ज्ञानेश्वरीतील श्री गणेशवर्णन व गणेशवंदन- श्री. शशांक पुरंदरे

Submitted by संयोजक on 19 August, 2014 - 08:01

---------------------------------------------------------

एका गणेशोत्सवातली गोष्ट. आमच्या कंपनीत एक डच माणूस आला होता. कंपनीत येत असता सर्वत्र जे उत्सवी वातावरण दिसत होते ते पाहता त्याने विचारले की, हा काय प्रकार आहे? त्याला सगळे सविस्तर सांगितल्यावर त्याने आग्रहच धरला की त्याला एक तरी गणपती नीट पहायचा आहे. दुपारच्या निवांत वेळी जेव्हा त्याला दगडूशेठचे दर्शन घडवले, तेव्हा तो केवळ आश्चर्यचकित झालेला दिसला. त्याला ते ध्यान इतके आवडले की त्याने तिथल्या तिथे एक फ्रेम विकत घेतली व मला सांगितले की त्याने नुकतीच एक मोटरबोट घेतली आहे त्या बोटीचे नाव आता तो "गणेश" ठेवणार व त्यात ही फ्रेम लावणार आहे. मी त्याला विचारले की हे गणेश नाव का तर तो म्हणाला ही त्याची पहिलीच मोटरबोट असल्यामुळे हे नाव!

एकंदरीतच श्री गणेशाचे ध्यान हे सर्व आबालवृद्धांना मोहिनी घालणारे असेच! ती आकर्षक शुंडा, ते विशाल गंडस्थळ, ते बारीक डोळे, ती तुंदिलतनू या सार्‍यांनी आपल्याला केव्हा मोहिनी घातली हे आता आठवणारही नाही, इतके त्याच्याशी आपले नाते सहज आणि नकळत जोडले गेले आहे.

अशा या श्री गजाननाबाबत आपल्याकडे एक अशी प्रथा आहे की कुठल्याही मंगल कार्याची सुरुवात करायची असेल तर ती गणेशपूजन, गणेशवंदना करूनच. श्री गणेशाला तो विशेष मान देण्यात आला आहे, किंबहुना कुठल्याही कार्याची सुरुवात - "श्रीगणेशा केला" अशीच ओळखली जाते.

सर्व संतवाङ्मयातही या प्रथेला अनुसरून गणेशनमन केलेले आढळते. माऊलीही भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) ग्रंथाला सुरुवात करताना गणेशाला वंदन करून हा ग्रंथ सिद्धीस जावा अशी प्रार्थना करीत आहेत. यामागे जो एक नम्र भाव, आशीर्वाद घेण्याची शालीनता आहे, हे सर्व विशेषत्वाने लक्षात घेण्याजोगे आहे. परमार्थात निरहंकारतेला सर्वात जास्त महत्त्व आहे. त्याकरता सर्वच संत ग्रंथनिर्मितीसारख्या कार्यातही हा अहंकार राहू नये म्हणून श्रीगणेश, श्रीशारदा व श्रीसद्गुरु यांचे स्तवन करताना दिसतात.

माऊलींनी ज्ञानेश्वरीचा प्रारंभ ज्या गणेशवंदनेने केला आहे ती वंदना खालीलप्रमाणे -

देवा तूंचि गणेशु | सकलार्थमतिप्रकाशु | म्हणे निवृत्तिदासु | अवधारिजो जी ||२||

सर्व मानवांना "बुद्धीची" विशेष देणगी मिळाली आहे. या बुद्धीचा प्रकाशक तो श्रीगणेश असे संबोधून स्वतःला श्रीनिवृत्तीदास म्हणवून माऊली गणेशवंदनेस प्रारंभ करीत आहेत.

आपल्या नजरेसमोर जे गणेशाचे ध्यान येते तेच माऊलींसमोर आहे. फरक एवढाच की माऊलींची असामान्य प्रतिभा लक्षात घेता ते एका वेगळ्याच उंचीवरुन त्या गणेशाचे वर्णन करतात. त्यांना त्या मूर्तीत सगळं शब्दब्रह्म साकारलंय असं वाटू लागतं. आपल्याला जी सोंड दिसते तिथे त्यांना निर्मळ विवेक दिसत आहे. दोन्ही कानांच्या ठिकाणी दोन मीमांसा दिसत आहेत तर गंडस्थळाच्या ठिकाणी द्वैत-अद्वैत! असे हे जे विलक्षण दर्शन माऊलींना घडले ते मुळातूनच वाचण्यासारखे आहे.

