स्तोत्रानुवाद- महागणेशपञ्चरत्नस्तोत्रम् |

Submitted by संयोजक on 14 August, 2014 - 07:26
आदिशङ्कराचार्यविरचित 'महागणेशपञ्चरत्नस्तोत्र' हे 'पञ्चचामर' वृत्तातील अतिशय प्रसिद्ध असं स्तोत्र.
त्यातील शब्द, त्याची लय, त्यातील अनुप्रास हे सारंच मोठं प्रसन्न आहे.
या स्तोत्राचा अर्थ देण्याचा हा एक प्रयत्न.

'नमामि तं विनायकम्' अर्थात 'त्या' विनायकाला माझा नमस्कार असो! असा या स्तोत्रातला पहिला श्लोक.
'तो' विनायक कसा आहे? हे पहिल्या आणि त्यापुढील प्रत्येक श्लोकात वर्णिले आहे.
कसे? ते पाहूया.

|| महागणेशपञ्चरत्नस्तोत्रम् ||

मुदाकरात्तमोदकं सदाविमुक्तिसाधकम् |
कलाधरावतंसकं विलासिलोकरक्षकम् |
अनायकैकनायकं विनाशितेभदैत्यकम् |
नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् ||१||

आनंदाचे द्योतक असलेला मोदक ज्याने आनंदाने हातात धारण केला आहे, जो नेहमीच आपल्या भक्तांना मुक्तीप्रत नेणारा आहे, जो चंद्रकोरीने सुशोभित आहे आणि त्रिलोकाचे रक्षण करतो, ज्याचा कोणीही नायक नसून जो सकल जगताचा एकमेव नायक आहे, ज्याने इभ नावाच्या (गजरूपी) दैत्याचा नाश केला आहे आणि जो त्याच्या पुढे नम्र असणार्‍यांच्या मनातील अशुभ सत्वर नष्ट करतो अशा विनायकाला माझा नमस्कार असो!

नतेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरम् |
नमत्सुरारिनिर्जरं नताधिकापदुद्धरम् |
सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरम् |
महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम् ||२||

जो गर्विष्ठांसाठी (नतेतर) अतिभयंकर आहे, जो उगवत्या सूर्याप्रमाणे तेजःपुंज आहे,
जो देवांच्या शत्रूंचा विनाश करतो आणि त्याच्यापुढे नम्र असणार्‍यांचा आपत्तीतून उद्धार करतो,
जो देवांचाही देव आहे, जो वैभवाचा-संपत्तीचा देव आहे, जो गजपती व गणपती आहे, जो मोठा आहे आणि ज्याचा पार कळत नाही अशा विनायकाच्या चरणाशी मी निरंतर आश्रित आहे.

समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरम् |
दरेतरोदरं वरं वरेभवक्त्रमक्षरम् |
कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करम् |
मनस्करं नमस्कृतांं नमस्करोमि भास्वरम् ||३||

जो त्रैलोक्याला मांगल्य प्रदान करतो, ज्याने हत्तीरूपी असुराचा नाश केला आहे, जो लंबोदर आहे, गजमुख आहे आणि जो अक्षर आहे. जो कृपाकर, क्षमाशील, आनंदप्रद, यशप्रद आणि नत-भक्त-जनांना मनोवांच्छित देणारा आहे अशा तेजस्वी विनायकाला माझा नमस्कार असो.

अकिञ्चनार्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजकम् |
पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगर्वचर्वणम् |
प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणम् |
कपोलदानवारणं भजे पुराणवारणम् ||४||

भौतिक सुखाची याचना न करणार्‍या भक्ताची सगळी दु:खे, संकटे जो नष्ट करतो,
वेद-पुराणादींतून ज्याची स्तुती केली जाते, जो शंकराचा (पुरारि- त्रिपुरासुराचा शत्रू= शंकर) मोठा मुलगा(पूर्वनन्दन) आहे, जो देवांच्या शत्रूचा गर्व नष्ट करतो (अक्षरशः गर्वचर्वणम्- म्हणजे त्या शत्रूंचा गर्व खाऊन संपवून टाकतो) जो मृत्यूसही भयंकर आहे (प्रपञ्च= शरीर. शरीर हे पाच तत्वांच्या पंचीकरणाने तयार होणारे, म्हणून- प्रपञ्च. त्याचा नाश= प्रपञ्प्रपञ्चनाश=मृत्यू) जो धनंजयादि दशप्राणांचे भूषण आहे, ज्याच्या गालांवरून 'मद' ओघळतो आहे अशा पुराणांनी वर्णन केलेल्या गजास माझा नमस्कार असो.

