"कळसुबाई" एका वेगळ्या वाटेने
१० वी च्या मे महिन्याच्या रजेतच मी झाडावरून पडून पाय मोडून घेतला. आता या घटनेला १९ वर्षे होऊन गेली. या दरम्यान माझ्या पायावर तीन शस्त्रक्रिया हि झाल्या तरीही माझे क्रिकेट, कबड्डी , बाईक टूर असे अनेक उद्योग आजतागायत चालू आहेत पण आता "कळसुबाई" म्हणजे ............अबब........
"कळसुबाई" महाराष्ट्रातील सर्वोच्य शिखर समुद्रसपाटी पासून ५४०० फुट म्हणजे माझ्यासाठी हे दिव्यच होते पण आमच्या १८ डॉल्फिन ट्रेककिंग आणि बाईकिंग ग्रुप ( 18 Dolphins trekking & biking group ) साथीला असल्याने मी कळसुबाई नक्की सर करीन असा मला विश्वास होता. बऱ्याच मिटिंग नंतर १२ / १३ जुलै २०१४ हा मुहूर्त ठरला. शनिवारी संध्याकाळी ६ वा. सफाळे स्टेशन जवळ सगळे जमूया असे ठरले. शनिवारी सकाळ पासूनच whatsApp वर चर्चा चालू झाल्या होत्या. खाण्याचे काय घ्यावे, sleeping bag घ्याव्या कि नाही. इत्यादी इत्यादी....... आज माझे लक्ष ऑफिस मध्ये मुळीच लागत नव्हते. ४.३० लाच ऑफिस मधून निघालो. सत्येन म्हणजे आमचे मोठे बंधुराज आणि धीरज वेळेवर न आल्याने घरून निघता निघताच आम्हाला ६ वाजून गेले होते. सफाळयाला वाट पहात असलेली बाकीची मंडळी मला एका मागुन एक फोन करत होते. या दरम्यान अनेक वेळा माझा फोन वाजून गेला होता. आम्ही कॉलीस घेऊन सफाळयाला ७ वा. पोहोचलो पण अमोल, धीरज, सत्येन, स्वप्नील(मामा), पण्या, कामनिश, विनय(अण्णा), जग्गू ,महेश, संजू,जयदीप (मी) अशी एकूण ११ माणसे झाल्याने आणखी एक गाडी घ्यावी असे सर्वानुमते ठरले. लगेचच विनय (अण्णा) त्याची मारुती इस्टीलो घेऊन आला. आणि आमची वारी निघाली कळसुबाईला.
वरई फाट्यावर थांबून ( सफाळ्यावरून national highway no ८ ला जोडणारा नाका ) एक एक चहा झाला. ‘वाडा highway वर छान जेवण मिळते आणि पुढे जंगल असल्याने पुढे घोटी गावा पर्यंत कुठे हि हॉटेल नाही’ असे जग्गू म्हणाला म्हणून वाडयालाच जेवण करुया असे ठरले. साधारण ८.३० ला वाडयाला पोहचलो जेवून निघेस्तोवर १० वाजले. आता आमचे लक्ष होते घोटी गाव.
वाडा ते घोटी हा पूर्ण रस्ता जंगलातून जातो आणि वेळही रात्रीची त्या मुळे एखादा बिबटया दिसतो का ? या आशेने आम्ही घोटी गावा कढे निघालो. मात्र रस्त्यात एक जंगली सश्या व्यतिरिक्त काहीही दिसले नाही. त्यात जंगलात डोंगरावर पूर्ण धुके पसरल्याने रस्ताही नीट दिसत नव्हताच. धुक्यातून वाट काढत आम्ही घोटिला पोहोचेस्तोवर रात्रीचे १२ वाजले होते. आता आम्हचा हॉटेल शोधण्याचा कार्यक्रम सुरु झाला मात्र एवढ्या रात्री आम्हाला एकही हॉटेल मिळत नव्हते. हॉटेल मध्ये झोपवायाचे आहे असे आधीच ठरलेले असल्याने फार कमी लोकांनी sleeping bag आणली होती आम्ही नेहमी ट्रेकला जाताना sleeping bags घेत असू आणि जिथे कुठे देऊळ ,शाळा मिळेल तिथे झोपत असू. बराच वेळ शोधाशोध केल्यावर " हॉटेल द्वारका " मिळाले. पण तिथे हि सामसुम झाले होते. हॉटेलच्या दारातच एक काका झोपले होते. त्यांना झोपेतून उठवून विचारले 'रूम मिळेल का?' उत्तर नाही असे आले. आता काय करावे या विचारात असतानाच वरून 'आवाज आला चाचा क्या हुवा' वर गॅलरीत एक मुलगा उभा होता. आम्ही विचारले रूम मिळेल का ? त्याचेही उत्तर नाही असेच आले. पण आम्ही त्याला गयावया केल्यावर त्याने दोन रूम दिल्या खऱ्या पण रूम अगदीच गलिच्छ न धड बाथरूम न बिछाने आणि त्यात कोंदट वास पण आता रात्री हुंदडत बसण्या पेक्ष्या इथेच ४/५ तास पडू आणि सकाळी ७ ला निघू असे ठरले. ह्या सगळ्या भानगडीत रात्रीचे २ वाजले होते. मुंबईवरून येणारे देव आणि स्वप्नील अदयाप पोहचले नव्हते त्यांना फोन केल्यावर असे कळाले कि रात्री ३ वा. पर्यंत ते पोहचतील आणि ते गाडीतच झोपणार आहेत. तसाही झोपायला खूपच उशीर झाला होता त्यामुळे कुणी मळक्या गादिवर तर कुणी sleeping bags मध्ये असे २ रूम मध्ये झोपलो.
