'तुम्ही फक्त लढ म्हणा!' - श्रीमती स्मिता तळवलकर

Submitted by चिनूक्स on 6 August, 2014 - 14:44

त्या दिवशी स्मिताताईंच्या घरी पोहोचायला मला चांगलाच उशीर झाला होता. 'चार वाजता येऊ दे त्याला, मग तासाभरात मुंबईला जायला निघेन', असं त्यांनी मोडककाकांना फोनवर सांगितलं होतं. तोपर्यंत मोडककाकांनी संगीत दिलेली गाणी वापरण्यासाठी मोडककाकांच्या मध्यस्थीनंच पाचसहा वेळा फोनवर त्यांच्याशी बोललो होतो. यावेळीही त्यांनीच माझ्यासाठी वेळ मागून घेतली होती, आणि लॉ कॉलेज रस्त्यावरची त्यांच्या घराची गल्ली काही केल्या मला सापडत नव्हती. मग शेवटी मला फोनवर पत्ता सांगून त्या कंटाळल्या आणि पन्नास फुटांवर असूनही सापडत नसलेल्या घरी मला नेण्यासाठी त्या खाली आल्या. त्या नुकत्याच खूप मोठ्या आजारपणातून उठल्या आहेत, हे माहीत असल्यानं दहा वेळा 'सॉरी' म्हणूनही मला वाईट वाटत राहिलं.

स्मिताताईंबद्दल मोडककाकांकडून मी बरंच ऐकलं होतं. त्यांच्याबद्दल ऐकून, त्यांनी निर्माण केलेल्या कलाकृती बघून, त्यांच्या मुलाखतींमधून त्या कलाकृतींमागच्या मेहनतीबद्दल ऐकूनवाचून त्या अतिशय शूर, धाडसी, खमक्या आणि विलक्षण प्रेमळ, वत्सल असल्याची माझी खात्रीच पटली होती. सहासात चित्रपट आणि पंचविसेक मालिकांची निर्मिती त्यांनी केली. मराठीत चित्रपट निर्माण करणं हा अस्सल आतबट्ट्याचा व्यवहार. पण स्मिताताई धाडसानं या क्षेत्रात उतरल्या. वेळप्रसंगी स्वतः फिरून त्यांनी आपल्या चित्रपटांची पोस्टरं लावली, पैसे वसूल करण्यासाठी भांडल्या, पण मराठी चित्रपटांची अवस्था बर्‍यापैकी दयनीय असताना त्यांनी आशय आणि तंत्रज्ञान यांत अजिबात तडजोड न करता उत्तम चित्रपट निर्माण केले. अनेकांची घरं त्यांनी उभी केली. अनेकांना रोजगार मिळवून दिला. यांत केवळ आज प्रसिद्धीच्या शिखरावर असलेले कलाकारच नव्हते, तर स्पॉटबॉय आणि ड्रायव्हरही होते.

मला स्मिताताईंकडून एक लेख लिहून हवा होता. दोनतीन विषय डोक्यात होते. त्यांनी निर्मिती केलेले चित्रपट, त्यांची कलाक्षेत्रातली जडणघडण असे नेहमीचे ते विषय होते. त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं आणि म्हणाल्या, "मी नुकतीच आजारपणातून बाहेर पडले आहे. कामही सुरू केलं आहे. मी माझ्या आजारपणाबद्दल लिहिलं तर चालेल का?"
मी काही उत्तर देणार, तेवढ्यात म्हणाल्या, "दिवाळी अंकात आजारपणासारखे विषय कदाचित तुम्हांला नको असतील, पण माझी भूमिका सांगते. मी अनेक वर्षं न थकता काम केलं. मला कामानं आनंदच दिला. पण हे आजारपण आलं, आणि सुरुवातीला मी थबकले. नंतर आजाराला मी स्वीकारलं. त्याला कायमचा परतवून लावण्यासाठी म्हणून स्वीकारलं. या वर्षभराच्या काळात अनेक गोष्टींचा मी पहिल्यांदाच विचार केला. लक्षात आलं की, मी सुदैवी होते. माझ्याकडे पैसा होता. माझ्या पाठीशी अनेक माणसं उभी राहिली. पण सगळ्यांनाच हे मिळत नाही. हल्ली हा आजार खूप जणांना होतो. या आजाराला काही वयाचं बंधन नाही. मग फार पैसा नसलेल्या, सतत घरची कामंच करत असलेल्या बायकांना हा आजार झाला तर? बायकांच्या तब्येतीकडे कोणाचंही लक्ष नसतं. त्यांनी सगळ्यांच्या तब्येती बघायच्या. त्यांच्या तब्येतीकडे मात्र सर्वांनी दुर्लक्ष करायचं. त्या स्वतःही लहानपणापासून स्वतःकडे दुर्लक्ष करतात. हे किती चुकीचं आहे! त्यांची तब्येत, मानसिक आणि शारीरिकही, अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून हल्ली मी प्रत्येकाला, आणि विशेषकरून बायकांना, सांगत असते, की तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. नियमित तपासण्या करून घ्या. एवढ्यात मी पुन्हा कार्यक्रमांना जाणं सुरू केलं आहे. प्रत्येक कार्यक्रमात मी हेच सांगते. आत्ता परवाच शन्नांशी बोलत होते. ते म्हणाले, 'आजारपणाबद्दल लिही, लोकांना सांग की काळजी घ्या तब्येतीची.' आणि मलाही हे खरंच सांगावंसं वाटतं सगळ्यांना. लोकांना काळजी घ्यायला हवीच, पण कुठल्याही आजाराकडे सकारात्मक नजरेनं पाहायलाही हवं. मी या सकारात्मकतेबद्दल, आनंदानं जगण्याबद्दल लिहिलं तर चालेल का?"

