'नाही लोकप्रिय तरी' - बर्ट्रांड रसेल (अनु. - डॉ. करुणा गोखले)

Submitted by चिनूक्स on 13 August, 2014 - 02:58

Thought is subversive and revolutionary, destructive and terrible, Thought is merciless to privilege, established institutions, and comfortable habit. Thought is great and swift and free.

- बर्ट्रांड रसेल

बर्ट्रांड रसेल हे एकोणिसाव्या-विसाव्या शतकातील एक प्रमुख तत्त्वज्ञ, गणिती, इतिहासकार, सामाजिक-राजकीय टीकाकार. या माणसानं पुस्तकं लिहिली, लेख लिहिले, भाषणं दिली, वाद घातले. जन्मभर विचारांचा पाठपुरावा केला. सत्य, विवेक, उदारमतवाद, युद्ध, हट्टाग्रह यांबद्दल रसेलनं गेल्या शतकात लिहून ठेवलेलं आजही तितकंच लागू आहे.

'अनपॉप्युलर एसेज्' हा रसेलचा अप्रतिम लेखसंग्रह. तिरकस भाषा, विचारांची स्पष्टता, अद्वितीय तर्कशुद्धता ही व्यवच्छेदक लक्षणं असलेले हे लेख आजच्या काळातही (दुर्दैवानं) तितकेच ताजे वाटतात.

'अनपॉप्युलर एसेज्'चा सुंदर अनुवाद डॉ. करुणा गोखले यांनी केला असून मेनका प्रकाशनानं तो प्रकाशित केला आहे. आजच्या काळात नितांत आवश्यक असलेले रसेलचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न कमालीचा स्तुत्य आहे.

'अनपॉप्युलर एसेज्'ला लिहिलेली रसेल यांची प्रस्तावना, डॉ. करुणा गोखले यांचं मनोगत, मूळ लेखसंग्रहाला असलेली कर्क विलीस यांची प्रस्तावना आणि या संग्रहाचं पहिलं प्रकरण असलेला रसेलनं लिहिलेला स्वतःचा मृत्यूलेख इथे वाचता येईल.

nahi.jpg

'अनपॉप्युलर एसेज्'ची बर्ट्रांड रसेल यांची प्रस्तावना

या संग्रहातील बहुसंख्य लेख गेल्या पंधरा वर्षांच्या कालावधीत वेगवेगळ्या वेळी लिहिलेले आहेत. त्या सर्वांचे उद्दिष्ट एकच आहे. वाढत्या हट्टाग्रहांशी चार हात करणे. मग हे हट्टाग्रह डाव्या विचारसरणीचे असोत, वा उजव्या. दिवसेंदिवस वाढत गेलेले हट्टाग्रह हे आपल्या या दुर्दैवी शतकाचे व्यवच्छेदक लक्षण होऊन बसले आहेत.

या सर्व लेखांमागची प्रेरणा गंभीर आहे, परंतु वरकरणी ते जरा थिल्लर वाटू शकतात. याचे कारण गंभीर प्रकृतीच्या दुराग्रही लोकांचा सामना करताना त्यांच्याहीपेक्षा जास्त गंभीर आणि दुराग्रही राहून चालत नाही.

आता थोडेसे पुस्तकाच्या शीर्षकाविषयी. 'हे पुस्तक केवळ प्रथितयश तत्त्ववेत्त्यांसाठी नाही' असे माझ्या 'ह्युमन नॉलेज' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत मी म्हटले होते. कारण कुठल्याही शिक्षित माणसाच्या जिव्हाळ्याच्या विषयांना तत्त्वज्ञान स्पर्श करतच असते. माझ्या त्या विधानाबद्दल समीक्षकांनी मला चांगलेच फैलावर घेतले. त्यांच्या मते या पुस्तकातील काही भाग बर्‍यापैकी क्लिष्ट होता. माझे पुस्तक विकत घेणार्‍या ग्राहकांची मी बुद्ध्या दिशाभूल केली, असा त्यांच्या त्या टीकेचा मथितार्थ. मला पुनश्‍च या आरोपाचा धनी व्हायचे नाही. त्यामुळे सदर लेखसंग्रहामधील अनेक वाक्ये दहा वर्षे वयाच्या काही विलक्षण निर्बुद्ध मुलांना थोडी बुचकळ्यात टाकणारी वाटू शकतील, हे मी आधीच कबूल करून टाकतो. म्हणूनच सदर लेख हे सुलभ ऊर्फ पॉप्युलर आहेत, असा माझा दावा नाही, आणि लेख जर पॉप्युलर नसतील, तर मग अनपॉप्युलरच होणार!

- बर्ट्रांड रसेल
(सन १९५०)

***

अनुवादिकेचे मनोगत

आपण रोजचे वर्तमानपत्र वाचले, की आईबाबा खूष होतात हे मला पाचवी-सहावीत कळले आणि त्यांना खूष करणे हा माझा दिनक्रम झाला. त्या वयात बाकी काहीच कळत नसल्यामुळे मुख्यत्वे खून-दरोडे-मृत्यू यांविषयीच्या बातम्याच माझ्या लक्षात राहायच्या आणि दोन दिवसांत स्मरणातून गळून जायच्या. पण एक दिवस जरा वेगळे घडले. थोर तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेल यांचे निधन ही बातमी वाचली, पण स्मरणातून गेली नाही. कारण त्या दिवशी वडील तीन-चार वेळा तरी 'फार अलौकिक माणूस गेला', असे म्हणत हळहळले. रसेल अलौकिक माणूस होता, हे माझ्या शाळकरी मेंदूवर कोरले गेले. पुढे अधूनमधून या अलौकिक माणसाचा संदर्भ कुठे ना कुठे वाचनात येत राहिला. एखादा मोठा माणूस वाचत असतानाचे छायाचित्र वर्तमानपत्रात झळकायचे आणि त्याच्या हातातले पुस्तक नेमके रसेलचे 'मॅरेज अ‍ॅन्ड मॉरल्स्' असायचे. दुसरा एखादा मोठा माणूस स्वतःच्या जीवनाविषयी लिहिताना 'व्हाय आय अ‍ॅम नॉट अ क्रिश्चन' या रसेलच्या लघुनिबंधाचा उल्लेख करायचा. अशा प्रकारे रसेल कुणीतरी मोठा माणूस आहे, हे मनावर बिंबले. हा माणूस माहीत असणे हेच मोठेपणाचे लक्षण असते, असेही कुठेतरी मनाने घेतले.

