ठो उपमा - प्रसंग क्र. ४

Submitted by संयोजक on 1 September, 2014 - 05:36

गणपती बाप्पा मोरया!
या उपक्रमाविषयी अधिक महितीसाठी येथे टिचकी मारा - http://www.maayboli.com/node/50546

प्रसंग :
आज मस्त धुंद कुंद हवा पडली आहे. पहाटेच्या तरल स्वप्नात "तो" दिसल्याने त्याच्यासोबत ओढणीचे किंवा पदराचे टोक हातात घेऊन झोपाळ्यावर झुलत-झुलत गप्पा मारायची अनिवार इच्छा अंजूच्या मनात वारंवार उसळ्या घेत आहे, पण तो मात्र कुठेतरी मित्रांबरोबर मौजमस्ती करायला गेला असणार! आणि अंजू इथे बिचारी त्याच्या आठवणींमध्ये झुरतेय. मनातल्या विचारांना निग्रहाने बाजूला फेकत एकवार तिने समोर नजर टाकली. तिच्या ऑफिसच्या १९व्या मजल्यावरच्या गॅलरीतून अत्यंत मनोहरी दृश्य तिला दिसत होतं. एकीकडे धरती नवविवाहितेसम हिरवा शालू नेसल्याप्रमाणे भासत होती तर दुसरीकडे काळा धूर सोडणारी बकाल वस्ती.. अगदी सुंदर चेहर्‍यावर काजळाची तीट असावी, अगदी त्यापरी! अचानक 'त्याचा' विचार अंजूच्या मनात तरळून गेला आणि ती एकदम कावरीबावरी झाली. आपल्यात अंतर तर पडणार नाही ना? या विचाराने तिचे टपोरे डोळे पाण्याने डबडबू लागले. त्याची आणि अंजूची ओळख तशी १०-१२ महिनापूर्वीचीच. पण साधारण सहा महिन्यांपूर्वी तिच्या काळजाचा ठोका चुकला. प्रत्येकवेळी अंजूशी गोड गोड बोलून मनातली गोष्ट काढून घ्यायचा... अगदी हळुवार पणे... कळायचंच नाही कसं जमतं? त्याचा स्वभावच अतिशय मिश्किल आणि लाघवी... बघता बघता समोरचा सर्वस्व पणाला लावेल त्याच्यासाठी. अंजूचं तिच्या हट्टी मनापुढे काही चाललं नाही. अर्थात त्याला ह्याची कल्पना होती. पण सहसा मुलांमध्ये असणारा इगो ह्याच्या नसानसांमध्ये भरला होताच. अंजूचं त्याच्या प्रेमात आकंठ बुडणं ही तर गोष्ट त्याचा मेल-इगो सुखावणारी होती. एक कन्यका ह्याच्या प्रेमात पडली होती. तिनं खरं तर अजून आपलं मन मोकळं केलं नव्हतं पण तिच्या कृतीतून मात्र त्याला जाणवले होते. आपल्या प्रत्येक मित्राला त्याने हे सांगितले होते की ती माझ्यावर जीव ओवाळून टाकते. मित्रसुद्धा योग्य सल्ला न देता त्याच्या त्या अहंकाराला अजून फुलवत होते. आता अंजूसमोर प्रश्न होता की त्याला थेट विचारावे की नाही?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज मस्त मातकट, कंटाळवाणी हवा पडली आहे. पहाटेच्या तरल स्वप्नात "तो" दिसल्याने त्याच्यासोबत पानाचे तोबरे भरत आणि सोबत पिंकदाणी हातात घेऊन रस्त्याने बुंगाट वेगाने धावणार्‍या फटफटीवर आरूढ होऊन ओरडून, घसे खरवडून गप्पा मारायची अनिवार इच्छा अंजूच्या मनात वारंवार उसळ्या घेत आहे, पण तो मात्र कुठेतरी मित्रांबरोबर कोणाच्या तरी मर्तिकाचे नाहीतर श्राद्धाचे जेवण करायला गेला असणार! आणि अंजू इथे बिचारी त्याच्या आठवणींमध्ये झुरतेय. मनातल्या विचारांना क्लोरोफॉर्मची गोडमिट्ट, धुंदफुंद भूल देत एकवार तिने समोर नजर टाकली. तिच्या ऑफिसच्या १९व्या मजल्यावरच्या गॅलरीतून अत्यंत उदासवाणं, कुरूप आणि ओंगळ आणणारं असं आजूबाजूच्या झोपडपट्टीचं अस्ताव्यस्त रूप तिला दिसत होतं. एकीकडे धरती ठिगळं लावलेल्या गोधडीवाणी गगनचुंबी स्कायस्क्रेपर्सच्या नक्षीतून हिरवी, भुरकट, ओसाड, पांढुरकी रंगाचे तुकडे दाखवत गपगुमान पडून होती तर दुसरीकडे काळा धूर सोडणारी बकाल वस्ती.. अगदी सुंदर चेहर्‍यावर काजळाची तीट असावी, अगदी त्यापरी! अचानक 'त्याचा' विचार अंजूच्या मनात खोल पाण्यात गटांगळ्या खाणार्‍या उंदराप्रमाणे तगमगून गेला आणि ती एकदम मत्सर व क्रोधाच्या महाभीषण लाटेने गिळंकृत करावे तशी लालबुंद - आरक्तवर्णा झाली. आपल्यात अंतर तर पडणार नाही ना? या विचाराने तिचे कुटिल, कावेबाज डोळे पाण्याने डबडबू लागले. त्याची आणि अंजूची ओळख तशी १०-१२ महिनापूर्वीचीच. पण साधारण सहा महिन्यांपूर्वी तिच्या मनाच्या रस्त्यावर त्याने आपल्या बदमाशीच्या विमानाचे क्रॅशलँडिंग केले. प्रत्येकवेळी अंजूशी गोड गोड बोलून मनातली गोष्ट काढून घ्यायचा... अगदी हळुवार पणे... कळायचंच नाही कसं जमतं? त्याचा स्वभावच अतिशय मिश्किल आणि लाघवी... बघता बघता समोरचा हाताला मिळेल ते अस्त्र-शस्त्र घेईल आणि त्याच्या विरोधात तोंड उघडणार्‍यांचा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नि:पात करेल. अंजूचं त्याच्या धूर्त आणि अस्सल कारस्थानापुढे काही चाललं नाही. अर्थात त्याला ह्याची कल्पना होती. पण सहसा मुलांमध्ये असणारा इगो ह्याच्या घरात सर्वात मोठी जागा व्यापून होता; शिवाय ह्याच्या अंगाखांद्यावर मत्सर, लोभ आणि ईर्श्येचा सदाजागता पहारा होताच. अंजूचं त्याच्याशी वाकड्यात शिरून, त्याला घालून-पाडून बोलणं ही तर गोष्ट त्याचा मेल-इगो सुखावणारी होती. एक कन्यका ह्याच्या प्रेमात पडली होती. तिनं खरं तर अजून त्याला आपल्या मूळ लबाड स्वभावाचं विश्वरूपदर्शन दिलं नव्हतं पण तिच्या कृतीतून मात्र त्याला जाणवले होते. आपल्या प्रत्येक मित्राला त्याने हे सांगितले होते की ती माझ्यावर भर पहाटे गल्लीतून जाणार्‍या सायकलस्वारावर गल्लीतली मोकाट कुत्री ज्या जोमाने भुंकतात त्या जोमाने खार खाऊन असते. मित्रसुद्धा योग्य सल्ला न देता त्याच्या त्या कुटिल कारस्थानाच्या आगीत रॉकेल ओतत होते. आता अंजूसमोर प्रश्न होता की त्याला थेट विचारावे की नाही?