त्या दिवशी स्मिताताईंशी बोलताना मला सतत खुणावत राहिले ते त्यांचे डोळे. भगवान रामपुरे यांनी बुद्धाची काही सुरेख शिल्पं केली आहेत. त्यांतला एक बुद्ध मला फार आवडतो. एका प्रदर्शनात मी हे शिल्प बघितलं होतं. या बुद्धाचे डोळे काही वेगळेच होते. नेहमीसारखे अर्धोन्मीलित नव्हते ते. ते डोळे अतिशय हसरे, मिश्कील होते. त्या डोळ्यांमध्ये प्रेम होतं. त्या डोळ्यांमध्ये धाडस होतं. त्या डोळ्यांमध्ये एक वेगळंच शहाणपण होतं. 'आयुष्य एका नदीसारखं असतं. सतत वाहणारं. अनेक प्रवाह एकत्र येऊन नदी बनते. वरवर पाहता ती नदी आपल्याला एकसंध वाटते. असं वाटतं, की वर्षानुवर्षं हे या नदीतलं पाणी सतत वाहतं आहे. पण ते तसं नसतं. कालची नदी वेगळी, आजची नदी वेगळी. कालचं पाणी वेगळं, आजचं पाणी वेगळं. चिरंतन काहीच नाही. ना नदीतलं पाणी, ना आपलं आयुष्य', असं सांगणार्‍या बुद्धाचे डोळे मला स्मिताताईंशी बोलताना दिसत राहिले. स्मिताताईंच्या आयुष्याचा सारा अनुभव त्यांच्या त्या सुरेख डोळ्यांमध्ये उतरला होता. त्या चिरंतन नसलेल्या नदीचं खरं रूप त्यांनी जाणलं होतं.

स्मिताताईंनी त्या वर्षी एक सुरेख, छोटेखानी लेख लिहून दिला. हा लेख त्यांच्या जीवनदृष्टीशी अतिशय सुसंगत असा होता. सकारात्मकतेनं ओतप्रोत भरलेला. आयुष्याकडे शहाणपणानं बघायला शिकवणारा.

आज स्मिताताई गेल्या. कर्करोगाशी त्यांची चाललेली झुंज आज संपली. 'चाचा चौधरी', 'साबू', 'पिंकू', 'बिल्लू' निर्माण करणारे कार्टूनिस्ट प्राणही आज कर्करोगामुळे गेले. आपल्या सर्वांच्या आयुष्यात अमर्याद आनंदाची पेरणी करणार्‍या या दोघांना आदरांजली म्हणून स्मिताताईंचा हा लेख मायबोलीवर प्रसिद्ध करत आहे.

मायबोली परिवारातर्फे श्रीमती स्मिता तळवलकर आणि कार्टूनिस्ट प्राण यांना विनम्र अभिवादन.


