हितगुज दिवाळी अंक २०१४ - घोषणा

Submitted by संपादक on 20 July, 2014 - 22:27
anotherheader_0.jpg

रसिकहो, सप्रेम नमस्कार!

मी अविवेकाची काजळी। फेडूनि विवेकदीप उजळी।
तैं योगियां पाहे दिवाळी। निरंतर ॥
- ज्ञानेश्वरी, अध्याय ४

अंध:काराला दूर सारणाऱ्या ज्योतींचा उत्सव म्हणजे दिवाळी. हा अंधार कधी सामाजिक विषमता, सामाजिक असहिष्णुता अशा स्वरूपांत पसरत राहतो, तर कधी अविवेक, अज्ञान, अंधश्रद्धा अशा रूपांत आपला ताबा घेत असतो. अशा वेळेस एखादी ज्ञानज्योत आपला मार्ग उजळायला, योग्य दिशा दाखवायला पुरेशी असते या आश्वासक जाणिवेचा प्रतीकात्मक उत्सव म्हणजे दिवाळी. मायबोलीवर हा उत्सव आपण साजरा करतो हितगुज दिवाळी अंकाच्या रूपाने. मायबोलीकरांच्या प्रतिभांचे लख्ख दिवे पेटवून मायमराठीच्या अंगणातला एखादा कोपरा उजळविण्याचा हा छोटासा प्रयत्न गेली चौदा वर्षे आपण सातत्याने करत आहोत.

मायबोलीची ही अभिरुचिसंपन्न व उज्ज्वल परंपरा कायम राखत एक उत्तम, दर्जेदार व बहुपेडी दिवाळी अंक सादर करण्याचा संपादक मंडळाचा संकल्प आहे. आपण आमच्या या प्रयत्नांना भरभरून साथ द्याल, याची खात्री आहे.

...तर रसिकजनहो, सादर करीत आहोत हितगुज दिवाळी अंक २०१४ची रूपरेषा!!

bullet2.jpgकथादर्पण :
मराठी अर्वाचीन साहित्यात उत्तमपणे रुजून सर्वांत जास्त फोफावलेला साहित्यप्रकार म्हणजे लघुकथा. लिमये, नाथमाधव यांच्यापासून सुरू झालेली ही वेल गोखले, गाडगीळ, मोकाशी, माडगूळकर, शंकर पाटील, दळवी, जीए, पानवलकर, गौरी देशपांडे, विद्याधर पुंडलिक, मतकरी, राजन खान, मेघना पेठे, प्रज्ञा दया पवार, मनस्विनी लता रवीन्द्र, हृषिकेश गुप्ते अशी वळणे घेत जोमाने वाढते आहे. संपन्न कथांशिवाय दिवाळी अंक सजणे अशक्यच. म्हणूनच या वर्षीचा आपला दिवाळी अंक तुम्हां सिद्धहस्त कथालेखकांची आतुरतेने प्रतीक्षा करत आहे. इतर कथाप्रकारांबरोबरच हितगुज दिवाळी अंकात आजवर क्वचितच वाचनात आलेल्या विज्ञान-गूढ-रहस्य-भय इत्यादी कथाप्रकारांचे स्वागत आहे!

bullet2.jpgकिशोरविश्व :
मायबोलीवर आजपर्यंत दहा ते पंधरा वर्षे वयोगटातील किशोरांसाठी असे लिखाण अभावानेच झाले आहे. असे साहित्य हितगुज दिवाळी अंकात प्रकाशित व्हावे या उद्देशाने किशोरांसाठी कथा, काव्य, ललित अशा व इतर साहित्यकृती मागवत आहोत.