Lol

हो ना, बिच्चारी अंजू .. Sad

हिच्यावरही कोणीतरी मलाही कोतबो लिहा रे .. एकेका माबोकरावर भडास काढायची असेल हिला Lol Rofl

आज मौसम बडा बेईमान है. पहाटेच्या तरल स्वप्नात "तो" दिसल्याने त्याच्यासोबत लाल दुपट्टा मलमल का हातात घेऊन झूले मे पवन के साथ गप्पा मारायची अनिवार इच्छा अंजूच्या मनात जंपिंग जॅक करत आहे, पण तो मात्र कुठेतरी मित्रांबरोबर व्हेअर्स द पार्टी टूनाईट करायला गेला असणार! आणि अंजू इथे बिचारी त्याच्या याद आ रही है तेरी याद आ रही है. मनातल्या विचारांना दूर दूर यहांसे दूर करून एकवार तिने समोर नजर टाकली. तिच्या ऑफिसच्या १९व्या मजल्यावरच्या गॅलरीतून ये हंसी वादियां तिला दिसत होतं. एकीकडे दुल्हनसी सजी धरती खुला वो आसमान भासत होती तर दुसरीकडे काळा धूर सोडणारी बकाल वस्ती.. अगदी सुंदर चेहर्‍यावर काजळाची तीट असावी, अगदी त्यापरी! अचानक 'त्याचा' विचार अंजूच्या मनात तुम्हे याद करते करते आणि ती एकदम फिर क्यु मुझको लगता है डर झाली. आपल्यात अंतर तर पडणार नाही ना? या विचाराने तिचं मेरे नैना सावन भादो झालं... . त्याची आणि अंजूची ओळख तशी १०-१२ महिनापूर्वीचीच. पण साधारण सहा महिन्यांपूर्वी तिच्या मुझे ऐसा लगा वो मिल गया... प्रत्येकवेळी अंजूशी गोड गोड बोलून मनातली गोष्ट काढून घ्यायचा... अगदी हळुवार पणे... कळायचंच नाही कसं जमतं? त्याचा स्वभावच अतिशय मिश्किल आणि लाघवी... बघता बघता समोरचा छोड दे सारी दुनिया त्याच्यासाठी. अंजूचं दिल तो पागल है..समोर काही चाललं नाही. . अर्थात त्याला ह्याची कल्पना होती. पण सहसा मुलांमध्ये असणारा इगो ह्याच्या नसानसांमध्ये भरला होताच. अंजूचं मैं डूब डूब जाता हू ही तर गोष्ट त्याचा मेल-इगो सुखावणारी होती. एक कन्यका ह्याच्या प्रेमात पडली होती. तिनं खरं तर अजून मुझे कुछ कहना है... पण तिच्या कृतीतून मात्र त्याला जाणवले होते. आपल्या प्रत्येक मित्राला त्याने हे सांगितले होते की ती हम तेरे प्यार मे सारा आलम खो बैठे है . मित्रसुद्धा योग्य सल्ला न देता त्याच्या त्या अहंकाराला अजून फुलवत होते. आता अंजूसमोर प्रश्न होता की त्याला थेट विचारावे की नाही