***

smita-talvalkar.jpg

१७ मे २०१०. कधीही न विसरता येणारा दिवस. तसं त्याआधी तीन-चार महिने थोडीशी अस्वस्थता जाणवत होती. ती मानसिकही होती आणि शारीरिकही. कितीतरी महिने एक चांगलं प्रोजेक्ट घेऊन एका दूरचित्रवाणी वाहिनीच्या ऑफिसात वधूपित्यासारखी वहाणा झिजवत होते, पण काही केल्या काम होत नव्हतं. त्याच सुमारास पोटात थोडा जडपणा जाणवत होता. तरी बरं, व्यायाम रोजचा असायचा. पण नेहमीसारखं फिट वाटत नव्हतं. मनानं आजारी असलं, की शरीरानंही आजारी वाटतं, अशी माझी मी समजूत करून घेत होते. काही दिवसांतच पोट बिघडलं आणि संशयाची पाल मनात चुकचुकली. इतक्या तीस वर्षांच्या नाटक- चित्रपट- दूरदर्शनच्या करिअरमध्ये आडवेतिडवे प्रवास करून, वाट्टेल तेव्हा जेवण करून कधी पोट बिघडलं हा प्रकार झाला नव्हता. इतकंच कशाला, गेल्या पंचावन्न वर्षांत दोन नॉर्मल बाळंतपणं सोडली, तर डॉक्टरकडे जाण्याची वेळच आली नव्हती. ना सर्दी, ना खोकला, ना ताप. सगळे या बाबतीत माझा हेवा करायचे, 'रात्री दोनला झोपूनही तू सकाळी साडेपाचला कशी फ्रेश उठतेस?', असं विचारायचे. आता ही खरं म्हणजे देवाचीच देणगी आहे. वयाच्या सतराव्या वर्षापासून 'दूरदर्शन'मध्ये काम सुरू झालं ते आतापर्यंत. कधी घरी बसून आराम केला, असं आठवतच नाही. शेवटी नाईलाजानं डॉक्टरकडे गेले आणि त्यांनी ताबडतोब अल्ट्रासाऊंड चाचणी करायला सांगितलं.

तोच दिवस १७ मे २०१०. डॉक्टरांच्या चेहर्‍याकडे बघूनच मी समजले, काहीतरी गंभीर प्रकार आहे. मला माहीत नाही, त्यावेळी नक्की काय वाटलं मला. भीती तर नक्कीच नाही. पण खूप काळजी वाटली ती हातात घेतलेल्या कामाची, माझ्या युनिटची, मनातल्या प्रोजेक्टची. नंतरचे चार दिवस खूप वैतागले, कारण सकाळी सुरू झालेलं हॉस्पिटल संध्याकाळी संपायचं. सगळ्या चाचण्यांचे निकाल हाती आले आणि डॉक्टरांनी समोर बोलावलं. मी मनाची तयारी केली होती. इतकी वर्षं निर्मितीक्षेत्रात काम करून रोज प्रत्येक क्षणी नवनवे ताणतणाव झेलायची सवय होती. ‘‘जास्तीत जास्त काय? कॅन्सर ना? कोणत्या स्टेजला आहे ते सांगा. त्याप्रमाणे कामाचा गाशा गुंडाळायला बरा. उगीच डोक्यावर टांगती तलवार नको", या माझ्या वाक्यावर ‘आता काय बोलू?’ असा डॉक्टरांचा चेहरा झाला. ‘‘इतकं काही नाही. ओव्हरीयन कॅन्सर आहे. तिसरी स्टेज आहे. यातून बाहेर पडता येतं. कित्येक बायका पुढची वीस-पंचवीस वर्षं उत्तम जगतात," डॉक्टर म्हणाले. तोपर्यंत मनात प्लॅनिंग सुरू झालं होतं. इतकं तयार झालेलं प्रोजेक्ट कुणावर सोपवावं?

‘‘ज्या काही ट्रीटमेंट्स् असतील त्या सांगा. मी तयार आहे. ऑपरेशननंतर चार महिन्यांत कामाला लागू शकेन का?", या माझ्या प्रश्‍नावर डॉक्टरांनी समाधानानं मान डोलावली आणि मी स्वत:ला डॉ. एम. आर. कामतांच्या हवाली करून टाकलं.

