वारे जरासे गातील काही...

Submitted by अ. अ. जोशी on 23 August, 2014 - 10:18

वारे जरासे गातील काही
येतील काही, जातील काही

हृदयी तुझ्या मी येणार होतो
इतक्यांत दिसले आतील काही

झाकून डोळे हसलीस ओठी
कळले तुझ्या मौनातील काही

म्हण तू स्वतःला पाषाणहृदयी
ढळलेत बघ डोळ्यातील काही

घायाळ करती हृदयें हजारों
नजरा तुझ्याही कातील काही

संसार सागर जातील तरण्या
बुडतील काही, न्हातील काही

दुःखे जगाची का रंगवू मी?
जगतो सुखाने त्यातील काही

सोडू नये सुख, कुठल्या क्षणाचे
मिळते जरी अंशातील काही

किंवा / आणि

वेसण कशाला घालू सुखाला?
मिळते किती? अंशातील काही

अंधार जितका, तितकीच आशा...
उजळेल कोनाड्यातील काही

घ्यावे 'अजय' सारे जे हवे ते
सोडू नये पण... हातील काही

- अ. अ. जोशी (२०१४)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आतील आणि मक्ता मस्त.

गागालगागा गागालगागा - ह्या मीटरमधे एक गुरू अलिकडे पलिकडे झाल्यामुळे जरा अडखळायला होत आहे. Happy

धन्यवाद.

>>गागालगागा गागालगागा - ह्या मीटरमधे एक गुरू अलिकडे पलिकडे झाल्यामुळे जरा अडखळायला होत आहे. <<

कळले नाही.

Matala zhakaas !
Kahee oleehee awadalya .

वारे जरासे गातील काही
येतील काही, जातील काही

हृदयी तुझ्या मी येणार होतो
इतक्यांत दिसले आतील काही<<<

आवडले.

मतल्यातील ओळी अदलाबदल करून पाहिल्यावरही आवडल्या.

छान.

सर्वांना धन्यवाद ..!

बेफिकीर,
>>> मतल्यातील ओळी अदलाबदल करून पाहिल्यावरही आवडल्या. <<<

वारे जरासे गातील काही
येतील काही, जातील काही
यांची अदलाबदल केल्यावर ती कवितेच्या वळणाने जाईल असे वाटते. कारण, दुसरी ओळ फार साधी होईल.

असो. सुचविल्याबद्दल धन्यवाद..!

जरा कमीच आवडली पण आवडली

ह्या मीटरमधे एक गुरू अलिकडे पलिकडे झाल्यामुळे जरा अडखळायला होत आहे.<<<+१
बहुधा कणखरजी यतिभंगाबद्दल म्हणत आहेत

धन्यवाद

वैवकु,

मतल्यामध्ये यती असताना पुढे वापरला नाही असे वाटणे स्वाभाविकच आहे. म्हणूनच मतल्यात एका ओळीत स्वल्पविराम आहे, तर एका ओळीत नाही आहे. कारण ती ओळ सलग वाचणे अपेक्षित आहे.

वारे जरासे गातील काही - ही ओळ सलग (पॉझ न घेता) वाचणे अपेक्षित आहे. मध्येच थांबल्यास म्हणजे 'जरासे' नंतर थांबल्यास अनावश्यक यतीचा दोष उद्भवतो. म्हणूनच याच ओळीची लय घेऊन पुढील सर्व ओळी रचलेल्या आहेत.

असो. कणखर यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा झाली असल्याने फार काही लिहिण्याची आवश्यकता नाही असे वाटते. मात्र, यतीवरती कोणी विचार करीत आहे हे चांगले वाटले.

धन्यवाद..!

म्हणूनच मतल्यात एका ओळीत स्वल्पविराम आहे, तर एका ओळीत नाही आहे.<<<<<< असे केल्याने यतिभंगाचा दोष निवारता येतो ही माहिती मला आजच मिळाली
धन्यवाद अजयजी.