यथावकाश मी वयाने मोठी झाले आणि पीएच. डी.वर काम सुरू केले, तेव्हा रसेल साक्षात अभ्यासाच्या अनुषंगाने भेटला. सिमॅन्टिक्सचा अभ्यास करताना रसेलचे एक वाक्य वाचले - 'जगात खर्‍या अर्थाने विशेषनाम एकच आहे - ते म्हणजे धिस हे सर्वनाम'. हे वाक्य वाचून या अलौकिक माणसाला मनोमन सलाम ठोकला. कारण रसेलच्या त्या वाक्यातील मेख पुढीलप्रमाणे आहे - वस्तूंच्या नावांना सामान्यनामे म्हणतात. उदा. घर, चाक, कापड इत्यादी. व्यक्तींच्या नावांना विशेषनामे म्हणतात. उदा. मायकेल, सुजाता, संजय आदी. परंतु रसेल यांचे म्हणणे असे, की जगात हजारो मायकेल, शेकडो सुजाता असू शकतात. त्यामुळे खरेतर ही व्यक्तींची नावेसुद्धा व्यवहारात सामान्यनामेच होतात. मग जे फक्त एकमेव व्यक्तीचा निर्देश करू शकते असे शंभर टक्के अस्सल विशेषनाम कोणते? रसेल यांच्या मते, बोलणार्‍याने हाताने निर्देश करून वापरलेले सर्वनाम ‘धिस’ हेच फक्त एकमेवाद्वितीय असे विशेषनाम म्हटले पाहिजे. या युक्तिवादाने मी थरारून गेले. त्याच दिवशी ग्रंथालयातून एकामागोमाग एक रसेलची पुस्तके उचलायला सुरुवात केली. माझ्या आयुष्यातील रसेलपर्व सुरू झाले. ४-५ वर्षांनी त्यांचे 'द काँक्वेस्ट ऑफ हॅपिनेस' मराठीत आणले. त्यानंतर 'अनपॉप्युलर एसेज्'चा अनुवाद करण्याची मला स्वप्ने पडू लागली. पण ते शिवधनुष्य पेलण्याचे धाडस होईना. यथावकाश इतर उपक्रम पुढे आले आणि 'अनपॉप्युलर एसेज्' मागेच पडत गेले.

आज अनेक वर्षांनी आजूबाजूचा धार्मिक उन्माद, अंधश्रद्धांचा बाजार, केवळ राजकीय पक्षांमध्येच नाही, तर साध्यासुध्या माणसांमध्येही दिसणारा स्वमत-आग्रह, प्रादेशिक, धार्मिक, जातीय, भाषिक अस्मितांचा उद्रेक हे सर्व वारंवार अनुभवताना पुनःपुन्हा 'अनपॉप्युलर एसेज्'ची आठवण येऊ लागली, कारण रसेल यांच्या या लेखसंग्रहाचा हेतूच हट्टाग्रहांशी चार हात करणे हा होता.

स्वतःचे वय वाढू लागले, तसा स्वमत-आग्रह आणि दूषित पूर्वग्रह यांमुळे आपण वैयक्तिक जीवनात स्वतःचे त्रास वाढवून घेतो, हा अनुभवपण वाढू लागला. भाबडेपणा वागण्यात लोभस वाटू शकतो, परंतु जगाच्या आकलनातच भाबडेपणा ठेवला, की पुनश्‍च वैयक्तिक आणि सामाजिक प्रश्‍न गुंतागुंतीचे होऊन बसतात, हेपण प्रकर्षाने जाणवू लागले. थोडक्यात, विवेकाला पर्याय नाही आणि विवेक म्हणजे नक्की काय, हे हरप्रकारची उदाहरणे देऊन समजावून सांगणारा रसेलइतका प्रभावी दुसरा माणूस नाही.

वैचारिक स्पष्टता आणि निष्पक्ष चिकित्सा हे रसेल यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य! व्यक्ती कितीही महनीय असली, तरी रसेल तिच्या मोठेपणाचे दडपण घेत नाहीत. तिच्या विचारांना तर्कसंगतीची कसोटी लावून त्यातील काय ग्राह्य आणि काय त्याज्य याची निर्भिड चर्चा ते करतातच. 'अनपॉप्युलर एसेज्'मध्ये रसेल प्लेटो, अ‍ॅरिस्टॉट्लपासून ते लेबनीझ, कांट, हेगेल, मार्क्स या सर्वांच्या विचारांमधील किंवा वर्तणुकीतील विसंगतीची चर्चा करतात. त्यामागील हेतू अर्थातच त्या व्यक्तीची अप्रतिष्ठा करणे हा नसून, विवेकवादाचा प्रसार हाच असतो.

व्यक्ती कितीही मोठी असली, तरी तिच्या विचारांची चिकित्सा रसेल यांना आवश्यक वाटते, कारण नेत्यांच्या विचारांमधील विसंगती त्यांच्या तत्त्वप्रणालीत उतरते. त्याद्वारे ती राज्यकर्त्यांच्या धोरणात आणि यथावकाश सामाजिक व्यवस्थेत प्रतिबिंबित होते. म्हणूनच राजकीय पक्ष, समाजधुरीण व राष्ट्रप्रमुख काय प्रतिपादन करतात, त्याची विवेकनिष्ठ चिकित्सा होणे आवश्यक असते. हिटलरने हेगेलची तत्त्वे हवी तशी वाकवून नाझी तत्त्वज्ञानाच्या समर्थनासाठी वापरली. स्टॅलिनने अनुवंशशास्त्राची अशास्त्रीय मांडणी रशियात राबवून कृषिक्षेत्राचे वाटोळे केले. अशा प्रकारचे उत्मात भोंगळ तत्त्वज्ञानातून उद्भवतात; आणि भोंगळ तत्त्वज्ञान विवेकशून्यतेतून उद्भवते. म्हणूनच सर्वसामान्य माणसास बालपणापासूनच तर्कशुद्धता आणि उदारमतवाद यांचे महत्त्व पटवायला हवे, असे रसेल यांचे म्हणणे होते. याच तळमळीतून त्यांनी'अनपॉप्युलर एसेज्' लिहिले. कारण जेथे विवेक येतो, तेथे हट्टाग्रह गळून पडतात व त्यांच्या जागी उदारमतवाद रुजू लागतो.

