'अस्तु' च्या निमित्ताने..

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

आयुष्यभर किती काय काय करून आपण आपलं अस्तित्व अधोरेखित करण्याची धडपड करत असतो. अगदी गर्भात प्रवेश केल्यापासून ही लढाई सुरू होत असावी. आपण 'आहोत' हे दाखवण्यासाठी हालचाली सुरू होतात त्या तेव्हापासून. रीतसर जन्म झाला, की या हालचालींना आणखी प्रतलं, आणखी अर्थ, आणखी साधनं आणि मार्ग मिळायला सुरूवात होते. बुद्धीचा विकास होत जातो आणि मग मेंदू एक भला मोठा सर्व्हर बनतो. चांगलं-बरं-बुरं-वाईट कळायला सुरूवात झाली, की अनेक आठवणींसाठी लाखो-करोडो कप्पे तयार होतात. या आठवणींतून आणि अनुभवांतून येणारं बरंवाईट शहाणपण वापरून पुढचं आयुष्य आपण जगत राहतो.

अस्तित्व अधोरेखित करण्याची या धडपडीभोवती मग इतकं आपण स्वतःला बांधून घेतो, की त्याशिवाय आयुष्य उरत नाही. पोट भरण्याची लढाई, मानसिक-शारिरीक-सामाजिक गरजा भागवण्याची जमेल तशी लढाई, मानापमान-अहंकार-प्रतिष्ठा-सुख-दु:ख हे साग्रसंगीत व्हावेत आणि 'आपल्या' इतमानाप्रमाणे वाट्याला यावेत यासाठीची लढाई.

असंही होत असावं, की या सार्‍या लढायांमिळून शेवटी नाईलाजाने आपलं अस्तित्व वगैरे बनत असावं. हे सारे झगडे, बंड, लढाया एकेक करून संपले; उत्क्रांतीसदृश प्रक्रिया होऊन हळुहळू वापर थांबवलेल्या वापरलेल्या अवयवांप्रमाणे झडत संपत नाहीसे होत गेले की मग पूर्णविराम. लढाया संपल्या, आठवणी पुसल्या, मेंदू थांबला, आपण संपलो, अस्तित्व संपलं, आपल्यापुरतं जग संपलं. आप मेला, जग बुडाले. निर्जन झालेल्या गावात एखादा स्फोट झाला- कुणी बघितला, ऐकला? हे गांव निर्जन झालं की नाही, मला माहिती नाही, मात्र मी आता त्या गावात नाही. त्या गावातल्या कोणत्याच गोष्टीशी माझा संबंध राहिला नाही. तिथं झालेल्या स्फोटासारख्या एखाद्या खळबळजनक घटनेचं अस्तित्व माझ्यासाठी नाहीच. माझ्या लेखी ती घटना घडलीच नाही..

'अस्तित्वा'च्या प्रश्नांशी जगातले किती तरी थोर विचारवंत कळत्या वयापासून त्यांच्या शरीराच्या अस्तित्वाच्या अखेरपर्यंत झगडत राहिले. स्वतःच्या आणि स्वतःभोवती असलेल्या दुनियेच्या अस्तित्वाला आव्हान देत प्रश्न विचारत राहिले. सार्‍यातून अंग काढून घेतलेला मी म्हणजे माझं खरं अस्तित्व- हे जर खरं असेल तर सार्‍यातून अंग काढून घेतलेल्या, एक प्रकारे त्या गावातून निघून गेलेल्या 'मी' या वस्तूला काही अर्थ असेल का?- असे प्रश्न जीव तोडून विचारत राहिले. 'अभाव' आणि 'अस्तित्व' हे दोन्ही एकच आहेत, किंवा एकाच संज्ञेच्या दोन बाजू आहेत- असं सिद्ध करत राहिले. अभावाचं अस्तित्व आणि अस्तित्वाचा अभाव- या गोष्टींशी खेळत 'मी'पणाचा अर्थ शोधत राहिले. आत्मा आणि शरीर- या दोन्हींच्या मिश्रणातून 'मी' वजा केला तर राहतं ते खरं अस्तित्व- यासारख्या प्रमेयांचं खरंखोटंपण तपासत राहिले. अस्तित्व, वर्तमान, भूत आणि भविष्य- या सार्‍यांचा परस्पर संबंध शोधत राहिले. 'मी', 'अध्यात्म', 'अस्तित्व' हे परस्परांशी कसे संबंधित आहेत- ते शोधत राहिले.