कणखरजींचा पॉइंट ऑफ व्यूव्ह वेगळा असल्यास मी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल क्षमस्व

पण बाय दि वे आपल्याला गझल शिकवली कोणी असा एक नवीनच प्रश्न पडून बसलाय (कृपया हलके घ्या )

वैवकु,
खरेतर, यतीसाठी काही खास असे नियम नाहीत. तुमच्या माहितीसाठी सांगतो...
*** पद्याच्या चरणाच्या शेवटी थांबावे लागते; मोठ्या वृत्तात मध्यंतरातही थांबावे लागते; त्या ठिकाणास विराम किंवा यती म्हणतात. *** अशी माहिती मराठी साहित्य व व्याकरण या पुस्तकाच्या १९५१ सालच्या दहाव्या आवृत्तीत दिली आहे.
तसेच,
*** पद्य सलगपणे आणि लयानुरोधाने वाचीत असताना जो न्यूनाधिक विराम घ्यावाच लागतो त्याला यती म्हणतात. असे छंदोरचना मध्ये माधवराव पटवर्धनांनी लिहिले आहे.
माझ्यामते, यती हा वृत्तातला अत्यावश्यक भाग प्रत्येकवेळी असतोच असे नाही. मी लिहिलेल्या ओळींमध्ये प्रत्येक ओळीच्या शेवटीच यती घ्यावा लागेल. कारण, ते काही फार मोठे वृत्त नाही. यतीबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. मात्र, जर उपलब्ध अक्षर गणवृत्तांचा वापर करून कोणी रचना केली असेल, तर त्या वृत्तात सांगितलेले यतीचे नियम पाळावेच लागतील हेही खरे.

*** बाकी तुमच्या तिरकस बोलण्याचा मी विचार करीत नाही आहे.

मला गझल कुणीही शिकविली नाही.....
मात्र वैवकु,
>>> पण बाय दि वे आपल्याला गझल शिकवली कोणी असा एक नवीनच प्रश्न पडून बसलाय (कृपया हलके घ्या ) <<<
हे तुमचे म्हणणे मी हलके घेतलेले नाही.

ही काही उदाहरणे पहा....

मतला आणि ..... ही खूण प्रत्येक ठिकाणी पहा.

बेफिकीर

जन्मतो गर्दीत आपण......संपतो गर्दीत पण
एकटा हा...एकटा तो...एकटा प्रत्येकजण
**** या ठिकाणी ''आपण'' आणि ''तो'' नंतर विराम आहे.

हेच अभ्यासायचे रा...हून गेले आमचे
मी तिला गेलो शरण की ती मला आली शरण

पोचलो आहे इथे को...णामुळे नाही स्मरत
मस्त आहे रोग साला नांव ज्याचे विस्मरण
------------------------------------------------

विजय दिनकर पाटील

स्नेह निर्व्याज पाहिजे होता
आजच्या आज पाहिजे होता
**** या ठिकाणी ''निर्व्याज'' आणि ''आज'' नंतर विराम आहे.

ही अदाही ब....रीच आहे पण
वेगळा बाज पाहिजे होता

तान आहे त....शी तयारीची
स्वच्छ आवाज पाहिजे होता

कसनुसे का ह....सून गेला तो
स्पष्ट नाराज पाहिजे होता
---------------

वैवकु

कशाला वाण पेरू अन... कशाला पीक मागू मी
तुझ्या काही सरींसाठी... पुन्हा का भीक मागू मी
**** या ठिकाणी ''अन'' आणि ''सरींसाठी'' नंतर विराम आहे.

तसे नुकतेच आकारा......स आले आपले नाते
तुझा सल्ला कसा इतक्या.......त वैयक्तीक मागू मी

मला माहीत आहे स........त्यनारायण शिरा देतो
तरीही वाटते पूजे.......तली खारीक मागू मी?

मला कंपल्सरी आहे........स केले विठ्ठला तू जे
कशाला प्रश्न त्या जगण्याकडे ऐच्छीक मागू मी
---------------

असली शेकडों उदाहरणे या संकेतस्थलावर अजून सापडतील. अशा शेरांना आपण दिलेले प्रतिसादही समर्थकांनी पहावेत.

धन्यवाद.

अजय,

माझ्य गझलांची उदाहरणे दिलीत म्हणून!

