ठो उपमा - प्रसंग क्र. २

Submitted by संयोजक on 30 August, 2014 - 01:37

गणपती बाप्पा मोरया!
या उपक्रमाविषयी अधिक महितीसाठी येथे टिचकी मारा - http://www.maayboli.com/node/50546

प्रसंग :

अजून कशी घरी आली नाही अंजू? आई एकदा घड्याळाकडे एकदा दरवाजाकडे पाहत होती. घड्याळाने नऊ कसे वाजतात ते दाखवले होते. म्हणजे अजून बारा वाजायला तीन तास अवकाश होता. अंजू लाडकोडात वाढलेली देखण्यांची एकुलती एक लेक. लग्नानंतर बर्‍याच वर्षांनी झालेल्या अंजूने घराचे नंदनवन केले होते. एवढी गर्भश्रीमंती, एवढा डोलारा असताना घरात रांगतं बाळ नाही म्हणून शशिकलाबाई कोमेजत चालल्या होत्या. अंजूच्या येण्यानं डॅडी आणि शशिकलाबाई स्वर्गसुखात न्हाऊन निघाले. सगळी सुखं तिच्यापुढे हात जोडून उभी केली होती डॅडींनी. अंजूही नशिबाने लाडाने वेडी न होता शशिकलाबाईंप्रमाणेच हुशार निघाली. शाळेत पहिला नंबर कधी सोडला नाहीच तिने पण कॉलेजातही अभ्यासाबरोबरच नाटक, नृत्य, संगीत, कचर्‍यातून कला, सॅलड डेकोरेशेन, ज्वेलरी डिझाईन,कराटे चित्रकला, बॅडमिंटन, शिल्पकला, सुतारकाम, क्रोशा, जलतरंग अशा अनेक स्पर्धांत एकाच दिवशी भाग घेऊन पहिला नंबरही मिळवला होता. घरी मात्र ती यातले काहीही करत नसे. घरी ती फोनवरील संभाषण आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लांबच्या मैत्रिणीकडे जाणे या दोन कलांमध्ये प्रावीण्य मिळवत होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून कशी घरी आली नाही अंजू? आई एकदा घड्याळाकडे एकदा दरवाजाकडे पाहत होती. घड्याळाने नऊ कसे वाजतात ते दाखवले होते. म्हणजे अजून संगीतबारीला तीन तास अवकाश होता. अंजू पंढरीदादांच्या तालमीत तय्यार झाल्याली देखण्यांची लाखात एक नक्षत्रावाणी लेक. लग्नानंतर बर्‍याच वर्षांनी झालेल्या अंजूने घराचे जणू हनुमान थिएटर केले होते. एवढी खानदानी लावणीकला, कातिल अदाकारी असताना घरात नृत्यबिजली नाही म्हणून शशिकलाबाई जणू पुनवंनंतरच्या चंद्रावाणी झुरत चालल्या होत्या. अंजूच्या येण्यानं डॅडी आणि शशिकलाबाई अक्षी वाघ्यामुरळीसारखे नाचायला निघाले. म्हनंल ती कलाकार मंडळी, सुपारी देऊन उभी केली होती डॅडींनी. अंजूही नशिबाने नटमोगरी कचकड्याची भावली न होता शशिकलाबाईंप्रमाणेच हुशार निघाली. शाळेत पहिला नंबर कधी सोडला नाहीच तिने पण कॉलेजातही अभ्यासाबरोबरच संगीतबारी, बैठकीची लावणी, फडाची लावणी, पेशवाई लावणी, अदाची लावणी अशा अनेक स्पर्धांत एकाच दिवशी भाग घेऊन पहिला नंबरही मिळवला होता. घरी मात्र ती यातले काहीही करत नसे. घरी ती गरतीवाणी संसार करण्यात प्रावीण्य मिळवत होती.

