मृत्यूपत्र - एक गरज

Submitted by दक्षिणा on 22 August, 2014 - 09:15

पुर्वी घरातला कर्ता खंदा पुरूष गेला की इस्टेटीसाठी/शेतीवाडी साठी भांडणं झालेली आपण पाहिली/ऐकली असतील. आज ही परिस्थिती बदलली आहे असं नाही.
भारतीय मनाला मृत्युपत्राची भिती वाटते आणि मग माणूस मेल्यावर मागे घोळ सुरू होतात.
खूप इस्टेट असणार्‍यांनीच असं नव्हे पण एका पेक्षा अधिक मुलं असतील, बाकी काही कौटुंबिक समस्या असतील जसं की एका पेक्षा अधिक बायका, सावत्र मुलं इ. तर मृत्यूपत्र केले पाहिजे.

एखाद्या व्यक्तिचे मृत्यूपत्र नसेल, तर त्याच्या पश्चात त्या माणसाची इस्टेट कशी, कुणाला मिळते/मिळाली? त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात/लागले? तुम्हाला आलेले असे काही अनुभव?मृत्यूपत्र कसे गरजेचे आहे याची चर्चा करू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृत्यूपत्राबद्दल एक विचित्र अढी असते माणसाच्या मनात. ते लिहिले म्हणून माणूस लगेच मरतो असे नाही आणि मेल्याशिवाय मृत्यूपत्राला अर्थही नसतो. आणि हयात असताना यात कधीही बदल करता येतो.
त्यात केवळ आपल्या मालमत्तेचीच नव्हे तर बाकीच्या इच्छा अपेक्षांबद्दलही लिहावे असे मला वाटते.
यात आपल्या मृतदेहाचे काय करावे, धार्मिक कृत्ये करावीत का हे पण लिहावे.

अगदी संपत्ती वाटायची नसेल तर आपल्याकडची पुस्तके वगैरे कुणाला द्यावीत हे पण लिहावे.
तसेच आपण असे लिहून ठेवलेय, ते कुठे ठेवलेय हे देखील जवळच्या / घरातील व्यक्तींना सांगून ठेवावे.

जिथे जिथे नॉमिनेशन करण्याची सोय असेल तिथे तसे करून ठेवावे.

मी स्वतः असे सगळे लिहून ठेवलेले आहे. घरापासून दूर आहे त्यामूळे एक कॉपी आमच्या डायरेक्टरनाही दिलीय.
मरायच्या आधी कोमात गेलो, तर काय करायचे ते पण लिहून ठेवलेय. सर्व फोन नंबर्स, पासवर्डस पण लिहिलेत.

मला या विषयाची फारशी महिती नाही. पण मी ऐकलय की कधी कधी एकापेक्षा अधिक मृपत्र असतात. खरं आहे का ते? मग त्यातलं कोणतं व्हॅलिड असतं?

एखाद्या व्यक्तिचं विल नसेलच तर त्याच्या इस्टेटिचं पुढे काय होतं? मनुष्य अगदी एकटा असेल तर इस्टेट कुणाला देतात? आणि कुणाला द्यायची याचा निर्णय कोण घेतं?

रहस्यकथा, मालिकांचा आवडता विषय आहे हा. एकापेक्षा जास्त.
प्रत्यक्षात मृत्यूपत्र बनविणारा मनुष्य इतरांपेक्षा व्यवहाराला थोडा अधिकच चोख असतो. आधीचं रद्द करूनच तो नवं बनवत असतो. वाद होतात ते खोट्या मृत्यूपत्रामुळे. सध्या असा एक वाद चालू आहे. त्याबद्दल न बोललेलं बरं...

पण मी ऐकलय की कधी कधी एकापेक्षा अधिक मृपत्र असतात. खरं आहे का ते? मग त्यातलं कोणतं व्हॅलिड असतं? >>> लेटेस्ट मृत्युपत्र नेहमी व्हॅलिड धरतात. पण त्याकरता मृत्युपत्रावर दोन साक्षीदारांची सही लागते (बहुतेक). नेहमी वकीलातर्फे मृत्युपत्र करावे. म्हणजे त्याच्याकडेही एक कॉपी राहते.