राज्यसंस्थांवर राज्यकर्ते राज्य करतात, तर जनमानसावर समजुती! म्हणूनच रसेल आपल्या संग्रहात दोन प्रकारच्या समजुतींची खोलात जाऊन चर्चा करतात : मानवाजातीला उपकारक ठरलेल्या समजुती किंवा संकल्पना आणि मनुष्यजातीस घातक ठरलेल्या समजुती. पहिल्या प्रकारच्या समजुती बुद्धिप्रामाण्यवाद, प्रयोगनिष्ठता, उदारमतवाद यांच्याशी संबंधित किंवा मूलभूत भौतिकशास्त्रातील आहेत. घातक समजुती अंधविश्‍वास, दुराग्रह, मिथ्या अभिमान, वर्णवर्चस्वाची भावना, पाप, पुनर्जन्म, नरक इत्यादींशी निगडित आहेत. रसेल या समजुतींचा उगम कसा, कधी व का झाला, यांची साक्षेपाने चर्चा करतात.

रसेल यांची तैलबुद्धी इतिहास, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, विज्ञान, साहित्य अशा विविध प्रांतांमध्ये लीलया वावरते. म्हणूनच त्यांच्या लेखणीतून उतरलेले बुद्धिवैभव वाचकाला अत्यंत अकल्पित अशा माहितीचे भांडार खुले करते. तत्त्वज्ञान आणि विज्ञानातील नाते हा रसेल यांनी रंगवलेला असाच एक अत्यंत रंजक मुद्दा आहे.

रसेल यांच्या मते प्राचीन काळी तत्त्वज्ञान एकाच वेळी दोन उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करायचे - या विश्‍वाची रचना विशद करणे आणि त्याचवेळी माणसाने नीतिमानतेने जगावे यासाठी मूल्यव्यवस्था निर्माण करणे. पैकी पहिल्या उद्दिष्टासाठी तत्त्वज्ञांनी जे काही चिंतन किंवा कल्पनाविलास केला, ते सगळे कालांतराने विज्ञानाच्या अभ्यासकांना उपयोगी पडले. तत्त्वज्ञ नसते, तर भौतिकशास्त्रातील अनेक कूटप्रश्‍नांची शास्त्रज्ञांना जाणीवही झाली नसती. परंतु विज्ञानाच्या विकासाचे कुठलेही श्रेय तत्त्वज्ञांना मिळाले नाही. आपल्या दुसर्‍या उद्दिष्टपूर्तीसाठी तत्त्वज्ञानाने धर्मशास्त्राशी हातमिळवणी करून नीती-अनीतीचे नियम ठरवण्याचा खटाटोपही केला. परंतु म्हणूनच विज्ञानाने एखादी गोष्ट सप्रमाण सिद्ध केली, की तत्त्वज्ञानाला त्याविषयीची आधीची भूमिका सांभाळणे अवघड होऊन बसायचे. धर्मशास्त्रे मात्र विज्ञानाचे म्हणणे बेदखलच करायची, कारण धर्मशास्त्रांना राजसत्तेचा आणि जनमताचाही पाठिंबा असे. त्यामुळे विज्ञान कितीही पुढे गेले, तरी धर्मशास्त्रे ढिम्मच असायची. याउलट तत्त्वज्ञानास राजसत्ता वा धर्मसत्ता मंजूर तर नसायची, परंतु विज्ञानाचे मत शिरोधार्य मानून त्यांस झुगारून दिले, तर तत्त्वज्ञांच्या पोटावर पाय यायचा. त्यामुळे तत्त्वज्ञानाची चांगलीच कोंडी व्हायची. एका बाजूला वैचारिक सचोटी व दुसर्‍या बाजूस व्यवहार सांभाळण्यासाठी ही अवघड कसरत तत्त्वज्ञांना सत्ताधार्‍यांच्या स्वमत-आग्रहापायी करावी लागायची. प्लेटो, लेबनीझ, कांट, हेगेल या सर्वांच्या जीवनातील हे वैचारिक द्वंद्व रसेल फार मार्मिकपणे उलगडून दाखवतात.

आपल्या समजुती, आपले आचार-विचार सर्वश्रेष्ठ, आपली जात किंवा धर्म सर्वांत योग्य असे मानून ते इतरांवर लादण्याच्या प्रवृत्तीविरुद्ध रसेल जन्मभर लढले. त्यासाठी त्यांनी लेखणी हेच अस्त्र वापरले. 'अनपॉप्युलर एसेज्' हे असेच एक अस्त्र होय. त्यातील लेखांचे विषय वरकरणी निरनिराळे वाटले, तरी त्यांमधील अंतःप्रवाह एकच आहे. तो म्हणजे सत्ताधार्‍यांच्या किंवा बलवानांच्या हट्टाग्रहांपायी समस्त मानवजातीस सहन करावा लागलेला त्रास!
हट्टाग्रहांना दूर कसे ठेवायचे याचेही अनेक साधे-सोपे मार्ग रसेल सुचवतात. त्यातील सर्वांत व्यवहार्य मार्ग म्हणजे विज्ञानाची कार्यपद्धती शिरोधार्य मानणे. विज्ञान कधीही कुठल्याही सिद्धांतास त्रिकालाबाधित सत्य समजून कवटाळून बसत नाही. त्या त्या परिस्थितीतील सर्वांत संभवनीय स्पष्टीकरण याच दृष्टिकोनातून त्यांकडे बघते. नव्या प्रयोगांमधून नवी निरीक्षणे समोर आली, तर आधीचे निष्कर्ष बदलण्याची तयारी ठेवते. विज्ञान वैज्ञानिकांची किंवा प्रचलित समजुतींची सत्ता मानत नाही. म्हणूनच विज्ञान नव्या विचारांचा गळा घोटत नाही.