यती पाळला गेलाच पाहिजे अशी काही आणि नाही पाळला तरी उच्चारताना अडखळत नाही अशी काही, अशी दोन प्रकारची वृत्ते दिसून येतात. हे फक्त उच्चारताना अडखळण्याबाबत आहे. ('गाताना' नव्हे).

पाळलाच पाहिजे ची 'काही' उदाहरणे: आनंदकंद, रंगराग, साशंक

(पाळलाच पाहिजे कारण नाही पाळला तर उच्चारताना शब्दाचा अर्धा भाग उच्चारून झाला की तेथे थांबावे लागते व नंतर अर्धा भाग उच्चारावा लागतो).

ह्या ओळी:

कळले तुझ्या मौ......नातील काही

ढळलेत बघ डो......ळ्यातील काही

मिळते जरी अं......शातील काही

मिळते किती? अं......शातील काही

उजळेल कोना......ड्यातील काही

घ्यावे 'अजय' सा......रे जे हवे ते

येथे शब्द अर्धा उच्चारून थांबावे लागत आहे. तुमची बाकीच्यांशी फोनवरून काय चर्चा झाली त्याच्यात मला स्वारस्य नाही, पण येथे वैवकु जे 'यतीबद्दल' म्हणत आहेत तो मुद्दा योग्य आहे.

बाकी गझल 'गायची' म्हंटली तर कोणत्याही अक्षरावर कितीही थांबता येते हे मला माहीत आहे व तो प्रयोग करून दाखवण्याचा येथे संबंध नाही हेही नोंदवून ठेवतो.

ही सर्व चर्चा तापदायक ठरत असल्यानेच माझ्या पहिल्या प्रतिसादात फक्त जे जे आवडले ते नोंदवले.

मी गागालगागा गागालगागा असे वाचून पहिले , अडखळायला होतेच आहे.
मात्र तुम्ही म्हणताय तसे एकाच लयीचा किंवा ह्याच लयीचा विचार करायलाच हवा असे काही नाही .
पुस्तक वाचल्यासारखे वाचले तर अगदीच अडचण येत नाही , पण ह्यातही काही लोकांना विशेष प्राविण्य असते.
म्हणजे काही मुक्तछंद आपण कल्पनाही करू शकत नाही अशा छंदात लोक वाचतात. त्यामुळे यतीचा विचार
कोणी किती करायचा हा व्याकरणी नियमांना फाटा देऊन ज्याने त्याने ठरवायचा प्रश्न होतो.

*वैभवचे (कोणी शिकवले?) स्टेटमेंट अनावश्यक आणि अवकाळी आहे. टाळत जा राव गझलेची मजा निघून जाते.

बेफिकीर,

तुम्ही माझ्या गझलेतील ज्या ओळी नमूद केलेल्या आहेत, त्यावरच तर चर्चा चालू आहे. आणि माझ्या ओळींमध्ये यतीभंग होतो आहे असे काहींना वाटते. मग, मी वर नमूद केलेल्या रचनांबद्दल बोला ना... त्या बरोबर आहेत का? तेथे यतीभंग वगैरे झालेला नाही का? आणि जर तसा झाला असेल तर ते कोणी नमूद का केलेले नाही? हाच मुळात प्रश्न आहे. इथे गझलेप्रमाणे नाही, तर गझलकाराप्रमाणे विधाने केली जातात (म्हणजे तो कोण आहे त्यावरून) हे वारंवार दिसले आहे आणि दिसतही आहे.

असो.

आता माझ्या ओळींबद्दल.....

वारे जरासे गातील काही....

ही ओळ वाचताना, ''जरासे'' नंतर थांबण्याची गरजच नाही आहे. कारण, ही ओळ लांबलचक नाही. तसेच, कोणतेही विरामचिन्ह या ओळीत वापरलेले नाही आणि ते असण्याचीही आवश्यकता नाही.

येतील काही, जातील काही...

या ओळीत विरामचिन्ह आवश्यक होते तिथे वापरले आहे.

दोन्ही ओळी मतल्यामधील असल्याने, एका ओळीत थांबण्याची आवश्यकता आहे, तर एका ओळीत नाही. म्हणजेच , यती घेतलाच पाहिजे असा नियम मतल्यामध्ये दिसून येत नाही. (टीप : शब्द संपला म्हणजे यती आला असे समजणे हे पूर्णतः चुकीचे आहे. तर, जेथे यती आवश्यक असेल तेथे शब्द संपला पाहिजे असा नियम आहे.)