मनुष्य अगदी एकटा असेल तर इस्टेट कुणाला देतात? आणि कुणाला द्यायची याचा निर्णय कोण घेतं? >> कायद्याच्या भाषेत एक संज्ञा आहे - Next-of-kin. म्हणजे मृत्यु पावलेल्या व्यक्तीचा सर्वात अथवा त्यातल्यात्यात जवळचा जिवंत नातेवाईक. मृत्युपत्र नसेल तर Next-of-kin ला मालमत्ता मिळते / क्लेम करता येते.

मृत्युपत्रात दर्शवलेले वाटप जर बेकायदेशीर असेल व ते काही कायदेशीर वारसांना मान्य नसेल तर मृत्युपत्र हे खरे असले तरी चॅलेंज केले जाउ शकते.

आणखी एक महत्त्वाचे कारण:
पाश्चिमात्य देशांत, नवरा-बायको दोघांच मृत्युपत्र नसेल आणि मृत्यू झाला तर, मृत्यू नंतर मुलाचं काय करायचं हा प्रश्न भेडसावतो. सरकार फोस्टर होम पर्याय निवडतं, आणि आजी/ आजोबा इ. ना कस्टडी मिळवायची असेल तर वेळ जातो.

http://www.oldagesolutions.org/Facilities/documentation_marathi.aspx इथे काही माहीती उपलब्ध आहे.
मृत्युपत्र हे नोंदणी करणे बंधनकारक नसले तरी त्याची नोंदणी करणे हे व्यवहार्य व शहाणपणाचे असते.

चांगला विचार... मृत्यु पत्र केल्यावर खरे तर ते कुठे आहे कोणत्या वकिलाकडे आहे ते देखील सांगुन ठेवावे

माझ्या आजोबांनी मृत्युपत्र केलेले होते.. म्हणजे बोलता बोलता कधी हिंट दिलेली पण आम्ही जास्त त्यांना विचारलेले नाही. कारण आम्हाला तशी गरज देखील वाटली नाही . त्यांनी काय काय घेउन ठेवलेले ते देखील विचारलेले नव्हते. पण जेव्हा अचानक ते वारले तेव्हा घर मामाच्या नावावर करताना बर्याच अडचणी आलेल्या.
त्यामुळे केल्यावर कुणाला तरी सगळे सांगुन ठेवावे

अमितव, बरोबर.
इथे नवरा बायकोचं वेगळं मृत्युपत्र लागतं. इस्टेटीकरता एकच चालू शकतं बहुतेक पण उद्या मला काही झाल्यास माझ्यामागे मुलांचं काय, ती कोणाकडे सोपवायची हे लिहावं लागतं. नोटराईज करावं लागतं. नवर्‍याने त्याचं केलं आहे. माझं अजून भिजत घोंगडं आहे.

Next-of-kin म्हणजे मृत्यु पावलेल्या व्यक्तीचा सर्वात अथवा त्यातल्यात्यात जवळचा जिवंत नातेवाईक. मृत्युपत्र नसेल तर Next-of-kin ला मालमत्ता मिळते / क्लेम करता येते. >>>> हे खरे आहे ,पण त्यातही प्रचंड भानगडी आहेत.मागचे वर्ष भर मी स्वःता ह्या Next-of-kin च्या प्रकरणात अडकले आहे. आणि खरं तर कंटाळले आहे.

२० वर्षां पुर्वि बाबा आणि १५ वर्षां पुर्वि आई गेल्यावर मी घरच्या मालमत्ते वरचा आणि बाकी गोष्टींचा हक्क सोडुन सर्व काही एकुलत्या एक लहान भावाच्या नावावर केले . दुर्दैवानी मागच्या वर्षी फक्त ३० वर्षाचा आणि अविवाहित असलेला भाउ पण हार्ट अ‍ॅटॅक नी अचानक गेला . त्याचे दोन फ्लॅट , फार्म हाउस , बँकेचे लॉकर कशावरही माझे नाव नसल्याने [ त्याचे लग्न झाल्या वर त्याच्या पत्नीलाच नॉमीनेट करु या विचारा मुळे ] मला ठाणे कोर्टात केस दाखल करावी लागली .त्यावेळी कळले की मृत्यूपत्र किंवा नॉमिनेशन किती महत्वाचे असते.

