पाहाता पाहाता २०१४ चे सात महिने सरले; श्रावण आला आणि सणवारांची रेलचेलही आलीच. आता काहीच दिवसांत गणराय येतील मूषकावर बसून आणि महालक्ष्म्यांचंही आवाहन होईलच!
या १० भारलेल्या दिवसांतच गौरीही असतात. विदर्भात मात्र महालक्ष्मी म्हणतात. तीन दिवस माहेरी असतात. सगळेच लोक मग त्यांच्या सरबराईमध्ये गुंग होतात.
ऋषीपंचमी नंतर एखाददिवशी फुलोरा करण्याचा घाट असतो. यात आई, आजी अन जवळच्या काकू, आत्या वगैरे येऊन सगळा फुलोरा करतात. यामध्ये करंज्या, तळणीचे मोदक, साटोर्या, लाडू, अनरसे, पापड्या, शंकरपाळे असे प्रकार असतात. विशेष प्रकारही केल्या जातात जसे वेणी वगैरे. आमच्या कडे गणपतीचा फुलोराही याचवेळेला करतात. काही जणांकडे मुका फुलोराही असतो. यात फुलोरा पूर्ण होईपर्यंत कुणाशी बोलायचं नसतं.
मग सुरुवात होते ती माळ्यावरून ट्रंक काढण्यापासून... सकाळी आजीची नित्यपूजा, पाठ झाले की माळ्यावरून मोठी ट्रंक तिला खाली उतरवून द्यायची; हे काम करून झालं की मग साफसफाई करायची. फुलोरा ठेवायची जाळी काढून द्यायची; महालक्ष्म्यांचे स्टॅन्ड (याला मराठी शब्द आहे, आता डोक्यात नाही मात्र) काढून द्यायचे. त्यानंतर मग नमस्कार करून आजी हळूवारपणे मऊ सुती कापडात गुंडाळून ठेवलेले मुखवटे बाहेर काढते. ज्येष्ठा आणि कनिष्ठेचे मुखवटे झालेत की मग बाळांचेही मुखवटे. यानंतर, परातीत धान्याच्या राशीवर त्यांची तात्पुरती स्थापना होते. मग पूजा होते.
यानंतर सोयीसाठी म्हणून दुसर्या दिवशीकरता चण्याच्या डाळीचं पुरण शिजवून तयार केलं जातं. अर्थातच, कडक सोवळ्यात.
यावेळेपर्यंत नातलग घरी जमायला लागतात. त्यासोबतच महालक्ष्म्या जिथे मांडायच्या ती जागा साफ करून बाकी सोय केली जाते. बर्याच जणांकडे मखर असतं ते आमच्याकडे नाही. त्यामुळे बरीच मेहेनत वाचते. एका घडवंचीवर गालीचा घालून ती जागा सजवली जाते. बाजूला शोभा म्हणून झाडाच्या कुंड्या ठेवल्या जातात. वर फुलोरा ठेवण्याकरता जागा केली जाते. हे सगळं आटपेस्तोवर संध्याकाळचे ४ / ४.३० होतात.
आता खरं बायकांचं काम चालू होतं. सकाळी धूवून स्वच्छ केलेले स्टँड आणले जातात. त्याच्या आतमध्ये तयार केलेल्या फुलोर्यामधला थोडा-थोडा फराळ आत ठेवला जातो. मग कोरी जरीची साडी घडी मोडून त्यांना नेसवली जाते. हे कौशल्याचं अन अनुभवाचं काम! आई, काकू मात्र एका प्रयत्नात व्यवस्थित करतात. नीट मनासारख्या निर्या पाडून चोपदार साडी घालून झाली की मग हात आणि मानेपर्यंतचा भाग (हा कापडाचा केलेला असतो) बसवला जातो. यानंतर बाळांना ही तयार केले जाते. आमच्याकडेतरी बाळांचे तयार कपडेच वापरले जातात. मग तयार केलेल्या मूर्ती स्थानापन्न केल्या जातात.