याउलट धर्मशास्त्रांत सत्ता व्यक्तींची किंवा व्यक्तींनी बनवलेल्या नियमांची असते. कालांतराने अशा व्यक्तींचे देव तरी होतात किंवा सत्ताधारी तरी. मग त्यांनी केलेले नियम मोडणे हे पाप तरी समजले जाते, किंवा गुन्हा तरी. विज्ञान कोणालाही देव करत नाही, तरी ते नम्र व लवचीक असते. याउलट धर्मशास्त्रे उद्दाम व ताठर होतात. सत्य हा अनेकदा सत्याचा आभास असतो. हा आभास कधी बुद्ध्या तयार केलेला असतो, तर कधी माणसाच्या आकलनशक्तीला पडलेल्या मर्यादांमुळे निर्माण होतो. या मर्यादांचे भान असणे, म्हणजे विवेक. असे भान माणसाला स्वमत-आग्रहांपासून परावृत्त करते; दुसर्‍याला आपल्यापेक्षा निराळे मत असण्याचा अधिकार आहे, हे मान्य करते. हाच झाला उदारमतवाद. आज जगाला या दोन्ही गुणांची नितांत गरज आहे, असे रसेल पोटतिडिकीने १९४० साली सांगत होते, कारण त्या वेळी जगाचा प्रवास पहिल्या महायुद्धाकडून दुसर्‍या महायुद्धाकडे सुरू होता.

आजही जगाला याच दोन गुणांची नितांत गरज आहे. जगाचा प्रवास धार्मिकतेकडून धर्मांधतेकडे सुरू आहे. हिंसेकडून दहशतवादाकडे सुरू आहे. त्यातून आजमितीस पृथ्वीतलावरचे एकही राष्ट्र सुटलेले नाही. दहशतवादाच्या वणव्यातून मनुष्यजमात शारीरिकदृष्ट्या कदाचित टिकून राहीलही, परंतु तिचे भावनिक स्वास्थ्य पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मानवी जीवनातील बौद्धिक आनंद, सांस्कृतिक वैभव आणि मानसिक संतुलन टिकवून ठेवायचे असेल, तर रसेल यांनी मांडलेल्या विचारांना पुन्हा एकदा उजाळा देण्याची नितांत आवश्यकता आहे. 'अनपॉप्युलर एसेज्'चा अनुवाद हा त्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न आहे. अनुवादप्रक्रियेच्या दृष्टीने माझ्यासाठी ते शिवधनुष्यच होते. रसेल यांनी पुस्तकाचे शीर्षकच 'अनपॉप्युलर' ठेवल्याने ते काहीसे क्लिष्ट झाले तरी हरकत नाही, अशी त्यांची धारणा होती की काय, अशी अनेकदा शंका येते. भरीला रसेल यांच्या शैलीनुसार त्यात ख्रिश्‍चन पुराणकथा व युरोपच्या प्राचीन इतिहासातील दाखल्यांची रेलचेल आहे. शक्य तेथे मी त्यांचे संदर्भ दिले आहेत. तरीसुद्धा वाचकांना काही दाखले अपरिचित वाटण्याची शक्यता आहे. संग्रहातील लेख १९३० ते १९४५ या कालखंडात लिहिलेले आहेत. त्यांना त्या दशकांमधील इंग्लंडच्या राजकारणाचा व समाजकारणाचा संदर्भ आहे. मराठी वाचकांना कदाचित ते संदर्भ अनावश्यक वाटू शकतील. परंतु मूळ लेखकाच्या लेखनाशी प्रामाणिक राहण्याच्या हेतूने ते अनुवादातून वगळलेले नाहीत.

'अनपॉप्युलर एसेज्'ने मला खूप काही दिले. निखळ बौद्धिक आनंद, माहिती, ज्ञान तर दिलेच; शिवाय वैचारिक स्पष्टता म्हणजे काय, तर्कनिष्ठ युक्तिवाद म्हणजे काय, निर्विष टीका आणि निष्पक्ष चिकित्सा म्हणजे काय, हेपण दाखवून दिले. मूळ इंग्रजी लेखसंग्रह मी वयाच्या सव्विसाव्या वर्षी वाचला. त्याआधी मला पाषाणशिल्प किंवा अक्षरशिल्प म्हणजे काय, हे ठाऊक होते. परंतु रसेल यांचा हा संग्रह वाचला आणि पहिल्यांदाच विचारशिल्प काय असू शकते, त्याची अनुभूती आली. या अनुभूतीत मराठी वाचकांना सामील करून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न.
आधी म्हटल्याप्रमाणे 'अनपॉप्युलर एसेज्'चा अनुवाद करणे हे माझे स्वप्न होते. मेनका प्रकाशनाचे माझे सुहृद सुजाता देशमुख आणि आनंद आगाशे यांनी ते पूर्ण करण्यास प्रोत्साहन दिले. जेथे माझी गाडी अडली, तेथे आनंदने मदत केली. पुस्तकाचे शीर्षकही या दोघांनीच सुचवले. रसेल यांना अभिप्रेत अर्थच्छटा मराठीत पकडणे हे प्रसंगी खूपच जिकिरीचे झाले. त्या वेळी राजीव साने हे माझे हक्काचे सल्लागार होते. त्यांना वेळोवेळी मी शब्दांची यादी पाठवायचे व ते तत्काळ मराठी शब्द सुचवायचे. औपचारिकतेचा दोष पत्करूनही या तिघांचे मी मनापासून आभार मानते.