घरातला पुरूष गेला की त्याच्या पत्नी ला आणि मुलांना वारसा हक्क मिळवताना फारसा त्रास होत नसावा . परंतु Next-of-kin मध्ये कोर्टात खूप गोष्टींचा किस काढ्ला जातो. माझ्या केस मध्ये आई , वडिल ,भाउ कोणिही जिवंत नाहीत आणि मी एकटिच वारस आहे हे स्पष्ट असताना देखील , मी एकटिच वारस आहे हे सिद्ध करावे लागते आहे. आई ,वडिलांचे आमच्या दोघां व्यतिरिक्त कोणतेही अपत्य नव्हते, भावाचे कोणाशिही लिव्ह इन रिलेशन नव्हते , तसेच सख्खा काका ,मामा किंवा त्यांच्या मुलांना कसले ही ऑब्जेक्श्न नाही हे सगळे कोर्टाला दाखवताना पुरती दमछाक झाली आहे. त्यातही मुव्हेबल [ गाडी , लॉकर , एफ डि वगैरे ] गोष्टीं ची एक केस आणि नॉन मुव्हेबल [ स्थावर जंगम मालमत्ता ] गोष्टीं साठी दुसरी केस चालु आहे. प्रत्येक वेळि दिल्ली -ठाणे वार्‍या करताना आणि वारसा हक्क सीद्ध करताना फार मानसिक त्रास होतो.

या सगळ्यात एकच शिकले की प्रत्येक गोष्टिचे नॉमिनेशन करा आणि नसेल तर सगळे विचार बाजुला ठेवुन म्रुत्युपत्र कराच , नाही तर जाणारा जातो आणि नंतर उरलेल्या वारस दारांना फार फार त्रास होतो.

चांगल्या वकिलाकडून मृत्युपत्र बनवून घ्यावे. वर प्रकाश घाटपांडेंनी लिहिलेला मुद्दा फार महत्त्वाचा आहे. मृत्युपत्रातील तरतुदी बेकायदेशीर असतील तर मृत्युपत्र असले तरी कोर्टात त्याविरुद्ध खटला दाखल करता येतो.
उदा समजा एखाद्या माणसाला वडिलोपार्जित जमिन मिळाली असेल. त्याला दोन सज्ञान मुले आणि एक मुलगी आहे. मुलीचे लग्न महाराष्ट्रात १९९४ नंतर झाले आहे. आता २०१४ मध्ये जर हा माणुस मेला आणि त्याने मृत्युपत्र केले असेल की सर्व वडिलोपार्जित जमिन एका सेवाभावी संस्थेला दान केली जावी तर मृत्युपत्र असले तरी वडिलोपार्जित जमिनीवरील मुलांचा व मुलीचा कायदेशीर हक्क डावलून ती जमिन दान करता येणार नाही.

हे एक उदाहरण झाले. अशी अनेक गुंतागुंतीची प्रकरणे असू शकतात. तेव्हा उत्तम वकील गाठावा हेच खरे.

एखाद्या व्यक्तिचं विल नसेलच तर त्याच्या इस्टेटिचं पुढे काय होतं?>>>>> हयात जोडीदार व मुले यांच्यात इस्टेटीचे विभाजन, (अर्थात कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यावर) समप्रमाणात होते.

मनुष्य अगदी एकटा असेल तर इस्टेट कुणाला देतात?>>> अशावेळी त्याच्या सख्ख्या हयात भावंडांना सक्सेशन सर्टिफिकेट करून , मृताचे नातेवाईक असल्याचे सिद्ध करावे लागते.त्यानंतर त्यांच्यात वाटणी केली जाते.
काहीवेळेस कॅव्हेट केले जाते.पण मला नेमके कधी ते आठवत नाहीय.

माझ्या आईने आम्हाला, पुढे काय करायचे ते बोलून दाखविले होते.पण काही काळानंतर परिस्थिती एकदम उलटीसुलटी झाल्यावर ,तिने मृत्युपत्र केले आहे .त्याचे रजिस्ट्रेशनही केले आहे.अर्थात तिनेच कधीकाळी सांगितलेल्या गोष्टीं आम्ही लिहिल्या ,तिला वाचायला दिल्या.वकिलाकडून तयार करून,तिची सही घेतली आणि एक साक्षीदार व डॉक्टर( मृत्युपत्र करणारा/रीचे शारीरिक व मानसिक संतुलन चांगले असण्याबाबत) यांच्या सह्या घेतल्या.
अर्थात आमच्याबाबतीत मृत्युपत्र केले नसते तरी चालले असते,पण तिचा आग्रह पडला की पुढे कोणालाही त्रास नको.