बेफिकीर,
तुम्ही फार ताणून लिहिले आहेत म्हणून सांगतो. तुमची गझल पहा....

जन्मतो गर्दीत आपण......संपतो गर्दीत पण
एकटा हा...एकटा तो...एकटा प्रत्येकजण
**** या ठिकाणी ''आपण'' आणि ''तो'' नंतर विराम आहे. जो तुम्हीच नमूद केला आहेत.

हेच अभ्यासायचे रा...हून गेले आमचे
मी तिला गेलो शरण की ती मला आली शरण

मात्र, इथे पहिल्या ओळीत तो दिसत नाही आहे.

*** जर मी लिहिलेल्या गझलेत यतीभंग असेल, तर मी मागील प्रतिसादात नमूद केलेल्या उदाहरणांत तर तो नक्कीच आहे.

शाम,

>>>
टाळत जा राव गझलेची मजा निघून जाते.
<<<

काही अनावश्यक प्रतिसादांमुळे ती आधीच निघून गेलेली आहे. काय आहे शाम, जगातील वेगवेगळ्या भागातील लोक आंतरजालावर गझला वाचत असतात. मात्र, चुकीची माहिती पोहोचविणार्‍यांमुळे चांगल्या विषयाचीही टिंगल होताना दिसते. अर्थात, काहींचा तो स्वभावही असेल. त्यामुळे, आपल्याला आपल्या साहित्याची काळजी घ्यावी लागते. केवळ बडबड करून काही अप्रमाणिक लोक मोठे झालेले आपण पाहतो, ऐकतो आणि वाचतोही. इथे पुन्हा आणखी कोणी गैरफायदा घेऊ नये असे वाटल्यामुळे इच्छा आणि वेळ नसूनसुद्धा उत्तर लिहावे लागते. असो. कुस्ती खेळायची असेल तर अंगाला माती चिकटणारच... Wink

चर्चेत स्वारस्य नाही, म्हणायचा तो मुद्दा म्हणून झालेला आहे. अवांतर ताशेर्‍यांकडे दुर्लक्ष!

माझ्यामुळे चर्चा विनाकारण वाढली त्याबद्दल क्षमस्व

बाकी काही खुलासे

१) यतिस्थान अमुक ओळीत पाळले गेले असेलच व वाचणारा त्या लयीचे यतिस्थान जाणून असेल तर तो त्या लयीतच वाचणार ते वाचायचे आहे की नाही हे सांगण्यासाठी लिहिणार्‍याने विरामचिन्हे विनाकारण वापरणे मला चूक वाटते. मुळात यतिस्थान हे वाचणार्‍याने वाचताना पाळायचे असते की लिहिणार्‍याने लिहिताना हा मुद्दाच माझ्यासाठी संदिग्ध आहे

२) यतिस्थान आपण मतल्यात व्यवस्थित पाळले आहेत तर पाळले आहेत असेच म्हणणार ना मी ! एखाद्या विरामचिंन्हाने ते स्थापीतही होत नसते की गायबही करता येत नसते आपल्याला पहिल्या ओळीतून ते घालवायचे असेल तर ओळ नॉन स्टॉप लिहावीत >>>वारेजरासेगातीलकाही<<< Happy
२-अ ) ओळ वाचत असताना अर्थाच्या मागे आपण अनायासे जातच असतो त्यात खो पडू नये म्हणून यतिस्थान येते तिथे शब्द संपवावा असा प्रघात असावा पण गम्मत म्हणजे यतिस्थान हे अर्थासाठी पाळाण्याचे नव्हे तर लयीत वाचताना श्वास अडखळू नये/ किंवा श्वासाना फार ताण/दाब पडू नये म्हणून थांबायचे ठिकाण आहे असे मला वाटते म्हण्जे शब्द संपणे न संपणे ह्याच्याशी यतिस्थानाचा संबंध लिहिणारे व वाचणारे ह्यांनी मागे कधीतरी संगनमताने जोडला आहे जो नियमासारखा पुढच्या पिढ्यांनी पाळला असावा असे म्हणता येते . मुळात कोण्याहीरिते यतिस्थान पाळा न पाळा ते लयीत असतेच ( म्हणजे यति हा लयीमागे जाणारा घटक आहे अर्थामागे नव्हे !!! )