मला माझी एक जीवाभावाची मैत्रीण नेहमी विचारते, ‘‘तुझ्या मनात शंका कशा कधी येत नाहीत? तू पटकन एखाद्या गोष्टीवर विश्‍वास कसा टाकतेस?’’
‘‘अगं, म्हणून तर इतके चित्रपट, मालिका, नाटकं करू शकले. सारखी शंका काढत बसले असते, तर ‘चौकट राजा’, ‘तू तिथं मी’, ‘सातच्या आत घरात’ कसे झाले असते? चित्रपटाचं क्षेत्रच बेभरवशाचं. तरीही परमेश्‍वरानं तगवलं. त्यामुळे सगळ्या काळज्या त्याच्यावर सोपवायच्या, आपण प्रामाणिकपणे आणि आनंदानं काम करत राहायचं फक्त", असं माझं त्यावर नेहमीचं उत्तर असतं आणि हे उत्तर ऐकून ती मला खूप वेळ काळजीनं निरखत राहते. यावेळीही तिनं मला हा प्रश्न विचारला. पण आता मात्र तिला काहीच बोलायचं नाही, असं मी ठरवलं. गंमत बघा, आपण घरच्यांना किती गृहीत धरतो. माझ्या मनात एकदाही मुलांचा, वडलांचा विचार आला नाही. कारण त्यांची काळजी करावी, असं कारणच नाही. सगळेजण स्वत:ला सांभाळायला समर्थ आहेत असं मी गृहीतच धरलं.

चोवीस तारखेला पहिली किमो घेतली आणि सगळा शारीरिक त्रास जवळजवळ नाहीसा झाला. किमो घेतल्यावर पहिले चार दिवस जो उलट्या, जुलाब, अंगदुखणं हा त्रास झाला, तो होणारच होता याची कल्पना डॉक्टरांनी दिली होतीच. मी मनानं एकदा सगळंच स्वीकारलं होतं. त्यामुळे त्याचा त्रास झाला नाही. मनानं सगळ्याचा स्वीकार करूनही एका गोष्टीचा मात्र त्रास झाला. दुसर्‍या किमोनंतर चार-पाच दिवसांत केसात कंगवा घातला आणि तो केसांसकट परत आला. दोन मिनिटं त्या गुंत्याकडे पाहत राहिले आणि डोळ्यांतून घळाघळा पाणी यायला लागलं. पट्दिशी धावत जाऊन खोलीचं दार बंद केलं आणि मनमुराद रडून घेतलं. साधारण पंधरा मिनिटांनी शांत झाले. आरशात स्वत:ला बघितलं आणि विचारलं, ‘तू फक्त स्वत:च्या बाह्यरूपावर प्रेम करतेस? तुझ्यातलं सुंदर माणूसपण तुला आवडत नाही? तुझ्यातले गुण, क्रिएटिव्हिटी, बुद्धी, मानसिक ताकद ही किमो नेणार आहे? मग का डोळ्यांत पाणी? या बाह्य गोष्टी आपल्या नसतात. जे आपलं आहे ते आंतरिक सुंदर 'मीपण' कुणीही हिरावून घेणार नाही. नसले केस तर विग घाल. तू किती लकी! या क्षेत्रात कलाकार असल्यामुळे तुला वेगवेगळे विग्ज घालायची पूर्वीपासून सवय आहे. आता सवय करायला हवी ती फक्त लोकांच्या नजरांची. त्यांच्या नजरेतली दया जर तुला नको असेल, तर मनापासून सगळं स्वीकार. सगळं स्वीकारलंस तरच तुझ्या चेहर्‍यावर खरा आनंद दिसेल. स्वभावातला सगळा मिश्किलपणा बाहेर काढ, तरच तुला आनंदानं सगळं पचवता येईल.’ हातांनी डोळ्यांतलं पाणी कायमचं पुसून टाकलं आणि पिशवीत सगळे केस भरले. बरी झाल्यावर माझ्यासाठीच तो विग मला तयार करायचा होता. तो आता मी काम करताना घालायला लागले आहे.

