आता कशाला शिजायची बात - मनीमोहोर - बनाका ( अर्थात बदाम, नारळ, काजू लाडू )

Submitted by मनीमोहोर on 29 August, 2014 - 03:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मायबोलीवर स्पर्धा जाहीर झाल्यापासूनच डोक्यात नकळतच विचार चक्र सुरु झाले आणि त्यातून निर्माण झालेला स्पर्धेच्या नियमात बसणारा हा गोड पदार्थ- बनाका ( अर्थात बदाम, नारळ, काजू लाडू )
साहित्य:
बदाम, काजू , डेअरी व्हईट दूध पावडर, दूध प्रत्येकी अर्धी वाटी,
डेसिकेटेड कोकोनट एक वाटी ,
वेलची पावडर स्वादासाठी
पिठी साखर गरजेनुसार,
रंगासाठी बीटचा अर्क २ चहाचे चमचे ( बीट किसून ते पाण्यात कुस्करल की जे लाल पाणी मिळते ते. मी कोणताही कृत्रिम रंग वापरत नाही म्हणून मला ही कसरत करावी लागली. आपण तो वापरत असाल तर बाजारचा गुलाबी किंवा दुसरा कोणताही आवडता रंग वापरू शकता. केशर वापरलं तर लाडू केशरी रंगाचे होतील किंवा कोणताही रंग न वापरता पांढरे ही चांगले दिसतील )

क्रमवार पाककृती: 

प्रथम अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट ला बीटचा अर्क अगदी थोडा थोडा हाताने चोळून डे. को . गुलाबी करून घ्यावा आणि पंख्याखाली तो १५ / २० मिनीटे वाळण्यासाठी ठेवावा. ( विकतचा रंग वापरणार असाल तर ही स्टेप स्किप करा )
बदाम पाण्यात १०-१५ मिनीटं भिजत घालावेत आणि नंतर त्याची साल काढून ते ही पंख्याखाली १५-२० मिनीट कोरडे होण्यासाठी ठेवावेत. ( हे तुम्ही चार सहा दिवस आधी ही करू शकता किंवा सोललेले बदाम बाजारात आयते मिळतात ते ही वापरू शकता. )

नंतर का़जू, बदाम यांची मिक्सर मध्ये पूड करावी ( साधारण दाण्याच्या कूटा इतकी बारीक / भरड करावी. )
साखर ही मिक्सर मध्ये बारीक करुन घ्यावी.

एका ताटलीत ही पूड, उरलेला डे. को. ( अर्धी वाटी ) , दूध पावडर , वेलची पावडर आणि लागेल तशी पिठीसाखर घालून चांगले मिक्स करावे. दुधाचा हात लावून लावून ( दूध एकदम घालू नये लागेल तसा दुधाचा हात लावावा ) मिश्रण लाडू वळता येतील इतपत मॉईस्ट ( मराठी योग्य शब्द सुचत नाहीये.) करावे आणि मग त्याचे लाडू वळावेत.

नंतर हे लाडू दूधात बूडवून किवा ब्रशने दूध लावून (डे. को. च आवरण लाडवांवर चिकटण्यासाठी ) मग गुलाबी डे. को. मध्ये घोळवावेत.

अशा प्रकारे गणरायाच्या प्रसादासाठी काजू, बदामाचे गुलाबी लाडू तयार.

हा फोटो मी केलेल्या लाडवांचा

From mayboli

आणि हा जवळून

From mayboli

वाढणी/प्रमाण: 
काय सांगू ? पण प्रत्येकी एकेक लागेल.
अधिक टिपा: 

१) हे लाडू झटपट होतात. चवीला छान लागतातच शिवाय पोटभरीचे ही आहेत.
२) साखर चव घेऊनच घालावी कारण डेअरी व्हाईट दू. पा. थोडीशी गोड असतेच. त्यामुळे साखर जास्त लागत नाही.
३) यावर चेरी लावली तर खूप सुंदर दिसते. चेरी चालेल की नाही स्पर्धेसाठी याबाबत साशंक असल्याने मी लावलेली नाही. तसेच मधोमध कापून दोन भाग करून प्लेट मध्ये ठेवलेले लाडू ही फार सुंदर दिसतात.
४) लाडू करताना फार मोठे करू नयेत कारण नारळाच्या किसाच्या कोटिंगने ते फायनली आणखी थोडे मोठे होतात.
५) वरील साहित्याचे साधारण आकाराचे आठ लाडू झाले.
६) गणपतीच्या दिवसात विकतच्या मिठाईच्या ( खव्याच्या ) क्वालिटी बाबत मनात शंका येते म्हणून गणपतीचा प्रसाद म्हणून करायला छान आहेत. मुलांना खाऊ म्हणून, चहाला कोणी पाहुणे येणार असतील तर गोड म्हणून ही देता येतील.
७) बीट न वापरता केशर किंवा रंग वापरला तर उपासाला ही चालतील.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्यांनी ज्यांनी मला मते दिली आणि माझी पाकृ विजेती केली त्या सर्वांचे मनापासून आभार.

ही स्पर्धा जाहीर झाल्यापासून काय पाकृ करता येईल ह्यावर विचार करणे, प्रत्यक्ष कृती करणे, फोटो काढणे, पाकृ माबोवर टाकणे, मिळालेले प्रतिसाद वाचणे आणि निकालाची वाट बघणे यात माझा वेळ अतिशय चांगला गेला. मी एवढी स्वयंपाकात निपुण नसताना ही ह्या स्पर्धेच्या निमित्ताने विचारांना चांगली चालना मिळाली ह्या बद्दल संयोजकांचे खूप खूप आभार.

पारितोषिक पत्राचं डिझायनिंग अतिशय सुंदर झाले आहे, ज्यांनी केले आहे त्यांचे मनापासून कौतुक.
ह्या स्पर्धेच्या निमित्ताने नवीन नवीन पा़कृ समजल्या. त्याबद्दल संयोजकांचे आभार....

Pages