पहाटे मामाच्या लाथेनेच मला जाग आली तशी हि फार निवांत अशी काही झोप लागलीच नाही मुळी. एक एक करून सगळेच उठलो आणि प्रातर्विधी आटपून खाली उतरलो तर देव आणि स्वप्नील आमची खाली वाट पहातच होते. आता आम्ही एकूण ३ गाड्या आणि १३ जण असे पेंशेत गावाकढे निघालो वाटेत हलका चहा नास्ता झाला. घोटी बुदरुक ते पेंशेत साधारण २८ ते ३० कि .मी. दूर आहे. पेंशेतच्या आधी ५ कि.मी. बारी गावावरून कळसुबाई चढण्यासाठी सोप्पा आणि रुळलेला मार्ग आहे. तरी आम्ही जंगल, दऱ्या-डोंगरातून जाणारी निसर्गरम्य पण तेवढीच खडतर वाट निवडली होती. साधारण १ तासात पेंशेत गावात पोहचलो. पेंशेत गावात पोहचतच कळसुबाई शिखराकडे जाणारा मार्ग अशी पाटी दिसली. तिथेच आम्ही गाडया पार्क केल्या इतक्यात गावातील एक काका आले आणि त्यांनी जवळ असलेल्या त्यांच्या घराच्या शेणाने सारविलेल्या ओटयावर चटई टाकून बसावयास दिले. तसेच पाणी आणून दिले. तद्नंतर कळसुबाई शिखरावर कोणत्या मार्गाने जावे, कसे जावे याची सविस्तर माहिती दिली. वाटाडया हवा का ? असे हि विचारले पण आम्ही वाटाडया नाकारला. काकांनी स्वतःचा फोन नंबर हि दिला. काही अडले नडले तर जरूर फोन करा असे सांगून आम्ही काकांचा निरोप घेतला. आता गावाच्या कडेने शेताच्या बांधाबांधाने आम्ही कळसुबाई शिखराच्या वाटेकडे निघालो.
समोर सह्याद्री रांगेतील डोंगर आजू बाजूला हिरवागार निसर्ग, रिमझीम पाऊस, हवेत गारवा. आम्ही चीखलवाट तुडवत डोंगर माथ्याकडे निघालो. पाऊस पडत असल्याने वाट निसरडी झाली होती . साधारण अर्धा तास चढलो आणि एका छोटया डोंगरमाथ्यावर पोहचलो. आता उजवी कडे जावे कि डावी कडे ? आणि आम्ही डावी कडे वळालो आणि इथेच घोळ झाला. काही अंतर चालल्यावर गावातून आमच्यावर नजर ठेवणाऱ्या काकांचा आम्हाला फोन आला. 'तुम्ही वाट चुकलात मागे फिरा ' हे एकुन आम्ही काही निराश झालो नाही. या डोंगर दऱ्यात भटकणे हेच तर आमचे उद्दिष्ट. काही नवीन पहावयास मिळते का ? यातच आम्हाला मौज. याच वाटेवर आम्हाला छोटया छोटया गुहा दिसल्या त्या हि आम्ही जवळून पाहिल्या आणि मग मागे फिरलो. आणि लगेचच आम्हाला दोन डोंगरातून जाणारी घळ दिसली या घळीतून आपल्याला पलीकडे जाता येईल का ? याचा अंदाज अमोलने ( आमच्या ग्रुपचे अलिखित सेनापती ) थोडे पुढे जाऊन घेतला. मात्र हि घळीची वाट फारच अवघड आहे असे सांगत अमोल माघारी आला. आम्ही पुन्हा आल्या मार्गी मागे फिरलो. मागे फिरून बराच वेळ झाला तरी कळसुबाई शिखराचा नेमका मार्ग आम्हाला काही सापडत नव्हता. कधी पुढे तर कधी मागे करत आम्ही योग्य मार्ग शोधत होतो. पण कळसुबाई कडे जाणारा मार्ग आम्हाला काही सापडत नव्हता इतक्यात दूर कुठेतरी खाली एक म्हातारी आणि तिचा नातू आम्हाला दिसला. आम्ही मोठया मोठयाने हाका मारून तिला कळसुबाई जाण्याची वाट कुठे आहे असे विचारात होतो. आणि ती हि बेंबीच्या देठापासून ओरडून आम्हाला खाली येण्याचे हात वारे करत होती. तुम्ही वाट चुकलात असे तिला सांगावयाचे होते. आम्ही हि आता खाली उतरू लागलो. म्हातारी सोबत असलेला नातू थोडा डोंगर चढून वर आला आणि आम्ही हि थोडे खाली आलो. मग नातवाने आम्हाला योग्य वाट दाखवली. त्याला खाऊसाठी थोडे पैसे दिले