सकाळी पूजा केलेले मुखवटे घराच्या दारा पर्यंत नेतात. मग लहान मुलांना थाळी चमचा वाजवायला सांगतात आणि वाजत गाजत महालक्ष्म्यांचं आगमन होतं. ते मुखवटे मग मूर्त्यांवर बसवले जातात. ज्येष्ठा, कनिष्ठा नीट पाहून बसवतात. पदर वगैरे नीट बसवतात आणि मूर्ती पूर्ण करतात. धान्याची रासही ओततात खाली घोंगडीवर. मूर्तींना आणि बाळांना दागिने घालतात. मंगळसूत्र, चपलाहार, पोहेहार, लक्ष्मीहार, मोत्येहार, बांगड्या, पाटल्या, कर्णफुलं, वेणी असं सगळं घालून झालं की काय रूपवान दिसतात!
याचवेळेस एखादी अंगणात रांगोळी काढते आणि दारापासून तर महालक्ष्म्यांच्या स्थानापर्यंत पाऊलं काढते. दिवेलागणीच्या वेळेस मग लहानशी पूजा होते; फक्त फुलं आणि हळद-कुंकवानी. आवाहन केल्या जातं. नंतर गणपतीच्या आरतीपाठोपाठ देवीचीही आरती गायली जाते. यावेळेस साधा प्रसाद असतो.
गौरीपुजनाचा असतो दुसरा दिवस...
सकाळपासून कामाची लगबग सुरु होते. आई - आजी तर भल्यापहाटे आवरून कामाला लागलेल्या असतात. यांच्याबरोबर अजून एकजण सोवळ्यात असते. बाबा/मी वगैरे सकाळीच भाजी आणायला जातो. तर्हेतर्हेची भाजी आणल्या जाते. सग़ळ्यात महत्त्वाचा म्हणजे १६ भाज्यांचा पुडा! याबरोबरच पालेभाजी, फळभाजी, कोशिंबीरीला लागणार्या भाज्या येतात. तांबूल करण्याकरता विड्याची पानंही येतात. काही विशेष पानं मिळाली तर तीही आणली जातात. जसे की वावडिंगाची, ओव्याची, आघाड्याची वगैरे. भाजी येऊन पडली की ती निवडणे, साफ करणे, धुणे, चिरणे यात सगळ्या लेडीजबायका व्यस्त होतात.
एकजण पूजेची तयारी करत असतो. हार, फुलं, दूर्वा, देवींकरता शेवंतीच्या फुलाच्या वेण्या आणल्या जातात. बाकी सगळं पूजेचं साहित्य सगळं आहे नाही याची खात्री करतो. धूपाचीही तयारी असते. राळ, धूप, गोवर्यांची जमवाजमव असते. एकजण सूत तयार करून त्याला हळद-कुंकवाची बोटे लावून तयार ठेवते. हे सूत घरातल्या प्रत्येकीकरता अन लहान बाळांकरता करतात.
बाबा आंघोळ करून तयार झाले की आधीपासून ठरवून ठेवलेल्या गुरुजींना बोलावणं पाठवलं जातं. ते आलेत की गरम दूध / चहा होतो आणि मग साग्रसंगीत पूजा सुरू होते. गणपतीची, खणखणीत आवाजात अथर्वशीर्ष म्हणून पूजा झाली की मग लक्ष्मीपूजन सुरू होतं. यात सूत वाहिलं जातं. लक्ष्मीला खण, कुंकवाचा करंडा, शुद्ध तुपावरचं काजळ, फणी ही सौभाग्यलेणी दिली जातात. याचवेळेस फुलोराही वाहिला जातो. आमच्याकडे मात्र फुलोरा ड्ब्यात भरून तो डबा वर ठेवतात. शेवटी धूप, दीप दाखवून साग्रसंगीत नैवेद्य दाखवतात. यात तांबूलाचाही नैवेद्य असतो. मग दणक्यात आरती होते. हा एकप्रकारचा कुलाचार आहे म्हणून मग अंबाबाईचा जोगवा मागतात. यानंतर पंगत!
