प्रवाह

Submitted by संतोष वाटपाडे on 18 August, 2014 - 00:02

झरझर झरझर उंच कड्यावर
मुग्ध पांढरी कोसळणारी
नदी पाहूनी मला वाटले
शुभ्र वस्त्र हे सुकण्यासाठी
खडकावरती कुणी टाकले
म्हणून गेलो माथ्यावरती
लांबट बांबू हाती घेऊन
दबकत दबकत धरण्यासाठी
वार्‍यावर जे लहरत होते..

स्तब्ध जाहलो समोर पाहून
पात्र मनोहर धुंद नदीचे
वाहत होते मस्त कधीचे
खळखळणार्‍या पाण्यावरती
फ़ेस पांढरा दुधासारखा
पाने काही हिरवी पिवळी
फ़ुले रानटी छान तरंगत
कुठे कुठे तर वाट दुभंगत
पाण्यासोबत चालत होते...

जुने कुठूनसे तिथे आलेले
दगड चोपडे दणकट थोडे
मान सावळी वरती काढून
खेळत होते काठावरती
थबथब पाणी तळहातांनी
उधळत उडवत शिंपडताना
लिबलिबणारे स्फ़टिक लांबडे
रविकिरणांतून चमचमणारे
पुन्हा नदीतच मिसळत होते...

नको जायला जवळ उगाचच
खेळ चांगला मोडायाला
म्हणून मीही उंच कड्यावर
दगड कोरडा शोधून छोटा
त्यावर ठेवून अभ्रक पिशवी
निवांत जागी ठाण मांडुनी
बघत एकटक बसलो तेव्हा
गिरिशिखरांना वळसे घालत
अवखळ पाणी वाहत होते...

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान