लहान मुलांना शिकवण देताना ...

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 August, 2014 - 07:54

चार-पाच महिन्यांपूर्वींची गोष्ट. (मी तेव्हा मायबोलीवर नव्हतो).
बसने प्रवास करत होतो. बरोबर शाळेच्या मुलांचा एक ग्रूप होता. त्यापैकी दोघेजण माझ्या पाठच्या सीटवर बसले होते. दोघांच्याही गप्पा बरेपैकी मोठ्या आवाजात चालू होत्या जे विशेष कष्ट न घेता मला सुस्पष्ट ऐकू येत होत्या. पण माझे कान टवकारले गेले ते त्यांच्या गप्पांचे विषय ऐकून. मुद्दाम पलटून खात्री करून घेतली की शाळेचा गणवेश घातलेली शाळेचीच मुले आहेत आणि त्यांच्या बोलण्यात खोडा न घालता मान पुढे वळवून ऐकू लागलो.

ना त्यांच्या अभ्यासाच्या गप्पा चालू होत्या ना मोबाईल्स, विडीओगेम्सची वा तत्सम ईलेक्ट्रॊनिक गॆझेटसची माहिती शेअर करत होते. ना एखाद्या नवीन प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची वा क्रिकेट-फूटबॉलच्या सामन्याची चर्चा करत होते, ना कोणत्या मुलीच्या नावे चिडवाचिडवी चालू होती (जे आजकाल शाळकरी मुलांमध्येही सर्रास आढळते.)

तर त्यांच्या गप्पांचा विषय होता नथुराम गोडसे आणि गांधीहत्या !
त्यातील एक मुलगा विषयातील जाणकार होता तर दुसरा माहीती जाणून घेण्यात रस दाखवत होता. जाणकार मुलगा "गांधीहत्या आणि मी" हे पुस्तक त्याला वाचायला सुचवत होता तसेच "मी नथुराम गोडसे बोलतोय" हे नाटक देखील त्याने बघितले असल्याचे त्याच्या बोलण्यातून समजते होते. त्यानंतर त्यांची चर्चा जातीयवादावर वळली आणि तो दुसरा मुलगाही काही कमी जाणकार नाही याचा मला साक्षात्कार झाला. बरे या चर्चेतही अप्रत्यक्षपणे जातीयवादाचेच समर्थन होते न की समतेचा संदेश जात होता. दोघेही भिन्न जातींचे असल्याने त्यांची मते एकमेकांना काटत होती मात्र दोघांचा अभ्यास जेमतेम आणि तोकडा असल्याने त्यांना फक्त आपले मत मांडता येत होते, समोरच्याचे खोडता येत नव्हते. पुढे लगेचच त्यांचा स्टॉप आला आणि त्यांची चर्चा / वाद आता पुढे काय वळण घेते हे मला समजायच्या आधीच ते उतरले.

नाही म्हटले तरी एकंदरीत माझ्यासाठी थोडेफार ते शॉकिंगच होते, कारण मला स्वताला हा विषय किंवा यासारखे कित्येक वादग्रस्त विषय ऑर्कुट-फेसबूक सारख्या सोशल साईटसवर अवतीर्ण झाल्यावर समजले. महापुरुषांच्या’ही जाती असतात, नव्हे ते त्यानुसार पुजले किंवा निंदले जातात हे देखील इथेच समजले. एवढेच नाही तर काही काळ मी स्वतादेखील त्या प्रभावाखाली येऊन बहकलो होतो. त्या प्रभावाखाली विचार करू लागलो होतो. सुदैवाने त्यातून लवकर बाहेर पडलो. पण त्या मुलांकडे पाहून मनात आले कि अश्या वादग्रस्त विषयांचे आणि विचारांचे बाळकडू या अजाणत्या वयात त्यांना घरातूनच मिळत असण्याची शक्यता जास्त असावी. जसे क्रांतीवीर मध्ये नाना पाटेकर ईस्माईलला बोलतो की या लहान मुलांना काय माहीत कोण हिंदू आणि कोण मुसलमान, तर ते काय सांगणार त्यांच्या आईला कोण्या हिंदूने मारले म्हणून, तो तूच आहेस मित्रा जो यांच्या मनात ‘नफरत के बीज’ पेरत आहेस... तर.., कुठेतरी या जातीपातींबद्दल मुलांना न कळत्या, अजाणत्या वयात सांगून आपणही त्यांच्या मनात असेच काहीसे पेरत नसतो ना ?

विषय म्हटले तर संवेदनशील असल्याने मी जास्त शब्दखेळ करत नाही, उगाच नेमका एखादा शब्द पकडून तेवढेच निमित्त मिळायचे आणि माझ्या भावना एकीकडे आणि धागा दुसरीकडे भरकटायचा.

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्या वादग्रस्त विषयांचे आणि विचारांचे बाळकडू या अजाणत्या वयात त्यांना घरातूनच मिळत असण्याची शक्यता जास्त असावी.>>>>> अजिबात नाही.घरी अशी पार्श्वभूमी नसतानाही बाहेरच्या बर्‍यावाईट अनुभवांवरून,
माणूस जास्त घडत असतो.