सवाष्ण-ब्राह्मण आले नसतील या वेळेपर्यंत तर त्यांना बोलावून घेतात. यांचं बुकींग झालेलं असावच लागतं कारण सगळ्यांकडेच हा कार्यक्रम असतो. घरात पंगत मांडली जाते तर बाहेर पाट, हात-पाय धुण्याकरता पाणी ठेवतात. मोठी ताटं मांडतात, भोवती रांगोळी काढतात. सुवासिक उद असतोच त्यामुळे प्रसन्न वातावरण असतं. ताटं वाढून तयार असतात. पाहुण्यांना पानावर बसवलं की वाफाळता भात-वरण अन अन्नशुद्धी वाढली की संकल्प सोडतात. शांतपणे पंगत होते.
जेवणात मोठा थाट असतो... मीठ, लिंबू, पंचामृत, मोकळी डाळ, हिरवी चटणी, कोशिंबीर, लोणचं डव्या बाजूला असतं. भरड्याचे वडे, गिलक्यांची, वावडिंगाच्या पानांची, ओव्याच्या पानांची भजी असतात. कधीकधी पापड कुरडयाही असतात. घारी, पुरणाची खीर, फुलोर्यामधला फराळ ही वाढतात. उजवीकडे १६ भाज्यांची परतून केलेली भाजी (ही अगदी प्रसादापुरतीच करतात शक्यतो), एक अजून फळभाजी, पातळभाजी, कढी असते. विशेष प्रकार म्हणजे आजच्या महाप्रसादामध्ये ज्वारीची आंबील असते. दूध + पिठीसाखर घालून सरबरीत केलेली पानावर वाढतात. गरम गरम तुपानी माखलेल्या गच्च पुरणानी भरलेल्या खास पोळीचा आग्रह तर केल्या जातोच! कुणाला हवं असल्यास याबरोबर दूध + तूप देतात. शांतपणे पोटभर जेवून तृप्त झालेल्या पाहुण्यांना मग तांबूल दिला जातो.
यादिवशी सगळ्यांची जेवणं होईतो दुपारचे तीन तरी होतातच... मग संध्याकाळी काही विशेष नसतं. गप्पा-टप्पा अन आराम!
तिसर्या दिवशी सकाळी साधी पूजा करतात. आदल्या दिवशी जे लोक राहिलेले असतात ते लोक आज प्रसादाला असतात. वडा-पुरणाचा महाप्रसाद असतो आजच्याही दिवशी. दुपारी मग, कुणीतरी जवळच्या १०/१५ घरी संध्याकाळच्या हळदीकुंकवाचं बोलावणं करतं. संध्याकाळी मग अंगणात सडा घालून रांगोळी घालतात. आलेल्या सवाष्णीं लक्ष्मीची ओटी भरतात. आई / आजी या सवाष्णींणींची ओटी भरतात. त्यांना मसाल्याचं गरम दूध देतात. हा कार्यक्रम आटोपला की संध्याकाळची आरती होते. मग जेवणं. यानंतर ज्येष्ठा-कनिष्ठांची पाठवणी केली जाते. बाहेरगावी जाणार्या पाहुण्यांना प्रसादाची पाकीटं दिली जातात. मुखवटे पुढच्या वर्षी करता पुन्हा ट्रंकेत ठेवले जातात.
तर अशी ही तीन दिवसांच्या माहेरवाशीणीची कहाणी...
हा फटू (यावर्षीच्या महालक्ष्म्यांचा आहे)
(दोन वर्षे झाली माबोकर होऊन; ववि, टीशर्ट समितीमध्येही काम केलं. पण लेखन कधी केलं नव्हतं. हा पहिलाच प्रयत्न. काही चूक असेल तर माफी असावी)
मस्त सविस्तर लिहीलय..
मस्त सविस्तर लिहीलय..
मस्त...!! आमच्या कडे पण याच
मस्त...!! आमच्या कडे पण याच पद्धतिने महालक्ष्मी बसवल्या जातात..
मस्त लिहीले रे ! पुढच्या
मस्त लिहीले रे !
पुढच्या वर्षी जोडीने पुजा तुलाच करायची आहे.
टीना हे ऐतेनच की! >> म्हणजे
टीना हे ऐतेनच की! >> म्हणजे ?::अओ:
ऐतेन - ऐकावे ते नवल
ऐतेन - ऐकावे ते नवल
टिना, उभ्या गौरी फक्त
टिना, उभ्या गौरी फक्त विदर्भातच असतात असे नाही. आम्ही चार वर्षे नगर जिल्ह्यात श्रीरामपुर येथे होतो, तिकडे काही जणांकडे उभ्या गौरीच बघितल्या. कोकणांत जास्त करुन खड्याच्या, तेरड्याच्या अशा असतात.