३ ) एकंदर चर्चेवरून माझा विचार ठाम झाला आहे की हे जे कोणते वृत्त आहे त्यात यतिस्थान पाळणे महत्त्वाचे ठरते (जे आपण मतल्यात पाळलेही आहेत बाकी अनेक मिसर्‍यांतही पाळले आहेत ) वृत्त लहान असण्याची सबब इथे लागू पडत नाही किंवा वीरामचिन्हाची उपयुक्तता हा मुद्दाही.. हेही खरे की यतिस्थान पाळण्या न पाळण्याने आशयाला धक्का तर पोचतच नाहीच आहे तो वाचकापर्यंत व्यवस्थीत पोचतोच आहेच म्हणून या मुद्द्याचा फारसा बाऊ करणे न करणे तुमच्या हाती

मेन मुद्दा असा की यतिस्थान विरामचिन्हानी दाखवायचे वगैरे नसते कारण तशी गरज नसते (आणि इथे गम्मत पहा अशी आहे की ही विरमचिन्हे व्याकरणाचा भाग असतात व ती अर्थाच्या मागे जास्त जात असतात लयीच्या नव्हे ) इतकेच आपण लक्षात ठेवावे

धन्यवाद जोशी साहेब
आपला नम्र
वैवकु

आपण दिलेल्या उदाहरणार्थ शेरांमध्ये यतिभंग ज्याला म्हणतात तो आहेच हे मी मान्य करतोच आहे पण त्या लयीही यतिभंग खपवून घेणार्‍या आहेत असे माझे निरीक्षण आहे .

आणि आपण जर नीट पहाल की त्या उदाहरणांमधील अधिकांश शेरात एका पॅटर्न्वाईज यतिभंग झालेत हा मुद्दा आपण पाहावात व लक्षात घ्यावात एक गम्मत आपल्या लक्षात येइल जी नियमाप्रमाणे वापरता येतेय :)( हिंट : ह्या मुद्द्याचा संबंध यतिस्थानाचा भंग व भंगलेल्या अक्षरांची मात्रासंख्या याच्याशी आहे )