या अशा प्रश्नांचा सांगोपांग विचार करण्याइतका आणि त्यातून ठोस काही निष्पन्न करण्याइतका आपला वकुब नाही खरा. हे सारे थोर थोर विचारवंत निवर्तले. पण ते आता आत्म्याशरीरासकट नाहीत- म्हणजे त्यांचं अस्तित्व नाही- असं म्हणायचं का? जगातल्या विद्यार्थ्यांना आणि वाचकांना आजही वेडावून आणि मंत्रवून टाकणारे त्यांची प्रमेयं, सिद्धांत आणि अभ्यास- हे त्यांच्या अस्तित्वाचे कुठचे फॉर्म, कुठची पातळी म्हणायची?

***

मी विचारवंत खचितच नाही, पण मी 'वेडा' झालो तर काय- हा विचार तर मी सहज करू शकतो. आता 'वेडा' नक्की कशाला म्हणायचं याची काही ठोस गृहितकं मांडायची पाळी येतेच. मी साहजिकच समाजात वावरतो- चार लोकांत ऊठबस करतो, इच्छा-आकांक्षा व्यक्त करतो, त्या पुर्‍या होण्यासाठी प्रयत्न करतो. त्यासाठी सण-समारंभ-व्रतवैकल्यं-उपास-नवस करतो. राहायला घर बांधतो, काम करतो, प्रवास करतो, लिहितो-वाचतो- इत्यादी. तर आता हे सारं जो कोण करत नाही- तो 'वेडा' हे म्हणण्याशिवाय मला गत्यंतर नाही. थोडक्यात लौकिकार्थाने वेडा, तोच माझ्याही दृष्टीने वेडा.

वेडसरपणाच्या कुठच्या पातळीवर आठवणी पुसल्या जात असतील, किंवा त्यांचं रूपांतर भलत्याच एखाद्या वेगळ्या फॉर्मॅटच्या फाईल्समध्ये होत असेल- ते मला नीट सांगता येणार नाही. तेवढा अभ्यास नाही, शिवाय कलपनाशक्तीची आणि प्रतिभेची झेपही तेवढी नाही. मात्र असं माझं झालं तर माझं 'अस्तित्व' माझ्यापुरतं नक्की काय, कसं नि कुठच्या स्वरूपात असेल? 'माझ्या जाणीवा' आणि 'माझं अस्तित्व' यांचा परस्परसंबंध नक्की कसा असेल? ते बदलत्या जाणीवा आणि पुसल्या जाणार्‍या आठवणींगणिक बदलतं राहील का? जाणीवांचा संच म्हणजे माझं अस्तित्व, आणि एकेक करून या सार्‍या जाणीवा जगवून संपल्या की संपलं.. असं?

बहुतेक असंही होईल, की माझ्या वेडसरपणाची जाणीव मला कधीच होणार नाही, मी स्वतःला 'लौकिकार्थातला वेडा' कधीच मानणार नाही. माझ्या लेखी इतर सारेच वेडे असतील कदाचित! 'त्या वेडं असलेल्या' मला मग कधीतरी स्वप्नं पडतील- वेडं झाल्याची, खून झाल्याची, अस्तित्व संपल्याची, आयुष्य संपल्याची.

किंवा असंही होईल, की मीच माझ्या जगातला विचारवंत- अस्तित्वाच्या प्रश्नांशी सदोदित झगडणारा! माझ्या जगण्याचे अर्थ शोधणारा, इतर सार्‍यांच्या वेडाची कारणे शोधणारा, त्यांच्या अस्तित्वाचे नि आयुष्यांचे अर्थ शोधणारा.