हे पुस्तक अक्षरजुळणीच्या दृष्टीनेही क्लिष्ट होते. नाना प्रकारच्या पंथांची, विचारप्रणालींची, धार्मिक रुढींची नावे मराठीत लिहिणे काही सोपे नव्हते. म्हणूनच मेनका प्रकाशनाचे अनुभवी अक्षरजुळणीकार हनुमंत पवार आणि पुस्तकाचे मुद्रितशोधन करणारे उदय जोशी यांची मी आभारी आहे. पुस्तकाला अत्यंत समर्पक मुखपृष्ठाचा साज सचिन जोशी यांनी चढवला आहे. त्यांनाही मनःपूर्वक धन्यवाद!

सदर अनुवाद वाचून वाचकाला आनंद मिळो, रसेल यांच्या वैचारिक संपदेचा त्यांना लाभ होवो, अशी मी इच्छा व्यक्त करते.

- करुणा गोखले

***

अनपॉप्युलर एसेज्


प्रस्तावना - कर्क विलिस, जॉर्जिया विद्यापीठ

१९४५मध्ये बर्ट्रांड रसेल यांचा 'हिस्ट्री ऑफ वेस्टर्न फिलॉसफी' हा ग्रंथ प्रकाशित झाला आणि त्यांना हयात असलेले ब्रिटनचे सर्वांत थोर तत्त्वज्ञ समजले जाऊ लागले. रसेल हे निखळ उदारमतवाद, लोकशाही आणि विवेकवादाचे अधिकृत उद्गाते आहेत, या शब्दांत त्यांचा गौरव होऊ लागला. युद्धोत्तर युरोपचे बौद्धिक आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवन करण्यामध्ये आपणही उदारमतवादी तत्त्वे आणि लोकशाही मूल्ये यांचे प्रतिपादन करून महत्त्वाची भूमिका बजावावी, असे रसेल यांना वाटू लागले.

बीबीसीनेही रसेल यांना उशिरा का होईना 'द फ्यूचर ऑफ सिव्हिलायझेशन'सारख्या महत्त्वाच्या विषयावर व्याख्यान मालिका देण्यासाठी आमंत्रित केले. १९४५ ते १९५० या काळात रसेल यांची बौद्धिक कामगिरी किती मोलाची आहे, याची केवळ ब्रिटनमध्येच नाही, तर संपूर्ण युरोपभर आणि त्याही पलीकडे आशिया खंडात प्रकर्षाने जाणीव होऊ लागली. १९४९मध्ये त्यांना मिळालेला 'ऑर्डर ऑफ मेरिट' हा बहुमान आणि १९५०मध्ये प्रदान केलेले नोबेल पारितोषिक हे त्यांच्या प्रसिद्धीचे कळसाध्याय ठरले.

प्रसिद्धी आणि सुयश यांनी भरगच्च अशा दशकातच १९५०मध्ये 'अनपॉप्युलर एसेज्' प्रकाशित झाले. रसेल यांनी कोणत्याही विषयावर केलेले लेखन समीक्षकांना आकर्षिक करणार आणि त्यास वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळणारच, याची प्रकाशकांना खात्री असल्याने त्यांनी रसेल यांना विनंती केली, की त्यांनी आपले अप्रकाशित किंवा वाचकांपर्यंत न पोचलेले लेख संग्रहासाठी द्यावेत. त्यांच्या विनंतीला मान देऊन आठ पूर्वप्रकाशित लेख आणि चार अप्रकाशित लेख रसेल यांनी आनंदाने उपलब्ध करून दिले. या सर्व लेखांत नाझी राजवटीतील दुष्कृत्ये, वंशश्रेष्ठत्वाच्या भावनेतील पोकळपणा, हिटलरने केलेले गुन्हे यांचा वारंवार संदर्भ येत असला, तरी त्यामागचा उद्देश १९३०मधील वैफल्य आणि अमानुषपणा यांबद्दल रागे भरणे हा नसून, १९५०मधील आशास्थाने आणि भविष्याचा वेध घेणारी दृष्टी यांना संबोधणे हा आहे. मनुष्यजातीच्या वाट्याला आलेला सर्वांत महत्त्वाचा, निर्णायक आणि आव्हानात्मक काळ म्हणजे युद्धोत्तर (१९४५-१९५०) काळ, असे रसेल यांचे ठाम मत होते. म्हणूनच एखाद्या शिलेदाराप्रमाणे ते शांतिपूर्ण आणि नवनवोन्मेषी जगाची पुनर्बांधणी कोणत्या राजकीय तत्त्वप्रणालीवर आणि सांस्कृतिक मूल्यांवर केली पाहिजे, ते हिरीरीने मांडू लागले. 'अनपॉप्युलर एसेज्'च्या प्रत्येक शब्दातून आपणास प्रत्यय येतो, की रसेल यांना त्यांनी मांडलेल्या तत्त्वांविषयी वा मूल्यांविषयी कुठल्याही प्रकारची शंका वाटत नव्हती. या लेखसंग्रहातून त्यांनी व्यक्त केलेल्या उदारमतवादी ठाम निष्ठा बालपणी त्यांच्या कोवळ्या मनावर बिंबवलेल्या होत्या; तरुणपणी त्यांनी त्या घासूनपुसून सुरेखित केल्या होत्या आणि प्रौढपणी कितीही संकटे आली, तरी जिवाच्या कराराने त्यांची पाठराखण केली होती. वैचारिक स्वातंत्र्य, लोकशाही राज्यसंस्था, समन्यायी दंडयंत्रणा, वैज्ञानिक प्रगती, सामाजिक औदार्य आणि व्यक्तिगत सहिष्णुभाव या मूल्यांच्या रक्षणार्थ आपल्या प्रौढ जीवनात त्यांनी हरक्षणी जाहीररीत्या संघर्ष केला. या अर्थाने'अनपॉप्युलर एसेज्' हा लेखसंग्रह म्हणजे आडव्यातिडव्या कोणत्याही विचारांचा गठ्ठा नाही. राजकीय कृतिकार्यक्रमाची ती तपशीलवार रूपरेषाही नाही. सदर पुस्तक म्हणजे ज्या उदारमूल्यांच्या सोबतीने रसेल लहानाचे मोठे झाले, ज्या मूल्यांसाठी ते आयुष्यभर झगडले आणि ज्या मूल्यांवर नवे जग उभे असले पाहिजे, असे त्यांना ठामपणे वाटते, त्या उदारमूल्यांचे वेधक अधोरेखन आहे.