१) दिनेश यांनी म्हटल्याप्रमाणे "जिथे जिथे नॉमिनेशन करण्याची सोय असेल तिथे तसे करून ठेवावे'.
२) फिजिकल शेयर्स असतील तर डीमॅट करून घ्याच.नाहीतर प्रचंड त्रास होतो.वेळ ,पैसा, शक्ती खर्च होते.
३) हे जंगम मालमत्तेबाबत झाले.स्थावर मालमत्तेसाठी केवळ नॉमिनेशन न करता मृत्युपत्र करावे.कारण नॉमिनीला चॅलेंज केले जाऊ शकते.
४)पोस्ट,बँक,एल.आय.सी. हे नॉमिनीलाच रक्कम देतात.मग कोणी इतर वारसदार असतील तर त्यांनी त्यांचा हिस्सा,कोर्टाकडून घ्यावा.

उत्तम धागा.

इतक्यातच अगदी जवळच्या व्यक्तिंचे मृत्यू फार कमी कालावधीत अनुभवल्याने एक गोष्ट फार फार प्रकर्षाने
नमूद कराविशी वाटतेय आणि ती म्हणजे कळत्या-सवरत्या वयात, शारिरीक व मानसिकदृष्ट्या परावलंबी होण्यापूर्वी किंवा वयाच्या कुठल्याही फेजमधे, केव्हाही गाठू शकणा-या मृत्यूनंतर होवू शकणा-या आर्थिक गोंधळाचा सुनियोजीत सामना करण्यासाठी वयाच्या साधारण ४०-४५ व्या वर्षीच मृत्यूपत्र करून घ्यावे व दर पाच एक वर्षांनी त्यात आवश्यक बदल करून घ्यावेत.

अर्थात ते कसे असावे यावर तज्ञ मंडळीच प्रकाश टाकू शकतील.

-सुप्रिया.

खूपचं सुंदर धागा आहे. अगदी वाचून मनुष्य एकदम अलर्ट होतो. ज्याच्या कडे काहीच नाही फक्त पोटापुरतेच आहे त्याचे बरे आहे असे वाटले वाचून.

नुकताच माझा भाऊ गेला. आणि त्याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आणि दुसर्‍या लग्नाची बायको आहे. पहिली पत्नी निवर्तली. जाताना भावाने काहीच सांगून नाही गेला.

अगदी ओसरीभर जागा जरी असली जाणार्‍याच्या नावे तर केवढी भांडणे निर्माण होतात. मी तर असे म्हणेल आपण आपले कमवावे. इतर कुणाचे काही मिळो वा न मिळो फार खंत बाळगू नये. पण, जिथे आपला अधिकार असतो आणि तो अधिकार चुकीच्या व्यक्तिला मिळतो तेंव्हा विवेकी मन हे मान्यच करत नाही की मिळते ते जाऊ द्यावे. भारतात तर कायदा इतका संथ आहे आणि त्यात आपले अधिकारी लोक इतके हलगर्जीपणा करतात की वर सुखदा म्हणते त्याप्रमाणे मार्ग काढता काढता मनुष्य कंटाळून जातो.

ज्याच्या कडे काहीच नाही फक्त पोटापुरतेच आहे त्याचे बरे आहे असे वाटले वाचून. >>> बी ,नाही पटत. प्रत्येकजण
प्रगतीकडे वाटचाल करीत असतो.मात्र हे करत असताना इतरांची संपत्ती मिळावी अशी अपेक्षा किंवा हव्यास खरंच धरु नये.सामंजस्याने प्रश्न सोडवावेत.
तशी मनाची तृप्ती ही एक वेगळी गोष्ट आहेच.

माफ करा.
व्हॉट्सॅपचं ढकलपत्र पोहोचलं वाटतं?
आज ३० वर्षे वय असताना मी बायकोला अक्खी इश्टेट लिवली, अन समजा ३५ च्या वयात माझा डिव्होर्स झाला.
किंवा ३६व्या वरषी मी दीड करोडची नवी प्रऑपर्टी घेतली.
हायपोथेटिकल विचारतोय बरं का.
तर मला सांगा,
मृत्युपत्र अपडेट करायची वेळ कशी असावी?
आय मीन चष्म्याचा नंबर दर वर्ष दीड वर्षांत तपासतो आपण. तसं काही करावं का? एव्री बड्डे चेंज युर वुईल?

