नॉक आउट पंच - मर्दानी (Movie Review - Mardaani)

Submitted by रसप on 26 August, 2014 - 04:31

खरं तर ही कहाणी आजपर्यंत अनेक सिनेमांत मूळ कथानक किंवा उपकथानक म्हणून येऊन गेली आहे. टीव्हीवर, गुन्हेगारी सत्यघटनांवरील डॉक्युमेंटरी सिरियल्समध्येही अश्या प्रकरणांना पाहून झाले आहे. पण तरी डोळ्यांचं पातं लवू न देता पाहावंसं वाटतं, इथेच 'मर्दानी' जिंकतो.

सेन्सॉर सर्टिफिकेट दाखवणाऱ्या फ्रेमपासून, ते अगदी शेवटच्या दृश्यापर्यंत 'मर्दानी'त लेखक-दिग्दर्शकाने एक सूत्र १००% पाळलं आहे. 'नो नॉनसेन्स'. अनावश्यक दृश्यं, संवाद, गाणी, पात्रं, कॅमेरावर्क काही म्हणता काही नाही. फक्त तेच जे कथानकाला पुढे नेणार आहे, हातभार लावणार आहे. म्हणून साहजिकच चित्रपट दोन तासांपेक्षाही कमी लांबीचा आहे.

शिवानी रॉय (राणी मुखर्जी) निरीक्षक, मुंबई क्राईम ब्रांच. पती डॉ. बिक्रम रॉय व लहानग्या भाचीसह राहत असते. अनाथालयात राहणाऱ्या व फुलं विकणाऱ्या कुमारवयीन 'प्यारी'वर तिचा फार जीव असतो. मुलीसारखीच असते. इतकं कथानक पाहून झाल्यावरच पुढे काय घडणार आहे, ह्याची पुसटशी कल्पना आपल्याला येते.
एके दिवशी अचानक 'प्यारी' गायब होते आणि तिचा शोध घेताना शिवानीला अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचाच शोध लागतो. एका मोठ्या रॅकेटला उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यास ज्या किंमती मोजायला लागतात, त्या ती मोजते. धक्के पचवते, पुन्हा उभारी घेते, लढते, भिडते, हार मानत नाही.

Mardaani - 1.jpg

रोहित शेट्टी, साजिद खानसारख्यांच्या अक्कलशून्य चित्रपटांमुळे बॉलीवूडला बौद्धिक दिवाळखोरीचं चालतं-बोलतं उदाहरण समजलं जात असताना 'प्रदीप सरकार'सारखा दिग्दर्शक समोर येतो. ज्या ताकदीने तो 'परिणीता'ची हळवी कहाणी सादर करतो, त्याच ताकदीने तो 'मर्दानी'ची लढत साकार करतो आणि मग शुजीत सरकार, विशाल भारद्वाज, नीरज पांडे, राजकुमार हिरानी, अभिषेक कपूर, झोया अख्तर सारखी काही गुणी नावं आठवून अवस्था इतकीही सुमार नसल्याची हमी मिळते. प्रत्येक छोट्या व्यक्तिरेखेकडूनही उत्कृष्ट कामगिरी करवून घेण्यात प्रदीप सरकार पूर्ण यशस्वी ठरले आहेत.

राणी मुखर्जीने दाखवलेली उर्जा 'मर्दानी'ची जान आहे. खरं तर ह्या भूमिकेला साकार करताना तिची देहयष्टी आड येऊ शकली असती, पण केवळ जबरदस्त उर्जेच्या जोरावर तिने ही उणीव भरून काढली आहे. आक्रमक देहबोली व अचूक संवादफेक, जोडीला खमकी नजर व जबरदस्त आत्मविश्वास अशी ही 'मर्दानी' राणीची आजवरची सर्वोत्कृष्ट भूमिका नक्कीच आहे.

images_1.jpg

राणीइतकंच लक्षात राहण्यासारखं काम केलंय नवोदित 'ताहीर भसीन'ने. सेक्स रॅकेटच्या मास्टर माइंडच्या भूमिकेतला भसीन अत्यंत संयतपणे अंगावर येणारा खलनायक साकार करतो. त्याच्या जवळजवळ प्रत्येक दृश्यात तो छाप सोडतो. इतक्या शांतपणे क्वचितच कुणी थरकाप उडवला असेल किंवा संताप आणला असेल.

आजच्या हिंदी चित्रपटावर आसूड ओढण्याच्या अहमहमिकेत उत्साहाने सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाने 'मर्दानी'सारखे चित्रपटसुद्धा पाहायला पाहिजेत. असे काही चित्रपट बघितले की हिंदी चित्रपटांचे काही अक्षम्य गुन्हे माफ करावेसे वाटतात.

रेटिंग - * * * *

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेच्चा! इतका लहान लेख एका चांगल्या कलाकॄतीचा. Happy
सर्वांनी अवश्य पहावा, इतका चांगला आहे सिनेमा.