त्या दिवसानंतर वेदनांमुळे, भीतीमुळे माझ्या डोळ्यांत कधी पाणी आलं, हे मला कधीच आठवत नाही. हां, त्यानंतर डोळ्यांत पाणी आलं ते घरच्यांच्या माझ्यावरच्या प्रेमामुळे. माझा मुलगा, सून, सुनेची आई, मुलगी, जावई, माझे वडील यांनी इतकं प्रेम दिलं या काळात. विशेष म्हणजे माझा बारा वर्षांचा नातू आर्य. मी रोज रात्री तो झोपायची वाट बघायचे. तो मला सोबत म्हणून माझ्या खोलीत झोपायचा. तो झोपल्यावर मी विग काढून रुमाल बांधायचे आणि तो सकाळी उठायच्या आत पुन्हा विग घालायचे. एके दिवशी रात्री मी विग काढत असताना त्यानं माझा हात धरला. ‘‘आजी, उद्या सकाळी नको घालूस विग. खूप उकडतंय ना? मला कशाला लाजतेस? मी घाबरणार नाही. मला माहिती आहे, तू लवकर बरी होणार आणि तुला पुन्हा मोठ्ठे केस येणार. माझ्यासमोर नाही घातलास विग तरी चालेल. तू कम्फर्टेबल राहा. तुला वाटलं तरच विग घाल. मी तुला परत स्कार्फ आणून देतो आणि मग तू मला नेहमीसारखं थोपट." त्यावेळी मला खरंच आनंदानं रडू आलं होतं.

आमच्या घराखाली एक जपानी माहिकारी आध्यात्मिक केंद्र आहे. तिथे एक दिवस माझी पुतणी सीता मला घेऊन गेली. तिनं त्या सेंटरमध्ये चालणार्‍या अ‍ॅक्टिव्हिटिजचा अर्थ समजावला आणि मी रोज त्या केंद्रात जाऊन लाईट घ्यायला लागले. पूर्वीच्या काळी बुद्ध, विवेकानंद, येशू ख्रिस्त यांच्या हातातून येणार्‍या प्रकाशामुळे कित्येकांना आराम मिळायचा. आज ते नाहीत पण अध्यात्माचा हा प्रकाश आपल्याला मिळू शकतो. या सेंटरमध्ये ते शिकवलं जातं, तेही विनामूल्य. कित्येक सेवाभावी वृत्तीच्या व्यक्ती या सेंटरमध्ये विनामूल्य सेवा करायला येतात. सहा महिने लाईट घेऊन त्यातील शिकवण, समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. पन्नास मिनिटांच्या या सत्रामध्ये शरीराचे वेगवेगळे बिंदू कव्हर केले जातात. एका दिवसात नाही, पण सातत्यानं हा परमेश्‍वराचा प्रकाश घेतला तर नक्की मानसिक आणि शारीरिक फरक लक्षात येतो. मनापासून परमेश्‍वरावर विश्‍वास ठेवून तो घ्यायला हवा. ‘‘तू जे काही मला देशील ते मी स्वीकारेन. हसतहसत स्वीकारेन. तू माझ्याबरोबर राहा. मग मी काहीही सहन करेन. तुझी सोबत राहू दे," ही प्रार्थना करत तो लाईट घ्यायचा. ही जादू नाही, अंधश्रद्धा नाही, अंगारेधुपारे नाहीत. हे अध्यात्माचं ध्यान लावणं आहे. त्यातून मिळणारं मानसिक समाधान अपार आहे. त्यामुळेच मी हसतहसत ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊ शकले. शुद्धीवर आले तेव्हाही मी त्या माझ्या जिवाभावाच्या सख्याला आठवत होते, आणि त्यानंच मला बळ दिलं. त्यानंतरचे सहा महिने मी सतत रोज लाईट घेत होते.

‘हे माझ्याच बाबतीत का?’ हा सुरुवातीला वारंवार मनात येणारा विचार नंतर नाहीसा झाला. उलट ‘तुझ्यात हे सहन करायची, पचवायची, यातून बाहेर पडायची ताकद आहे म्हणून तुला,’ हा विचार पक्का झाला. जवळच्या कुणाचेही फार आभार न मानायची मला सवय होती. ती सवय आजारपणात गेली. आपल्या अवयवांचेसुद्धा आपण आभार मानायला हवेत, हे मला कळलं. किती प्रेमानं, निस्वार्थीपणानं आपली किडनी, गर्भाशय, लिव्हर, हृदय, हात, पाय, डोळे, कान आपल्याला साथ देतात... आणि हे सगळं निर्माण करणारा परमेश्‍वर? कधी आपण त्याचे आभार मानतो? त्या माहिकारी जपानी अध्यात्म पद्धतीनं मला आभार मानायला शिकवलं. दुसर्‍याचा विचार करायला शिकवलं. आपल्यातल्या चुका शोधून आत्मपरीक्षण करायला शिकवलं आणि त्याचबरोबर सगळ्या गुणदोषांसकट स्वत:वर प्रेम करायलाही शिकवलं.

