला सजवून मांडणे. त्यामुळे सजावट ही फक्त कहाणीला उठाव देणारी हवी.

या सगळ्याला हा गणपतीच्या आकाराचा दगडही अपवाद नव्हता. त्या आकाराचे 'गणपती'पण महत्वाचे, ते दिसले पाहिजे. पण गणपतीचा आकार हा तारांनी दाखवायचा नाही अन्यथा या दगडाच्या गणपतीपणाला काहीच अर्थ नाही. त्यामुळे गणपतीला एखाद्या बेसवर बसवायचे आणि बाजूने मखर करायचे हे ठरले.

बेससाठी तांब्याची १८ गेजची तार घेऊन स्पायरल करून एक चकती तयार केली. पितळ्याच्या २१ गेजच्या तारा घेऊन त्याच्या पाकळ्या तयार केल्या. त्या पाकळ्यांच्या दांड्यांची जुडी बांधली आणि पाकळ्या सर्व दिशांना सूर्यकिरणासारख्या मुडपल्या. हा झाला पाया. या पाकळ्या आता सर्व बाजूंनी वजनाला बॅलन्स करणार. या जुडीच्या वरती तांब्याची चकती बसवली. हे झाले बाप्पांचे बसण्यासाठीचे स्टूल. सिंहासनाच्या पायाशी पाकळ्यांच्या दांड्यांच्यामधे तांब्याच्या २२ गेजच्या तारेने विणून घेतले. याच्यामुळे पाया जास्त स्टेबल झाला.

02 sinhasan.jpg

आता बाप्पांना त्यावर बसवायचे तर टेकायला काहीतरी हवे आणि बाप्पा स्टुलावरून हलू नयेत म्हणून त्यांना धरून ठेवणारेही काहीतरी हवे. ते तांब्याच्या १८ गेजच्या तारेतून तयार केले. पण ते तयार करताना एकही तार बाप्पांच्या पुढून क्रॉस होणार नाही आणि गणपतीचा आकार झाकणार नाही ही काळजी घेतली. इथे बाप्पांनी माझी परिक्षा घेतली. विविध पद्धतीने तारा बांधून बघितल्या पण बाप्पा काही स्थिर बसायला तयार नाहीत. काही करा स्टुलावरून उडी मारणे चालूच.

अजून तारा वापरल्या, जास्त गुंडाळले तर पक्के बसणार पण मग गणपतीपण हरवून जाणार... अश्या काहीतरी खोड्यात अडकले होते. कला तुम्हाला आयुष्याविषयी बरंच काही शिकवून जाते ती अशी वगैरे फिलॉसॉफीही सुचत होती त्या दरम्यान. पण उडी कशी थांबवायची? बाप्पा कसे जागेवर रहातील? ते काही समजत नव्हते. सगळं गुंडाळून बाजूला ठेवून दिलं आणि जरा वेळ घेऊन नव्याने विचार करावा, केलेलं काम जाऊ देत, अजून काही वेगळी कल्पना लढवूया असे ठरवले.

'सगळ्या गोष्टींची वेळ यावी लागते' हे एक वारंवार वापरून गुळगुळीत झालेलं वाक्य इथेही खरं ठरलं. तब्बल दीड महिन्यांनी गुंडाळून ठेवलेले बाप्पा आणि त्यांचं अर्धवट झालेलं सिंहासन बाहेर काढलं. केलेलं सगळं खारीज वगैरे करण्यापूर्वी एक शेवटचा प्रयत्न म्हणून आधीच्याच टेक्निकने बाप्पांना बांधून घालायचा प्रयत्न केला आणि काय आश्चर्य बाप्पा शहाण्या मुलासारखे एका जागी बसले. एक महत्वाचे काम झाले होते. अडकलेलं काहीतरी सुटून पुढे वाहतं व्हावं तसं काहीतरी वाटलं मला.

मग मागची प्रभावळ करायला घेतली. पायामधे असलेल्या पाकळ्यांच्या सारखेच काहीतरी करायचे ठरवले कारण खूप वेगळं काही केलं तर पूर्ण डिझाइनचा तोलच ढळला असता. पाकळ्यांचा पिसारा तयार करून बाप्पांच्या मागे बसवला. नंतर त्या पाकळ्यांच्या मधे मधे तांब्याच्या २२ गेज तारेने विणून घेतले.

03 bappa-closup.jpg

वायर रॅप टेक्निकमधे केलेली वस्तू जरी एकाच बाजूने बघायची असली तरी मागची बाजू दृष्टीस पडली तर ती सुबकच दिसली पाहिजे या नियमाला फार महत्व असते. त्यामुळे पिसारा बसवल्यानंतर मागच्या बाजूनेही तारा विणून सगळे जोडकाम वगैरे झाकून टाकले.