किंवा मग असंही होईल की सारा भवताल, भूत नि भविष्य विसरून मी फक्त वर्तमानावर एकाग्र होईन. आठवणींचा कप्पाच नसल्याने मागची नाळ तुटलेली, संदर्भ तुटलेले. एकंदरित काय- तर 'पाठचे' दोर सारे कापलेले. लखलखीत वर्तमानाच्या प्रकाशात मी जगेन. वर्तमानात सुख आहे की दु:ख- याने मला काहीच फरक पडणार नाही. खरं तर सुख-दु:खाचे लौकिक अर्थच माझ्यापुरते बदललेले असतील. सुख आणि दु:ख यांच्या पार पोचलेलं माझं अस्तित्व लख्ख वर्तमानाच्या साथीने जगेल. मग कदाचित अस्तित्वाचे अर्थ शोधण्याचा अट्टाहास करावा लागणार नाही. या अशा- वर्तमानाशी निगडित माझ्या जगण्याचं, अस्तित्वाचं रूपडंच इतकं भव्यदिव्य राजेशाही अलौकिक आणि अस्सल धारदार पण तरीही साजूक मवाळ असेल- की त्याचा अर्थ काय, त्याचा प्रवास कसा नि शेवट कुठे- ही धडपड मला व्यर्थ वाटेल. या अशा भवताल-भूत-भविष्य विरहित जगू शकत नसलेल्या सार्‍यांना मी मनोमन हसेन. ती सारी मला केविलवाणी, व्यर्थ धडपडणारी अजाण बालकं-पामरं मला वाटतील.

स्वतःच्या फाटक्या कपड्यांपलीकडे, शरीरा-विकारांपलीकडे, इच्छा-आकांक्षांपलीकडे गेलेलं माझं अस्तित्व या विश्वाचं एक प्रतिरूप बनेल. मी परमेश्वर होईन.

***

अस्तित्वाच्या प्रश्नांच्या या बुद्धीला न झेपणार्‍या जंजाळात अडकायचं कारण घडलं- ते म्हणजे 'अस्तु' नावाची गोष्ट. 'लोकांना गोष्ट हवी असते.' नीटपणे मांडलेली, रसाळ भाषेत सांगितलेली गोष्ट तर कुणालाही आवडते. मलाही. काही थोड्या लोकांना अंतर्मुख करणारी, आपल्या जगण्याच्या, अस्तित्वाच्या प्रश्नांपर्यंत जाऊन भिडणारी, संपताना अनेक उत्तरं देणारी, पण त्याहीपेक्षा जास्त प्रश्न उपस्थित करणारी गोष्ट आवडते.

ही गोष्ट म्हणजे प्राध्यापक चक्रपाणी शास्त्री या अतिशय विद्वान माणसाच्या म्हातारपणाच्या एका दिवसात घडणारी घटना. एकेकाळी प्रकांडपंडित असलेले शास्त्री आता आजारी आहेत. काही काळापुर्वीच त्यांना विस्मरणाचा विकार जडलेला. लौकिकार्थातलं 'वेड' त्यांना लागलेलं नाही खरं, पण आजकाल डिमेन्शिया, अल्झायमरची लक्षणं ठळकपणे, वारंवार आणि गंभीर पातळीवर दिसू लागली आहेत. आणि संस्कृताच्या या गाढ्या अभ्यासकाचं चक्क 'लहान मूल' होऊन गेलेलं आहे..!

शास्त्र्यांच्या आजूबाजूला अर्थात माणसं आहेतच. रोजचं आयुष्य, धावपळ नि प्रश्नोत्तरं उपसणारे. रागलोभ-हेवेदावे, प्रतिष्ठा-अभिमान बाळगणारे. 'मी- म्हणून बापाचं करते. तुमच्याच्याने हे होणे नाही!' हे नेणीवेत कुठेतरी सतत ठेऊन वेळ आल्यावर ते बाहेर काढून दाखवणारी कर्ती मुलगी- यापासून ते बापाच्या विद्वत्तेच्या, मायेच्या प्रभेत भारावून जाणारी लेक- अशी आंदोलनं घेणारी शास्त्र्यांची लेक आहे. सतत 'मध्यबिंदू' साधू पाहणारा शास्त्र्यांचा जावई आहे. बंड करून दुसर्‍या गावी निघून गेलेली आणखी एक लेक आहे. कॉलेजात जाणारी- भलं बुरं आणि मान-प्रतिष्ठा समजू लागलेली एक नात आहे. शास्त्र्यांचं करायला आवरायला येणारा गावाकडचा एक दुरचा नातेवाईक तरूण आहे. शास्त्र्यांचे डॉक्टर वगैरेही आहेत.