देशावर बहुतेक उभ्या गौरींची प्रथा आहे. प्रत्येक कम्युनिटीप्रमाणे वेगळं असतं, आमच्याकडे खड्याच्याच आणायची पद्धत आहे.
१ प्रश्न आहे . गौरी म्हणजे
१ प्रश्न आहे . गौरी म्हणजे गणपतीची आई नं . मग गौरीची स्थापना करतात कि महालक्ष्मीची ? आणि जेष्ठा , कनिष्ठा हा काय प्रकार असतो ?
मस्त लिहिलंय. आमच्याकडे
मस्त लिहिलंय.
आमच्याकडे चांदीचा एक तांब्या आहे, त्याचीच गौर बसवतात. त्यावर गौरीचा पूर्ण मुखवटा दाअगिने वगैरे कोरले आहेत.
आमच्याकडे गौरी म्हणजे गणपतीची
आमच्याकडे गौरी म्हणजे गणपतीची बहीण मानतात आणि हरतालिका म्हणजे आई.
गौरी या गणपतीच्या बहिणी
गौरी या गणपतीच्या बहिणी समजतात.
आमच्याकडे बाळ म्हणून चांदीच्या तांब्याभांड्याला कुंची घालून सजवतात. मुखवटे शाडूचे आहेत पण हात नाहीत. डायरेक्ट तिवईला साडी नेसवून त्यावरच बसवायचे. आणि भटजी वगैरे नाही येत, सगळं आईच करते. पहिल्या दिवशी रात्री मेथीची भाजी, बाजरीची भाकरी असते नैवेद्याला आणि दुसर्या दिवशी पुरणपोळी. ५ भाज्या, ५ कोशिंबिरी असतात बहुदा पण आम्ही करत नाही, ते आमच्या चुलत घराण्यात करतात. फुलोराही नसतो, लाडू आणि बर्फीने गौरींची पोटं भरायची असतात. गौरी, गणपती बरोबरीनेच जातात. घर एकदम ओकंबोकं वाटतं तेव्हा...
माझ्या आजोळी शंकर पण आणतात.
माझ्या आजोळी शंकर पण आणतात. तो दीड दिवसाचाच असतो. मग सगळे कुटुंब एकत्र जाते.
घरात उभ्याच्या आधी बसलेल्या
घरात उभ्याच्या आधी बसलेल्या महालक्ष्म्या होत्या, त्याआधी आज्जीच्या काळात कुंभाराच्या म्हणजे कुंभाराकडून मडकी आणुन त्यावर नाक डोळे काढायचे. मुखवटेही विकत आणता येत नाही, व्याह्यांनी द्यावे लागतात . माझ्या बहिणींच्या सासरचांनी पितळी मुखवटे दिल्यावर ते बसवायला लागलो. सगळ्यात मोठ्या भावाचे लग्न झाल्यावर मग घरच्यांनी उभ्या गौरी बसवायला सुरुवात केली.
महालक्ष्म्या रुसतात वगैरे ते ही ऐकुन आहे. आमच्या शेजारच्यांच्या रुसल्या होत्या एकदा. सकाळपासुन त्यांनी साडी नेसवायला सुरुवात केली होती पण संध्याकाळपर्यंत बसल्याच नाहीत. शेवटी अंधार पडल्यावर बसल्या.
आमच्या इथेही उभ्याच्या
आमच्या इथेही उभ्याच्या महालक्ष्म्या बसतात . पहिल्या दिवशी मुहुर्तवर आणतात आणि लगेच दुध व हातशेवई चा नैवेद्य असतो रात्रि शेपु भाजी भाकरीचा नैवेद्य, दुसर्या दिवशी पुरणपोळी ,१६ भाज्यांची भाजी ,पडवळाचि कढी , ५ प्रकाराचि भजी , फळाची कोशिंबीर, तांबूल असा नैवेद्य शिवाय पुरणाचि आरती असते आणि संध्याकाळी हळदी- कुंकू आणि मसाल्याचं दूध असा नैवेद्य, तिसर्या दिवशी दोरे घेतात , महालक्ष्म्याचि कहाणि करतात आणि सुके खोबरेचे सारण घालुन गोड पूर्याचा नैवेद्य असतो.
