"ठो उपमा " (उपक्रम)

Submitted by संयोजक on 28 August, 2014 - 01:43

THO UPMA POSTER.jpg

गणपती बाप्पा मोरया!
मध्यंतरी मायबोलीवर एक प्रचंड मोठी हास्यचळवळ गाजली होती. या चळवळीचे प्रणेते होते प्रसिद्ध मायबोलीकर फारएण्ड. ही चळवळ होती ठराविक उपमा व ठोकळेबाजपणाविरुद्ध आणि तिचा नारा होता - "नहीं चलेगी, नहीं चलेगी! बोरिंग उपमा नहीं चलेगी!!!" अनेक मायबोलीकरांनी या चळवळीत उडी घेतली आणि त्यांना अतिशय वैताग देणार्‍या उपमांची होळी केली. ज्याप्रमाणे स्वातंत्र्यलढ्यात लोकांना एकत्र आणण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली तोच आदर्श ठेवून यंदाचा मायबोलीवरील गणेशोत्सव मराठी साहित्यशारदेला नव्या, क्रांतिकारी उपमालंकारांनी सजवण्यासाठी वचनबद्ध झाला आहे. जुनाट उपमांच्या गंजलेल्या शृंखला खळाखळा तोडण्याचे सामर्थ्य मायबोलीकरांमध्ये खचितच आहे. म्हणूनच यंदाचे संयोजक मंडळ मराठी साहित्यातील या घासून गुळगुळीत झालेल्या उपमांना "चले जाव" सांगत सादर करत आहे - एक आगळावेगळा गंमत खेळ - "ठो" उपमा!! किंवा अगदी हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर हे आहे 'उपमा मेकोव्हर सेंटर!'
हा खेळ कसा खेळाल?

नियमावली :
१) २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या गणेशोत्सवादरम्यान ठराविक काळाने एक प्रसंग दिला जाईल. धाग्याचे नाव असेल - मायबोली गणेशोत्सव २०१४ : उपक्रम "ठो उपमा - <क्रमांक>" <दिनांक>
२) या प्रसंगाच्या मजकुरात काही शब्द, शब्दसमूह, वाक्यं, वाक्प्रचार ठळक / बोल्ड केलेले आढळतील.
३) त्या ठळक/ बोल्ड केलेल्या मजकुराच्या जागी तुम्हाला तुमच्या मनातील उपमा वापरून जुन्या उपमांना "ठो!" द्यायचा आहे. म्हणजेच त्या उपमांना प्रतिशब्द शब्द योजायचा आहे. तुम्ही लिहिलेल्या शब्दांमुळे एकूण प्रसंगाचा नूरच बदलला तरी हरकत नाही. म्हणजेच गंभीर प्रसंग तुम्ही विनोदी करू शकता, शृंगारिक प्रसंग करूणही! तुमच्या शब्दांतून साहित्यातील नवरसांची यथेच्छ उधळण करा, गणेशोत्सव मायबोलीचाच आहे.
४) सर्वच्या सर्व ठळक शब्दांना प्रतिशब्द लिहायलाच हवेत असे नाही.ठळक केलेल्या शब्दांपैकी/शब्दसमूहापैकी कोणती उपमा बदलायची हे ऐच्छिक आहे. अर्थात, सगळ्याच उपमा बदलल्या तरीही चालणार आहे.
५) तुमची पोस्ट तुम्हाला त्या प्रसंगाच्या धाग्यावरच टाकायची आहे.
६) ही स्पर्धा नाही, खेळ आहे.
त्यामुळे कोणताही आयडी कितीही वेळा यात भाग घेऊ शकतो. फक्त सलग दोन पोस्टी एका आयडीच्या नसाव्यात अशी अपेक्षा आहे. इतरांनाही खेळू दिले, तर खेळाची मजा आहे!
७) खास तुमच्या उपमा वाचकांना कळण्यासाठी तुम्हीही त्या ठळक केल्या तरी चालतील.करायलाच हव्यात असा काही नियम नाही.

या अनोख्या खेळातून आपले आपल्यालाच उमजेल की जुने ते सोने की नवे ते हवे? चला तर मग, करुया सुरुवात?
काही प्रश्न असतील तर याच धाग्यावर विचारा.

प्रसंग १ साठी येथे टिचकी मारा - http://www.maayboli.com/node/50547
प्रसंग २ साठी येथे टिचकी मारा - http://www.maayboli.com/node/50574
प्रसंग ३ साठी येथे टिचकी मारा - http://www.maayboli.com/node/50597
प्रसंग ४ साठी येथे टिचकी मारा - http://www.maayboli.com/node/50607
प्रसंग ५ साठी येथे टिचकी मारा - http://www.maayboli.com/node/50617
प्रसंग ६ साठी येथे टिचकी मारा - http://www.maayboli.com/node/50634
प्रसंग ७ साठी येथे टिचकी मारा - http://www.maayboli.com/node/50649
प्रसंग ८ साठी येथे टिचकी मारा - http://www.maayboli.com/node/50660
प्रसंग ९ साठी येथे टिचकी मारा - http://www.maayboli.com/node/50679
प्रसंग १० साठी येथे टिचकी मारा - http://www.maayboli.com/node/50698

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरी.

ठळक केलेले शब्द बदलताना , ठ़ळक नसलेलेही काही शब्द (मोजकेच हो) बदलले तर चालतील का?
>>>
भरत मयेकर,
तुम्ही दिलेल्या उतार्‍यातले बोल्ड न केलेले मोजकेच शब्दही बदलू शकता पण असे शब्द ५ पेक्षा जास्त नको.