माझ्या आजेसासूबाईनी साधारण ५०-६० वर्षांपूर्वी स्वतःचे मृत्युपत्र केलं, त्या शिकलेल्या कमी होत्या पण तरीही त्यांनी पंचक्रोशीतली पाच माणसे ज्यांना समाजात मोठा मान होता त्यांच्या सह्या त्यावर घेतल्या आणि त्यावेळी त्यांनी कोर्टात त्याचं रजिस्ट्रेशन केलं. खूप दूरदृष्टी होती त्यांना.

मृत्यूपत्र अत्यंत खाजगी (गोपनीय) असावे.

>>>>आज ३० वर्षे वय असताना मी बायकोला अक्खी इश्टेट लिवली, अन समजा ३५ च्या वयात माझा डिव्होर्स झाला.
किंवा ३६व्या वरषी मी दीड करोडची नवी प्रऑपर्टी घेतली.
हायपोथेटिकल विचारतोय बरं का.
तर मला सांगा,
मृत्युपत्र अपडेट करायची वेळ कशी असावी?
आय मीन चष्म्याचा नंबर दर वर्ष दीड वर्षांत तपासतो आपण. तसं काही करावं का? एव्री बड्डे चेंज युर वुईल?<<<<

ते केव्हाही बदलता येतेच की Happy

पण न करण्याचे तोटे जास्त असतात.

दक्षिणा यानी या लेखाला जे शीर्षक दिले आहे...."मृत्यूपत्र - एक गरज"....तेच अत्यंत बोलके आहे. आपल्या हिंदू समाजात आजही त्याची आत्यंतिक "गरज" भासत नाही असे कितीतरी सुशिक्षित म्हटल्या जाणार्‍या कुटुंबातूनही दिसते. मरणारा मरून जातो....त्याचे दहन होऊन बारावे-तेरावे घालून जाईतो डोळ्यातून पाणी काढले जाते जवळच्या नातेवाईंकडून आणि मयताला जमलेले आपापल्या गावी जाणार त्याचवेळी इस्टेटीच्या वाटणीची सुरुवातीला हळू आवाजात झालेली चर्चा खर्‍या अर्थाने लाल रंगाच्या वापरापर्यंत येते. इस्टेटीचा वारस असला तरी मुलीला देखील पित्याच्या मिळकतीतील हिस्सा मिळायला हवा असे कायदा सांगत असल्याने मग मुळात इस्टेट आहे तरी किती ? बॅन्केत किती पैसा फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतविला आहे ? इन्शुरन्सची कागदपत्रे कुठे आहेत, तो आहे तरी कितीचा ? पोस्टाची सर्टिफिकेट्स? सोनेनाणे, जंगम मालमत्ता, राहते घर...इतकेच काय पण घरातील फर्निचर, कपडेलत्ता यांच्याही ढिगावर आपले क्लेम सांगणारे पुढे येतात आणि कालपर्यंत "बाप" गेला म्हणून एकमेकाच्या गळ्यात पडून रडणारे आज त्याच गळ्याला पैशासाठी दाबायला पुढे येतात.....हे चित्र शहरातच नव्हे तर अगदी खेडेगावातसुद्धा पाहायला मिळाले आहे.

हे सारे टळले जाते जर मयताने "मृत्यूपत्र" केले असेल तर. त्यासाठी कोणत्याही खास कागदपत्राची वा स्टॅम्पपेपरची गरज नसते. त्या विषयीच्या तरतुदीविषयी लिहितो :

भारतात २१ वर्षावरील व्यक्ती मृत्यूपत्र तयार करण्यास पात्र मानली जाते. सदरचे पत्रक अगदी साध्या आखीव वा कोर्‍या पानावर केले जाते आणि स्टॅम्पपेपरवरच केले पाहिजे असे कायदा सांगत नाही. शक्यतो व्यक्तीने आपल्या हस्ताक्षरात ते पूर्ण करावे, याला कारण उद्या त्याला कोर्टात कुणीतरी खरेपणाबद्दल आव्हान दिलेच तर सर्वप्रथम हस्ताक्षरतज्ज्ञाकडून अक्षराची खातरजमा केली जाते. संबंधित इसम स्वतःच्या इच्छेने त्याच्या नावे असलेल्या इस्टेटीची वासलात (वाटप) करू शकतो. किंबहुना तो त्याचा हक्क मानला गेला आहे. नातेवाईक, मित्र, विश्वासू नोकर यानाही इस्टेटीमधील वाटा देता येतो, मात्र त्याची स्पष्ट नोंदणी मृत्यूपत्रात....म्हणजे किती, कुणाला....नोंद करणे भाग आहे. वाटणीची कारणे वा समर्थन देण्याची गरज नसते.