bullet2.jpg विचारमंथन :
bullet1.pngसामर्थ्य आहे चळवळीचे
मराठी माणूस खरा चळवळ्या! अतिडाव्या ते अतिउजव्या विचारांनी प्रभावित चळवळी असोत, आदिवाशांमध्ये काम करणारे प्रकाश आमटे किंवा सिमेंटच्या जंगलातील गर्दुल्ल्यांसाठी काम करणारे अनिल अवचट असोत, रविकिरण मंडळ असो अथवा आजची विद्रोही साहित्य चळवळ असो! समाजकारण, राजकारण, साहित्य, पर्यावरण इत्यादी अनेक क्षेत्रांतल्या सर्वव्यापी चळवळी महाराष्ट्राने बघितल्या. या चळवळींनी अनेक आयुष्यांना सोनेरी स्पर्श केले. अशा एखाद्या चळवळीत आपला सक्रिय सहभाग असेल, तर आपल्या, म्हणजे एका कार्यकर्त्याच्या नजरेतून, अनुभवांतून आम्हांला त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
bullet1.pngक्रांतिकारी बदल (पॅराडाइम शिफ्ट)
अहिंसेच्या मार्गाने दिलेला स्वातंत्र्यलढा, रनेसाँसमध्ये तोडूनमोडून नवनिर्माण झालेल्या कलापद्धती, डार्विनने केलेली उत्क्रांतीची उकल, मायक्रोचिप वापरून बनवलेला पहिला संगणक या घटनांनी त्या त्या क्षेत्रातच नव्हे, तर अखिल मानवजातीच्या आचारविचारांत क्रांतिकारक परिवर्तन आणले. प्रस्थापित विचारधारा, जीवनपद्धती यांच्यात किंवा वैज्ञानिक सिद्धान्तांत घडून आलेल्या क्रांतिकारी परिवर्तनाबद्दल आपले अभ्यासपूर्ण लेख या विभागात अपेक्षित आहेत. तंत्रज्ञान, विज्ञान, अर्थकारण, राजकारण, समाजशास्त्र अशा व इतर क्षेत्रांमधील बदलांविषयीही आपण लिहू शकता.
bullet1.pngदेशोदेशींची खाद्यसंस्कृती
भारतातील पंजाब प्रांतातील सामुदायिक स्वयंपाकघराची व जेवणाची लंगरपद्धत सर्वांना माहीतच असेल. त्याच प्रांतात सायंकाळी गावातील सार्वजनिक चुलीवर एकत्र स्वयंपाक करण्याची 'सांझा चूल्हा' परंपराही निर्माण झाली. या मागे इंधन वाचवण्यापासून ते लोकांनी रोज एकत्रितपणे सामूहिक स्तरावर काम करण्यासारखे संकेत दिसून येतात. असे काही ऐतिहासिक, आर्थिक, राजकीय व सामाजिक संदर्भ अथवा संकेत तुम्हांला विविध देशांमधील तुम्ही अनुभवलेल्या खाद्यसंस्कृतींमागेही आढळून आले असतील. वर्षानुवर्षे सुगरण हातांनी केलेले किंवा अगदी फसलेले प्रयोग, काही रीतिरिवाज, सामाजिक घडामोडी, एखादा विशेष दिवस किंवा ऋतुमान हे एखाद्या समाजाची खाद्यसंस्कृती घडवतात. उदाहरणार्थ, अमेरिकेत व कॅनडात दिली जाणारी थँक्सगिव्हिंगची मेजवानी. तुम्ही अनुभवलेली परदेशातील खाद्यसंस्कृती, तेथील जनसामान्यांचे खाण्यापिण्याचे रीतिरिवाज, त्यांमागील सुरस कथा आम्हांलाही ऐकायला आवडतील.
bullet1.pngभारत-भारती
मराठी भाषेतील साहित्याबद्दल व साहित्यिकांबद्दल आपण मायबोलीवर भरभरून चर्चा करतो. 'वाचू आनंदे' गटातील धाग्यांवर नजर टाकली असता इंग्रजी साहित्यावरदेखील भरपूर चर्चा होताना दिसते. पंजाबी, हिंदी, बंगाली, तमीळ इत्यादी अनेक भारतीय भाषांत विपुल व सकस साहित्य निर्माण झाले आहे, होत आहे. मात्र या भाषांमधील साहित्याबाबत आपल्यापैकी बहुसंख्य लोकांना फारच थोडी माहिती असते. उदाहरणच द्यायचे झाले तर, गुजराती भाषेत विपुल गझलनिर्मिती झाली आहे, ही माहिती आपल्यापैकी अनेकांना चकीत करेल. या वर्षीच्या दिवाळी अंकामध्ये आपण मराठीखेरीज इतर भारतीय भाषांत लिखाण करणार्‍या लेखकांच्या साहित्यप्रवासाची वा साहित्यकृतींची ओळख रसिक वाचकांना करून द्यायची आहे.

