इमोशनल फूल

Submitted by स्नू on 1 August, 2014 - 08:30

दोन अनुभव...

माहीत नाही आम्ही फसलो की सत्पात्री दान झाले..

प्रसंग पहिला :

वेळ : संध्याकाळचे ७- ७: ३०

ठिकाण: ट्रॅफिक लाइट, नवी दिल्ली

ट्रॅफिक लाइटवर बराच वेळ आमची कार थांबली होती. रस्ता दुभाजकावर साधारण सत्तरीच्या घरातली एक वयस्कर स्त्री खाली मान खालून बसली होती. मळकट पंजाबी ड्रेस...केस विस्कटलेले पण डोक्यावरून घेतलेल्या ओढणीमुळे लपलेले..पंजाबच्या खेड्यामधून आलेल्या स्त्रिया दिसतात तशी ती दिसत होती. माझे लक्ष वेधून घेतले ते त्या स्त्रीने घातलेल्या सोनेरी फ्रेमच्या चष्म्याने. एखाद्या साधन घरातल्या स्त्री प्रमाणे ती दिसत होती....आणि क्षणात मला वाटले की कदाचित ही वाट चुकलेली, स्मृतिभ्रंश झालेली कोणी वृद्धा तर नाही. मी नवर्‍याचे तिकडे लक्ष वेधले आणि त्यालाही कदाचित तेच जाणवले असावे कारण त्याने गाडी वृद्धेच्या थोडी जवळ नेली आणि काच खाली करून तिला विचारले... "माताजी, कही जाना है आपको? घर छोड दू?" तशी ती वृद्धा रडू लागली आणि पंजाबी मिश्रित हिन्दी मध्ये बोलू लागली. शब्द आठवत नाहीत कारण मी तिला न्याहाळण्यात मग्न झाले होते पण " नवरा मेल्यावर मुलाने घराबाहेर काढली", "नवर्‍याचं घर पण स्वतःच्या नावावर केलं आहे", "पण आता परत गावी जाणार आहे" असे ती सांगत होती. एकंदरीतच खूप दयनीय अवस्था वाटत होती तिची. माझ्या नवर्‍याने एक मोठी नोट काढली आणि तिच्या हातात ठेवली. मी थोडे चमकूनच त्याच्याकडे पाहिले. पण आता काही बोलून फायदा नव्हता.... ती दुवा देत होती... घरी जाऊन मी पीठ विकत घेणार आणि रोटी खाणार असे ती सांगत होती.. तेव्हड्यात पुढची गाडी हलली..आणि आम्हीही मार्गस्थ झालो.. दोन तीन मिनिटात घडलेला हा प्रसंग... माझ्या हळव्या नवर्‍याच्या डोळ्यातून आलेले पाणी मी पाहिले पण गप्प राहिले...किंवा समजूच शकले नाही की खरच ती गरजू होती की आम्ही फसलो... पैसे गेल्याचे दु:ख नाही पण अश्या प्रकारे जर emotional fool बनवले गेले असेल तर..........

प्रसंग दूसरा:

वेळ : संध्याकाळचे १० - १०: ३०

ठिकाण: सरवणा भवन च्या बाहेर, कनोट प्लेस, नवी दिल्ली

अप्रतिम दाक्षिणात्य पदार्थांचा स्वाद घेऊन आम्ही बाहेर आलो. .डिसेंबरच्या थंडीत मस्त गार वर सुटलं होतं...पार्किंग थोड दूर असल्यामुळे आम्ही गप्पा मारत चालू लागलो.

तेव्हड्यात एक साधारण ३०-३५ वर्षाचा तरुण आमच्या जवळ आला आणि मोडक्या तोडक्या हिंदीत म्हणाला महाराष्ट्रातून आलोय कोणीतरी पाकीट मारलयं, परत जायला पैसे नाही आहेत, मी भिकारी नाही आहे, शेतकरी आहे, काम शोधायला आलो होतो इत्यादि इत्यादि. त्याने महाराष्ट्र म्हणताच मी मराठीतून बोलायला सुरवात केली आणि त्याला विचारलं की कुठून आलात? त्याने विदर्भातल्या कुठल्याश्या गावाचे नाव घेतलं आणि एक कार्ड पण काढून दाखवलं. त्यावर त्याचं नाव, गावाचं नाव, पेशा – शेतकरी असा काहीसं लिहिलेलं होतं. तो बोलत होता मुलीला थंडी वाजते आहे पांघरायला काही नाहीये...एका तिशीतल्या बाईकडे आणि तिच्या कडेवरच्या छोट्या मुलीकडे बोट दाखवलं..ते पाहून त्याची ती बायको पण जवळ आली आणि म्हणायला लागली...ताई, भिकारी नाही हो आम्ही..परत जायचं आहे गावाकडे.. मी कुडकुडणार्‍या छोट्या मुलीकडे नजर टाकली..