आणि त्याचे धन्यवाद मानून आम्ही पुढे निघालो. एव्हाना आमचे दोन तास वाया गेले होते. आता आम्हाला समोर विशाल डोंगर दिसत होता. त्या डोंगरातून येणारा एक ओढा हि दिसत होता. हे सगळे पार करून आम्हाला जावयाचे होते पण या मध्ये एक दरी होती आणि तिला आम्हाला संपूर्ण फेरा घालून समोरील डोंगरावर चढायचे होते. जंगल पार करत आम्ही थोड्याच वेळात ओहळा पर्यंत पोहचलो. ओहळाच्या पाण्याने हातपाय धुतले, थंडगार पाणी तोंडावर मारले. त्या मुळे आम्ही फ्रेश झालो होतो. सगळेच थोडे फार दमलो होतो म्हणून जंगलातल्या त्या काळ्या दगडावर सगळ्यांनीच पाय पसरले. इतक्यात मामाने ब्यागेत हात घालून आईने बनविलेले कुळी भाजीचे थालीपीठ काढले. थालीपीठ काढताच सगळे त्याच्यावर तुटून पडले. अल्पोपहार झाला होता. धीरजने एक एक चॉकलेट देत सगळ्यांचे तोंड गोड केले. आता आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो. गप्पा टप्पा हाकत आम्ही दोन डोंगर पार केले. आता आम्हला पठार सदृश्य छोटासा सपाट भाग लागला. आता आम्ही बऱ्या पैकी उंचावर आलो होतो. इथून आम्ही पार केलेले डोंगर आम्हाला समोर दिसत होते. आजूबाजूला निसर्गाने पसरलेली हिरवीगार चादर दिसत होती, इथे ढग आम्हाला आलिंगन देत होते,शरीरात जितका ऑक्सिजन भरून घेता येईल तितका ऑक्सिजन आम्ही भरून घेत होतो. निसर्गाचा आस्वाद घेत होतो. पण आता पोटात कावळे ओरडत होते. दुपारचे २ वाजले होते. धीरुने आणि स्वप्नीलने घरून थेपले आणि चटणी आणली होती. सर्वानीच काहीना काही आणले होते. चालून चालून भूकही भरपूर लागली होती. दोन दोन थेपले खाऊन थंडगार पाणी पिऊन सगळेच थोडे सुस्तावले होतो. आजू बाजूला निसर्गच इतका सुरेख होता कि १५ मिनिटे झाली तरी कुणी जागेवरून उठायला तयार नव्हते. मग अमोलने सगळ्यांना मेंढरा सारखे हाकले. पोटोबा झाला होता आता कळसुबाई शिखराच्या शोधात आम्ही पुढे निघालो.
पुढील पाऊल वाट समांतर उजवीकडे जाताना दिसत होती.त्या वाटेनेच आम्ही हळू हळू पुढे सरकत होतो. आता कळसुबाई शिखर कधी दिसते याचीच ओढ प्रत्येकालाच लागली होती. मी आणि जग्गू सर्वात पुढे होतो. आणि तो क्षण आला. कळसुबाईचे त्या उंच शिखराचे आम्हाला दर्शन झाले . आमच्या डाव्या हाताला कळसुबाईचे शिखर दिसत होते तर समोर बारी गावातून येणारी वाट आम्हाला दिसत होती. त्या वाटे पर्यंत पोहचल्यावर तर येणारे जाणारे मुला मुलीचे कॉलेज ग्रुप, माणसे बायका दिसू लागल्या होत्या. थोडया पुढे गेल्यावर तर एक झोपडी वजा चहाची टपरी हि दिसली. त्याच्याच कडे आम्ही एक एक ग्लास लिंबू सरबत प्यायलो. 'अर्ध्या पाउण तासात परत येतो चहा बनवून ठेव' असे सांगत आम्ही पुढे निघालो. आता तर पुढील वाट सरळच होती. शिखरा अगोदर साधारण ७०/८० दगडी पायऱ्या लागल्या त्या पार केल्यावर कळसुबाईचे टोक म्हणजेच एक उभा सुळका लागतो. त्यावर पूर्वी लोक साखळदंडाने चढत असत. आता मात्र एक लोखंडी शिडी लावलेली आहे. सोसाटयाचा वारा ,पाऊस , आणि ढगान मुळे अंधुक दृष्टी या सगळ्या परस्थिती मुळे ती शिडी पार करणे म्हणजेही जिकरीचे काम होते . चुकून पाय सरकला तर कपाळमोक्ष निश्चित. मात्र हि शिडी पार केल्यावर स्वर्गाच्या जवळ पोहोचल्याची अनुभूती होते.