शास्त्र्यांना गाडीत घेऊन ही लेक आज भर गर्दीच्या रस्त्यावर जाते. नाईलाज होऊन बाबांना गाडीत बसायला सांगून घाईगर्दीने ती काहीतरी आणायला दुकानात जाते. चुळ्बूळ करत गाडीत बसलेल्या शास्त्र्यांना मघाशी रस्त्यावरून जाताना दिसलेली हत्तीण आता पुन्हा दिसते, आणि ते लहान मुलागत खुळावतात. काहीतरी खटपट करून माहुताला पैशाचं आमिष दाखवून ते दरवाजा उघडतात, आणि स्वतःची 'मुक्तता' करवून घेतात.

मुक्त झालेल्या शास्त्र्यांचा पुढे प्रवास सुरू होतो खरा, पण रस्ता मात्र एकच सुचतो- हत्तीण जाते तिकडचा. कारण आठवणी, राहतं घर, आपल्या माणसांचं ठिकाण- हे तर आधीच विस्मरणात गेलेलं. आधी पैशाच्या आमिषाने आणि मग नंतर दया येऊन आणि मग शेवटी नाईलाज म्हणून माहुत शास्त्र्यांना सोबत घेऊन जातो, आणि त्याच्या झोपडीकडे जातो.

शास्त्र्यांना आता याआधी कधीच न पाहिलेली-अनुभवलेली, कसलाही संदर्भ नसलेली ही एक नवीन जागा मिळाली आहे. कसल्याही आठवणी जिथं पाठलाग आणि कर्कश आवाज करत येत नाहीत-असा एक नीरव भवताल आणि निरभ्र आकाश मिळालं आहे. याआधी कधीही न मिळालेली अशी स्वतःची अशी स्पेस शास्त्र्यांना मिळाली आहे. गिरवणं नव्याने सुरू करण्यासाठी कोरी पाटी मिळाली आहे. इथं सारं काही पुसलं जाऊन आजवर लाखो वेळा घोकलेल्या ज्ञानाचे अन श्लोकांचे जणू अर्थ त्यांना लागत आहेत, आणि मग त्यांचं पांडित्य कुठेतरी पूर्णत्वाला आल्यागत त्यांना वाटतं आहे. नवीनच उमज आलेल्या बाळागत ते आनंदी-समाधानी होतात. कित्येक वर्षांपुर्वी बोट सोडून निघून गेलेलं निर्व्याज बाळपण त्यांना इथं नव्याने गवसलं आहे. त्याचंच बोट नव्याने धरत त्यांनी त्यांची 'आई' देखील शोधली आहे. 'नवं अस्तित्व' जन्माला येण्याचा हा अजब खेळ जवळून बघणारी, शास्त्र्यांच्या निम्म्या वयाची माहूताची बायको त्यांची आई झाली आहे.

'भूतकाळ' विसरलेलं, विचार बंद करून वर्तमानात जगणारं- असं मन, असं आयुष्य असू शकेल का- या प्रश्नाचं उत्तर शास्त्र्यांनी एकेकाळी 'विचार थांबल्यावर सारं नीरवच की! निरभ्र आकाशासारखं, शांतता पेरणारं.. वर्तमानात जगणारा माणूस- हीच कडी असते की भूतकाळाशी त्याला सांधणारी!' असं काहीसं दिलेलं असतं. आता त्याच्यापलीकडचंही स्वतःच अनुभवणारे शास्त्री जणू नवा जन्म घेतात. आधीची हताशा, खळबळ, धडपड, लढाई सारं सारं संपतं, थांबतं. शास्त्र्यांचं जाणू आयुष्यच 'रिसेट' झाल्यागत..

