म्हातारी

Submitted by संतोष वाटपाडे on 1 August, 2014 - 03:01

कुंकूमरेषा जुनाट कळकट
रुंद कपाळी विस्कटलेली
ठिपके ठिपक्यांनी बनलेली
त्वचा वयाने सुरकुतलेली
वस्त्र जरीचे पांघरलेली
आत जराशी पोखरलेली
काटक थोडी भेदक थोडी
पोकळ काठी घेउन हाती
बजरंगाच्या ओट्यावरती
एक म्हतारी झोपायाची.....

जुनाट गोणी अंथरलेली
त्यावर नाणी मंतरलेली
जखमांवरती चिंध्या बांधून
पाय पसरुनी तेथे लांबट
रस्त्यावरती कधी मंदिरी
किलकिल डोळे करुन अलगद
बघताना अन हसतानाही
भजन जुनेसे गात मजेने
देरे बाबा एक रुपैया
असेच काही बोलायाची....

शाळेमध्ये जातायेता
मित्रमंडळी माझ्यासोबत
बजरंगाचे दर्शन घेऊन
भाळावरती शेंदूर लावून
ओट्यावरच्या म्हातारीची
कधी घोंगडी ओढायाचो
चिडल्यावरती नाचायाचो
तिच्या उशीला साचवलेले
मऊ मुरमुरे लाह्या काही
अगदी गुपचूप चोरायाचो....

नको नकोशा शिव्या हासडुन
कधी उशाचा दगड आपटून
पोकळ काठी वर उगारुन
ती आम्हाला हाकलायाची
तरीही ठरलेल्या वेळेला
गोणीवरती निजल्या निजल्या
सुकले थकले डोळे झाकून
रोज उशाला आमच्यासाठी
कधी मुरमुरे लाडु लाह्या
आमच्या नकळत ठेवायाची....

एके दिवशी सुट्ट्यांनंतर
तिला पाहण्या गेलो जेव्हा
दिसली नाही ओट्यावरती
मंदिरातही दिसली नाही
कुणी म्हणाले गेली वरती
देव पाहण्या वैकुंठीचा
ऐकून थिजलो पाषाणागत
हसलो नाही रडलो नाही
तेव्हापासून मात्र कधीही
मंदिरात त्या गेलो नाही....

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऐकून थिजलो पाषाणागत
हसलो नाही रडलो नाही
तेव्हापासून मात्र कधीही
मंदिरात त्या गेलो नाही....

त्यात एवढं मनाला लावून घेण्यासारखं काय आहे ? प्रत्येक माणूस म्हातारा होवून मरणारच .

सुकले थकले डोळे झाकून
रोज उशाला आमच्यासाठी
कधी मुरमुरे लाडु लाह्या
आमच्या नकळत ठेवायाची....
...हे त्याचे उत्तर आहे मोहिनीजी....लळा असतो माणसाला माणसाचा.....त्यातंच लहान वय!