मस्त लिहिलं आहे. आमच्याकडे पण
मस्त लिहिलं आहे. आमच्याकडे पण ज्येष्ठा-कनिष्ठा आहेत. पितळी मुखवटे. खुर्चीत बसवण्याची पद्धत होती ती आजेसासुबाईंनी सुट्सुटित करुन फक्त मुखवटे ठेवले आहेत. बाकी गौरीजेवणाच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहिली जाते. मट्ण रस्सा, लिप्ती कलेजी मस्ट! फक्त सोम्वार गुरुवारी आमच्या गौरींना नोन-वेज चालत नाही. मग खाता वार नसला तर पुरणाच्या पोळ्या! नवरात्रात अष्टमीला मात्र कुठलाही वार अस्ला तरी मटण हवंच!
मस्त लिहिलंयत. डोळ्यांसमोर
मस्त लिहिलंयत. डोळ्यांसमोर आल्या महालक्ष्मी.
माझ्या माहेरीपण गौरी पुजनाच्या दिवशी मटणाचा नैवेद्य लागतो आधी शेजारी असलेल्या गणपतीबाप्पाला मधे पडदा ओधुन व्हेज जेवण खावू घालायचे आणि मग त्याच्या आईला मटण वाढायचे.
योकु, मस्त लिहिलंयस रे
योकु, मस्त लिहिलंयस रे

माझ्या एका मित्राकडुन हे सगळं ऐकलेलं.
योकु, मस्त लिहिल आहे. आमच्या
योकु, मस्त लिहिल आहे. आमच्या घरी गौरींची पद्धत नाही , त्यामुळे हे पाहिलच नव्झत कधी .
छान लिहीलंय! बर्याच जणांकडे
छान लिहीलंय! बर्याच जणांकडे नवसाच्या उभया महालक्श्म्या असतात पण नवसाच्या खड्याच्या गौरी ऐकिवात नाही, असं का?
महालक्ष्म्यांचे स्टॅन्ड (याला
महालक्ष्म्यांचे स्टॅन्ड (याला मराठी शब्द आहे, आता डोक्यात नाही मात्र)
<<
कोठी.
कोठ्या : शिसवी लाकडाच्या अडीच ती फूट उंचीच्या मॅनेक्विनसारख्या बाहुल्या आहेत आमच्याकडे. हाताचे पंजे फिरकीचे, ते काढून चोळी नेसवता येईल असे. पितळी मुखवटे.
काही लोकांकडे पोकळ मातीच्या कोठ्या असतात. कोनिकल. त्यात गहू/तांदूळ भरले जातात.
*
आजोबांचं एक दुकान होतं. त्या दुकानात वुडवर्ड ग्राईपवॉटरवाल्यांनी एक सुंदर मातीचं रंगवलेलं बाळ जाहिरातीसाठी ठेवायला दिलेलं होतं. रांगणार्या बाळकृष्णाच्या पोजमधलं. ते बाळ महालक्ष्म्यांचं बाळ म्हणून आमच्याकडे वापरतात.
*
गोगो यांच्या गौरींना मटणाचा नैवेद्य ऐकूनच आमच्याकडे काही लोक झीट येऊन पडतील
*
गणपती सेपरेट बसतो, अन गौरी आल्या की त्याची रवानगी गौरींसोबत. माझ्या डोक्यात या महालक्ष्म्या म्हणजे रिद्धीसिद्धी असं होतं समहाऊ.
*
खड्याच्या गौरी कोकणस्थांत, अन उभ्या मूर्त आकारातल्या देशस्थांत असतात, असं ऐकून आहे.
*
लहानपणी घरी संपूर्ण चुलत गोतावळा जमा होत असे. गेली कित्येक वर्षे सणही शॉर्टकट, अन लोकांना यायला वेळही नसतो. अंतरं वाढली आहेत..
