माहेरवाशीण महालक्ष्मी

Submitted by योकु on 19 August, 2014 - 09:23

पाहाता पाहाता २०१४ चे सात महिने सरले; श्रावण आला आणि सणवारांची रेलचेलही आलीच. आता काहीच दिवसांत गणराय येतील मूषकावर बसून आणि महालक्ष्म्यांचंही आवाहन होईलच!
या १० भारलेल्या दिवसांतच गौरीही असतात. विदर्भात मात्र महालक्ष्मी म्हणतात. तीन दिवस माहेरी असतात. सगळेच लोक मग त्यांच्या सरबराईमध्ये गुंग होतात.
ऋषीपंचमी नंतर एखाददिवशी फुलोरा करण्याचा घाट असतो. यात आई, आजी अन जवळच्या काकू, आत्या वगैरे येऊन सगळा फुलोरा करतात. यामध्ये करंज्या, तळणीचे मोदक, साटोर्‍या, लाडू, अनरसे, पापड्या, शंकरपाळे असे प्रकार असतात. विशेष प्रकारही केल्या जातात जसे वेणी वगैरे. आमच्या कडे गणपतीचा फुलोराही याचवेळेला करतात. काही जणांकडे मुका फुलोराही असतो. यात फुलोरा पूर्ण होईपर्यंत कुणाशी बोलायचं नसतं.

मग सुरुवात होते ती माळ्यावरून ट्रंक काढण्यापासून... सकाळी आजीची नित्यपूजा, पाठ झाले की माळ्यावरून मोठी ट्रंक तिला खाली उतरवून द्यायची; हे काम करून झालं की मग साफसफाई करायची. फुलोरा ठेवायची जाळी काढून द्यायची; महालक्ष्म्यांचे स्टॅन्ड (याला मराठी शब्द आहे, आता डोक्यात नाही मात्र) काढून द्यायचे. त्यानंतर मग नमस्कार करून आजी हळूवारपणे मऊ सुती कापडात गुंडाळून ठेवलेले मुखवटे बाहेर काढते. ज्येष्ठा आणि कनिष्ठेचे मुखवटे झालेत की मग बाळांचेही मुखवटे. यानंतर, परातीत धान्याच्या राशीवर त्यांची तात्पुरती स्थापना होते. मग पूजा होते.
यानंतर सोयीसाठी म्हणून दुसर्‍या दिवशीकरता चण्याच्या डाळीचं पुरण शिजवून तयार केलं जातं. अर्थातच, कडक सोवळ्यात. Happy
यावेळेपर्यंत नातलग घरी जमायला लागतात. त्यासोबतच महालक्ष्म्या जिथे मांडायच्या ती जागा साफ करून बाकी सोय केली जाते. बर्‍याच जणांकडे मखर असतं ते आमच्याकडे नाही. त्यामुळे बरीच मेहेनत वाचते. एका घडवंचीवर गालीचा घालून ती जागा सजवली जाते. बाजूला शोभा म्हणून झाडाच्या कुंड्या ठेवल्या जातात. वर फुलोरा ठेवण्याकरता जागा केली जाते. हे सगळं आटपेस्तोवर संध्याकाळचे ४ / ४.३० होतात.
आता खरं बायकांचं काम चालू होतं. सकाळी धूवून स्वच्छ केलेले स्टँड आणले जातात. त्याच्या आतमध्ये तयार केलेल्या फुलोर्‍यामधला थोडा-थोडा फराळ आत ठेवला जातो. मग कोरी जरीची साडी घडी मोडून त्यांना नेसवली जाते. हे कौशल्याचं अन अनुभवाचं काम! आई, काकू मात्र एका प्रयत्नात व्यवस्थित करतात. नीट मनासारख्या निर्‍या पाडून चोपदार साडी घालून झाली की मग हात आणि मानेपर्यंतचा भाग (हा कापडाचा केलेला असतो) बसवला जातो. यानंतर बाळांना ही तयार केले जाते. आमच्याकडेतरी बाळांचे तयार कपडेच वापरले जातात. मग तयार केलेल्या मूर्ती स्थानापन्न केल्या जातात.
सकाळी पूजा केलेले मुखवटे घराच्या दारा पर्यंत नेतात. मग लहान मुलांना थाळी चमचा वाजवायला सांगतात आणि वाजत गाजत महालक्ष्म्यांचं आगमन होतं. ते मुखवटे मग मूर्त्यांवर बसवले जातात. ज्येष्ठा, कनिष्ठा नीट पाहून बसवतात. पदर वगैरे नीट बसवतात आणि मूर्ती पूर्ण करतात. धान्याची रासही ओततात खाली घोंगडीवर. मूर्तींना आणि बाळांना दागिने घालतात. मंगळसूत्र, चपलाहार, पोहेहार, लक्ष्मीहार, मोत्येहार, बांगड्या, पाटल्या, कर्णफुलं, वेणी असं सगळं घालून झालं की काय रूपवान दिसतात!
याचवेळेस एखादी अंगणात रांगोळी काढते आणि दारापासून तर महालक्ष्म्यांच्या स्थानापर्यंत पाऊलं काढते. दिवेलागणीच्या वेळेस मग लहानशी पूजा होते; फक्त फुलं आणि हळद-कुंकवानी. आवाहन केल्या जातं. नंतर गणपतीच्या आरतीपाठोपाठ देवीचीही आरती गायली जाते. यावेळेस साधा प्रसाद असतो.

