परका पाऊस

Submitted by चाऊ on 31 July, 2014 - 11:18

परदेशी, परगावी, कसा परका पाऊस
अनोळखी सरी, पडती दारी, नको तू न्हाऊस

पागोळ्यांच्या लयीचा ताल अनोळखी
कुंद सावळा अंधार अनोळखी
गार वा-याचा स्पर्श अनोळखी
नाही कुणी ओळखीच जवळपास

गंध ओल्या मातीचा येथला वेगळा
भिजणा-या मुलांच्या मुखी शब्द आगळा
कुणी काही बोले, ना येई आकळा
कसे सांगु गुज माझ्या मनीचे कुणास

आठवते हिरवाईतली तांबडी वाट
किनारी फुटणारी उधाणाची लाट
माडा-पोफळीतून बरसातीचा सरसराट
त्या श्रावणाची लागे मनास आस

Group content visibility: 
Public - accessible to all site users