आई झालेली माहुताची बायको कानशीलावर बोटं मोडत आपल्या या नव्या लेकराची दृष्ट काढून म्हणते- 'सारं काही सारखं, एकाच पातळीचं दिसतंय त्याला.. देव झालाय त्याचा!'

***

हत्ती हे बुद्धीचं, स्मृतीचं प्रतीक आहे म्हणे. 'अस्तु' म्हणजे 'So be it', 'Let it be..', 'असूदे', 'असो' वगैरे. आपला वर्तमानकाळ हा भुतकाळ आणि भविष्यापेक्षा नेहमीच शहाणा असतो. माझ्या आठवणींची भुतं-लक्तरं, बरीवाईट बुजगावणी आणि भविष्याच्या चिंता-काळज्या यांच्या माझ्या भवतालातल्या अस्तित्वापेक्षा माझ्यातल्या 'आताच्या' अस्तित्वाचं रूप जास्त अस्सलझनक, धारदार आणि लखलखतं आहे- हे त्याला नीट कळतं.

***
***

प्रकार: 

अंतर्मुख करणारे , आपल्या जगण्याच्या, अस्तित्वाच्या प्रश्नांपर्यंत जाऊन भिडणारे , संपताना अनेक उत्तरं देणारे , पण त्याहीपेक्षा जास्त प्रश्न उपस्थित करणारे लिखाण Happy

अप्रतिम! चिंतन करावे असे काही इतक्या सोप्या शब्दात मांडणे खरच खूप अवघड आहे.

एकदा वाचून मन भरत नाहीये, परत परत वाचायला, जवळ जवळ प्रत्येक शब्दा-वाक्यावर थबकायला लावणारे लिखाण....

चित्रपट बघायलाच लागणार आता....

काय सुरेख लिहिलंयस साजिर्‍या...
एका सुंदर कथेची तितकीच सुरेख कथा सांगणं, लिहिणं अवघड असतं. तितकेच समर्थ शब्द सापडणंही मुश्किल असतं. तू खूप उत्तम प्रकारे 'अस्तु' आमच्यासमोर मांडला आहेस. वाचल्यावर नक्की काय वाटलं ते सांगायला शब्द सापडत नाहीयेत.

मुंबईत हा सिनेमा कधी येतोय त्या प्रतीक्षेत...

हर्पेन,
चित्रपट जरूर बघ.
प्रभात, सिटीप्राईड कोथरुड आणि सिटीप्राईड अभिरुची इथे या आणि येत्या आठवड्यात सुरू आहे.

मुंबईत सप्टेंबरच्या पहिल्या / दुसर्‍या आठवड्यात.

मला पहायचाय सिनेमा पण तो पाहून विचारांचा जो ट्रॅक सुरू होईल त्याच भ्या वाटतय.>>>> टोकाचा डिमेन्शिया हँडल केल्यामुळे/जवळून पाहिल्यामुळे मी पण हिम्मत गोळा करुनच पाहणार आहे.

अर्ध्या तासात ३ वेळा लेख वाचला. आणि आणखी काही वेळा पुन्हा पुन्हा वाचावा लागेल. अख्खा, अधूनमधून, एखादा परिच्छेद सुटा, कसंही वाचलं तरी चालणारे असंही वाटतंय. माझी बोलती बंद झाली आहे. तू तिथे आभाळात उंच कुठेतरी बसून लिहिलंयस का हे?