नितान्तकान्तदन्तकान्तिमन्तकान्तकात्मजम् |
अचिन्त्यरूपमन्तहीनमन्तरायकृन्तनम् |
हृदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनाम् |
तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम् ||५||

ज्याचा दन्त अतिशय शुभ्र कांतीचा आहे असा, जो अन्तकाच्या(यमाच्या) अन्तकाचा(संहारकर्त=) मुलगा (म्हणजेच, शिवपुत्र) आहे,
ज्याचं रूप आकलनापलीकडे आहे, जो अंतहीन आहे आणि जो संकटांचा नाश करतो अशा योगीजनांच्या हृदयात सतत निवास करणार्‍या एकदंताचे मी नित्य-चिंतन करतो.

महागणेशपञ्चरत्नमादरेण योऽन्वहम् |
प्रजल्पति प्रभातके हृदि स्मरन्गणेश्वरम् |
अरोगतामदोषतां सुसाहितीं सुपुत्रताम् |
समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोऽचिरात् ||६||

गणपतीचे आदरपूर्वक स्मरण करीत रोज प्रभातकाली जो कोणी हे महागणेशपञ्चरत्नस्तोत्र पठन करील त्याला गणेशाच्या कृपेने आरोग्य, (भाव्)शुद्धता, संपन्नता, चांगली संतती, दीर्घायुष्य आणि अष्टैश्वर्य यांचा सत्वर लाभ होईल.

||इति श्रीमदाद्यशङ्कराचार्यविरचितं श्रीगणेशपञ्चरत्नस्तोत्रं सम्पूर्णम् ||

अनुवाद- चैतन्य दीक्षित
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

आचार्यांची सगळीच स्तोत्रं इतकी सुरेख आहेत, त्यातली भाषा, भाव ह्या सगळ्यांचा विचार करता क्षणभर तरी असे वाटते की 'इतक्या ज्ञानी, अद्वैतवादाचं मूर्तिमंत रूप असलेल्या व्यक्तीनेच हे (पूर्णपणे द्वैतभावनेवर आधारित) लिहिलंय?'
अर्थ कळला नाही तरी प्रत्येकच स्तोत्रातली गेयता मोहवून टाकणारी आहे.
पुण्यात बरेच गुरुजी पूजेच्यावेळी हे स्तोत्र म्हणताना आढळतात. ऐकायलाही फार छान वाटते.
स्तोत्राचा अर्थ कळला तर स्तोत्र म्हणताना/ ऐकताना अजूनच छान वाटते. ह्याच भावनेने स्तोत्राचा अर्थ द्यायचा प्रयत्न केला आहे.
श्रीगणेशार्पणमस्तु |

सुरेख सुमधुर काव्याचा सुगम अर्थ इथे सादर केल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद!
स्तोत्र आणि अर्थशोधन दोन्हीही आवडले.

करात मोदका धरा, प्रमोद, मुक्ति द्या प्रभो
कला शिरी धरीत जो, त्रिलोक तोच रक्षितो
अनाथनाथ ध्वंसितो इभास राक्षसास जो
विनाशतो अशूभ जो नमू तया विनायका १

गर्वोन्नता भयंकरा उदीतसूर्यदीप्ति ज्या
सुरारिनाशका सुरासक्तास मोक्षदायका
सुरेश्वरा निधीश्वरा गजेश्वरा गणेश्वरा
महेश्वरा परात्परा तवाश्रयास मी सदा २

जगा शुभंकरा गजासुरास ध्वंसका गजा
लंबोदरा गजानना नमू अनाथनाथ त्वा
कृपाकरा क्षमाकरा सुखाकरा यशप्रदा
अभिप्सितार्थ दायका नमू अशा विनायका ३

न मागता हरे अरीष्ट तो सदाच वानिता
महेश्वरास पुत्र थोरला विदारि राक्षसा
अग्न्यादिभूषणा सदा महाभुतांस काळशा
पुराणवर्णनांत वाहत्या मदे विभूषिता ४

काळांतकासुतास शुभ्रकांतिदंत ज्या
अवर्णनीय रूप ज्या नमू सदा विनायका
हृदी निवास जो अनंत सर्वदा करीतसे
सदाच एकदंत तो मी चिंतितो पुनःपुन्हा ५

स्मरेल रोज, प्रार्थना करेल, प्रातःकाळि जो
म्हणेल हे महागणेशस्तोत्र आदरे भजे
त्वरे तयास संतती व संपदाहि लाभती
तया निरामया मिळे विशुद्ध संपदाहि ती ६

अशा प्रकारे
श्रीमान आद्य शंकराचार्य विरचित
श्री गणेश पंचरत्न स्तोत्र संपूर्ण होत आहे.