देवकी,
हो, बाहेरून तर असे डोस मिळतच असतात आणि ते रोखायचाच प्रयत्न असावा. किमान त्या मुलांना सारासार विचार करायची स्वताची अक्कल येईपर्यंत तरी..
मी जे वर लिहिले आहे ते त्या पर्टीक्युलर केस बद्दल (आणखीही अश्या असाव्यात). त्यामध्ये त्या मुलांची चर्चा पाहून त्यांच्यामागे नक्कीच कोणीतरी गुरू असावा आणि त्यांच्या केसमध्ये तो बाहेरचा असण्यापेक्षा घरचाच असण्याची शक्यता जास्त होती.

छे हो!
येळेकर म्हणताहेत तेच खरंय.
घरातून फक्त उत्तमोत्तम संस्कारच होतात. आपल्या हिंदुस्थानात किनई, सर्व घराघरांतले पालक अत्यंत सुसंस्कृत, सर्वधर्मसमभाव बाळगणारे, जातीपाती न पाळणारे, लिंगनिरपेक्ष पद्धतीने मुलांना वाढवणारे असतात.
त्यामुळे घरातून अजिब्बात असं काही होत नाही.
हां, बाहेर...
तिथे मात्र कुणा हलक्या जातीच्या, किंवा 'त्यांच्या'पैकी मुलांच्या संपर्कात वगैरे येऊन असलं विष पेरलं जात असावं. माणूस फक्त बाहेरच्या संस्कारांनीच जास्त घडतो.

त्यांच्या केसमध्ये तो बाहेरचा असण्यापेक्षा घरचाच असण्याची शक्यता जास्त होती.>>>>. मला नाही वाटत.वाचन आणि तुमचं सेकंड माईंड असेल तर या वायातील मुले असा विचार करू शकतात.
माझा मुलगा शाळेत जाईपर्यंत धर्म,जात वगैरे घरात उल्लेखही झाला नाही.(जाणीवपूर्वक नसून तो भाग खरंच महत्वाचा वाटला नाही) त्याला शाळेत ,इव्हीएस शिकवले जात असताना त्याने विचारले होते' मी कोण आहे?' मला कळेना की हा असं का विचारतो म्हणून. मी सांगितले की तू माणूस आहेस.तर तसं नाही, ख्रिश्चन, चर्चमधे जातात,मुसलमान मशिदीत जातात मग मी कोण? त्यावर त्याला म्हटले की आपण हिंदू आहोत कारण मंदिरात जातो.
तोच माझा मुलगा,नंतर शाळेतील ठराविक मुलांमुळे/ ट्यूशनच्या सरांमुळे बिथरला होता.कारण ती मुले नेहमी म्हणायची आमचा अमुक राजा बघ आणि तुमचा शिवाजी राजा बघ.असे बरेच काही.लेक तिथे काय प्रतिवाद करायचा आता आठवत नाही.सरांनी संभाजीराजांबद्दल चुकीचे शिकवल्यावर याने ,त्यांना करेक्ट केले.
त्याला सांगितले की तुझ्या मित्राला सांग की ते राजे बाहेरच्या देशातून आले आहेत.तू काय मी काय याच देशातील आहोत.त्याने काय सांगितले माहित नाही.पण त्याच्या मनात एक आकस राहून गेलाय.

नेहमीप्रमाणे अर्थाचा अनर्थ करणारा प्रतिसाद पाहून आश्चर्य नाहीच वाटले.
शिवाजी म्हणतो' असा काही खेळ होता लहानपणी.त्यात सांगणार्‍याच्या म्हणण्यानुसार करायचे असते.तसाच प्रकार मा.बो.वर आहे म्हणायचा.

तोच माझा मुलगा, नंतर शाळेतील ठराविक मुलांमुळे/ ट्यूशनच्या सरांमुळे बिथरला होता.

<<

हातच्या काकणाला आरसा कशाला?

शाळेतील ठराविक मुलांमुळे/ ट्यूशनच्या सरांमुळे बिथरला होता.>>> चिडवण्यामुळे/ इतिहासाचा विपर्यास करून शिकवल्यामुळे तो बिथरला होता.अर्थात हे मी नंतरच्या वाक्यात लिहिलं आहेच.पण मला हवं तेवढेच मी बघणार म्हटलं की आणखी काय होणार.

ईतिहासाचा विपर्यास हा प्रकार आजकाल घाणेरड्या राजकारनामुळे इतका पसरलाय की कोण खरे कोण खोटे हे काहीच समजेनासे होते. कारण कोणीही स्वता ना बखरी ढुंढाळायला जात ना कोणी उत्खनन करायला जात. त्यामुळे मग सरतेशेवटी प्रत्येक जण आपला इतिहास जाज्वल्ल्यमानच हवा या हट्टापायी सोयीचा तेवढे घेतेय. सो, यावर नो कॉमेंटस !