आता आम्ही कळसुबाई शिखरावर पोहचलो होतो. वरती पोहचल्यावर पहिले दर्शन होते ते कळसुबाई देवीच्या भगव्या मंदिराचे. थंडगार वारा वाहत होता ,आजूबाजूला ढगांची चादर पसरली होती. या ढगान मधील बाश्पानी आम्ही पूर्ण ओले झालो होतो. वरती तशी फार काही जागा नाही. या पूर्ण सुळक्याला आजूबाजूने लोखंडी रेलिंग लावली आहे . आम्ही एका कडेला जाऊन बसलो . मात्र ढगांमुळे खालचे काहीच दिसत नव्हते. ढगांचा आणि वाऱ्याचा जणू काही लपंडावाच चालला होता. कधी वाऱ्याने ढग एका बाजूला होत तर कधी पूर्ण दरी पांढऱ्या शुभ्र ढगांनी व्यापून जात असे . निसर्गाचा निराळाच खेळ आम्ही पहात होतो. साधारण अर्धा तास आम्ही तिथे बसलो असू. वेळ कसा गेला कळालेच नाही . आता मनात एक ध्येय पूर्ण केल्याचे समाधान होते. इथून निघण्या साठी पाय निघत नव्हते. पण काळोख पडायच्या आता आम्हाला खाली उतरायचे होते. शिखरावरून खाली येण्या आधी कळसुबाई देवीचे दर्शन घेतले. तिथेच शिखरावर चढण्यासाठी लावलेली साखळी बांधली होती.
आता आमचा परतीचा प्रवास सुरु केला. सुळक्यावरुन खाली उतरल्यावर गरमा गरम चहा आणि कांदाभजी खाऊन आम्ही माघारी फिरलो. येताना आम्ही बारी गावातील सोप्या आणि सरळ मार्गानेच उतरणार होतो. बारी गावातून खाली उतरताना लोखंडी तीन शिड्या लागतात. तर मध्ये मध्ये दगडी पायऱ्या देखील आहेत. साधारण २.३० तासात आम्ही बारी गावात उतरलो. दिवस भराच्या दगदगिने आम्ही पार थकलो होतो. गावातील विहिरीवर थंड पाण्याने हात पाय धूऊन गाडीत जाऊन विसावलो. येताना घोटी गावात चिकन मटण वर यथेच्छ ताव मारला. आता लवकरात लवकर घरी पोहचायचे होते. उदया सोमवारचे ऑफिस हि गाठायचे होते आता आमच्या गाड्या पालघरकडे सुसाट वेगाने सुटल्या.



छान आहे वर्णन. पुलेशु.
छान आहे वर्णन.

पुलेशु.
मस्त! फोटोस छान आले आहेत!
मस्त! फोटोस छान आले आहेत!
ट्रेकची खरी मज्जा पावसाळ्यात
ट्रेकची खरी मज्जा पावसाळ्यात येत असेल. वर्णन आणि फोटो खरच छान आहेत.
हे फोटो मी काढले नाहीत माझे
हे फोटो मी काढले नाहीत माझे मित्र महेश,स्वप्नील , जग्गू ह्यांनी काढले आहेत. कॅमेरा सांभाळत फोटो काढत वरती चढणे हे अवघडच. खूप पाऊस नसला तरी कॅमेरा भिजू शकतो म्हणून पावसाळ्यात फोटो काढणे अवघड असते.
धन्यवाद......!
मस्त फोटो आणि तुमचा उत्साह .
मस्त फोटो आणि तुमचा उत्साह .
छान वर्णन, सुरेख फोटो ...
छान वर्णन, सुरेख फोटो ...
वर्णन आणि फोटो मस्त
वर्णन आणि फोटो मस्त आहेत.............
छान वर्णन, सुंदर फोटो.
छान वर्णन, सुंदर फोटो. ट्रेकचा अनुभव कधीही घेतला नाही पण माबोकरांचे ट्रेकचे, गडकिल्ल्यांचे वर्णन आणि प्रकाशचित्रे पाहून ट्रेक करण्याची जबरदस्त इच्छा होते. लवकरच एखादा तरी ट्रेक करणारच.