bullet2.jpgकाव्यधारा :
मराठी भाषेला संतकाव्याची मोठी परंपरा आहे. वेगवेगळ्या पंथातील संतांनी अनेकानेक प्रयोग करून मराठीत काव्य नुसतेच रुजवले नाही, तर फुलवले आहे. आधुनिक युगातील कवींनी ही धुरा समर्थपणे पुढे चालवत मराठी काव्याला नवे आयाम मिळवून दिले. केशवसुतांची 'तुतारी', कुसुमाग्रजांची 'कणा', आरती प्रभूंची 'नक्षत्रांचे देणे', ग्रेस यांच्या ‘राजपुत्र’ आणि ‘डार्लिंग’ व मर्ढेकरांची ‘पिंपात मेले ओल्या उंदीर’... या आणि अशा अनेक कवितांनी मराठी भाषेस आजवर जे काही दिले आहे त्याचे मूल्यमापन करता येणे केवळ अशक्य आहे! आणि म्हणूनच मराठी माणसाचे कवितेवर निरतिशय प्रेम आहे. त्याच्या भावविश्वात काव्याला एक अनमोल स्थान आहे. मायबोलीवर प्रसिद्ध होणार्‍या कवितांना मिळणारी उत्स्फूर्त व भरघोस दाद याचीच तर साक्ष देते. म्हणून मायबोलीवरील प्रतिभावंत कवीमंडळींना आम्ही आवाहन करीत आहोत की, आपल्या उत्तमोत्तम काव्यरचना यावर्षीच्या दिवाळी अंकासाठी पाठवाव्यात.

bullet2.jpgदिवाळी संवाद :
नाना पाटेकरांची सुधीर गाडगीळांनी घेतलेली मुलाखत आठवते? निखिल वागळ्यांनी 'ग्रेट भेटी'त घडवून आणलेल्या भेटी आठवतात? गप्पांची मजा काही औरच! आपल्या आवडत्या साहित्यिकांना, अभिनेत्यांना, खेळाडूंना बोलताना ऐकून-बघून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेच पैलू समोर येतात. अनवट क्षेत्रात, खडतर मार्गावर, अशक्यप्राय परिस्थितीत काम करणार्‍या लोकांचे मनोगत ऐकून आपल्याकडूनही अनेकदा मदतीचा खारीचा वाटा उचलला जातो.

'दिवाळी संवाद' म्हणजे बहुआयामी, प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वांचं कार्य वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असलेले खास दालन. यावर्षीसुद्धा दिवाळी अंकात मुलाखतींचं स्वागत आहे. फक्त मुलाखत घेण्याआधी आपल्याला मंडळाची परवानगी घ्यायची आहे.

bullet2.jpgहलके-फुलके :
bullet1.png'मेंडकेचा सल्ला'
हे एक नवीन सदर दिवाळी अंकात आपल्या भेटीला आणत आहोत. या सदरात निरनिराळ्या समस्यांवर गमतीशीर सल्ले आम्ही मायबोलीकरांकडून मागवत आहोत. मात्र हे सल्ले तुम्ही द्यायचे आहेत मेंडकेच्या भूमिकेतून!