( शेवटचे वाक्य बदलावे लागले Happy )

अजून कशी घरी आली नाही अंजू? आई एकदा घड्याळाकडे एकदा दरवाजाकडे पाहत होती. घड्याळाने नऊ कसे वाजतात ते दाखवले होते. म्हणजे अजून चहा प्यायला तीन तास अवकाश होता. अंजू एक नंबरच्या आळशी देखण्यांची चक्रम लेक. लग्नानंतर बर्‍याच वर्षांनी झालेल्या अंजूने सर्वांना खूप पीडले होते. तिला सर्व प्रकारची मुभा असताना ती घरात आपल्याला हवे तसे वागत नाही म्हणून शशिकलाबाई कोमेजत चालल्या होत्या. अंजूच्या येण्यानं डॅडी आणि शशिकलाबाई यांना सळो की पळो झाले होते. तिच्या विरोधात एक मोठी फळीच उभी केली होती डॅडींनी. अंजूही नशिबाने त्यांच्या फळीचा पुरता समाचार घेणारी व शशिकलाबाईंप्रमाणेच हुशार निघाली. शाळेत पहिला नंबर कधी सोडला नाहीच तिने पण कॉलेजातही मारामारी, खंडणिगिरी, ड्रामेबाजी, कॉप्या करणे, धमक्या देणे, अपहरण करणे, कॉलेजच्या मालमत्तेची तोडफोड - नुकसानी करणे इत्यादींमध्ये एकाच दिवशी भाग घेऊन पहिला नंबरही मिळवला होता. घरी मात्र ती यातले काहीही करत नसे. घरी ती फोनवरील संभाषण आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लांबच्या मैत्रिणीकडे जाणे या दोन कलांमध्ये प्रावीण्य मिळवत होती.

बॉलीवूड उपमा:

अजून कशी घरी आली नाही अंजू? आई एकदा घड्याळाकडे एकदा दरवाजाकडे पाहत होती. घड्याळाने नऊ कसे वाजतात ते दाखवले होते. म्हणजे अजून घड्याळाच्या काट्यांना गुलाबांच्या फुलामागे लपायला अजून तीन तास अवकाश होता. अंजू बडजात्यापटामधल्या प्रेमसारख्याच लाडात (आणि गाजराच्या हलव्यात) वाढलेली. लग्नानंतर बर्‍याच वर्षांनी झालेल्या अंजूने घराचे शम्मी कपूरच्या गाण्यांचे शूटिंग लोकेशन केले होते. इतनीबडी जायदाद के मालिक आणि इतनी बडी हवेली असताना घरात बडा नटखट है टाईप्स मातॄवत्सल गाणी गायची काहीच कहानी की मांग नाही म्हणून शशिकलाबाई टशनमधल्या पूजाच्या भूमिकेत (ऑब्व्हिसली ऋजुता दिवेकरची फी भरून) चालल्या होत्या. . अंजूच्या येण्यानं डॅडी आणि शशिकलाबाईंचा अभिमानमधल्या क्लायमॅक्सच्या (म्हणजे चित्रपटाच्या शेवटी असलेले गाणे, अश्लील मतलब निकालने वालों जनता माफ नही करेगी) गाण्याचा काहीतरी उपयोग झाला.
डॅडींचा नोकर सुखलाल अंजूसमोर कायम अलिशा चिनॉञच्या मेड इन इंडिया गाण्यावर ड्यान्स करून दाखवायना (नाही! मिलिंद सोमण बजेटमध्ये सध्या परवडत नाहीये) . अंजूही नशिबाने लाडाने तेरेनाम मधला राधे (सलमान खान देखील परवडत नव्हता, पण मराठी सिनेमासाठी, आई मराठी असल्यानं कॅमिओ केला आहे. काय भाऊ?) झाली नव्हती. शशिकलाबाईंप्रमाणेच हम आपके है कौनमधली माधुरी निघाली. शाळेत पहिला नंबर कधी सोडला नाहीच तिने पण कॉलेजातही कंप्युटर्स करत चॉकोलेट खाणे, उहू उहू असले खोकल्याचे आवाज काढणे, पांढर्‍या घागर्‍यावर हिरवा टीशर्ट घालून चप्प केस बांधणे, स्केटिंग करताना (मग नंतर हीरो की बाहि मे पडायला सोयीचे व्हाव्हे म्हणून) गरागरा फिरणे ही एकमेव अ‍ॅक्शन करणे, गाजराचा हलवा बनवणे- तो योग्य व्यक्तीलाच खाऊ घालणे, कसलाही संबंध नसताना फिदी फिदी हसणे, प्रत्येक सीनला ड्यान्स करणे अशा अनेक स्पर्धांत एकाच दिवशी भाग घेऊन पहिला नंबरही मिळवला होता. स्वतःच्या घरी मात्र ती यातले काहीही करत नसे, मोठी बहीण नसल्यानं या कलांचा नक्की कूठे उपयोग करावा याबाबत ती साशंक होतीच. घरी ती सध्या परदेसमधील महिमा चौधरीसारख्या गोंडस आणि सालस आणि आड्डस (अर्थ शब्दार्थ बीबीवर विचारा! इथला विषय भरकटवू नका!) टोनमध्ये बोलण्याची सवय करणे आणि प्रेम अगनमधील व्यायामाचे महत्त्व सांगणार्‍या गाण्यावर नाचणे (ते गाणे आठवत नसल्यास गूगल करा. परिणामांना आम्ही जबाबदार नाही. प्रेम अगन हा सिनेमाच माहित नसेल तर अभिषेक बच्चनप्रमाणे निवांत जगा. उगाच शोधाशोध करून आयुष्यचा विवेक ओबेरॉय करू नका) ) या दोन कलांमध्ये प्रावीण्य मिळवत होती.

