चना मदरा

Submitted by चिनूक्स on 4 August, 2014 - 01:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

१. भिजवलेले छोले - दोन कप
२. सुगंधी तांदूळ - सहा मोठे चमचे
३. फेटलेलं दही - एक कप
४. लवंगा - चार
५. मोठी वेलची - दोन
६. लहान वेलची - चार
७. दालचिनी - एक लहान तुकडा
८. काळी मिरी - पाव लहान चमचा
९. हिंग
१०. हळद - पाव चमचा
११. जिरं - अर्धा चमचा
१२. धणेपूड - एक लहान चमचा
१३. लाल तिखट - अर्धा चमचा
१४. तेल
१५. तूप - एक मोठा चमचा
१६. मीठ
१७. साखर - अर्धा चमचा
१८. पाणी

क्रमवार पाककृती: 

१. रात्रभर पाण्यात भिजवलेले छोले एक चमचा मिठासह प्रेशर कुकरात तीन-चार शिट्ट्या देऊन शिजवून घ्यावेत.
२. तांदूळ आणि लहान वेलचीचे दाणे जेमतेम बुडतील एवढ्या पाण्यात तासभर भिजवून ठेवावेत. मग त्यांचं अगदी बारीक वाटण करावं.
३. लहान कढईत (तेल न घालता) एका मोठ्या वेलचीचे दाणे, एक अख्खी मोठी वेलची, काळी मिरी, दालचिनी, लवंगा भाजावेत आणि त्यांची बारीक पूड करावी.
४. एका कढईत तेल तापलं की त्यात हिंग घालावं. नंतर मसाल्याची पूड घालून चांगलं परतावं.
५. मसाल्याचा घमघमाट सुटला की त्यात जिरं घालावं.
६. जिरं तडतडलं की हळद आणि धणेपूड घालावेत.
७. नंतर या फोडणीत शिजवलेले छोले घालून पाच मिनिटं परतावं. नंतर तिखट घालावं.
८. मिश्रण एकजीव झालं की त्यात फेटलेलं दही घालावं, आणि मंद आचेवर दहा मिनिटं सतत ढवळत राहावं. दही फाटणार नाही, याची काळजी घ्यावी.
९. गरज वाटल्यास थोडं पाणी घालावं.
१०.एक उकळी आली की त्यात तांदळाचं वाटण, मीठ आणि साखर हे जिन्नस घालावेत.
११. दहा-पंधरा मिनिटं कढईवर झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी.
१२. सरतेशेवटी चमचाभर तूप वरून घालावं.

चना मदरा तयार.

वाढणी/प्रमाण: 
चार माणसांसाठी
अधिक टिपा: 

हा पदार्थ भाताबरोबर किंवा पोळीबरोबर खाता येतो.
तिखट, मसाले यांचं प्रमाण आवडीनुसार कमीजास्त करता येतं.
मीठ घालताना छोले शिजवतानाही मीठ घातलं आहे, हे लक्षात असू द्यावं.
दही आंबट नसल्यास साखर घातली नाही तरी चालेल.
लग्नात या पदार्थात काजू-किसमिसही घालतात.
या पदार्थाची चव सौम्य असते.
फारफार वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशातल्या चंब्याच्या खोर्‍यात भटकत असताना एका हिमाचली लग्नात उपस्थित राहण्याचा योग आला. आमच्या ड्रायव्हराच्या कुठल्याश्या दूरच्या नातलगाचं लग्न होतं, आणि मग त्याच्याबरोबर आम्हीही चंब्याजवळच्या त्या खेड्यात गेलो. लग्नातल्या किंवा सणासमारंभाच्या सामूहिक हिमाचली जेवणाला 'धाम' असं म्हणतात. चना मदरा, (चने का / आलू का / कद्दू का) खट्टा, मुंगौडी सब्जी, आलू पालडा, माल पुडा, मोटी सेवैयाँ, मीठे चावल, साबूत माह, दाल माहनी, राजमा, कढी असे अनेक पदार्थ या धामात असतात. तर, त्या लग्नातल्या स्वयंपाक्यानं दिलेली ही पाककृती.

माहितीचा स्रोत: 
हिमाचली लग्नातल्या स्वयंपाक्यानं दिलेली पाककृती.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगळाच पदार्थ आहे. मी करणार नक्की..
फोटो द्या की साहेब...
तेलात मसाला परतून झाल्यावर जिरं घातलं तर ते तडतडण्याची क्रीया होते का?

चिन्मय, अगदीच वेगळी आहे पाकृ! कसं लागेल त्याचा अंदाज नीट येत नाहिये. तांदुळाच्या उकडीत छोले असं काहिसं डोळ्यासमोर येतंय Happy तुला आवडला होता का हा पदार्थ?

तेलात मसाला परतून झाल्यावर जिरं घातलं तर ते तडतडण्याची क्रीया होते का? >>> एक्झॅक्टली असंच वाटलं मला. आधीच काही तेलात घातलं असेल तर मोहरी, जिरं तडतडत नाही.

मंजू,
पुरेसं तेल असेल तर होते. वाटल्यास (म्हणजे तुला वाटल्यास) आधी जिरं टाक. Happy पदार्थ केला की फोटो टाकेन.

केश्विनी,
जबरी लागतो. तांदूळ अगदी थोडे असल्याने उकडीसारखी चव काही नसते. बुंदीचा खट्टा, माहनी या पाककृतीही टाकेन.