सर्वच सीरीजमधील सर्वांचे ठो मस्तच!

पण मूळ प्रसंगही काय जमले आहेत! कोणी लिहिले आहेत? सर्व टिपिकल उपमा वापरुन झकास भट्टी जमली आहे!

या खेळामुळे होणारे मनोरंजन व धमाल सर्वांनी आवर्जून लिहील्याबद्दल धन्यवाद!
वेदिका२१, कलाकारांची नावे समारोपाच्या धाग्यावर नक्की वाचा. Happy

अंजूच्या गोष्टीत पुढे काय होईल बरं..?

आज मस्तं ठेवणीतल्या फर्निचरवर धूळ पडली आहे. पहाटेच्या तरल स्वप्नात "तो" दिसल्याने त्याच्यासोबत खराटाहातात घेऊन पारावरण्या गप्पा मारायची अनिवार इच्छा अंजूच्या मनात कडमडली आहे, पण तो मात्र कुठेतरी मित्रांबरोबर कचरा गोळा करायला गेला असणार! आणि अंजू इथे बिचारी त्याच्या घंटा गाडीचा नंबर आठवतेय. मनातल्या विचारांना पांढरी शाई लावून एकवार तिने समोर नजर टाकली. तिच्या ऑफिसच्या १९व्या मजल्यावरच्या गॅलरीतून अत्यंत वेगाने जाणारे विमान तिला दिसत होतं. एकीकडे धरतीला म्हणत गर्दी एका चोरी करणार्‍या मुलीच्या मागे लागली होती तर दुसरीकडे काळा धूर सोडणारी बकाल वस्ती.. अगदी सुंदर चेहर्‍यावर काजळाची तीट असावी, अगदी त्यापरी! अचानक 'त्याचा' विचार अंजूच्या मनात गळपाटला आणि ती एकदम लहान झाली. आपल्यात अंतर तर पडणार नाही ना? या विचाराने तिचे हातपायही गळपाटले. त्याची आणि अंजूची ओळख तशी १०-१२ महिनापूर्वीचीच. पण साधारण सहा महिन्यांपूर्वी तिच्या १९व्या मजल्यावरून टाकलेल्या कचर्‍याच्या खाली तो आला. प्रत्येकवेळी अंजूशी गोड गोड बोलून मनातली गोष्ट काढून घ्यायचा... अगदी हळुवार पणे... कळायचंच नाही कसं जमतं? त्याचा स्वभावच अतिशय मिश्किल आणि लाघवी... बघता बघता समोरचा कचर्‍याचा डबा बाहेर आणून ठेवेलत्याच्यासाठी. अंजूचं तिच्या कचर्‍याच्या डब्याकडे लक्ष नव्हतं. अर्थात त्याला ह्याची कल्पना होती. पण सहसा मुलांमध्ये असणारा इगो ह्याच्या गावीही नव्हता. अंजूचं त्याच्या वर कचरा टाकणं ही तर गोष्ट त्याचा मेल-इगो सुखावणारी होती. एक कन्यका ह्याच्या प्रेमात पडली होती. तिनं खरं तर अजून मागच्या महिन्याचे पैसे दिले नव्हते पण तिच्या कृतीतून मात्र त्याला जाणवले होते. आपल्या प्रत्येक मित्राला त्याने हे सांगितले होते की ती माझ्यावर खार खाऊन असते. मित्रसुद्धा योग्य सल्ला न देता त्याच्या त्या थापांना अजून फुटेज देत होते. आता अंजूसमोर प्रश्न होता की त्याला थेट विचारावे की नाही?