गौरीपुजनाचा असतो दुसरा दिवस...
सकाळपासून कामाची लगबग सुरु होते. आई - आजी तर भल्यापहाटे आवरून कामाला लागलेल्या असतात. यांच्याबरोबर अजून एकजण सोवळ्यात असते. बाबा/मी वगैरे सकाळीच भाजी आणायला जातो. तर्‍हेतर्‍हेची भाजी आणल्या जाते. सग़ळ्यात महत्त्वाचा म्हणजे १६ भाज्यांचा पुडा! याबरोबरच पालेभाजी, फळभाजी, कोशिंबीरीला लागणार्‍या भाज्या येतात. तांबूल करण्याकरता विड्याची पानंही येतात. काही विशेष पानं मिळाली तर तीही आणली जातात. जसे की वावडिंगाची, ओव्याची, आघाड्याची वगैरे. भाजी येऊन पडली की ती निवडणे, साफ करणे, धुणे, चिरणे यात सगळ्या लेडीजबायका व्यस्त होतात.
एकजण पूजेची तयारी करत असतो. हार, फुलं, दूर्वा, देवींकरता शेवंतीच्या फुलाच्या वेण्या आणल्या जातात. बाकी सगळं पूजेचं साहित्य सगळं आहे नाही याची खात्री करतो. धूपाचीही तयारी असते. राळ, धूप, गोवर्‍यांची जमवाजमव असते. एकजण सूत तयार करून त्याला हळद-कुंकवाची बोटे लावून तयार ठेवते. हे सूत घरातल्या प्रत्येकीकरता अन लहान बाळांकरता करतात.
बाबा आंघोळ करून तयार झाले की आधीपासून ठरवून ठेवलेल्या गुरुजींना बोलावणं पाठवलं जातं. ते आलेत की गरम दूध / चहा होतो आणि मग साग्रसंगीत पूजा सुरू होते. गणपतीची, खणखणीत आवाजात अथर्वशीर्ष म्हणून पूजा झाली की मग लक्ष्मीपूजन सुरू होतं. यात सूत वाहिलं जातं. लक्ष्मीला खण, कुंकवाचा करंडा, शुद्ध तुपावरचं काजळ, फणी ही सौभाग्यलेणी दिली जातात. याचवेळेस फुलोराही वाहिला जातो. आमच्याकडे मात्र फुलोरा ड्ब्यात भरून तो डबा वर ठेवतात. शेवटी धूप, दीप दाखवून साग्रसंगीत नैवेद्य दाखवतात. यात तांबूलाचाही नैवेद्य असतो. मग दणक्यात आरती होते. हा एकप्रकारचा कुलाचार आहे म्हणून मग अंबाबाईचा जोगवा मागतात. यानंतर पंगत!
सवाष्ण-ब्राह्मण आले नसतील या वेळेपर्यंत तर त्यांना बोलावून घेतात. यांचं बुकींग झालेलं असावच लागतं कारण सगळ्यांकडेच हा कार्यक्रम असतो. घरात पंगत मांडली जाते तर बाहेर पाट, हात-पाय धुण्याकरता पाणी ठेवतात. मोठी ताटं मांडतात, भोवती रांगोळी काढतात. सुवासिक उद असतोच त्यामुळे प्रसन्न वातावरण असतं. ताटं वाढून तयार असतात. पाहुण्यांना पानावर बसवलं की वाफाळता भात-वरण अन अन्नशुद्धी वाढली की संकल्प सोडतात. शांतपणे पंगत होते.