मृत्यूपत्र लिहिताना गंमतीशीर वाक्याने सुरुवात करावी लागते....ते म्हणजे...."मी, नाव : अबक, आज वय ६०, लिंग पुरुष, सध्या राहणार....अबक, माझी स्वतःची बुद्धी वापरून, जी व्यवस्थित कार्यरत आहे, माझे मृत्यूपत्र लिहित आहे. त्यानुसार मी जाहीर करत आहे की माझी स्वतःची म्हटली जाणारी खालील मालमत्ता, रोख पैसा कायद्याने माझी असून माझ्या मृत्यूनंतर ती नावे दिलेल्या व्यक्तींना देण्यात यावी.

इस्टेटीचे वर्णन.... (अ) घर....[इथे घराचे वर्णन, सिटी सर्व्हे नंबर, गावातील भाग, एकमजली, दुमजली वा फ्लॅट असेल तर त्याचे वर्णन, खोल्या आदीची माहिती द्यावी लागते]....माझी पत्नी - पूर्ण नाव, वय....याना दिले आहे.
(ब) बॅन्केतील पैसे....फिक्स डिपॉझिटस....म्युच्युअल फंडस, पोस्टातील खाती, शेअर सर्टिफिकेट्स, इन्शुरन्सच्या रकमा, सोन्याचे जिन्नस....आदीचे वाटप....ज्या मुलानामुलीना द्यायचे असेल त्यांची नावे.
शेत जमीन असल्यास त्याचे सविस्तर वर्णन....त्यातील वाटेकरी.
बॅन्केत व्यक्तीच्या नावे सेफ डिपॉझिट व्हॉल्व्ह असेल तर मृत्यूपत्रात त्याचा सविस्तर उल्लेख असून याची एक कॉपी संबंधित बॅन्क मॅनेजरला देणे आवश्यक आहे. मृत्यूपत्रात व्हॉल्व्हमधील रक्कम आणि कागदपत्रे ज्या कुणाला द्यायची असतील त्याचे स्पष्ट नाव आणि ओळख बॅन्क मॅनेजरना करून देणे अगत्याचे असते.

मृत्यूपत्राचे लिखाण झाल्यावर,,,समजा सार्‍या वर्णनानंतर तीन पानाचे ते झाले आहे तर त्या व्यक्तीने प्रत्येक पानावर सही करावी लागते. दोन साक्षीदार लागतात. त्यानीही प्रत्येक पानावर सही करायची असते. विशेष म्हणजे साक्षीदारामध्ये कुणीही नातेवाईक चालत नाही तसेच मृत्यूपत्रात ज्यांची नावे आली आहेत तेही साक्षीदार होण्यास अपात्र असतात. मित्र आणि कार्यालयातील ज्येष्ठ व्यक्तीला बोलाविले जाते. सहसा एक डॉक्टर आणि एक वकील साक्षीदार म्हणून ठेवणे फार उपयोगी ठरते. कोर्टात केस उभी राहिलीच तर डॉक्टर "सही करताना व्यक्ती निरोगी आणि तणावविरहीत होती हे मी स्वतः तपासले होते आणि त्यानंतरच सह्या झाल्या आहेत याची मी खात्री केली होती..." अशी साक्ष देवू शकतात. दोन्ही साक्षीदारांना मृत्यूपत्राद्वारे एकही रुपया मिळणार नाही याची खात्री करून घेतली जाते; तरच साक्षीदाराची सही ग्राह्य मानतात.