***

प्रकरण एक

मृत्युलेख

संक्षेपात :

रसेल यांची विद्वत्ता वादातीत असली, तरी त्यांची विविध विषयांवरची विधाने चांगलीच वादग्रस्त होती. रसेल म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीस केवळ इंग्लंड नाही, तर संपूर्ण युरोप आणि जगाच्या पाठीवरील इंग्लिशभाषक राष्ट्रांत घोंघावणारे वैचारिक वादळच होते. त्यांना समर्थक जसे मोठ्या संख्येने लाभले, तेवढेच विरोधकही वाट्याला आले. त्याला कारणेही अनेक होती.

आपण स्वतःस ख्रिश्‍चन समजत नाही, हे त्यांनी लेखाद्वारे जाहीर केलेले होते. धर्म कसे तर्कदुष्ट आणि प्रसंगी दुष्टही असतात, याची त्यांनी वरचेवर चर्चा केली होती. कांट, हेगेल, मार्क्स, लेबनीझ, देकार्ते यांसारख्या आदरणीय तत्त्ववेत्त्यांच्या मांडणीतील अंतर्विरोध वा विसंगती त्यांनी निर्भीडपणे वाचकांपुढे मांडली होती. 'मॅरेज अँड मॉरल्स' या पुस्तकातून त्यांनी विवाह हे स्त्रीसाठी उपजीविकेचे साधन असते, असे विधान करून परंपरावाद्यांना दुखावले होते. प्रत्येक विवाहित स्त्रीस वेश्येपेक्षाही अधिक प्रमाणात जबरी संभोग सहन करावा लागतो, असे म्हणून विवाहास पवित्र बंधन म्हणणार्‍या संस्कृतिरक्षकांचा रोष ओढवून घेतला होता.

राजकीय पातळीवरसुद्धा पहिल्या महायुद्धानंतर दोस्त राष्ट्रांनी जर्मनीची निर्घृण अडवणूक केली, म्हणून जर्मन बिथरले आणि दुसरे महायुद्ध झाले, असे विधान करून त्यांनी खुद्द स्वतःच्याच सरकारला नाराज केले होते. हिटलरने ज्यूंवर अत्याचार केले, म्हणून ज्यूंना अरबांवर अत्याचार करण्याचा परवाना मिळालेला नाही, असे बोलून त्यांनी इस्राईल आणि इस्राईल समर्थक अमेरिकेचा रोष ओढवून घेतला होता. सक्तीच्या सैन्यभरतीविरोधात रस्त्यावर उतरून त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची मान खाली केली होती. त्याबद्दल त्यांची विद्यापीठाने हकालपट्टीपण केली होती. दुसरे महायुद्ध ऐन भरात आले असताना युद्धविरोधी भूमिका घेऊन त्यांनी सर्व दोस्त राष्ट्रांना, आपल्या आप्तस्वकीयांनाही सखेद आश्‍चर्याचा धक्का दिला होता.

एकंदरीत रसेल म्हणजे ब्रिटिशांना ‘कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळा’ असेच वाटत असत. हा माणूस नको इतके खरे बोलून अडचणीत टाकेल, अशी सर्वांनाच धास्ती असे. म्हणूनच आपल्या विद्वत्तेविषयी आदर असला, तरी आपण विक्षिप्त समजले जातो, आपल्याला शत्रूही खूप आहेत याची रसेल यांना पूर्ण जाणीव होती. पण रसेल हे हाडाचे ब्रिटिश होते. परखड पण त्याचवेळी महा मिष्कील! आपल्याविषयी लोकांच्या काय भावना असू शकतील याचा अंदाज करून त्यांनी स्वतःच स्वतःवर एक मृत्युलेख लिहिला. लेख प्रसिद्ध झाल्यानंतरही ४३ वर्षे ते एक समृद्ध आयुष्य जगले.

###

तिसरे अर्ल-सरदार रसेल यांचे वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले. (अर्ल रसेल यांना स्वतःस बर्ट्रांड रसेल असे म्हणवून घेणे अधिक पसंत असे.) त्यांच्या निधनाने फार पुरातन इतिहासाबरोबरचा एक दुवा निखळला आहे. त्यांचे आजोबा- लॉर्ड जॉन रसेल हे राणी व्हिक्टोरियाच्या कालखंडात ब्रिटनचे पंतप्रधान होते. त्यांनी एल्बा येथे नेपोलिअनची भेट घेतली होती. त्यांची आजी - आईची आई - ही चार्ल्स् एडवर्ड स्टुअर्ट या इंग्लंडच्या पदच्युत युवराजाच्या पत्नीची मैत्रीण होती. बर्ट्रांड रसेल यांनी तरुणपणी गणिती तर्कशास्त्रात महत्त्वाचे काम केले. मात्र पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यांचे विचार फारच विक्षिप्त व्हायला लागले. त्यातून त्यांच्यातील संतुलित बुद्धीचा अभावच स्पष्ट होत होता व त्याची लागण त्यांच्या पुढील लेखनास मोठ्या प्रमाणात होऊ लागली. याचे एक कारण कदाचित असे असावे, की त्यांना सार्वजनिक शिक्षणाचे सुख मिळाले नाही. वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंत त्यांचे शिक्षण घरीच खासगी शिक्षकांमार्फत झाले. त्यानंतर त्यांनी केंब्रिजस्थित ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १८९३मध्ये त्यांनी रँग्लर हा गणितातील उच्चतम किताब मिळवला. विद्यापीठातील ते सातवे रँग्लर होत. १८९५ साली त्यांनी फेलो हा किताब मिळवला. त्यानंतरच्या पंधरा वर्षांत त्यांनी जी ग्रंथसंपदा निर्माण केली, तिने रसेल यांना विद्वज्जनांच्या वर्तुळात प्रसिद्धी मिळवून दिली. रसेल यांच्या साहित्यांत पुढील ग्रंथांचा समावेश होतो : द फाऊंडेशन्स ऑफ जॉमेट्री, द फिलॉसॉफी ऑफ लेबनीझ, द प्रिन्सिपल्स ऑफ मॅथेमॅटिक्स आणि प्रिन्सिपिया मॅथेमाटिका (सहलेखक डॉ. ए. एन्. व्हाइटेहड). पैकी शेवटचा ग्रंथ ही त्या काळातील अत्यंत महत्त्वाची निर्मिती ठरली. हा ग्रंथ दर्जेदार ठरला याचे श्रेय निश्‍चितपणे डॉक्टर (कालांतराने प्रोफेसर) व्हाइटहेड यांनाच जाते. या माणसाच्या इतरही लेखनातून जी दूरदृष्टी आणि आध्यात्मिक खोली प्रत्ययास येते, तिचा रसेल यांच्या विचारांत पूर्ण अभाव होता. याचे कारण रसेल यांचे युक्तिवाद कल्पक आणि चतुर असले, तरी ते अधिक उच्च पातळीवरील तर्कातीत विचारांची दखल घेत नाहीत.