>>>किंवा मग असंही होईल की सारा भवताल, भूत नि भविष्य विसरून मी फक्त वर्तमानावर एकाग्र होईन. आठवणींचा कप्पाच नसल्याने मागची नाळ तुटलेली, संदर्भ तुटलेले. एकंदरित काय- तर 'पाठचे' दोर सारे कापलेले. लखलखीत वर्तमानाच्या प्रकाशात मी जगेन. वर्तमानात सुख आहे की दु:ख- याने मला काहीच फरक पडणार नाही. खरं तर सुख-दु:खाचे लौकिक अर्थच माझ्यापुरते बदललेले असतील. सुख आणि दु:ख यांच्या पार पोचलेलं माझं अस्तित्व लख्ख वर्तमानाच्या साथीने जगेल. मग कदाचित अस्तित्वाचे अर्थ शोधण्याचा अट्टाहास करावा लागणार नाही. या अशा- वर्तमानाशी निगडित माझ्या जगण्याचं, अस्तित्वाचं रूपडंच इतकं भव्यदिव्य राजेशाही अलौकिक आणि अस्सल धारदार पण तरीही साजूक मवाळ असेल- की त्याचा अर्थ काय, त्याचा प्रवास कसा नि शेवट कुठे- ही धडपड मला व्यर्थ वाटेल. या अशा भवताल-भूत-भविष्य विरहित जगू शकत नसलेल्या सार्‍यांना मी मनोमन हसेन. ती सारी मला केविलवाणी, व्यर्थ धडपडणारी अजाण बालकं-पामरं मला वाटतील.

स्वतःच्या फाटक्या कपड्यांपलीकडे, शरीरा-विकारांपलीकडे, इच्छा-आकांक्षांपलीकडे गेलेलं माझं अस्तित्व या विश्वाचं एक प्रतिरूप बनेल. मी परमेश्वर होईन.>> विशेषतः हे पुन्हा पुन्हा वाचलं. हे काहीतरी विलक्षण लिहिलंयस.

चित्रपट संपल्यावर अरे, आता तर खरा सुरू झाला असं वाटलं. चित्रपट बघताना आणि बघून बाहेर पडताना डोकं गरगरत होतं. पायाला कापरं भरलं होतं. त्याबद्दल कुणाशी फार चर्चाही केली नाही. इतरांना बघा म्हणुन आवर्जून सांगताना चित्रपटाच्या मर्माबद्दल, आशयाबद्दल चकार शब्द काढला नाही. कारण अनंत प्रश्न, भित्या, शंकांनी मन ग्रासून गेलं होतं. कुणाशी काय आणि किती बोलायचं त्याबद्दल..

मी स्वतःला डॉ. शास्त्रींच्या भुमिकेत पाहिलं. मग इराच्या भुमिकेत. मग घरातली इतर त्याच उलटसुलट चक्रातून फिरली. हे आपोआप झालं. स्वतःला प्रश्न विचारून झाले. तो एक मानसिक व्यायामच झाला, अशक्य दमवून टाकणारा. झोप उडवणारा. तो तुझाही झालाय, पण तू किती समर्थपणे तो पेललायस..

>>>आपला वर्तमानकाळ हा भुतकाळ आणि भविष्यापेक्षा नेहमीच शहाणा असतो. माझ्या आठवणींची भुतं-लक्तरं, बरीवाईट बुजगावणी आणि भविष्याच्या चिंता-काळज्या यांच्या माझ्या भवतालातल्या अस्तित्वापेक्षा माझ्यातल्या 'आताच्या' अस्तित्वाचं रूप जास्त अस्सलझनक, धारदार आणि लखलखतं आहे- हे त्याला नीट कळतं.>> हा साक्षात्कार आहे. तो तु समर्थ शब्दात आमच्यापर्यंतही पोचवलास, मनापासून हॅट्स ऑफ!!

खरंतर रमा माधवही बघायचा होता मला. पण 'अस्तु'नं घेरलंय. आणि तो बाजूला टाकून एक भूतकाळ झगझगीत आवरणात बघून येण्याची मानसिक तयारी नाही. आणि तो नंतर कधी पाहिला तर काही बिघडतही नाही. 'अस्तु'चा वेढा त्रासदायक असला तरी हवा आहे. असे चित्रपट बनवणा-यांना धन्यवाद द्यायला हवेत की तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे मनाला खुराक पुरवता.

साजि-या, अतिशय समरसून लिहिलेला प्रभावी लेख आहे.