सह्या झालेले मृत्यूपत्र तारखेचा स्पष्ट उल्लेख केलेले असावे आणि ते मोठ्या लिफाफ्यात ठेवून पुन्हा लिफाफ्यावर सही करून, ते सील करावे लागते आणि रजिस्ट्रार ऑफिसमध्ये "प्रोबेट" साठी द्यावे. प्रोबेट म्हणजे केलेल्या "विल" वर सरकारी मोहोर लावून घेणे. यासाठी व्यक्ती आणि ते दोन साक्षीदार याना रजिस्ट्रारच्या कार्यालयात त्यानी दिलेल्या तारखेला वेळेला जायला लागते. विलच्या कागदावर सरकारी मोहोर उमटवून घेण्याअगोदर विहित अशी फी भरावी लागते....ती किती हे त्या इस्टेटीवर अवलंबून असते. रजिस्ट्रार ती कोर्ट फीची रक्कम ठरवितत. तेवढ्या फी नंतर वेगळा स्टॅम्पपेपर तयार करून सरकारी अधिकारी मृत्यूपत्रावर सहीशिक्का देतो....हा प्रोसेस झाला म्हणजे ते मृत्यूपत्र अधिकृत मानले जाईल. सरकारी कायदेकानूनकलमे चित्रविचित्र असल्याने नंतरच्या कोर्टकचेर्‍या टाळण्यासाठी मृत्यूपत्र करताना ओळखीच्या वकिलामार्फतच ते करून....तरीही स्वःहस्ताक्षरात...घेणे सोयीचे होते.

काही किचकट कलमे अशी आहेत की, मृत्यूपत्र करणारी व्यक्ती फक्त त्याच्या कमाईने घरी आलेल्या पैशाचे वा इस्टेटीचे वाटप करू शकतो. घर जर वाडवडिलार्जीत असेल तर (म्हणजे पूर्वजांकडून मिळाले असेल) त्या घराचे वाटप करण्याचा अधिकार या व्यक्तीला मिळणार नाही. ते सामाईकपणे वारसांकडे जाईल. वाहन...दुचाकी असो वा चारचाकी....ते आरटीओमध्ये व्यक्तीच्या नावाने रजिस्टर्ड असणे गरजेचे आहे...तरच त्याचा विलमध्ये उल्लेख करता येईल.

एकदा केलेले मृत्यूपत्र बदलता येते का ? होय, जरूर बदलता येते. नव्या विलमध्ये पुन्हा नव्याने वाटप करून आता फक्त "मी अमुकतमुक तारखेला जे मृत्यूपत्र केले होते आणि ज्यावर रजिस्ट्रार महाराष्ट्र शासन, यानी सही केली आहे....ते आज दिनांक.....रोजी कायमचे रद्द करण्यात आले आहे असे समजावे...." असे वाक्य लिहून पुन्हा सविस्तर मृत्यूपत्र (स्वःहस्ताक्षरात) करावे आणि पुन्हा तो सह्यांचा कार्यक्रम करावा लागतो.

इब्लिस, "आज ३० वर्षे वय असताना मी बायकोला अक्खी इश्टेट लिवली, अन समजा ३५ च्या वयात माझा डिव्होर्स झाला. ....हायपोथेटिकल विचारतोय बरं का." - मा.बो. वर वागता, तसच घरी वागत असाल, तर ९९% कॉन्फिडन्स लेव्हल वर हा नल हायपोथिसीस अ‍ॅक्सेप्ट करावा लागेल Wink

फेफ,
अशोक पाटील सरानी लिहिलेली सोप्पी सरकारी पध्धत, स्टाम्प ड्यूटी इ. वाचली ना?
मी विचारले, किती वेळा विल बदलायची?

अन बायको बद्दल लिहिलेले दिसले. दीड कोटी नाही दिसले का?

मृत्यूपत्र आणि लिव्हिंग विल यामधे फरक आहे का?

एखाद्या व्यक्तिचं विल नसेलच तर त्याच्या इस्टेटिचं पुढे काय होतं? <<< जोडीदार व मुले यांच्यामधे समान विभागणी.
ते नसतील तर मग सगळ्यात जवळचे नातेवाइक वगैरे.

डॉक्टर.... धन्यवाद.

"...किती वेळा विल बदलायची?..." असे तुम्ही विचारले आहे, तर त्याला उत्तर....कितीही वेळा. मात्र प्रत्येक बदलाच्या वेळी लिखाणाची सुरुवात करताना स्पष्ट उल्लेख यावा लागतो....