हें शब्दब्रह्म अशेष | तेचि मूर्ति सुवेष | जेथ वर्णवपु निर्दोष | मिरवत असे ||३||
स्मृति तेचि अवयव | देखा आंगीक भाव | तेथ लावण्याची ठेव | अर्थशोभा ||४||
अष्टादश पुराणें | तींचि मणिभूषणें | पदपद्धति खेवणें | प्रमेयरत्नांचीं ||५||
पदबंध नागर | तेंचि रंगाथिले अंबर | जेथ साहित्य वाणें सपूर | उजाळाचें ||६||
देखा काव्य नाटका | जे निर्धारितां सकौतुका | त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका | अर्थध्वनि ||७||
नाना प्रमेयांची परी | निपुणपणें पाहतां कुसरी | दिसती उचित पदें माझारीं | रत्नें भलीं ||८||
तेथ व्यासादिकांच्या मतीं | तेचि मेखळा मिरवती | चोखाळपणें झळकती | पल्लवसडका ||९||
देखा षड्दर्शनें म्हणिपती | तेची भुजांची आकृति | म्हणौनि विसंवादे धरिती | आयुधें हातीं ||१०||
तरी तर्कु तोचि फरशु | नीतिभेदु अंकुशु | वेदांतु तो महारसु | मोदकु मिरवे ||११||
एके हातीं दंतु | जो स्वभावता खंडितु | तो बौद्धमतसंकेतु | वार्तिकांचा ||१२||
मग सहजें सत्कारवादु | तो पद्मकरु वरदु | धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु | अभयहस्तु ||१३||
देखा विवेकवंतु सुविमळु | तोचि शुंडादंडु सरळु | जेथ परमानंदु केवळु | महासुखाचा ||१४||
तरी संवादु तोचि दशनु | जो समता शुभ्रवर्णु | देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु | विघ्नराजु ||१५||
मज अवगमलिया दोनी | मिमांसा श्रवणस्थानीं | बोधमदामृत मुनी | अली सेविती ||१६||
प्रमेयप्रवाल सुप्रभ | द्वैताद्वैत तेचि निकुंभ | सरिसेपणें एकवटत इभ- | मस्तकावरी ||१७||
उपरि दशोपनिषदें | जियें उदारें ज्ञानमकरंदे | तियें कुसुमें मुगुटीं सुगंधें | शोभती भलीं ||१८||
अकार चरण युगल | उकार उदर विशाल | मकार महामंडल | मस्तकाकारें ||१९||
हे तीन्ही एकवटले | तेथ शब्दब्रह्म कवळलें | तें मियां श्रीगुरुकृपा नमिलें | आदिबीज ||२०||

हें शब्दब्रह्म अशेष | तेचि मूर्ति सुवेष | जेथ वर्णवपु निर्दोष | मिरवत असे ||३||
(शब्दब्रह्म = वेद, वर्ण=स्वर व व्यंजने, वपु=शरीर)

हे गणेशाचे रुप म्हणजे केवळ मूर्तिमंत वेद - ज्यात अतिशय निर्दोष असे वर्ण हेच जणू त्याचे शरीर.

स्मृति तेचि अवयव | देखा आंगीक भाव | तेथ लावण्याची ठेव | अर्थशोभा ||४||

निरनिराळ्या स्मृति हे त्याचे विविध अवयव. या स्मृतितील अर्थसौंदर्य हे जणु या गणेशाचे शरीरलावण्यच होय.

अष्टादश पुराणें | तींचि मणिभूषणें | पदपद्धति खेवणें | प्रमेयरत्नांचीं ||५||
(खेवणे=छंदमय रचनेचे कोंदण)

अठरा पुराणे हे या गणेशाला मंडित करणारे रत्नखचित अलंकारच. हे अलंकार असे की अनेक सिद्धांतरुपी रत्ने पद्याच्या कोंदणात नेटकी जडविली आहेत.

पदबंध नागर | तेंचि रंगाथिले अंबर | जेथ साहित्य वाणें सपूर | उजाळाचें ||६||
(पदबंध नागर = सुंदर शब्दरचना, अंबर=वस्त्र, सपूर्=बारीक पोत)

सहजसुंदर शब्दरचना हे या गणेशाचे रंगदार वस्त्र आणि हे वस्त्र विणले आहे साहित्यरुपी धाग्यांनी. या शब्दरचनेतील अलंकार हेच त्या वस्त्राचा तलमसा पोत.

देखा काव्य नाटका | जे निर्धारितां सकौतुका | त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका | अर्थध्वनि ||७|| (क्षुद्रघंटिका=घागर्‍या)
नाना प्रमेयांची परी | निपुणपणें पाहतां कुसरी | दिसती उचित पदें माझारीं | रत्नें भलीं ||८|| (कुसरी=चातुर्य)

काव्य-नाटकरुपी घागर्‍या या गणेशाच्या पायात आहेत आणि त्यातून निघणारा जो अर्थ म्हणजेच ध्वनि तो कसा सुरेल रुणझुणता आहे. अनेक प्रमेयरुपी रत्ने अतिशय चातुर्याने यामधे गुंफली आहेत.