*सर्व मते वैयक्तिक निरीक्षणांवर आधारित न पटल्यास सोडून द्या Happy

वैवकु आणि इतरांसाठी
----------------------------
2013 - समीरच्या गझलेवरील ही चर्चा पहा....
बेफिकीर....
तुझ्या कुशीत उजाडेल का पहाट पुन्हा'
लगा लगाल लगागाल गा लगाल लगा
या अक्षरगणवृत्तात एकच यती येत आहे. तो 'लगाल गाललगा गा - यती - लगाल गाललगा' येथे येत आहे व माझ्या मतल्यात यती पाळला गेलेला नाही आहे. मात्र तसाच तो तुमच्या वरील गझलेत :
>>>तुला कळून कळेना, मला जळून कळे
उरायचाच उरे प्रश्न तो अजून तिथे<<<
या शेरात पाळला गेलेला नाही आहे. तरीही ते जाणवत नाही याचे कारण या वृत्तात यती तितकासा महत्वाचा नाही, जसा तो आनंदकंद, रंगराग, शार्दुलविक्रीडित या वृत्तात ठळकपणे जाणवतो तसा.
अक्षरगणवृत्त पाळल्यास लय चुकणे असंभव असते. यतीभंग शक्य असतो, पण बहुतांशी वृत्तात यती जाणवतही नाही इतका अस्पष्ट असतो. मात्र ज्या वृत्तात यती महत्वाचा व ठळकपणे जाणवणारा असतो
अनेक वृत्तांत यती जाणवण्याइतका ठळकपणे उच्चारला जात नाही. त्यामुळे तो फार महत्वाचा मानू नये असे म्हंटले जाते.
इथे ही चर्चा पहा - http://www.maayboli.com/node/41945
--------------------------------------------------------------------------------------------------
यतिविचार पद्य सलगपणे आणि लयानुरोधाने वाचीत असताना जो न्यूनाधिक विराम काही ठिकाणी घ्यावाच लागतो त्याला यती म्हणतात. हा यती ज्या ठिकाणी घ्यावयाचा त्या "जिह्वेष्टविश्रामस्थानाला"ही यती म्हणतात. यतिस्थानी पद्याचा विच्छेद होतो, तुकडा पडतो; म्हणून यतिस्थानी शब्दसमाप्ती, निदान पदसमाप्ती तरी व्हावी. तसे न झाल्यास जो कर्णकटू दोष होतो त्याला यतिभंग म्हणतात.
यती मानावा की नाही याविषयी मतभेद आहे असे दिसते.पिङ्गल आणि जयदेव हे यती मानतात तर माण्डव्य, भरत, काश्यप, आणि सैतव हे मानीत नाहीत. याचा अर्थ, पद्यरचनेत यती येऊच शकत नाही असा नव्हे, तर यती हा पद्य म्हणणाऱ्याच्या पद्धतीवर अवलंबून असल्यामुळे त्याचे स्थान हे निश्चित मानीत नसते एवढाच केला पाहिजे. ही अनिश्चिती चरणान्तर्गत यतीविषयी असली पाहिजे; कारण 'यति: सर्वत्र पादान्ते श्लोकार्धेतु विशेषत:'असे परंपराप्राप्त वचन आहे.चरणान्ती यती हा निरपवादपणे असलाच पाहिजे. कारण, पद्याचे चरणरूपी विभाग हे या अपरिहार्य यतीच्या अनुरोधाने पडतात.
असा एक विचार http://www.sureshbhat.in/node/478 या ठिकाणी आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
महेशरावांनी असेही विचारले होते की - मात्रावृत्तांतील यतिभंग कसा टाळायचा ?
याचे सोपे उत्तर असे देता येईल की, गण व्यवस्थित पाडून !!! यतिभंग टाळता नाही येणार; पण गण व्यवस्थित पाडले तर तो झाकता मात्र जरूर येईल. Happy
- यतिभंग हा काही फार मोठा दोष कोणत्याच काव्यशास्त्रकाराने मानलेला नाही. कोणत्याच कवीनेही नाही!!! ओळी सुचण्याचा ओघच इतका वेगवान असतो की त्या ओघात अनेकदा मोठमोठ्या कवींच्या रचनांमध्येही यतिभंगाचा (म्हटलाच तर) दोष राहून गेलेला आढळेल. यतीचा भंग हास्यास्पद जागी होऊ नये म्हणजे झाले ! यतिभंग होताना अर्थाचा अनर्थ होणार नाही, याचीही काळजी घेणे आवश्यक असते. तुम्ही त्या ओळीचे गण ठीकठाक पाडलेत, तर यतिभंगाचा दोष (?) बेमालूमपणे झाकला जाऊ शकतो.
उदाहरणार्थ ही ओळ घ्या
पडझड । झालेले गतवैभव । मनात माझ्या
आता या ओळीत यतिभंग झाला आहे, हे उघडच होय.
या ओळीचे गण मी जर

पडझड झा । लेले गत वै । भव मनात । माझ्या
असे पाडले तर साहजिकच ते हास्यास्पद ठरेल आणि निरर्थकही वाटेल; पण गण पाडतानाच असे पाडायचे की उच्चारणासही सोपे पडतील, यतिभंग (झालेला कळला) तरी पण तो खटकणार नाही आणि तुम्हाला जे म्हणायचे आहे, त्याचा अर्थ, आशयही श्रोत्यापर्यंत नीट पोहोचेल...ही तारेवरची कसरत असते खरी; पण (डोंबारणीच्या लहान मुलीप्रमाणेच !) ती साध्य होते, ती सरावानेच !
असाही एक विचार http://www.manogat.com/node/13552 या ठिकाणी आहे.
---------------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/22742
इथली चर्चाही वाचावी
-------------------------------------------------------
मी बेफिकीर यांची उदाहरणे पुन्हा पुन्हा घेत आहे, कारण माबोवर त्यांची रेलचेल अधिक असते आणि त्यांना मानणारेही आहेत.

***** त्यांना वाईट वाटले असेल तर क्षमस्व.