रसेल यांच्या व्यक्तिमत्त्वातील आध्यात्मिक प्रगल्भतेचा अभाव पहिल्या महायुद्धाच्या काळात अत्यंत क्लेशदायक पद्धतीने उघड झाला. त्या वेळी रसेल यांनी बेल्जियमवर झालेल्या अन्यायास बेदखल केले नाही, हे जरी खरे असले, (हो! उगीच रसेल यांच्यावर अन्याय करायला नको), तरी आपला युद्धविरोधी हेकाही सोडला नाही. युद्धाने सर्वांचाच विनाश ओढवतो, त्यामुळे ते लवकरात लवकर थांबवणे हे मुत्सद्दी राज्यकर्त्यांचे व नेत्यांचे पहिले उद्दिष्ट असायला पाहिजे होते, हे तुणतुणे त्यांनी आचरटासारखे सुरूच ठेवले. पण युद्ध थांबवायचे म्हणजे ब्रिटिशांनी तटस्थ राहायचे व जर्मनांना जिंकू द्यायचे! रसेल यांच्या बाबतीत असेच म्हणावे लागते, की गणिताचा व्यासंग केल्यामुळे ते फक्त २ + २ = ४ असा हिशेबी विचारच करू शकायचे. परंतु असा विचार कधीकधी गैरलागू ठरू शकतो. एखाद्या विशिष्ट परिस्थितीत काही तत्त्वे महत्त्वाची असतात, याकडे त्यांचे दुर्लक्ष व्हायचे. युद्धकाळात ते सतत विनवण्या करत राहिले, की काय वाट्टेल ते झाले, तरी युद्ध थांबवलेच पाहिजे. त्यामुळे ट्रिनिटी कॉलेजने त्यांचे व्याख्यातापद काढून घेतले, ते योग्यच केले. शिवाय १९१८मध्ये काही महिने त्यांनी तुरुंगाची हवापण खाल्ली.

१९२० साली त्यांनी रशियाला धावती भेट दिली. तेथील शासनयंत्रणेविषयी त्यांचे फारसे काही चांगले मत झाले नाही.
त्यानंतर त्यांनी चीनला थोडी दीर्घकाळासाठी भेट दिली. चीनच्या पुरातन, परंपरानिष्ठ संस्कृतीतील विवेकनिष्ठता त्यांना फार भावली. त्यात अजूनही टिकून असलेला अठराव्या शतकाचा गंध त्यांच्या मनाला भिडला. त्यानंतरची अनेक वर्षे त्यांनी आपल्या लेखनातून समाजवाद, शैक्षणिक सुधारणा, विवाहाविषयीची लवचीक नीतिमूल्ये यांची भलावण करण्यात वाया घालवली. अधूनमधून मात्र ते चर्चेत असलेल्या तत्कालीन विषयांपेक्षा निराळ्या विषयांवर लिहीत. त्यांनी आयुष्यभर आधुनिक काळात निरुपयोगी अशा कालबाह्य विवेकवादाची कास धरली व त्यातील उथळपणा आपल्या ऐतिहासिक विषयांवरील लेखनातून शैली व अक्कलहुशारी यांच्या आधारे बेसावध वाचकांपासून दडवला.

दुसर्‍या महायुद्धात रसेल यांनी सक्रिय सहभाग घेतला नाही. युद्धास तोंड फुटण्याआधीच ते एका तटस्थ देशात सटकले. खासगी वर्तुळात बोलताना ते हटकून म्हणत, की खुनशी वृत्तीचे माथेफिरू एकमेकांना ठार करण्याच्या उद्योगात चांगला वेळ घालवतायत. त्यांना जे करायचे ते करू देत. शहाण्या माणसांनी त्यांच्यामध्ये पडू नये. हा बेन्थेमच्या काळचा विचार झाला. सुदैवाने आज तो लुप्त झाला आहे. आजचा माणूस ओळखून आहे, की शौर्य या गुणास त्याच्या उपयुक्ततेपलीकडे विशेष असे एक मूल्य आहे. हे खरे, की एकेकाळचे प्रगत, सुसंस्कृत म्हणवले जाणारे जग हे आता भग्नावस्थेस पोचले आहे. परंतु आज डोके ठिकाणावर असलेला कुठलाच माणूस म्हणणार नाही, की या महायुद्धात न्यायाच्या बाजूने लढताना कामी आलेली माणसे हकनाक मेली.