"मी, अमुकतमुक, आज दिनांक.......रोजी या द्वारे जाहीर करत आहे की, मी माझ्या मालमत्तेच्या वाटपाविषयी दिनांक ..... रोजी माझ्या सहीने तसेच १) अबक व २) कबअ या दोन साक्षीदारांच्या सह्यांनी जे मृत्यूपत्र करून त्यावर डिव्हिजनल प्रोबेशनरी ऑफिसर, म.शासन, यांची सहीमोहोर घेतली होती, ते तीन पानी मृत्यूपत्र रद्द करीत आहे. त्यातील तरतूदींचा आजपासून विचार न करता या नव्या मृत्यूपत्रात जाहीर केल्यानुसार मालमत्ता वाटप व्हावे...." (किती पाने होती मूळ मृत्यूपत्रात त्याचा उल्लेख आवश्यक आहे.....हे काम वकीलही करतात.)

या शपथेनंतर परत मूळ प्रतिसादात दिलेल्या बाबींचा रितसर उल्लेख होतो. रजिस्ट्रारकडे प्रोबेटला देण्यापूर्वी अगोदरचे "मृत्यूपत्र रद्द करावे" असा स्वतंत्र अर्ज देवून (कारण द्यावे लागत नाही) नव्याने नोंद करावे असा उल्लेख आवश्यक ठरतो. रजिस्ट्रार लागलीच हे काम करीत नाही. त्याना आवश्यक वाटले तर आपल्या खर्चाने स्थानिक वर्तमानपत्रात जाहीरात "रद्द" बद्दलची जाहीरात द्यावी लागते....(हे कर्नाटकात चालू आहे.)

पहिले रद्द होऊन नवीन अंमलात येणे यात किमान तीन महिन्याचा कालावधी जातो. त्यामुळे असेल पण वारंवार विल करणे होत नाही....म्हणजे निदान माझ्या पाहाण्यात असा प्रकार झालेला नाही, डॉक्टर.

मृत्युपत्र या शब्दाच्या ऐवजी इच्छापत्र हा शब्द वापरला तर त्यासोबत येणारी भीती/विषण्णता/अभद्र भावना कमी होऊन संबंधित व्यक्ती अधिक स्पष्टपणे, स्वच्छ भाषेत आणि सोपेपणानं त्याची तरतूद करू शकेल असं मला नेहमी वाटतं.

तरूण वयात घरातल्या एकमेव कमावत्या व्यक्तीचा झालेला अकाली मृत्यू आणि त्यानंतरचे नॉमिनेशन्स इ.अभावी झालेले प्रचंड प्रॅक्टिकल गोंधळ अगदी जवळून पाहिलेले असल्यामुळे माझ्या लेखी मृत्यूपत्राचं महत्त्व खूप आहे.

माझा नवरा गेली पाच वर्षं दरवर्षी (एका विशिष्ट दिवशीच) नव्यानं स्वत:चं एक मृत्यूपत्र करतो. त्याच्या ३ कॉपीज करून, त्याचं बंद पाकीट घरातल्या तीन नातेवाईकांकडे १-१ असं देऊन ठेवतो. कुठल्या तीन व्यक्तींना ती ३ पाकिटं दिलेली आहेत हे त्या पाकिटांवर लिहिलेलं असतं.
हे सुरू करण्यापूर्वी त्यानं मृत्यूपत्र तयार करण्याच्या रीतसर पद्धतीची माहिती काढली होती. त्यानुसार, वरती अशोक. यांनी सांगितलेल्या मजकुराप्रमाणेच सुरूवात करून सगळे मुद्दे लिहितो.

मोठा बिझिनेस, पार्टनरशिप इत्यादी बद्दल मृत्यूपत्रात काही लिहायचं असेल तर त्यासाठी वकील, रजिस्ट्रेशन वगैरे कायदेशीर टप्पे आहेत. नोकरदार व्यक्तीनं आपल्या पगारी मालमत्तेबद्दल मृत्यूपत्र केलेलं असेल, तर फक्त तारीख-वारासकट सगळे मुद्दे, त्याची स्वत:ची सही आणि दोन साक्षीदारांच्या सह्या (यात मृत्यूपत्रातल्या बेनिफिशिअरी व्यक्ती नसाव्यात) इतकं पुरतं.

तरी नवर्‍याला परत एकदा विचारून इथे माहिती लिहिते.

खुप छान धागा दक्षिणा ताई,
सद्द्या मी याच अनुभवातुन जात आहे.
वडिलांनी बनवलेल्या मृत्यूपत्रा मुळे बरेच वाद चालु झाले आहेत,
त्यामुळे खुप महत्वाची माहिति या मुळे मला मिळालि.

Pages