शक्यतो दिल्लीत मराठी माणूस दिसत नाही..मराठी ऐकण्यासाठी कान तसरतात...आणि अश्या वेळी का कुणास ठाऊक मराठी भाषिक बघितल्यावर मला गहिवरून येत असावं..कारण मग मी बोलायचं प्रयत्न करते..मला सगळीच दिल्लीला आलेली मराठी माणसं आपली वाटू लागतात...ते खोटं बोलत नसणारच असा पूर्वग्रहही करून घेते..हा निश्चितच भयंकर प्रकार आहे..

आम्ही परत एकदा emotional fool बनलो..मी नवर्याणकडे पाहताच त्याने पैसे काढून त्या माणसाला दिले..

नवर्या च बरं आहे..तो एकदा गोष्ट घडून गेल्यावर लक्षात ठेवत नाही की त्यावर विचार करत नाही..चांगल्या वाईटाचे लेबल चिकटवत नाही..मी मात्र कायम कोड्यात...आपण बरोबर केलं का? त्या माणसाने आपल्याला फसवलं तर नसेल? आपण का दर वेळेस इतके भावनिक होतो?

प्रसंग दोन.. समान मनोवस्था..समान भावना...

फक्त एकच इच्छा आहे माझी...ती वृद्धा आणि तो कुटुंब कबील्यावाला तरुण मला परत दिसू नये...माझ्यासारख्याच एखाद्यापुढे हात पसरलेले...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या प्रसंगाबद्दल काही कल्पना नाही पण दुसरा प्रसंग काही जणांच्या बाबतीत घडलेला मागे कधीतरी ऐकला / वाचला आहे. तो एक घसघशीत भीक मागण्याचा प्रकार आहे.

कारण त्याने गाडी वृद्धेच्या थोडी जवळ नेली आणि काच खाली करून तिला विचारले... "माताजी, कही जाना है आपको? घर छोड दू?" तशी ती वृद्धा रडू लागली ....................

>>>>
स्पष्टवक्तेपणाबद्दल माफी, मात्र या प्रसंगात ती वृद्ध स्त्री आपल्याकडे मदतीसाठी आली नसून आपण गाडी तिच्याजवळ नेत काच खाली करत विचारणा केली आहे. पुढे मग तिने स्वताहून पैश्यांची मदत मागितली असाही वर उल्लेख नाही म्हणजे तिची रामकहाणी ऐकून (कदाचित तिने आर्थिक मदतीची हिंटही दिली असेल, तरीही) एक मोठी नोट आपण स्वताहून दिल्यासारखे वाटते. त्यामुळे या केसमध्ये ती बाई फसवणारी असावी असा उल्लेख मला रुचला नाही.

दुसर्‍या प्रसंगाबाबत येस्स, फसवणूकीची शक्यता आहे. आणि याबाबत आपण लेखात दिल्याप्रमाणे आपल्या नवर्‍याचाच आदर्श ठेवणे उत्तम. नेकी कर दर्या मे डाल Happy

दुसर्‍या प्रसंगात लिहील्याप्रमाणे दिल्लीत जर शक्यतो मराठी माणूस दिसत नसेल तर त्यांच्या मराठी आहे म्हणुन फसवण्याच्या नाटकाला जास्त वाव नाहीये.

एखाद्या व्यक्ती कडून एकदा फसवले गेलो तर ती आपली चूक नसते. ती फसवणायाची चूक असते.

तसंही दान करताना आपण आपली बाजू बघायची असते. आणि तुमच्या नवयासारखं एकदा गोष्ट घडून गेल्यावर विसरता आलं पाहंजे नाहितर आपल्याच डोक्याला भुंगा लागतो.

आणि मदत करायला हवी होती हा भुंगा लागण्यापेक्षा निदान मदत केली हा भुंगा चालेल एकवेळ.

माझंही होतंय गं असंच!
माझी आई मागे लागलीय माळीण ग्रस्ताना सकाळ रिलिफ फंडाकडे दान करूया. रक्कमही भरपूर देऊ इच्छितेय. पोचेल का गरजूंपर्यंत अशी सारखी शंका येतेय!!

ऋन्मेऽऽष,

दुसर्‍या प्रसंगाबाबत येस्स, फसवणूकीची शक्यता आहे. आणि याबाबत आपण लेखात दिल्याप्रमाणे आपल्या नवर्‍याचाच आदर्श ठेवणे उत्तम. नेकी कर दर्या मे डाल स्मित >>> कळतं पण वळत नाही... Happy

मीरा,
मला नाही वाटत तु फसवली गेले. दोन्ही खर वाटतात. >> तसेच असो ..

पोचेल का गरजूंपर्यंत अशी सारखी शंका येतेय!!
>>

अरे असे करू नका, आईंची इच्छा आहे आणि तुम्हालाही शक्य आहे तर करा मदत. विश्वासार्ह सोर्स हवा असेल तर त्यासाठी सल्ला मागणारा धागा काढा मायबोलीवरच. यात तुम्ही आपल्या मदतीची / दानाची जाहीरात करत आहात असा विचार मनात आणू नका. यानिमित्ताने माबोवर एक चांगली प्रथा पडेल किंवा असे धागे आधीही निघाले असण्याची शक्यता आहे.