वक्के!
मी आधी केला तर मीही फोटो टाकेन Wink
फ्रिजात सापडली आणि मोह झाला तर यात कोथिंबीर टाकावी काय?

आमच्यात पण करतात लग्नाच्या जेवणात /धाममध्ये मदरा. पण आम्च्यात चने न वापरता रौंगी (चवळी) ची मदरा करतात.दही, चवळी, ड्राय फ्रुट्स असं सगळं असतं त्यात.

दाल (काली आणि चनेची वेगवेगळी), माणी (कद्दू का खट्टा), मदरा, मीठा सलुणा, चावल हे आमच्या गावात धाममध्ये किंवा कुठलायाही देवकार्यात गावजेवणात कच्ची रसोई असेल तर करतात. पक्की रसोई असेल तर छोले-पुरी, रायता , मिक्स गुलाब, एखादा गोड पदार्थ (शक्यतो गुलाबजाम) .

माणी कद्दूची आणि चण्याची पण असते. पण कद्दूची माणी जास्त पॉप्युलर. हिमाचलात ३-४ प्रकारच्या माणी आणि २-३ प्रकारच्या मदरा असतात जेवणात. आणि आमच्याकडच्या मिठा सलुणा ऐवजी त्यांच्याकडे सरळ मीठे चावल.

हे सगळं जेवण पत्रावळ्यांवर असतं. मजा येते धामचं जेवण करायला.

यावेळी दिवाळिच्या वेळच्या धामच्या वेळी मुलुख अंकल (आमचे परंपरागत न्हावी काका आणि धामच्या जेवणाचे स्वैपाकी) कडून रेसेपी घेते. त्यांच्या हातचं धामचं जेवण खूप टेस्टी असतं.

साहित्य वाचताना पंजाबी छोले राईस वगैरे टाईप वाटलं, पुढे तांदळाचं वाटण म्हटल्यावर वाटलं तमिळी भाऊबंद दिसतोय!! तर हे महाशय हिमाचलातले निघाले. Proud

पण करून बघणार. वन डिश मिल म्हणून चांगलं लागेल का?

नाय नाय, वन डिश मिल म्हणून विचार पण नका करू. २ प्रकारच्या डाळी, मदरा, माणी, थोडासा मीठा सलूणा असं सगळं भातात एकत्र कालवून खायला मज्जा येते. Happy

माणी - कद्दूची आंबट पातळ डीश. मीठा सलुणा - किसमीस,बडीशेप, आणि थोडा खडा मसाला, ड्रायफ्रूट्स घातलेला साखरेचा कच्चा पाक.

Bhoomipujan,4th_oct_08_4-30-2009_7-56-52_AM.jpg
आयामच्या जावळाच्या वेळी धामची तयारी करताना

Bhoomipujan,4th_oct_08_4-30-2009_7-59-55_AM.jpg

माणीसाठी कद्दू कापताना घरातली मंडळी.

(दोन्ही फोटो इथे रिलेव्हंट नाहीत. नंतर काढून टाकेन)

अल्पना,
फोटो असू दे. अजून असतील तर टाक इथे. किंवा धामाबद्दल स्वतंत्र लेख लिही.
मला विदर्भातल्या भंडार्‍यांचे फोटो काढायचे आहेत.

अल्पना अजून लिही.

चिन्मय, रेसिपी मस्त. लगेच करुन बघणार.

दह्यातच तांदळाचे वाटण एकत्र करुन मग ते घातले तर फाटण्याची धास्ती रहाणार नाही असं वाटतं.

रेसिपी वेगळीच आणि छान वाटतेय.

आपण ताकाच्या कढीत जस थोड बेसन घालतो दाटपणा यायला तसच हे तांदळाच वाटण असणार. आम्ही सुक्या माश्यांच्या कालवणातही तांदळाच पिठ वापरतो थोड दाटपणासाठी.

छान आहे कृती. करुन बघीन.
अल्पनाकडून रेसिपी कधी येताहेत त्याची वाट बघतोय.

पुढच्या वविच्या सांकाची तजवीज करतोयस काय चिनुक्स? Wink

वेगळाच प्रकार आहे मात्र. कोणी करणार असेल तर मला बोलवा रे जेवायला.

वेगलीच व सोपी पाक्रु. नक्की करुन पाहणार. माझ्या सासूबाई धूवण (तांदूल धुतलेले पाणी )भाज्यात टाकायच्या दाटपणा येण्यासाठी अर्थात तांदूल घरचे बिना पाॅलीशचे असायचे, आठवण झाली.

अरे वा, वेगळीच पाककृती. लगेच करणार !

या पदार्थाची चव सौम्य असते. >>> हा एकच निकष सुद्धा पुरेसा आहे खरंतर रेसिपी ट्राय करण्यासाठी Wink

मस्त वेगळी रेसिपी. करून पाहतो. अल्पना तुमचीही रेसिपी छान आहे. स्वतंत्र लेख लिहाच.

आत्तापर्यंत आलं-लसूण न घालता छोले कधीच केले नव्हते. छान लागतोय चना मदरा. जाडसर पुरी किंवा लोण्यावर भाजलेल्या पराठ्याबरोबर मस्त जाईल हा प्रकार असं वाटलं. धन्यवाद Happy

Chana Madra.jpg

Pages