तेथ व्यासादिकांच्या मतीं | तेचि मेखळा मिरवती | चोखाळपणें झळकती | पल्लवसडका ||९||
(मेखळा=शेला, पल्लवसडका=पदराच्या दशा)

व्यासादिक कविश्रेष्ठांची जी मति (बुद्धी) हा गणेशाच्या कटीचा जणू शेला आणि त्या शेल्याच्या अतिशय नाजुक व सुंदर दशा कशा निर्मळपणे झळकत आहेत पहा.

देखा षड्दर्शनें म्हणिपती | तेची भुजांची आकृति | म्हणौनि विसंवादे धरिती | आयुधें हातीं ||१०||
तरी तर्कु तोचि फरशु| नीतिभेदु अंकुशु| वेदांतु तो महारसु| मोदकु मिरवे ||११||
एके हातीं दंतु| जो स्वभावता खंडितु| तो बौद्धमतसंकेतु| वार्तिकांचा ||१२||
मग सहजें सत्कारवादु| तो पद्मकरु वरदु| धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु| अभयहस्तु ||१३||

वरवर पाहता या सहा दर्शनांमधे विसंवाद दिसून येतो. त्याचा सुरेख वापर माऊलींनी गणेशाच्या सहा हातातील वेगवेगळ्या आयुधांचे निमित्त करून सांगितला आहे. तर्क हा जणू परशुसारखा काटछाट करणारा. न्याय हा अंकुश तर मोदक म्हणजे जणू रसपूर्ण वेदांत.

कणादऋषिंच्या वैशेषिक शास्त्ररुपी हातात तर्क हा परशु
गौतमऋषींच्या न्यायशास्त्ररुपी हातात तत्वभेद हा अंकुश
व्यासमुनींच्या वेदांतरुपी हातात तर ज्ञानरुपी रसयुक्त असा मोदक.
पतंजलींच्या योगशास्त्ररुपी हातात दात आहे जो मूळचाच मोडका आहे - तो म्हणजे बौद्धांचे शून्यमत जे स्वभावतः खंडीत आहे असा संकेत दाखवत आहे.
कपिलमुनींच्या सांख्यशास्त्रातील सत्कारवाद हा जणू वर देणारा कमलासारखा हात.
जैमिनीकृत धर्मसूत्रे/धर्मनिर्णय हा अभय देणारा हात

देखा विवेकवंतु सुविमळु | तोचि शुंडादंडु सरळु | जेथ परमानंदु केवळु | महासुखाचा ||१४||

सारासार विवेकरुपी अशी सरळ सोंड ज्यामुळे महासुखाचा आनंद उपभोगता येतो.

तरी संवादु तोचि दशनु | जो समता शुभ्रवर्णु | देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु | विघ्नराजु ||१५||

विविध मतामतांतील जो उपकारक असा संवाद किंवा उत्तमवाद हा श्रीगणेशाचा दात, जो नि:पक्षपातीपणामुळे शुभ्र पांढरा आहे. ज्ञानदृष्टी हेच ज्याचे सूक्ष्म निरीक्षण करणारे असे बारीक नेत्र आहेत.

मज अवगमलिया दोनी | मिमांसा श्रवणस्थानीं | बोधमदामृत मुनी | अली सेविती ||१६|| (अली=भुंगे)

पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा हे गणेशाचे दोन कान. गणेशाच्या गंडस्थळातून स्त्रवणारे ज्ञानामृत मुनीरुपी भुंगे सेवन करीत आहेत.

प्रमेयप्रवाल सुप्रभ | द्वैताद्वैत तेचि निकुंभ | सरिसेपणें एकवटत इभ- | मस्तकावरी ||१७|| (निकुंभ=गंडस्थळ, इभ=हत्ती)

वरील सर्व स्मृति-श्रुतीतून प्रतिपादन केले गेलेले सिद्धांत हे गणेशाच्या अंगावरील कांतियुक्त पोवळीच जणु. तर द्वैत आणि अद्वैत जिथे एकवटतात ते गणेशाचे गंडस्थळच जणू.

उपरि दशोपनिषदें | जियें उदारें ज्ञानमकरंदे | तियें कुसुमें मुगुटीं सुगंधें | शोभती भलीं ||१८||

दशोपनिषदे ही जणू ज्ञानरूपी मकरंदाने परिपूर्ण अशी सुगंधी फुले, जी गणेशाच्या मस्तकावर शोभत आहेत.
या दशोपनिषदातून सतत ज्ञानरुपी परागकणांची उधळण सहज होत असल्याने त्यांना ज्ञान देण्यासाठी उदार असे म्हटले आहे.

