ओझं

Submitted by संतोष वाटपाडे on 30 August, 2014 - 02:50

झोळीतल्या पोरानं चुळबुळ केली तेव्हा
धारदार विळा घेतलेला हात थांबला तिचा
पदराखाली झाकलेली आई
कोरडीठाक पडलेली होती
मरुन पडलेल्या घोसाळ्यागत
तळपणार्‍या उन्हानं
अन रोजरोजच्या कामानं....

कपाळाचा खारट घाम
जसाजसा ओठाजवळ येऊ लागला
तसतशी घशात टोचणारी गरीबी
पोटात धडका मारु लागली
नुकत्याच आकार घेऊ लागलेल्या
पोटातल्या गोळ्यागत

तीच्या कोरड्या पडलेल्या ओठांवर
लालसर काहीतरी चमकत होतं
कदाचित नशीबानं दिलेलं लालभडक कुंकू
शरीरातल्या लापट नसांतून
बाहेर येत असावं मोकळे श्वास घ्यायला....

अख्खं आयुष्य जसं दिसायच
ओसाड माळरानासारखं
अगदी तसं....हुबेहुब
विरलेल्या झोळीच्या लुगड्यातून
पोरं दिसत होतं तिला
पोटाशी हातपाय दुमडून झोपलेलं...

कापलेल्या गवताचा भारा डोक्यावर
निपजलेल्या मांसाचा गोळा पाठगुळीवर
आणि स्वप्नांचा ढिगारा डोळ्यावर घेऊन
ती परतणार होती....घर नावाच्या आडोशात....

--संतोष वाटपाडे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users