आपण बायका संपूर्ण आयुष्य घरासाठी, मुलांसाठी, नवर्‍यासाठी काम करत असतो. आपली काळजी कुणी घ्यायची? कॅन्सर चोरपावलांनी येतो, पण तिशीनंतर प्रत्येक वर्षी सगळ्या चाचण्या करून घ्यायची जबाबदारी आपलीच ना? आजारी पडल्यावर हक्कानं मला औषधपाणी हवंय, ट्रीटमेंट हवी आहे, हे सांगायची जबाबदारीही आपलीच. उलट, मी बघितलंय, बाईच कानकोंडी होते. 'आता माझ्यासाठी खर्च होणार', या भावनेनंच खचते. असं नाही चालत. यातून बाहेर यायला खूप मोठा सकारात्मक दृष्टिकोन लागतो. स्वत:वर प्रेम असावंं लागतं. लढायची जिद्द लागते. सतत कामात राहायची, दुसर्‍यांना मदत करायची वृत्ती ठेवायची. समोरच्याचं दु:ख वाटून घ्यायचं. बघा, काय जादू घडते. आपल्या वेदना जाणवेनाशाच होतात. खरंच मनापासून सांगते, मला आता मरायची भीती नाही वाटत. तेवढा विचार करायला वेळच नाही इतकं काम चाललंय. उलट उत्सुकता आहे पलीकडच्या जगाची. शरीरच नाहीसं झाल्यावर काय वाटेल, याचा ओझरता अनुभव आलाय. तो पूर्ण अनुभव येईपर्यंत हातून भरपूर सेवा घडावी. काम करावं, मनापासून दुसर्‍याचं दु:ख, निराशा नाहीशी करायचा प्रयत्न करावा, हीच इच्छा! पुन्हा नव्या आलेल्या माझ्या मऊशार दाट केसांना कुरवाळत माझा आर्य रोज म्हणत असतो, ‘आजी गॉड इज ग्रेट! नाऊ यू आर लुकिंग मोअर ब्युटिफूल!’ बस्स, मी मिश्किलपणे हसत राहते.


***

पूर्वप्रसिद्धी - 'माहेर' (दिवाळी) - २०११


***

श्रीमती स्मिता तळवलकर यांचं छायाचित्र त्यांच्या खाजगी संग्रहातून.


***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर लेख चिनूक्स.

स्मिताताईंचे व्यक्तीमत्व आणि त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन अत्यंत प्रेरणादायी आहे.

छान लिहिला आहे लेख त्यांनी.
त्या दूरदर्शनवर बातम्या देत असत तेव्हापासून त्यांना बघतोय. पुर्वी त्या खुप स्थूल होत्या. त्यांनीच सांगितलेली
एक आठवण.. एकदा एक जीन्स त्यांना आवडली म्ह्णून त्या चौकशी करायला गेल्या. दुकानदाराने विचारले कुणासाठी हवीय ? स्वतःसाठी हवीय सांगितल्यावर तो हसला. त्याचवेळी त्यांनी वजन कमी करायचा निश्चय केला आणि पारही पाडला. त्यानंतर त्यांनी गजरा मधे एक प्रवेश केला होता. पुढे रंगभूमीवर आल्या. खामोशी चित्रपटावर आधारीत कथानक असलेल्या एका नाटकापासून ( बहुतेक चाफा बोलेना ) त्यांनी सुरवात केली, असे आठवतेय.

चित्रपटातील वाईट प्रवृत्तींबद्दल त्यांना तिटकारा होता आणि त्यांनी त्यावर प्रकाश टाकणारा एक लेखही लिहीला होता.

स्मिताताईंना श्रद्धांजली !
त्यांचा दिवाळी अंकात लिहिलेला लेख खरच खूप छान आहे

स्मिताताईंचे व्यक्तीमत्व
आणि त्यांचा आयुष्याकडे
पाहण्याचा दृष्टीकोन अत्यंत
प्रेरणादायी आहे. >>>>>>>> +१

Aprtim lekh...shabdach nahi,akshrshah pani aala dolyatun...smita taina shrdhanjali

लेखातून स्मिता तळवलकर यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण किती आनंदी होता हे समजते. कॅन्सर आता आपला कायमचा साथीदार झाला हे जितक्या सहजरित्या मान्य केले तितक्याच सहजतेने आपल्या आयुष्याची पुन्हा वाटचालही चालू ठेवली होती. "...जवळच्या कुणाचेही फार आभार न मानायची मला सवय होती. ती सवय आजारपणात गेली. आपल्या अवयवांचेसुद्धा आपण आभार मानायला हवेत, हे मला कळलं..." या एकाच व्याक्यात त्यानी देवाने आपल्याला किती शक्ती दिली या आजारपणात हे दर्शविले आहे.