अकार चरण युगल | उकार उदर विशाल | मकार महामंडल | मस्तकाकारें ||१९||

श्रीगणेशाचे चरण युगुल हे ॐकारातील "अ"कार तर त्याचे विशाल पोट हे "उ"कार आणि मस्तक हे "म"कार.

हे तीन्ही एकवटले | तेथ शब्दब्रह्म कवळलें | तें मियां श्रीगुरुकृपा नमिलें | आदिबीज ||२०||

ॐकाराच्या या तीन मात्रा जिथे एकवटल्या आहेत, जिथे हे शब्दब्रह्म साठवले गेले आहे. त्या मूळबीजभूत गणेशास मी श्रीगुरुंच्या कृपेने वंदन करीत आहे.

माऊलींनी इथे गणेशाचे वाङ्मयीन रुप दाखवले आहे. त्यात हिंदू तत्वज्ञानातील वेद, पुराणे, सहा दर्शने, वेदांत याबरोबरच काव्य - नाटक इ.चेही महत्व विशद केले आहे. व्यास मुनींचा विशेष उल्लेख आहे. कारण सहजच आहे - व्यासोच्छिष्टं जगत सर्वम् - असे त्यांचे वर्णन सुप्रसिद्धच आहे.
स्मृति - मनुस्मृति, पाराशरस्मृति या स्मृतींचा पगडा त्याकाळातील समाजावर प्रचंड होता. बहुधा सर्वसाधारण धर्मशास्त्र व समाजशास्त्राचे नियम यात सांगितले गेले असल्यामुळे हा पगडा असावा.
पण माऊलींना मुख्यतः अद्वैत सिद्धांत प्रतिपादन करायचा असल्याने त्यांनी वेदांताला झुकते माप दिलेले दिसते.

सगुणाचेनि आधारे | निर्गुण पाविजे निर्धारे | सारासार विचारे | संतसंगे || दासबोध ||

ही जी समर्थ रामदास स्वामींची भूमिका होती तीच बहुसंख्य संतांचीही दिसते. सर्वसामान्य लोकांना परमार्थात काही कृती करायला आवडते. सगुणाच्या निमित्ताने ती कृती (पूजा-अर्चा, वाचन-मनन, भजन-किर्तन, इ.) करता करता त्यांचे लक्ष निर्गुणाकडे कसे वेधले जाईल यासाठी सर्व संत खटाटोप करताना दिसतात. कारण मुळातला निर्गुण-निराकार परमात्मा आपल्या सहज पचनी पडणार नाही हे जाणून जो सगुणात आहे तोच निर्गुण-निराकार आहे हे हळूहळू का होईना पण नीट लक्षात यावे याकरता ते इथे श्रीगणेशाचेही ॐ कार स्वरुपात वर्णन माऊली करताहेत.

माऊलींची तत्कालीन संस्कृतोद्भव अशी प्रासादिक भाषा, त्यांनी दिलेल्या विविध सुंदर सुंदर उपमा यामुळे हे सारे गणेशवर्णन व वंदन अतिशय उत्तुंग झाले आहे. अशा या श्रीगणेशाचे स्मरण करता करता आपणही त्या मूळ निराकाराशी एकरुप होण्याचा प्रयत्न करुयात. माऊलींच्या चरणी हीच विनम्र प्रार्थना.

इति ||
---------------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ -
१] श्री साखरे महाराज संपादित सार्थ श्री ज्ञानेश्वरी
२] http://abhangdnyaneshwari.org/
३] http://www.gharogharidnyaneshwari.com/
---------------------------------------------------------------------------------------------------------------
अवांतर माहिती -

१] षड्दर्शनें = सहा दर्शने - न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा

२] स्मृति = मनुस्मृति, पाराशर स्मृति वगैरे

३] दशोपनिषदे - ईश, केन, कठ, प्रश्न, मंडूक, मांडूक्य, ऐतरेय, तैत्तिरीय, छांदोग्य, बृहदारण्यक
----------------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओम नमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या | जय जय स्वसंवेद्या | आत्मरूपा ||

असा आत्मरूपी गणेश माउलींनाच दिसू शकतो आणि त्याचे इतके विलक्षण वर्णनही माउलीच करू शकतात.
इतक्या सुंदर प्रकारे हे सगळे वर्णन तुम्ही उलगडून दाखवलेत त्याबद्दल अनेकानेक आभार शशांक काका.
खूपच छान उतरलंय लिखाण.

मायबोलीच हेच वैशिष्ट. नविन नविन माहिती मिळते. ज्ञानात भर पडते. ही माहिती, वर्णन आजच वाचल.. खुप आवडल.. धन्यवाद.