अजून कशी घरी आली नाही अंजू? आई सोफ्यावर बसून एकदा टिव्हीकडे तर एकदा आरश्यात * बघत होती. होणार सून मी या घरची संपले आणि फू बाई फू सुरू झाले म्हणजे नऊ वाजले होते. म्हणजे बारा वाजायला तीन तास बाकी एवढे सोपे गणित न समजायला अंजूची आई काही मालिकेतली जान्हवी नव्हती.

गॅरेजमध्ये कित्येक मर्सिडीज धूळ खात पडल्या असताना घरातल्या टोबू सायकलवर बसणारे बाळ नाही या विचाराने शशिकलाबाईंच्या टायरमधील हवा दिवसेंदिवस निघत होती. पण अंजूच्या येण्याने डॅडी आणि शशिकलाबाई दोघांची जीवनगाडी फुल्ल चौथ्या गेअरमध्ये पळू लागली. लग्नानंतर बरेच वर्षांनी झालेल्या अंजूने घराचा पार एक्स्प्रेस हायवे करून टाकला होता. आज अंजूकडे घर, बंगला आणि गाडीच नाही, तर मां आणि तिच्या बरोबर डॅडी पण होते. पण अंजूने मात्र हा डायलॉग कधीच मारला नाही. ना शाळेत ना कॉलेजात.

कॉलेजात लेक्चरला बसून ती कॅल्युलेटरवर गणित सोडवत असताना त्याच वेळी मांडीवर ठेवलेल्या लॅपटॉपवर फेसबूक आणि मोबाईलवर मायबोलीचे अकाऊंट उघडून मराठी मध्ये टाईपण्याचे प्रावीण्य राखून होती. घरी मात्र ईंटरनेट नसल्याने ती यातले काहीच करायची नाही. शशीकलाबाईंच्या तालमीत गॉसिपिंग करणे आणि गॉसिपिंगच करणे यातच प्रावीण्य मिळवत होती.

* आरश्यातून दरवाजा दिसत होता.

