नाटक!!!

Submitted by सारंग पात्रुडकर on 24 August, 2014 - 02:52

नाटक… नाटकामधील रंजकता नेहमीच भुरळ घालते.

त्याच नाट्यजादूचा अनुभव घेण्यासाठी नाटक केले आणि बरच काही उलगड्लं…

नाटकात सगळं सरळसोट असतं उलट माणसं एरवीच जास्त नाटकीपणे वागतात, वेगवेगळे मुखवटे लावतात.
नाटकामधे सगळं कसं सरळ प्रामणिक आणि पारदर्शक असत. अगदी जे “काही” असेल ते प्रेक्षकांसमोर.
एखाद्याला वाटत असेल काय सगळं ठरवून तर घडतयं, याच्यानंतर तो प्रसंग हा संवाद हे हावभाव…

हा खरचं एवढा सरळ हिशोब आहे का? याचं उत्तर शोधताना नाटकामागची ‘नाटकं’ उलगडली.

अभिनयाची एक वेगळी कथा आहे फ़क्त अभिनय करुन चालत नाही ते ओव्हरऍक्ट वाटतं.
ती भूमिका जगावी लागते तर ती खरी उमटते आणि प्रेक्षक स्वीकारतो… आणि मग वाटतं अरे बापरे माणसं रोज जगतात ती ऍक्टिंगच की काय?
मग यांचा खरा चेहरा कोणता, माणसांची जात कोणती?

मला वाटतं सगळेच काही डायरी लिहीत नसावीत मनातलं खरं व्यक्त करत नसणार नेहमी. आजकाल तर आत्मचरित्र आणि डायऱ्यांवर विश्वास ठेववत नाही. आणि विचारवंत अन् संत म्हणतात त्याप्रमाणे सर्वसामान्यांना सत्य उमगलेलं नसतं मग डोंबलं कोणी कितीही सत्य लिहीलं तरी त्यांच्या दृष्टिने ते असत्यच! नाटकीचं!!

आणि तरीही लोक नाटक पहायला जातात.

कोण कोणाला नाटक दाखवतो? नाटककार लोकांना? छे त्यानींच तर ते नाटकारांना अजाणपणे दिलेलं असतं. काही लोक तर सोंग घेतात अजाणतेपणाचं, मग कोण ऍक्टर कोण प्रेक्षक?

कधी कधी सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक प्रेक्षकांना दयावसं वाटतं अवास्तव न अस्ताव्यस्त कलाकृती पहाण्याचं नाट्क केल्याबद्दल!

नाट्यनिर्मितीमधे आनंद असतो असा आणखी एक गैरसमज.. खोटं वाटतयं? नाटक तालमिच्या वेळी पडद्यामागील एखाद्या कलाकाराला तो बाकीच्यांकरता पाण्याच्या बाटल्या घेऊन जात असताना त्याला हा प्रश्न विचारा जी प्रतिक्रिया येईल त्यात काहीही नाटकीपणा नसेल. ज्यांची मोबाइल बिलं वाढत आहेत, पेट्रोल जळत आहे, घरातलं सामान स्टेजवर विनाश पावत आहे अश्या सगळ्यांच्या प्रतिक्रिय़ा वस्तुनिष्ठ असतील, म्हणजे वस्तुंच किती नुकसान झालं आहे त्यानुसार तिखट.

पण म्हणून ज्यांची गर्लफ़्रेंड किंवा बॊयफ़्रेंड सेट्वर असेल त्यांना विचारु नका तुमचा पीस ते वापरत आहेत कसं वाटत आहे?

तरीही लोकांना वाटतं की या नाटकवाल्यांमधे काहीतरी नाटकी स्पार्क आहेच. थोडे दिवस हेवेदावे बाजुला ठेवुन काहीतरी सुंदर निर्मितीच्या उद्देश्याने कष्ट वैगेरे घेतात, खरतर असतं उलटचं एखादा सीन / संवाद भारी वैगेरे होतो तो मला वाटतं खुन्नसमुळेच.
बॅकस्टेजवाल्यांमधेही काम चालढकल होत होतं कोणाच्यातरी टाळ्क्यावर पडतं, तो ते झक मारुन संपवतो मग बाकीचे कौतुक वैगेरे करतात का तर पुढ्च्यावेळचा बकरा गवसलेला असतो म्हणून… यालाच कदाचित स्पिरीट म्हणत असतील. असो काही गैरसमज चांगले असतात.

लोक समर्पित भावनेने नाटक करण्यासाठी येतात पण मग हळूहळू मूळ स्वभाव उचल खातोच तो किती दिवस नाटक पांघरुण बसणार. हळूह्ळू वैय़क्तिक कामांबरोबर सोयीने नाटकाचे कामेही पुढं सरकत राहतात.
नाटकाचा क्लायमॅक्स हा प्रेक्षकांसाठी जेवढा उत्कंठावर्धक असतो तितकाच तो नाटककारांसाठीही.
तो भयंकर छळतो, प्रयत्न करुनही लवकर जमून येत नाही.

तोपर्यंत मग इतर प्रसंग बिन-सेनापतिच्या सेनेसारखे सैरावैरा असतात. कोणालातरी त्यात विनोद दिसतो. इथे सगळेच क्रिएटिव्ह होतात नाटकचा कोथळा काढतात …नैराश्यामधून टाईमपासकडे वाटचाल होते.

कारण क्लायमॅक्स तो क्लायमॅक्स इतका सहज कसा गवसेल.

मग सेट वैगेरे या डिपार्ट्मेंट वर लक्ष केंद्रित होते. फ़स्ट्रेशन इकडे बाहेर पडतं. ऑनस्टेज विरुध्द बॅकस्टेज संघर्ष. इतके दिवस दाबलेले हेवेदावे, राग बाहेर येतो, स्टेज चा धोबिघाट… काही काळ एक पोकळी निर्माण होते, रुटिन चालु असतं पण बधिरतेने, चाचपड्त असतात सगळेच.

डोक्यात पानं उलटत असतात. मागील दिवसांच्या लेखाजोखा, काही आनंदाचे चुकांचे निराशेचे प्रसंग सरकतात, कशासाठीचा होता हा अट्टहास???

आपण जे कोणी आहोत ते स्वीकारुन काही सत्य लोकांसमोर मांडण्याचे ध्यैर्य जया अंगी असतो तोच नाटकासाठी पुढे येतो तोच रंगभूमिवर वावरु शकतो. धमण्यामधुन नाटक वाहत असत त्यांच्या. म्हणुनच अवचित कधी स्वप्नात-संडासात काहितरी क्लिक होतं, मोबाइलमधुन ते सहकाऱ्यांना रात्री बेरात्री वाऱ्यासारखं पोचतं, त्याचं वादळ होतं. पाहता पाहता सगळं काबीज होतं आणि नाटक उभं राहतं शेवटासहीत.

नकळत नाटकातली रंजकता आयुष्यामधे कधी उतरते ते कळत नाही. भान येते ते सुजाण प्रेक्षक मायबापांच्या टाळय़ांच्या गजराने, सहकाऱ्यांच्या हिप हिप हुर्रेने!!!

--सारंग पात्रुडकर.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण म्हणून ज्यांची गर्लफ़्रेंड किंवा बॊयफ़्रेंड सेट्वर असेल त्यांना विचारु नका तुमचा पीस ते वापरत आहेत कसं वाटत आहे? >>>. हा हा हे भारी Wink