जेवणात मोठा थाट असतो... मीठ, लिंबू, पंचामृत, मोकळी डाळ, हिरवी चटणी, कोशिंबीर, लोणचं डव्या बाजूला असतं. भरड्याचे वडे, गिलक्यांची, वावडिंगाच्या पानांची, ओव्याच्या पानांची भजी असतात. कधीकधी पापड कुरडयाही असतात. घारी, पुरणाची खीर, फुलोर्‍यामधला फराळ ही वाढतात. उजवीकडे १६ भाज्यांची परतून केलेली भाजी (ही अगदी प्रसादापुरतीच करतात शक्यतो), एक अजून फळभाजी, पातळभाजी, कढी असते. विशेष प्रकार म्हणजे आजच्या महाप्रसादामध्ये ज्वारीची आंबील असते. दूध + पिठीसाखर घालून सरबरीत केलेली पानावर वाढतात. गरम गरम तुपानी माखलेल्या गच्च पुरणानी भरलेल्या खास पोळीचा आग्रह तर केल्या जातोच! कुणाला हवं असल्यास याबरोबर दूध + तूप देतात. शांतपणे पोटभर जेवून तृप्त झालेल्या पाहुण्यांना मग तांबूल दिला जातो.
यादिवशी सगळ्यांची जेवणं होईतो दुपारचे तीन तरी होतातच... मग संध्याकाळी काही विशेष नसतं. गप्पा-टप्पा अन आराम!

तिसर्‍या दिवशी सकाळी साधी पूजा करतात. आदल्या दिवशी जे लोक राहिलेले असतात ते लोक आज प्रसादाला असतात. वडा-पुरणाचा महाप्रसाद असतो आजच्याही दिवशी. दुपारी मग, कुणीतरी जवळच्या १०/१५ घरी संध्याकाळच्या हळदीकुंकवाचं बोलावणं करतं. संध्याकाळी मग अंगणात सडा घालून रांगोळी घालतात. आलेल्या सवाष्णीं लक्ष्मीची ओटी भरतात. आई / आजी या सवाष्णींणींची ओटी भरतात. त्यांना मसाल्याचं गरम दूध देतात. हा कार्यक्रम आटोपला की संध्याकाळची आरती होते. मग जेवणं. यानंतर ज्येष्ठा-कनिष्ठांची पाठवणी केली जाते. बाहेरगावी जाणार्‍या पाहुण्यांना प्रसादाची पाकीटं दिली जातात. मुखवटे पुढच्या वर्षी करता पुन्हा ट्रंकेत ठेवले जातात.
तर अशी ही तीन दिवसांच्या माहेरवाशीणीची कहाणी...

हा फटू (यावर्षीच्या महालक्ष्म्यांचा आहे) Happy

Mahalakshmi 1.JPG

(दोन वर्षे झाली माबोकर होऊन; ववि, टीशर्ट समितीमध्येही काम केलं. पण लेखन कधी केलं नव्हतं. हा पहिलाच प्रयत्न. काही चूक असेल तर माफी असावी)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या अमरावती भागात.महाल्क्ष्म्या जेवत असताना त्या खोलिचे दार बंद केले जाते . तेव्हा कोणीच त्या जेवतांनी बघायचे नसते म्हणे..थोद्या वेळाने दार उघडले जाते आणि त्या जेउन गेल्याच्या खाणाखुणा शोढल्या जातात ...आणि त्या सापडतात सुधा.

अश्विनी.. छान लिहिलेय. तिथे लाडाने त्याला शंकरोबा म्हणतात. शंकर आमचा मेहुणा, दिड दिवसाचा पाहुणा..
असे पण काहीतरी गाणे आहे.

गौरी आणायला जाणे हा एक सोहळा असतो. अनेक गाण्यात त्याचे उल्लेख आलेत.
दोन आठवली.

रुणुझुणत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा
आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा ( टिळा लाविते मी रक्ताचा )

बारा घरच्या बारा जणी निघालो,
आणायाला गौरी..
( पुढे जाऊ की परतू मागे, मला हा पडला पेच -- रंगपंचमी )

अश्विनी, अवांतर अजिबात नाही, गणपती घरी येणे, त्याला २१ या विशिष्ट संख्येचा नैवेद्य का दखवला जातो, ऋषिपंचमी म्हणजे काय हे पण माहित हवे ना, आपण जे करतो ते का व त्यामागचा इतका सुंदर हेतू कळला तर करतानाही त्याचा आस्वाद घेता येतो आणि नुसती कवाईत होत नाही. तसेच आपल्या मुला-बाळांनाही या सुंदर गोष्टी सांगुन या सर्व परंपरा पुढच्या पिढीपर्यंत त्यांच्या अर्थासकट पोहोचतात.