04 Moraya-pathmore.jpg

मग बाप्पांच्या सिंहासनाला गादी बनवली. तिच्या चारी बाजूंनी तारेने धावदोरा घातला आणि पाटाच्या कोपर्‍यांना फुलं बसवावी तसे त्या तारांचे छोटे स्पायरल्स बसवले.

05 Gaadi.jpg

अश्या तर्‍हेने बाप्पा पूर्ण तयार होऊन आता आपल्या योग्य स्थळी जाण्यास सिद्ध झाले.

06 Morayaa.jpg

- नीधप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मेटलस्मिथिंग शिकलेय. पण एवढं इंट्रिकेट वायरवर्क नाही केलं कधी. शिकायचंय वेळ झाला की.
पण माझ्या जुलरी मेकींग डोळ्यांना हे खूप सफाईदारपणे झाल्याचं दिसतंय! सुरेख!
किती वेळ लागला बनवायला?

तसं जानेवारी ते ऑगस्ट हा स्पॅन आहे खरं पण त्यात यावर प्रत्यक्ष काम करण्याचे दिवस म्हणले तर ३ तास प्रत्येक दिवशी असे १०-१२ दिवस धरता येतील. सगळ्यात जास्त जीव काढला तो गणपती सिंहासनावर बसवणे या पायरीने.

वाह नी. अतिशय सुरेख.
त्या तारा मापात वाकवताना फार कष्ट पडत असतील ना? अंदाजे करतेस की माप वगैरे असते काही त्याचे ठरलेले?

दक्षे, यातलं कुठलंच डिझाइन किंवा डिझाइनचा भाग हा ट्युटोरियलप्रमाणे केलेला नाही. संपूर्ण डिझाइनही मीच केले आहे. तुमच्या डिझाइनसाठी तुम्ही काय टेक्निक्स वापरता हा ही डिझाइनचा भाग त्यामुळे माप वगैरे तुमचे तुम्ही अंदाजानेच ठरवायचे असते.

धन्यवाद सगळ्यांना....

अप्रतिम! काय सुरेख झालंय सगळं काम. मला मुख्यत्वे मागच्य महिरपीत मोकळ्या ठेवलेल्या पाकळ्या आणि त्याच्या मधल्या भरलेल्या जागा अतिशय आवडल्या. खूप सुरेख इफेक्ट मिळतोय. आणि बाप्पांना धरून ठेवण्याकरता केलेले ते दोन बाजूंचे मिनिमॅलिस्टिक डिझाईनही मस्त आहे.

अप्रतिम काम आहे हे! प्रभावळ तर अफलातून जमली आहे.

नीधप, एक भाप्र! बाप्पाला अंगठीतल्या खड्यासारखं बेसला कोंदण करुन बसवणं सोपं पडलं नसतं का ?

बाप्पाला अंगठीतल्या खड्यासारखं बेसला कोंदण करुन बसवणं सोपं पडलं नसतं का ? <<
अंगठीतला खडा हा नीट बसावा यासाठी व्यवस्थित कट करून सर्व बाजूंनी आकार दिलेला असतो. ते इथे केलेले नाही. तसेच जे कोंदण असते त्याचा बेस हा धातू ओतून बनवलेला असतो खड्याच्या आकाराच्या अनुषंगाने. तेही इथे शक्य नाही.
इथे एकही मशिन वापरलेले नाही. खडा नुसता स्वच्छ धुवून, ब्रशने घासून वगैरे साफ केलेला आहे. नुसत्या खड्याचा बेस नीट बघितलास तर लक्षात येईल की त्या खड्याचा बेस अजिबात सरळ नाही. तिरका आहे आणि निमुळताही आहे. बाकी फक्त वायर्स आहेत. आकार देणे वगैरे यासाठी माझी बोटे आणि ज्वेलरी प्लायर्स एवढेच आहे.

हे वायर रॅप तंत्र आहे. ज्यात धातू ओतणे वगैरे गोष्टी अपेक्षित नाही. ते मेटलस्मिथिंग होईल.

ज्वेलरी प्लायर्स आणि एक तारेसाठीचे कटर आणि प्लॅस्टिक हातोडी + मेटलचा जड ठोकळा (ज्याच्यावर वस्तू ठेवून ठोकता येतील असा) एवढीच माझी हत्यारे/ औजारे आहेत. Happy

Pages