रसेल यांचे सगळे आयुष्य विचित्र उपद्व्याप करण्यात गेले असले, तरी त्यात आजच्या काळाला विसंगत वाटेल अशी एक अंतःस्थ सुसंगती होती. ती बघता एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील उच्चकुलोत्पन्न बंडखोरांचीच आठवण यावी. रसेल यांची तत्त्वे चमत्कारिक होती. परंतु कशीही असली, तरी त्यांची कृती त्या तत्त्वांनुसारच असे. ज्या बोचर्‍या टीकेपायी त्यांच्या लेखनाला गालबोट लागायचे, तो बोचरेपणा त्यांच्या खासगी आयुष्यात कधीही दिसून आला नाही. ते बोलायला स्नेहशील, मृदू होते; माणसांविषयी त्यांना निश्‍चितपणे कळवळा होता. त्यांना मित्र खूप होते, परंतु बहुतेक सर्व त्यांच्याआधी मरण पावले. मात्र जे कोणी उरले होते, त्यांना रसेल अगदी वार्धक्यातही आनंदी, उत्साहीच वाटायचे. त्याचे श्रेय अर्थात त्यांच्या सुदृढ प्रकृतीला जाते, कारण राजकीयदृष्ट्या त्यांच्या उतारवयात ते अगदी एकटे पडले होते. १६६०नंतर, दुसरा चार्ल्स पुनश्‍च इंग्लंडच्या गादीवर आल्यावर मिल्टन एकटा पडला. तसेच काहीसे वयोवृद्ध रसेल यांच्या बाबतीतही झाले. काहीही असो, गतयुगातून आपल्यापर्यंत पोचलेला रसेल हा शेवटचा माणूस; त्यांच्याबरोबरच ते युग संपले.

(टीप : सदर मृत्युलेख 'द टाइम्स'मध्ये १ जून, १९६२ रोजी माझ्या दुःखद परंतु विलंबाने झालेल्या मृत्यूखातर छापण्यात येईल (किंवा नाहीसुद्धा). एक भाकीत म्हणून तो १९३७ साली 'द लिसनर'मध्ये प्रसिद्ध झाला.)

***

नाही लोकप्रिय तरी - उदारमतवादाची कास धरी

बर्ट्रांड रसेल
अनुवाद - डॉ. करुणा गोखले

मेनका प्रकाशन

किंमत - रु. २००
पृष्ठसंख्या - १९८

***
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या माणसाच नाव ऐकल आहे . थोडस वाचलही आहे.
पण तपशीलवार ओळख नाही.
प्रस्तावना वाचून समानधर्मी माणूस वाटतोय . आता हे पुस्तक वाचल पाहिजे.

लेखाबद्दल धन्यवाद !

पुस्तकाचा लोकार्पण सोहळा निवारा पुणे इथे झाला. त्यानिमित्त परिसंवाद ही चांगला झाला. राजीव साने,प्रदीप रावत (माजी खासदार) व हरि नरके आले होते. छान शाब्दिक कसरती झाल्या.

हे पुस्तक वा इतर पुस्तक माबो खरेदी द्वारे घेण्यासाठी क्रेडीट/ डेबिट कार्डचा वापर अनिवार्य आहे असे दिसते. नेट बँकिग किंवा सीओडी सुविधा चालू करता येईल का माबो प्रशासनाला ?

सर्वप्रथम चिनूक्स यांस पुस्तकपरिचयाबद्दल शतश: धन्यवाद! Happy

बर्ट्रांड रसेल हे भारदस्त नाव आहे. प्रस्तुत पुस्तक त्यांच्या विचारांचा अभ्यास करण्यासाठी उत्तम सुरुवात ठरावे. करुणा गोखले यांचं एक विधान थोडं तपासून पाहायला पाहिजे :

>> विज्ञान कोणालाही देव करत नाही, तरी ते नम्र व लवचीक असते. याउलट धर्मशास्त्रे उद्दाम व ताठर होतात.

हे फार सरसकट विधान आहे. भारताच्या संदर्भात हे विधान धर्मशास्त्रांना कितपत लागू पडेल याची शंका आहे. भारतात धर्मशास्त्रांचे श्रुति, स्मृति आणि पुराणे असे वर्गीकरण आहे. त्यापैकी श्रुति आणि पुराणे बदलत नसतात. याउलट कालानुरूप वेगवेगळ्या स्मृति उदयास येतात. या तिहींचा परस्परसंबंध अभ्यासणं मनोरंजक आणि प्रबोधक ठरावं. रसेल यांनी केला असता तर एक वेगळाच खजिना उघडला गेला असता असं वाटतं.

असो.

आधुनिक विज्ञानाचे जनक आणि सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांचा बायबलावर गाढ विश्वास होता. रसेल यांनी न्यूटन यांच्यावर काही लेखन केलंय का ते पाहायला हवं.

-गा.पै.

सुरेख पुस्तक परिचय. अनुवादिकेचे मनोगत आवडले.
उत्सुकता निर्माण करण्याचे योग्य काम केलेले आहेस चिनुक्स. थँक्स.

<< सुरेख पुस्तक परिचय. अनुवादिकेचे मनोगत आवडले.उत्सुकता निर्माण करण्याचे योग्य काम केलेले आहेस चिनुक्स. थँक्स. >> १००%सहमत.
कॉलेजमधून बाहेरच्या जगात मीं प्रवेश करत असताना माझ्या एका मित्राने माझ्यासारख्या सर्वसाधारण माणसाला समजेल व उपयुक्त ठरेल असं रसेल यांचं 'Conquest of Happiness' हें पुस्तक मला भेंट दिलं होतं. त्या मित्राने व रसेल यानी नकळत माझ्यावर किती मोठे उपकार केलेत हें अधिकाधिक तीव्रतेने मला अजूनही जाणवतच रहातं ! जीवनाच्या महत्वाच्या अंगांवर केलेलं इतकं स्पष्ट, तर्कशुद्ध व मौलिक विवेचन तुम्हाला आयुष्यभर साथ व आधार देतं, हा माझा वैयक्तीक अनुभव.