छान लिहिलंयस, आवडलं आणि आठवलं.

यावर्षीच्या महालक्ष्म्यांचा फोटो वर लेखात दिला आहे. आताच पूजा झालीआहे. बाकी नैवेद्याच्या ताटाचे फोटोपण टाकतो जरावेळात...

माझ्या माहेरी पण उभ्याच्या,हाताच्या,डोक्यावरून पदर घेतलेल्या गौरी येतात.
आमचे देखील एकत्र कुटुंब आहे. खूप अविस्मरणीय होते ते दिवस. आता मी भारताबाहेर राहत असल्याने सणाला जावू शकत नाही.
पण आठवणी तर आहेतच.

माझ्या लेखाची लिंक
https://www.maayboli.com/node/19690

अतिशय सुन्दर वर्णंन केले आहे., मी देखील महालक्ष्म्यां करते.
महालक्ष्म्यांचे स्टॅन्डना 'अडणी' म्हणतात.
मझ्याकडे आहेत.
अन्जलि

आमच्या अमरावती भागात.महाल्क्ष्म्या जेवत असताना त्या खोलिचे दार बंद केले जाते . तेव्हा कोणीच त्या जेवतांनी बघायचे नसते म्हणे..थोद्या वेळाने दार उघडले जाते आणि त्या जेउन गेल्याच्या खाणाखुणा शोढल्या जातात ...आणि त्या सापडतात सुधा.>>>>>> असंच काहीसं माझ्या माहेरी करतात की विसर्जनाच्या दिवशी हळदी कुंकवाचे करंडे भरून वरनं सपाट करून ठेवतात अणि दुसर्‍या दिवशी बोटांचे ठसे उमटले का ते पाहतात अशी समजूत की त्या हळद कुंकु लावुन निघाल्या. बोटं उमटायची का नाही हे आठवत नाही मात्र.

शंख ज्यावर ठेवतात देव्हार्‍यात त्यालाही अडणीच म्हणतात ना? >>> श्न्खाच माहीत नाही पण महालक्ष्मीच्या stand ला अडनी / अडण्या म्हणतात . महालक्ष्मीच्या स्टेजच्या सजावटी मध्ये आणि नंतर रात्रभर पत्ते खेळत किंवा इतर टाइमपास करत जागरण करताना जाम मजा यायची .

बरीच मेहनत आहे.

आमच्याकडे खड्याच्या गौरी. आणि ती सुद्धा गणपतीची आई'च' म्हणून आणतात. आणि घारगे करतात. पुपो वगैरे नाहीच.

आम्ही कोथळ्या म्हणतो! पायली च्या डिझाईन प्रमाणे दोन "व्ही" चे आकार व्हर्टेक्स ला एकत्र जोडल्या सारखे स्टँड असतात. वर व खाली गोलाकार रिंग.

आम्ही पण या स्टँडला अडण्याच म्हणतो. आमच्याकडे पहिल्या दिवशी शेपू भाजी ज्वारीची भाकरी दुसर्‍या दिवशी पुरणपोळी आणि तिसर्‍या दिवशी साखरभात असतो. फुलोरा वगैरे असतोच, आरासही छान करतात. विसर्जनाच्या दिवशी हळदी-कुंकवासाठी सवाष्ण बायका येतात त्या दोरे तयार करतात म्हणजे आईने ते दोरे हळदीने पिवळे केलेले अलतात बायका त्या दोर्‍यामध्ये आघाडा, दुर्वा, पान, सुपारी खारीक खोबर्‍यांचे तुकडे, लवंग असं बरच काही बांधतात नंतर आई ते दोरे गौरींच्या माथ्यावर ठेवते.

एवढं सगळं करतात ....आश्चर्य आहे.....माझा देवावर विश्वास नाही पण संस्कृती जपायला आवडतं.....आत्ताच्या काळात पण आपली रुढी जपण्यासाठी एवढी मेहनत घेतात हे ऐकुन बरा वाटलं

साग्रसंगीत सोहोळा आहे की. सर्वांनाच खूपच मजा येत असणार. कर्त्या स्त्रीला मात्र जमेजमेस्तोवर, थोडी धाकधूक असणारच नाही म्हणायला. पण एकंदर अतिशय उत्सवपूर्ण.

Pages