गणेशउत्सव तेव्हाचा

Submitted by नितीनचंद्र on 29 August, 2014 - 11:28

काळभैरवनाथ गणेश मंडळ हे आमच्या मंडळाच नाव. आजही हे मंडळ अस्तीत्वात आहे. आज निरोप आला की हजार रुपये वर्गणी पाठव आणि सातव्या दिवशी तुझ्या हाताने आहे तेव्हा चार तारखेला आरतीला संध्याकाळी आरतीला ये.

मी ३५-४० वर्षे मी मागे गेलो. हे मंडळ आमच्या आधीचे आहे. आम्ही काही कार्यकर्त्यांनी त्याचे त्या काळात मनापासुन झटुन हे नाव आणि मोठे मंडळ असा लौकीक प्राप्त करुन दिला.

जेव्हा हे बालगणेश मंडळ होते तेव्हा दोन - दोन मंडळे गणपतीची वर्गणी मागायचो. मोठ्या लोकांचे तरुण मंडळ आणि मुलांचे बालगणेश मंडळ.

चिंचवडात प्रत्येक तालमीचा एक आणि चौकाचा एक इतके किमान मंडळ असायचे. याशिवाय बालगणेश मंडळे सुध्दा जवळपास निम्या संख्येने असायची.

साधारण गणपतीच्या तारखेच्या आधी पण पगाराचे दिवस पाहुन वर्गणी मागितली जायची. मोठ्या मंडळाची छापील पावती पुस्तके, वार्षिक अहवाल असायचा. आम्ही रेडीमेड पावती पुस्तक आणुन मंडळाच्या नावाचा शिक्का त्यावर मारायचो.

मोठ्या मंडळांना घरटी पाच रुपये, अकरा रुपये अशी वर्गणी मिळायची तर आम्हा बाल गणेश मंडळांना मात्र एक रुपया फार झाले तर दोन रुपये त्या काळी वर्गणी मिळे.

मंडळाला स्टेज बांधणी साठी तरुण मंडळांना वासे, बांबु पत्रे भाड्याने आणावे लागत. इतके बजेट त्यांचे असायचे. बालमंडळाकडे ते बजेट नसायचे त्यामुळे वासे, बांबु आणि पत्रे कुणा -कुणा कडे मागावे लागायचे. एक जण स्टेज साठी आपला झोपाळा काढुन दहा दिवस देत असत.

सीन काय करायचा यावर खलबते होत. लक्ष्मण पडलाय, रामाची सेना पडद्यावर चित्तारलेली आहे. मोठ्या काचेवर हनुमानाचे चित्र हातात संजीवनी असलेला पर्वत घेऊन उडत येतो आहे ते चिकटवलेले असायचे. आणि उलट्या दिशेने पर्वत मागे पडत आहेत, नद्या मागे जात आहेत असा आभास चित्रे मोठ्या चक्रावर चिकटवौन फिरवली म्हणजे हनुमान पुढे येत असल्याचा भास निर्माण व्हायचा.

आलटुन पालटुन सगळ्याच मंडळात हा सीन असायचाच. कारण याचा तंत्रज्ञ हे सर्व अगदी मुक्तपणे द्यायचा. कधी सीतेची अग्नीपरिक्षा, कधी शिवाजी महाराजांची आग्राहुन सुटका तर कधी अशोक वनातली सीता असे सीन कधी तरुण मंडळात तर कधी बालगणेश मंडळात असायचे.

या सर्व उपक्रमात आधीचे पंधरा दिवस आणि नंतरचे दहा दिवस कसे जायचे कळत नसे. रोजचा वेगवेगळा प्रसाद, आरत्या त्याच बरोबर घंटा आणि वाजंत्री यानी परिसर दुमदुमत असे. घराघरात चैतन्य असे.

पुण्यातले गणपती विसर्जन पहाता यावे म्हणुन चिंचवडातले गणपती विसर्जन नवव्या दिवशी त्याकाळी होत असे. त्याआधी म्हणजे आठव्या दिवशी बहुतेक वर्गणी संपलेली असे. मग सत्यनारायणाच्या पुजेला नवीन लग्न झालेले जोडपे शोधायचे आणि मग त्यांचे फोटो काढायचे इ. कारणे सांगुन जवळपास सगळा खर्च या घरच्यांकडुन वसुल केला जायचा.

काही रक्क्म विसर्जनाच्या मिरवणुकीत गुलालावर खर्चाकरता बाजुला काढुन ठेवलेली असायचीच. नाहीतर जकात खात्यातल्या शिपायावर द्बाव टाकुन जास्तीची वर्गणी वसुल केली जायची. त्याच्या हाती असलेला दररोजचा रोख "गाळा" दारुशिवाय कधीतरी असा खर्च व्हायचा.

ढोल - ताशे - झांजा याच्या गजरात विसर्जनाची मिरवणुक रंगतदार व्हायची. आम्ही कितीही तयारी केली तरी आम्हाला ज्ञानप्रबोधनी शाळेचे मिरवणुक पथक आम्हाला आवडायचे. आमची मिरवणुक लवकर संपवुन आम्ही ते पथक पहायला वेळ काढायचो.

आता सगळ बदलल आहे. वर्गणीदार वाढले आहेत तसेच वर्गणीही वाढली आहे. मंडप कॉन्ट्रेक्टर , सीनचा कॉन्ट्रॅक्टर असे व्यवसाय झाले आहेत. सजावटीचे तंत्र बदलले आहे. दृक्श्राव्य याच बरोबर एल सीडी प्रोजेक्टर आणि आता एल सीडी स्क्रिन याचा मुक्त वापर वाढत आहे.

कार्यकर्त्यांचा शारिरीक ताण कमी झाला आहे. वर्गणिचे नियोजन आणि उपस्थिती हा भाग प्रमुख झाला आहे.

गणपतीच्या उत्सवाने सर्वच शहरात कार्यकत्यांची कार्यशाळा होत असते. पुढे तेच कार्यकर्ते पुर्णवेळ राजकीय किंवा सामाजीक कार्यकर्ते होतात हा रिवाज हल्ली कमी झालाय. त्याऐवजी जो जास्त वर्गणी देईल तो अध्यक्ष असा शिरस्ता झालाय. अनेक मंडळांचे अध्यक्ष नगरसेवकच असतात. पैशाची उधळण चालु असते. खरा कार्यकर्ता आणि संयोजक हरवत चाललाय. त्याऐवजी त्यांची जागा खोटा मान मिळवण्यासाठी पुढे येणारे नवश्रीमंत घेत आहेत.

या निमीत्ताने एखादा सामाजिक उपक्रम चालविणे हा आग्रह पुर्वीही होता आजही आहे पण शंभरात एखादे मंडळ हे करते. मधेच स्पीकर्स, डेसीबल्स आणि मिरवणुकीचे तास यावरुन बंधने आल्यास सर्व मंडळे एकत्र होतात. कधी काळी बंदी धुडकाऊन रात्री बारा नंतर सुध्दा मिरवणुका झाल्या. पण हल्ली पोलीसांनी आधीच जाग्रुती करुन हे नियम काटेकोर नाही तर ज्याला नियमात बसवता येईल असे करुन पाळले जातील असे बनविले आहेत.

मराठी माणसाच्या मनातला गणेश उत्सव अजुन काही शतके तरी चालु राहील हा विश्वास काळ बदलला तरी आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे इतका मस्त लेख कसा मिस झालाय सगळ्यांकडुनच? Uhoh

नितीन, हा लेख सार्वजनिक करा. हा फक्त ग्रूप पुर्ता मर्यादित दिसतोय Happy