*
योकु,
या सणांचं नीट डॉक्युमेंटेशन व्हायला हवं, यादृष्टीने तुमचा लेख महत्वाचा वाटला. ललिताच्या अंगाने लिहिलेला लेख असला, तरी धाग्यावर आलेल्या प्रतिसादांतून अधिक डीटेल्स मिळतील, त्यानुसार महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत हा सण कसा साजरा होतो, असं कॉम्प्रिहेन्सिव्ह लिखाण आलं तर अजून मजा येईल. विकिवर अन इतरत्रही फार त्रोटक माहिती आहे.
मुलांना आजकाल हे उत्सव काय असतात हे ठाउकही नसतं.
इब्लिस, नेमका शब्द
इब्लिस,
नेमका शब्द सांगीतल्याबद्द्ल धन्स!
अंतरं वाढली आहेत हे पटलच. महत्त्वाचं ही आहेच. मला आठवतं तोपर्यंत जवळजवळ ५०/६० पान होतं असतील. आताशा ती संख्या अर्ध्यावर आहे. काही स्पेसिफिक कारणं ही असतात. पोळ्यांना, बाकी कामांना बाई मिळत नाही, याही आधी तयारी करू लागायला नातेवाईकांच येणंही होत नाही, नोकरी, इतर उद्योग इ.इ.इ. असो...
योकु तुम्ही विदर्भात्ले कु
योकु तुम्ही विदर्भात्ले कु आणि आम्ही पण
त्यामुळे आमच्याकडे पण सगळं सेम टु सेम! फक्त स्वयंपाकाला पंडित आणि त्याचे असिस्टंट असतात आणि हो, मखर असतं. त्यात सगळ्यांचा भरपूर वेळ जातो.
जेवणातले पदार्थ पण तुमच्यासारखेच.. एक गव्हल्यांची खीर अजून असते.
विदर्भातल्या महालक्ष्म्यां च्या सणाची स्पेशलिटि ही की पुजेच्या दिवशी जेवायला किमान ६०-७० लोक तरी असतात. नातेवाईक, शेजारी, ओळखीचे वगैरे. आणि हे एवढं सगळं सगळ्यांना अजुनही पंगतीत वाढतात. आमच्या घरी मागच्या १० वर्षापासनं दरवर्षी ठरवतात की "आता काही एवढं वाढणं वगैरे जमत नाही, पुढचया वर्षीपासुन बफे!" पण अजुनतरी खरंच करायची हिंमत झाली नाहिये. प्रसादाचं एवढं सगळं जेवण उभ्याने घेऊन जेवणं हे मला पण विचित्र वाटतं.
महालक्ष्म्यांचं जेवण अन
महालक्ष्म्यांचं जेवण अन बुफे!!! आजी बदडेल धरून... :p
मस्त वाटलं वाचून योकु! एकदम
मस्त वाटलं वाचून योकु! एकदम त्या वातावरणात नेलेत.
योकू, छान लिहिलंय. आमच्याकडे
योकू, छान लिहिलंय. आमच्याकडे ही उभ्या महालक्ष्म्या. २ लक्ष्म्या, २ बाळं आणि एक ज्येष्ठा गौरी. ही दोघींची मोठी जाऊ. तिसर्या (विसर्जनाच्या) दिवशी दोरा घेऊन तो गौरींभोवती फिरवून त्याचे ४-५ पदर करुन घेतात. त्याला हळदीने पिवळा रंग देतात. ह्या तीन चार पदरी दोर्याला (मध्ये छोटी जाईजुईची फुलं घालून) मध्ये मध्ये गाठी बांधतात. सगळ्यांच्या नावचे असे दोरे (ह्याला पोत म्हणतात) बनवतात. पुरुष मंडळी ही हातात बांधतात तर स्त्रिया गळ्यात घालतात. जवळ्पास पुढचे २-३ आठवडे हे घालतात. लहानपणी ह्या पोत प्रकाराचं अतिशय आकर्षण होतं. अजूनही आहे. कित्येक दिवस आम्ही आईला आम्ही महालक्ष्म्यांच्या वेळी नसलो तरी आमच्या नावचे पोत बनवून ठेव असे सांगायचो.
गौरी घरी येतात तो सोहोळाही किती छान असतो. मुखवटे आणताना पायांचे छापे दरवाज्यापासून ते जिथे बसवल्या जातात तिथे पर्यंत आणायचे आणि त्यावेळी ताट चमच्याने वाजवत आवाज करायचा.