फार अप्रतिम लिहिलं आहेस साजिरा.
तू चित्रपट शास्त्र्यांच्या परिस्थितीनुरूप आलेल्या मानसिक आंदोलनांसहित अनुभवलास हे स्पष्टं दिसतं आहे.

आपलं आयुष्यंच एवढं गुंतागुंतीचं झालं आहे की ते कुठल्या लढाईपेक्षा कमी नाही. लढायानंतर सैनिकांच्या आयुष्यात हमखास येणार्‍या पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस आजकाल धकाधकीच्या जीवनातही प्रत्येक जाणत्या माणसामध्ये साठून राहतो आणि मग येते असे चिंतन >> 'अस्तित्वा'च्या प्रश्नांशी जगातले किती तरी थोर विचारवंत कळत्या वयापासून त्यांच्या शरीराच्या अस्तित्वाच्या अखेरपर्यंत झगडत राहिले. स्वतःच्या आणि स्वतःभोवती असलेल्या दुनियेच्या अस्तित्वाला आव्हान देत प्रश्न विचारत राहिले. सार्‍यातून अंग काढून घेतलेला मी म्हणजे माझं खरं अस्तित्व ...

साजिर्‍याचे 'परिक्षण ' ही स्वतःच एक स्वतंत्र कलाकृती आहे.मला तरी एवढे आसूसून लिहिलेले परिक्षण म्हणण्यापेक्षा रसास्वाद , रसग्रहण म्हनणे उत्तम- पूर्वी कधी वाचनात आलेले आठवत नाही ! ह्या साजिर्‍यात एक मोठ्या कपॅसितीचा लेखक दडलेला आहे पण संपादक मम्डळात गेल्यापासून 'आब ' साम्भाळायला लागतो त्यामुळे त्याने लिहायचे बंद केले अशी शंका आहे.

आयुष्य 'रिसेट ' करणे ही कल्पना लईच अफलातून....

हूड, संपादक मंडळ नाही हो, अ‍ॅडमिन टीम. Happy
कमी लिहीतो आणि क्वालिटी मेंटेन करतो. जाहिरातींचं जग ना त्याचं! Happy

सॉरी, रहावलं नाही मला. तुझं ते अवतरण चिन्हातलं मुक्तता _/\_ थबकायला लावतं! थांबा, पहा आणि पुढे न जाता अंतरात डोकवा Happy
मी तुझ्या लेखावर लेख लिहीन आता. थांबावं ते बरं.

मन:पुर्वक धन्यवाद मित्रांनो. Happy

हे अर्थातच 'चित्रपट परीक्षण' नाही. सिनेमा बघून आलेल्या अस्वस्थतेला आणि विचारांना इथं लिहून वाट करून दिली इतकंच. (याचमुळे चित्रपट ग्रुपात न लिहिता रंगीबेरंगीवर लिहिलं). परीक्षणात चित्रपटाच्या अनेक बलस्थानांचा उल्लेख करावा लागेल. दिग्गज कलाकार, त्यांचा अभिनय, दिग्दर्शन, संवाद, कथा.. अनेक गोष्टी. खुद्द प्राध्यापक चक्रपाणींच्या समोर असाच प्रसंग तिर्हाईत व्यक्तीबद्दल घडला तर 'अस्तित्वा'चे प्रश्न त्यांच्या डोक्यात येतील, थैमान घालतील असं वाटलं. 'अस्तित्वाचे प्रश्न' हा एक पाॅईंट आॅफ व्ह्यू.. असे अनेक असू शकतात.

मनात आले ते- विचार, गोंधळ, प्रश्न, दृष्टीकोन इ.- शब्दांत लिहून तुमच्यापर्यंत पोचवता आले, हा मोठा आनंद आहे. पुन्हा एकदा सर्वांना - थँक्स! Happy

____/\____

रविवारी सिनेमा बघितला. शेवट खुपच सुरेख, अप्रतिम जेव्हा शास्त्री आई हाक मारतात तो सीन तर मस्तच.
खरच खुप विचार करायला लावणारा चित्रपट.
वास्तुपुरुष सारखाच वेगळा चित्रपट

Pages