सेयाल फुलका / सेयाल माणी

Submitted by चिनूक्स on 12 August, 2014 - 12:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. पोळ्या (आदल्या दिवशी केलेल्या) - सहा
२. कोथिंबीर - चार वाट्या
३. पुदिन्याची पानं - दहा-बारा
४. कढीलिंबाची पानं - दहा-बारा
५. लवंगा - सहा
६. दालचिनी - लहान तुकडा
७. टोमॅटो - एक मोठा
८. कांदे - दोन मध्यम
९. मोहरी
१०. हिंग
११. हळद
१२. धणेपूड - एक लहान चमचा
१३. जिरेपूड - एक लहान चमचा
१४. लसूण - आठ-दहा पाकळ्या ठेचलेल्या
१५. मीठ - चवीनुसार
१६. तेल - फोडणीसाठी
१७. तिखट - चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

१. पोळ्याचे मोठे तुकडे करावेत.
२. कोथिंबीर, पुदिन्याची पानं मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावेत.
३. कढईत लवंगा आणि दालचिनी भाजून घ्यावेत. नंतर त्यांची बारीक पूड करावी.
४. कोथिंबीर-पुदिन्याच्या पेस्टीत ही पूड मिसळावी.
५. हे मिश्रण पोळ्यांच्या तुकड्यांना व्यवस्थित चोळून पाच मिनिटं राहू द्यावे.
६. कांद्याचे उभे, पातळ काप करावेत. टोमॅटो बारीक चिरावा.
७. कढईत तेल गरम करून मोहरी, हिंग, हळद अशी फोडणी करावी.
८. नंतर त्यात कांदा घालावा.
९. कांद्याचा रंग गुलाबी झाला की त्यात टोमॅटो व कढीलिंब घालावेत.
१०. टोमॅटो शिजत आला की लसूण घालून मिश्रण परतावे. धणेपूड - जिरेपूड घालावी.
११. नंतर त्यात पोळीचे तुकडे घालून व्यवस्थित परतावे.
१२. पोळीचे तुकडे आणि कांदा-टोमॅटोचं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं की त्यात हे मिश्रण जेमतेम बुडेल इतपत पाणी घालावं.
१३. मीठ, तिखट घालून एक दणदणीत उकळी आली की गॅस बंद करून पदार्थ वाढावा.

वाढणी/प्रमाण: 
तीन-चार व्यक्तींसाठी
अधिक टिपा: 

१. तिखटाऐवजी हिरवी मिरची, लवंग-दालचिनीबरोबर मिरपूड असं वापरू शकता.
२. हा पदार्थ करायचा असल्यास आदल्या दिवशी मुद्दाम जरा जाड पोळ्या करायला हरकत नाही.
३. कोथिंबीरीची पेस्ट लवून पोळ्या फार वेळ ठेवू नयेत.
४. पाणी घालायच्या आधी कैरीचा कीस घातल्यास चव जबरी लागते.
५. नेहमीच्या फोडणीच्या पोळीऐवजी हा पदार्थ बदल म्हणून करायला हरकत नाही.
६. मोड आलेली कडधान्यं, किसलेल्या भाज्या घालून इच्छुकांनी हा पदार्थ पौष्टिक करायला (आपापल्या जबाबदारीवर) हरकत नाही.

माहितीचा स्रोत: 
सिंधी मैत्रीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लागणारे जिन्नस स त रा !
बरीच ख ट प ट आहे.
पण नेहमीच्या पोळिच्या लाडवाला पर्याय आहे. प्रिंट काढून मातोश्रीना देण्यात येईल .

दोन्ही नाही. पोळीचे तुकडे विरघळत नाहीत कारण पाणी अगदी जेमतेम घेतलेलं असतं. Happy

जाई.,
फोडणीच्या पोळीपेक्षा अगदी थोडे वेगळे घटक आहेत.

शिळ्या पोळ्यांसाठी हा खूपच खटाटोप आहे. मी तर साधा कुस्कुरा करायचा तर त्यात कांदा न घालणे टाइप्स शॉर्ट कट मारते त्यामुळे कधी केला जाईल की नाही शंकाच आहे.

तृप्ती पोळ्यांचा कुस्करा करण्यासाठी पोळ्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करुन मिक्सर्/फुड प्रोसेसर मधे बारीक करायचे, अगदि २ मिन्टात मस्त बारीक होतात.

ही रेसीपी टेस्टी वाटते आहे. करुन बघणार.

इंटरेस्टिंग....

आयडिया Light 1

>> २. कोथिंबीर, पुदिन्याची पानं मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावेत.
३. कढईत लवंगा आणि दालचिनी भाजून घ्यावेत. नंतर त्यांची बारीक पूड करावी.
४. कोथिंबीर-पुदिन्याच्या पेस्टीत ही पूड मिसळावी <<

हे आदल्या दिवशी करुन घ्यावे आणि कणकेत मिसळून पराठे/मसाला फुलके बनवावेत... जास्त बनवुन उरवावेत

दुसर्‍या दिवशी उरलेल्यांचे तुकडे करुन स्टेप ६. पासुन कृती सुरू करावी...

म्हणजे आदल्या दिवशी मस्त चटकमटक सेयाल फुलका/पराठा आणि दुसर्‍या दिवशी सेयाल माणी Wink हाकानाका Happy

चिन्मय मारेल आता मला.... पळा.... Lol

हे गेल्या आठवड्यात लिहायला काय झालं होतं?
मी सोमवारी रात्री तेरा शिळ्या पोळ्या नेहमीसारखीच फो.पो. करून संपवल्या.

वर्षू,
तुझी पद्धत लिहिशील का कृपया? माझ्या अतिशय आवडीचा हा पदार्थ आहे.

मंजू,
यावेळी चौदा पोळ्या उरव. आणि वरून कोथिंबीर घालू नकोस. Happy

चालेल. तू वरती प्रमाण सहा पोळ्यांचंच दिलं आहेस. म्हणजे चौदा पोळ्यांसाठी हे प्रमाण २.३३ पट घ्यावं लागेल.
पण आता बहुतेक पुढच्या श्रावणातच एखाद्या रविवारी इतक्या पोळ्या उरतील.

बाकी सहा नंबराची टीप भारी आहे Lol

१२ व्या क्रमांकाची पायरी गाळून हा प्रकार करण्यात आला. मी लॅपटॉपवरून वाचून दाखवत होतो आणि माझी बायको त्यानुसार प्रत्यक्ष काम करत होती...

बरेच दिवसांनी दोघांनी मिळून बनवले काहीतरी... Happy