नवशक्तीमधील एका लेखात त्यानी स्त्रियांना सल्ला दिला होता, ते वाक्य "या आजारपणातच मला जाणवू लागले की, खरंच आपण जरी कितीही कामात असलो तरी ठराविक वयानंतर स्वतःची वैद्यकीय तपासणी ठराविक वेळी घेणे नितांत आवश्यक आहे...."...

असो.... सतत हसर्‍या चेहर्‍याने वावरणारे एक प्रसन्न असे व्यक्तिमत्त्व कायमस्वरुपी पडद्याआड झाले.

>> उलट ‘तुझ्यात हे सहन करायची, पचवायची, यातून बाहेर पडायची ताकद आहे म्हणून तुला,’ हा विचार पक्का झाला

व्वा !
स्मिताताईंना श्रद्धांजली.

खुपच सुंदर लिहिलेय स्मिताताईंनी. नजिकच्या भुतकाळातील घटनांशी रिलेट झाल्यामुळे नकळत डोळे भरुन आलेत. Sad

<<जवळच्या कुणाचेही फार आभार न मानायची मला सवय होती. ती सवय आजारपणात गेली. आपल्या अवयवांचेसुद्धा आपण आभार मानायला हवेत, हे मला कळलं. किती प्रेमानं, निस्वार्थीपणानं आपली किडनी, गर्भाशय, लिव्हर, हृदय, हात, पाय, डोळे, कान आपल्याला साथ देतात... आणि हे सगळं निर्माण करणारा परमेश्‍वर? कधी आपण त्याचे आभार मानतो? >> + करोडो

फारच सुरेख लेख लिहिला आहे त्यांनी.श्रद्धांजली!

सुंदर लेख.
स्मिताताईंचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी होते. त्यांच्या कलाकृतीही नकळत आपल्याला 'स्वतःच्या आत डोकावायला लावतात'.
स्मिताताईंना विनम्र आदरांजली.

स्मिता तळवलरांसोबताचा तुमचा अनुभव तर खास आहेच, पण त्याहूनही स्मिताताईंनी लिहिलेला लेख हा त्याहूनही जास्त खास आहे.

उत्तम लेख चिन्मय.
खूप वर्षांपूर्वी स्मितामावशीच्या युनिटमधे काही काळ काम केले होते. स्त्री निर्माती म्हणून तिचं वागणं, उभं रहाणं वगैरे सगळ्याची फॅन झाले होते. नंतर तिच्या युनिटसाठी काम करायची संधी परत आली तेव्हा मी परदेशात शिकायला गेले होते त्यामुळे ते राहून गेलं.

सिनेसृष्टीत राहूनही एखादी व्यक्ति इतकी अंतर्मुख होऊ शकते, एवढी प्रेरणादायी होऊ शकते हे स्मिताताईंकडे बघूनच कळते. ग्रेट व्यक्तिमत्व. स्मिताताईंना विनम्र आदरांजली.

चिनूक्स - मनापासून आभार हा लेख शेअर केल्याबद्दल.

हा लेख वाचला होता माहेरमध्ये. त्यातलं >>>यातून बाहेर पडता येतं. कित्येक बायका पुढची वीस-पंचवीस वर्षं उत्तम जगतात << हे वाक्य चांगलंच लक्षात होतं. त्यानंतर त्यांच्या मुलाखती ऐकल्या होत्या. आजारपणातून उठल्यानंतरचं त्यांचं तेजस्वी रुप पाहिलं होतं त्यामुळे हा त्यांच्या आयुष्यातला एक अपघात असंच धरुन चालले होते. धक्का बसला काल !

काल मृणाल कुलकर्णीने "जगासाठी मी अवंतिका असले तरी माझी अवंतिका ती होती." असं म्हटलं. त्यांच्यातली कमालीची तडफ, खास 'स्मिता' टच त्यांनी दिग्दर्शित/ निर्मीत केलेल्या अनेक पात्रांमधून मला ह्यापूर्वीही जाणवलेला आहे त्यामुळे हे विधान पटलंच.

Pages