टेकन या इंग्रजी चित्रपटाचा रिमेक आहे. त्याला भारतीय मुलामा लावला आहे. संवाद लेखन कमी पडले आहे असे मला वाटले. ताहीर भसीनने अप्रतिम काम केले आहे. रानी मुखर्जीने जरी १००% पेक्षा जास्ती देण्याचा प्रयत्न केला असला तरी त्या रोलसाठी रिचा चढ्ढासारखी शरीरयष्टी असलेली नटी हवी होती. चित्रपटभर व्यापलेला वेग मात्र क्लॅमॅक्सला थोडा रसभंग करतो असे मला वाटले. तरीही एकदा बघायला हरकत नाही पण ४ तारे देण्याइतका नक्कीच नाही. सिंघम रीटर्नस, हॉलीडे वगैरेंच्या जत्रेत उजवा आहे.

ह्या पेक्षा टेकनच परत बघावा म्हणतो.I don't know who you are. I don't know what you want. If you are looking for ransom, I can tell you I don't have money. But what I do have are a very particular set of skills; skills I have acquired over a very long career. Skills that make me a nightmare for people like you. If you let my daughter go now, that'll be the end of it. I will not look for you, I will not pursue you. But if you don't, I will look for you, I will find you, and I will kill you. महान चित्रपट. धन्यवाद कांदापोहे टेकनची आठवण काढल्याबद्दल...

तेच की. त्या वाक्यात जो दम आहे तो दम मर्दानीमधे दिसला नाही म्हणुन तर मी संवादलेखनात कमी पडला म्हणलो.

ट्रेलर बघितले होते. राणीने अभिनय चांगलाच केला असेल पण जरा शरीरावर पण मेहनत घ्यायला हवी होती.

अँड नाऊ दे विल टेक यू... हा संवाद पण टेकन मधलाच ना ?

टेकन फारच जबरी पिक्चर आहे.. त्याचीच नक्कल असेल तर बघावा की नाही ह्याचा विचार करावा लागेल...

रेगे नाही बघितलात का रसप?

लेख खरेच त्यामानाने लहान आहे, चित्रपट चांगला असेल आणि आपल्याला आवडला असेल तर आपण खरेच थोडा हात सैल सोडून लिहायला हवे होते. बाकी लिखाण नेहमीसारखेच छान.

राणी माझीही तशी आवडीची अभिनेत्री. दिसायला फारशी आवडत नाही पण तरीही पडद्यावरचा तिचा वावर मला नेहमी सुखावतो. मर्यादा आहेत, पण गुणी अभिनेत्री. ओवरअ‍ॅक्टींग कधी करत नाही वा केली तरी लक्षात येत नाही वा शोभून दिसते. अगदी दिल बोले हडीप्पा सारख्या कायच्या काय चित्रपटातही चांगली वाटते. त्यामुळे आपल्याला यात ती सिनेमाची जान आणि हि तिची सर्वोत्कृष्ट भुमिका वाटत असेल तर राणीसाठी तरी नक्कीच बघायला हवा बॉस Happy

त्या रोलसाठी रिचा चढ्ढासारखी शरीरयष्टी असलेली नटी हवी होती.>> किन्वा हुमा कुरेशी . डी-डे मध्ये कसली दिसते ती >>

कहाणी मधे नवाजउद्दिनने ऑफिसर्च्या भुमिकेत कसलीही वर दिलेली परिमाण नसताना व्यवस्थित छाप सोडलीय! ट्रेलर बघितल्यावर तरि मला राणी योग्य वाटली..बाकी मुव्ही बघितल्यावर कळेल.

राणी मुखर्जी आवडत नाही त्यामुळे पहाणार नव्हते पण एकुन सिनेमा चांगलाय म्हणता तर टीव्हीवर आल्यावर बहुतेक पाहीन... तरीही रामु.ला पहायचे फार जीवावर येते... नेहमीच.
टेकन आवडला होता.

सुनिधीने राणीचा रामुकाकाच केला पार Lol
चित्रपट पाहणार नक्की. टेकन ला तोड नाहीच. पण या पिक्चर बद्दल जाम उत्सुकता आहे.

शिवानीच्या घरावर पाटी दाखवलेय बिक्रम रॉय नि ती नांव सांगते शिवानी शिवाजी रॉय.. याचा खुलासा कुठेच येत नाही.

आया, टेकन भाग २ चं सिंघम रिटर्न सारखं झालंय. १ ल्या भागाइतका दमदार नाही वाटत. जीपीएस नेच खाल्लाय भाग.. Happy

शिवानी शिवाजी रॉय <<<<< हेमशी सहमत मलाही हेच खटकलेल होत.

पण 'टेकन'ला तोड नसली तरीही 'मर्दानी' आवडला मात्र ! Happy

Pages