आठवणी... आठवणी....
वॉव्..खूपच इंटरेस्टिंग
वॉव्..खूपच इंटरेस्टिंग वर्णन...
मी फक्त ऐकलंच आहे आतापर्यन्त्..आता वाचलं.. केव्हढी डीटेल मधे तयारी असते.. बापरे!!!
आता यावर्षी प्लीज कोणीतरी
आता यावर्षी प्लीज कोणीतरी फोटो टाका महालक्ष्मी आरासांचे ..
आमच्याकडेही (ता. कन्नड, जि.
आमच्याकडेही (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) अश्याच उभ्या महालक्ष्मी असतात. आणी अगदी तंतोतंत याच पद्धतीने करतात (फुलोरा, १६ भाज्यांची भाजी, ई.). फक्त विसर्जनाच्या दिवशी खिर कानवले व दहीभाताचा नैवेद्य असतो.
मराठवाड्यातही अश्याच
मराठवाड्यातही अश्याच लक्ष्म्या असतात.

मला गणपतीत लक्ष्मी आणणे आणि त्यांचेच लाड गणपतीपेक्षा जास्त करणे अगदी पटायचे नाही.
कोंकणातही काहिंच्यात पहिल्या दिवशी गोडाचा (खीर्/घारगे. कोंकणात कधी पु पो करत नाहीत कुठल्या सणाला. आता करत असतील तर ते इतरांचं पाहून) आणि दुसर्या दिवशी खाराचा(मटण्/कोंबडी वडे) नेवैद्य लागतोच.
कोंकणात एकच गौर येते, ती गणपतीची आईच असते.
बहिण हे मी पहिल्यांदाच ऐकतेय.
बाळे वैगेरे इकडे फार मस्त असतात. कोकणात एक बाळ म्हणजे गणपती आधीच आलेला असल्याने नविन बाळे आणत नाहीत.
दिनेशदा, शंकर वैगेरे येतो म्हणजे भारीच.
बायकोला कध्धी कधी माहेरीही एकटी राहू देत नाही म्हणजे काय?
दिनेशदा, शंकर वैगेरे येतो
दिनेशदा, शंकर वैगेरे येतो म्हणजे भारीच.
बायकोला कध्धी कधी माहेरीही एकटी राहू देत नाही म्हणजे काय? >>>>
कथेप्रमाणे, परमशिव आधीच आलेले असतात पत्नी आणि मुलाला नेण्यासाठी अत्री अनसुयेच्या आश्रमात. तिथे अनसुयामाता बालगणेशाचे (विश्वाचा घनप्राण) खूप लाड करत असते. एके दिवशी ती एक नविन गोड पदार्थ बनवते 'मोदक' (विश्वातील आनंदाचे घनरुप) त्याला भरवते. इकडे परमशिव देखिल आईच्या हातून भरवून घेण्याची इच्छा करुन भुकेने कळवळत वाट बघत बसतात. गणपतीबाळाने मोदक खाताच इकडे परमशिवांना तृप्तीचे २१ ढेकर येतात. म्हणून त्या दिवशी (गणेशचतुर्थी) गणपतीला २१ मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो. त्या योगे परमात्माही तृप्त होतो. दुसर्या दिवशी बालगणेशाचे उपनयन असते. ऋषी हे समाजाचे 'प्रज्ञानयन' म्हणून ओळखले जात. म्हणून त्या मुंजीच्या दिवसाला ऋषीपंचमी असे म्हणतात. त्या दिवशी अनसुया माता भिक्षावळीत २१ मोदक घालून बालगणेशाच्या चार हातात मोदक (आहारावरील प्रभाव), पाश (आचारावरील प्रभाव), परशु (विचारांवरील प्रभाव) व दन्त (विहारावरील प्रभाव) देऊन त्याच्या मनात सुखकर्ता ब्रीदाचे व बुद्धीत विघ्नहर्ता तत्वाचे दान करते.
हे अवांतर आहे खरं...पण लिहावंसं वाटलं
अश्विनी, किती सुंदर माहिती
अश्विनी, किती सुंदर माहिती सांगितलीस.
Pages