धूम फेम अली - गण्या - मलाही कोतबो

Submitted by गण्या. on 30 August, 2014 - 03:14

नमस्कार
मी... मी , काय ओळख करून देणार माझी ?

मी बॉलीवूडच्या सर्वात सुपरहीट सिरीजचा सुपरहिरो आहे. हॉलीवूडच्या तोडीचे स्टंटस, महागड्या सुपरबाईक्सवरून केलेले पाठलाग, हाणामा-या यामुळे एका सुपरकॉपला माझ्याशिवाय पर्याय नाही. आख्ख्या मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचं बजेट एकत्र केलं तरी टेंडर निघणार नाही अशी एकेक सुपरबाईक मी त्या सुपरकॉपला सहज देत असतो. थोडक्यात काय तर हॉलिवूडमधे असतो तर माझ्या नावाचे टी शर्ट्स छापले गेले असते, व्हॉट्सप, फेसबुक, यूट्यूब सगळीकडे माझा बोलबाला असता. पण एक नाही, दोन नाही, तीन तीन सुपरहीट सिनेमे देऊनही माझं नावच कुणी घेत नाही.

ओळखलं कि नाही अजून ?

असंच आहे.

कोणच ओळखत नाय Sad

एकामागून एक हिट्ट देवून पण च्यायला आपल्या नावाची चर्चा नाय कुठे राव.

तिसरा भाग रीलीज व्हायचा म्हणुन कांजुरला हुमा थेटरात गेलो होतो. मला वाटलं सह्या मागायला लंबी लाईन लागल. तर पोस्टरच्या इथंच एक लोकल गर्ल काय बोलल्ली म्हाइतै ?

" वाव्व आमीरखान के लिएफिल्म देखना मंगता है, लेकिन उसमे वो है ना ?"
तर तिचा हिरो माझ्याकडे बोट करून म्हणाला
' कौन ये ?"
ती ई ई ई करत इतकी जोरात किंचाळली कि बस्स ! वर म्हणाली " नाम मत लो उसका" !

वलीखलं का मले, वलीखलं ? नाय काय म्हणुन राह्यले ? आं आं आं, आले ध्येनात नै ? Proud

मी अली !
ह्यो माका फोटु Proud

सुपरबाईकचं गॅरेज आहे आपलं. स्टंटस करायची आवड आहे. छोटी मोठी चोरी करायला ना नाही, पण आपला दोस्त सुपर कॉप पडला. ज्याला कुणीच पकडू शकत नाही अशा चोरांना पकडण्यासाठी तो आपली मदत घेत असतो. तसं आपलं कॅरेक्टर एकदम मजबूत. सल्लू भाई हा म्हटला असता तर आपलं नशीबच फळफळलं असतं. फिर क्या, अली के लिए लडकियां जान छिडकती थी ! पर मै भी क्या करू , प्रोड्युसर का लडका है, मजबुरी है !

च्या मारी, ही पण कसली मजबूरी राव, चा बरं मारी बिस्कीटं खायची ! त्या जॉन अब्राहमचा कुठला पिक्चर गेलाय का स्वतःच्या दमवर शंभर कोटीच्या क्लबमधे ? (बिपाशा बसूची जिममधली मेहनत भट कंपनीने पेश केली नसती तर जिस्म त्याच्या नावावर हिट म्हणून लागला नसता). पहिल्या भागात हा चोर असून भावखाऊ रोल मिळाला. पिक्चर सुपरहीट ! पण त्यानंतर जॉनला शंभर कोटीचा बिझनेस जमला का ? नाही ना ? पण क्रेडीट घेऊन गेला.

नंतर आला हृतिक रोशन. होम प्रॉडक्शन सोडलं तर सुपरहिट जवळजवळ नाहीच. इंडस्ट्रीतून बाहेर पडतो की काय असं वाटायला लागलं की पप्पा रोशन क ची अक्षरं हवेत फेकतात, पहिलं खाली पडेल त्या नावाचा पिक्चर काढतात. किती दिवस अशी फेका फेकी करनार ना ? म्हणून मग बाहेरच्या बॅनरचा पिक्चर हवा होता. मग पार्ट टू मधे आला. या पा‍र्ट मधे लै ढोर मेहनत केली आपण. पण पुन्हा हा चोरच भाव खाऊन गेला. पिक्चर पुन्हा सुपरहीट. ऐश्वर्या पण खूष (कशामुळं ? जास्त कीस पाडू नका). जय दी़क्षितचं पहिल्यापासून कळत नाही कि गडी खूष आहे , नाही ! त्यात या भागात जरा डिस्टर्बच होता मधूनच. पण त्यालाही थोडा भाव खाता आला.

आपल्याच वाट्याला घोर उपेक्षा का ?

त्याचं उत्तर त्या दिवशी हीना थेटरात मिळालं. त्या आगाऊ पोरीनं इज्जत का फालुदा केला. पण मी काय म्हणतो चेहरा कुठला मिळेल हे पात्राच्या हातात कुठं असतं. लेखकाने मस्त सल्लुमियाला डोळ्यासमोर ठेवून रोल लिहीला. आकाशातल्या आईला उद्देशून बोलायची स्टाईल तर भाईजानचीच. हम दिल दे चुके सनम मधे आकाशस्थ पप्पाला बोलत असतो ना, त्यावरून उचलली. पण हा उदय चोपडा डायलॉग बोलायला लागला की मी पप्पाच्या नावानं प्रार्थना करत असतो. जास्त कॉमेडी नको होऊ देवू बा हा सीन.

