खरच ?

Submitted by चाऊ on 31 July, 2014 - 04:26

खरच तुझ्या आत काही हलत नाही
पाहून ह्या जलधारा?
नाही उठत गोड शहार तनुवर
स्पर्शता लाडीक वारा?

रोजचच रहाट गाडगं, एक भरलं,
पुन्हा जहालं रितं
तोलून मोपून बोलायच, वागायचं
पाळायची जनरीत
आज गडगडले घन आली बरसात
स्वच्छंद भिजायच जरा
खरच तुझ्या आत काही हलत नाही
पाहून ह्या जलधारा?

हिशेब ठिशेब सगळे अचूक
दिस जातो हेच पहात
जागच्या जागी निटनेटकं स्वच्छ
दिसतय ह्या घरात
थोडा वेळ तुडवुन चिखल, अनुभवुया
हिरवा परिसर सारा
खरच तुझ्या आत काही हलत नाही
पाहून ह्या जलधारा?

आयुष्यभर जगायच सुरवंटासारखं,
घुसमटत आत
नाचावं पावसात बनावं फुलपाखरु
टाकून कात
हेच जगणं खरं, जपुन ठेवावा हाच
खजिना खरा
खरच तुझ्या आत काही हलत नाही
पाहून ह्या जलधारा?

Group content visibility: 
Public - accessible to all site users