रश्मी, जवळपास पुर्ण पॅराग्राफच बोल्ड होईल मग, उगाच छळ व्हायचा, वाचकांचा Proud

हे सर्वांसाठी --- कोणीतरी आग्री-मालवणी-कोल्हापुरी-भोजपुरी वगैरे बोलीभाषेत ट्राय मारा ना, मजा येईल .. Happy

अजून कशी घरी आली नाही अंजू? आई एकदा घड्याळाकडे एकदा दरवाजाकडे पाहत होती. घड्याळाने नऊ कसे वाजतात ते दाखवले होते. म्हणजे अजून कुत्रे भुंकायला ३ तास अवकाश होता. अंजू जास्तच वाढलेली देखण्यांची गब्दुल गोड कन्या. लग्नानंतर बर्‍याच वर्षांनी झालेल्या अंजूने घराचे जिम केले होते. एवढी संधी, एवढा व्हायाग्रा असताना घरात बेडरूमला कडी नाही म्हणून शशिकलाबाई कोमेजत चालल्या होत्या. अंजूच्या येण्यानं डॅडी आणि शशिकलाबाई नेहमी प्रमाणेच स्वर्गसुखात न्हाऊन निघाले. सगळी सुखं तिच्यापुढे हात धुवून उभी केली होती डॅडींनी. अंजूही नशिबाने आचरट न होता शशिकलाबाईंप्रमाणेच हुशार निघाली. शाळेत पहिला नंबर कधी सोडला नाहीच तिने पण कॉलेजातही अभ्यासाबरोबरच कँटीन, मॅक्डी, पिझा हट, डॉमिनोज मधील पदार्थ सर्वात जास्त खाणे अशा अनेक स्पर्धांत एकाच दिवशी भाग घेऊन पहिला नंबरही मिळवला होता. घरी मात्र ती यातले काहीही करत नसे. घरी ती फोनवरील संभाषण आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लांबच्या मैत्रिणीकडे जाणे या दोन कलांमध्ये प्रावीण्य मिळवत होती.

अजून कशी घरी आली नाही अंजू? आई एकदा घड्याळाकडे एकदा दरवाजाकडे पाहत होती. घड्याळाने नऊ कसे वाजतात ते दाखवले होते. म्हणजे अजून भुकंप व्हायला तीन तास अवकाश होता. अंजू झाडाझुडपात वाढलेली देखण्यांची एकुलती एक वेल. लग्नानंतर बर्‍याच वर्षांनी झालेल्या अंजूने घराचे अभयारण्य केले होते. एवढी दुर्गभ्रमंती, एवढा वृत्तांत असताना घरात रंगीत ब्लॉग नाही म्हणून शशिकलाबाई कॉलेजात चालल्या होत्या. अंजूच्या येण्यानं डॅडी आणि शशिकलाबाई फोटोशॉप मधुन न्हाऊन निघाले. सगळी अ‍ॅप्स तिच्यापुढे हात पररुन उभी केली होती डॅडींनी. अंजूही नशिबाने फोटोग्राफीने वेडी न होता शशिकलाबाईंप्रमाणेच हुशार निघाली. शाळेत पहिला नंबर कधी सोडला नाहीच तिने पण कॉलेजातही अभ्यासाबरोबरच चमचा गोटी, सुईदोरा, बडबडगीते, टिकाऊतून टाकाऊ, भिंती रंगवणे, गोधडी डिझाईनींग, फराटे चित्रकला, दाणपट्टा चालवणे, कांदा कापणे, परतकाम, जलदरंग अशा अनेक स्पर्धांत एकाच दिवशी भाग घेऊन पहिला नंबरही मिळवला होता. घरी मात्र ती यातले काहीही करत नसे. घरी ती फोनवरील संभाषण आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लांबच्या मैत्रिणीकडे जाणे या दोन कलांमध्ये प्रावीण्य मिळवत होती.