माझा स्वभाव चांगला आहे हो. हां, टू पीस वाल्या पोरींच्या मागे लागतो मी, पण सगळेच तसं करतात. हृतिक तर ऐश्वर्याच्या मागे लागला होता. त्याला नाय कोण काही बोलत ! हेच सल्लुभाई करतो तेव्हां सगळ्यांच्या गालावर कसे गुलाब फुलतात. पण च्यामारी या उदय चोपडेच्या ! त्याच्या फेसबुकमधेच प्रॉब्लेम आहे. त्याने सहज जरी पोरींकडं पाहीलं तरी लाळघोट्या वाटतो. इनोसण्ट बनायला गेला की माकड वाटायला लागतो. त्यातच गाल कुठून सुरू होतात आणि जबड्यात तोंड नावाचा अवयव कानापर्यंत कसा हे प्रश्न जसे तुम्हाला पडतात तसेच मलाही पडतात. तो भयानक थोबडा विसरून माझ्याकड बघा ना. सुपर बाईकच गॅरेज म्हणजे खायचं काम नाय बॉस. शान मधला अब्दुल्ला पण गाजला होता. मग एव्हढं महत्त्वाचं काम करून पण तुम्ही सर्वांनी माझा घोर अनुल्लेख केलाय मायबापहो.

आता त्याला स्वतःवर एव्हढा कॉन्फिडन्स आहे म्हटल्यावर काय करणार ! त्यात धूम ३ ने पाचशे कोटींचा बिझनेस केल्यावर त्याला वाटू लागलय की अभिषेक बच्चन पण नाही... माझ्यामुळंच पिक्चर हिट्ट झाला. अभिषेक ला काय जास्तीत जास्त आयडियाजच्या जाहीराती मिळतात. रावण आपटला, बायकोचेही पिक्चर खास चालत नाहीत. नेमके धूम सीरीजचेच पिक्चर कसे चालले ?

आमीरला एव्हढा चांगला थ्री इडीयट काढून दिला, गेला का तीनशेच्या वर ? हाच कसा पाचशेच्या वर गेला ? हे माझे नाहीत उदय भौंचे विचार आहेत. पाचशे कोटीचा गल्ला जमवल्यापासून आमीर पेक्षा रेट वाढवलाय , पण बाहेरच्या ब्रॅण्डचा पिक्चर करणार नाही अशी प्रतिज्ञा पण केलीय.

म्हणजे पुढच्या पार्ट मधे हाच भयानक चेहरा माझ्या नशिबी येणार तर...

मायबाप हो ! हीच माझी व्यथा आहे. एकतर मला समजून घ्या , नाहीतर त्या उदय चोप्राला म्हणावं अली को बख़्श दो, छोड दो उसे ! उसे भी जीने दो !!! तुमचं आइकलं तरच आइकल तो नाही तर पुन्हा तुम्ही प्रेक्षक म्हणून याल तेव्हां अलीलाच शिव्या घालणार हे ठरलेलं आहे , हे कॉनाशी तरी बोलावंसं वाटलं, योगायोगाने कोतबो स्पर्धा चालू होती, म्हटलं बक्षीस तर मिळणार नाहीचै, पण जरा हलकं हलकं तर वाटेल !

आपण माझी व्यथा शांतपणे ऐकून घेतलीत याबद्दल आपले आभार.

आपला अली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंय. अधेमध्ये अलीचे भाईगिरी फ्रेझेस अजून आले असते तर मज्जा आली असती. पण कॅरेक्टर आणि तो साकारणारा अभिनेता यामधलं दाखवलेलं वेगळेपण जास्त आवडलं. Happy

कॅरेक्टर आणि तो साकारणारा अभिनेता यामधलं दाखवलेलं वेगळेपण जास्त आवडलं.>> +१

मस्त लिहिलंय. Happy

छान लिहिलंय.. त्यालाही मन असेल, काही सांगायचे असेल असे कधी वाटलेच नव्हते Happy

आमच्या हृतिक चे नाव तेवढे नीट लिहिणार का ?

व्यथा टोटली ऐकून (वाचून) घेतली. अलीसाहेब - तुमचे इम्याजिनेशन आपल्याला फार आवडते. कोणतीही हीरॉइन समोर आली, की लगेच एक फोटो आपला तिच्याबरोबर, मग तिच्या व मुलांच्या बरोबर असे करत जे तुमचे स्वप्नरंजन चालते ते नेहमी हसवते.

बाय द वे धूम-३ मधला ज्यु.बी बरोबरचा रिक्षावाला स्पूफ स्टंट मात्र जबरी. टोटल लोल Happy

आपले सर्वांचे आभार.
भरत मयेकर यांची एण्त्री पाहून ही स्पर्धा कळाली. मौजमजा म्हणून यात भाग घेतला. जेव्हां भाग घेतला तेव्हां एकच एण्त्री होती, आता ती दिसत नाही, पण इअतरांच्या एण्त्रीज खूप दिसतात.हे आवडलं. या एण्ट्रीला क्रमांक मिळेल की नाही हे माहीत नाही, पण पुरस्कार नकोच असं मनापासून वाटतंय. संयोजकांनी या विनंतीचा विचार करावा ही नम्र विनंती. धन्यवाद