मेंडका ही स्वर्गातील एक शापित अप्सरा. स्वर्गलोक सोडून भूलोकी अर्धबेडकी-अर्धअप्सरा रूपात वावरण्याचा शाप तिला मिळाला आहे. दिवसातला काही काळ बेडकीच्या रूपात वावरणारी मेंडका उर्वरित वेळेत मात्र एक सौंदर्यवती, एक फॅशनिस्टा आहे. त्यामुळे तिचे सल्ले हे अप्सरेच्या व बेडकीच्या व्यक्तिमत्त्वांच्या एकत्रीकरणातून दिले गेलेले असतात. ‘मेंडकेचा सल्ला’ या सदरातील समस्यांची उकल सांगताना मायबोलीकरांनी हा परकायाप्रवेश साधायचा आहे व मेंडकेने 'वहिनीचा सल्ला' सदरातील प्रश्नांना जशी उत्तरे दिली असती, तशी या प्रश्नांची उत्तरे लिहून आम्हांला पाठवायची आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी आलेल्या उत्तरांमधून सर्वांत जास्त मजेशीर उत्तर या सदरात प्रकाशित केले जाईल. उत्तरांची निवड सर्वतो संपादक मंडळातर्फे करण्यात येईल. या विभागासाठी प्रश्न लवकरच एका स्वतंत्र्य धाग्यावर कळवण्यात येतील.
bullet1.pngहास्यावली
एखाद्या निखळ, खुमासदार विनोदात सार्‍या दिवसाचा ताण क्षणार्धात दूर करण्याची ताकद असते. मनाला विरंगुळा देणारे, चेहर्‍यावर हास्य फुलविणारे, चटपटीत विनोद सर्वांनाच आवडतात. दिवाळी अंकासाठी नवे, धमाल व अन्यत्र अप्रकाशित विनोद आपण आम्हांला पाठवा. हे विनोद हास्यचित्र-पट्टी स्वरूपात एक ते चार चौकटींत रेखाटण्यायोग्य असावेत. उदाहरणार्थ, वर्तमानपत्रातील ‘कॉमन मॅन’चा विनोद एका चौकटीत सद्यस्थितीवर मार्मिक भाष्य करतो, तर 'चिंटू' या हास्यचित्र-पट्टीमधील विनोद हा तीन ते चार चौकटींत उलगडतो.
bullet1.pngहास्यटपरी
बहुपरिचित, लोकप्रिय अशा नव्या-जुन्या लघुजाहिरातींचे लिखित स्वरूपातील विडंबन आम्हांला पाठवा. तुम्ही स्वतः लिहिलेली विनोदी जाहिरातही पाठवू शकता. जाहिरातीची शब्दमर्यादा आहे ५० शब्द फक्त!
bullet2.jpgदृक्‌श्राव्य :
आपल्या कलाकौशल्यांचे दृक्‌श्राव्य (व्हिडिओ) स्वरूपातील सादरीकरण आपण दिवाळी अंकासाठी पाठवू शकता.

*** आपले साहित्य आम्हांला या दुव्यावर पाठवा ***

साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : रविवार ३१ ऑगस्ट, २०१४ [पॅसिफिक (अमेरिका) प्रमाणवेळेनुसार रात्री बारापर्यंत]

काही प्रश्न, शंका अथवा सूचना असल्यास आमच्याशी या धाग्यावरच अथवा sampadak@maayboli.com या ई-पत्त्यावर जरूर संपर्क साधा. संपादक मंडळ आपल्या सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल.

साहित्य पाठवण्याआधी खालील दुव्यांवर दिलेल्या काही महत्त्वाच्या बाबींची माहिती करून घ्यावी, अशी नम्र विनंती.

१. हितगुज दिवाळी अंक २०१४ नियमावली
२. मालकीहक्क (Copyright)
३. शुद्धलेखनासंबंधी नियमावली

चला तर मग, सिद्ध व्हा आणि उत्साहाने आरंभ करा हितगुज दिवाळी अंकासाठी लेखन करायला!

anotherfooter.jpg

विषय: 

जाहिराती, विनोदचौकटी, मेंडकेचा सल्ला... ऐकत नाहीत यंदा संमं! छापील अंकांना मागे टाकणार हितगुज अंक! शुभेच्छा! Happy

या प्रत्येक प्रकारात प्रत्येकी एक सॉलिड एंट्री आली तर सॉल्लिडच होणार आहे अंक

दिवाळी अंकास शुभेच्छा.

>छिद्रान्वेषी मोड ऑन

"आदिवाशांमध्ये" हा शब्द खटकला.
आदिवासींमध्ये बरोबर वाटतो.

उदा. सिमिलर शब्द देवदासी. देवदाशांमधे असं म्हणाल, की देवदासींमध्ये असं?

कॉलिंग चिनुक्स अँड अदर व्याक्रणतज्ज्ञाज्

>छिद्रान्वेषींमधे मोड ऑफ Wink

बिनागरजेची सूचना क्र. २.
'या' दुव्यावरची व्याप्ती वाढवा. पूर्ण वाक्यास हॉटलिंक केल्याने काही प्राब्लेम होणार नाही. क्लिक करायला अधिक सोयीचे होईलसे वाटते.

रहिवाशांमध्ये, आदिवाशांमध्ये.
आदिवासींनी, आदिवासींमध्ये ही वृत्तपत्रांनी रूढ केलेली रूपं आहेत.
या पुढची चर्चा आपण 'शब्दाचे योग्य रूप कोणते' या बाफवर करू. Happy

चांगले आहेत विषय आणि घोषणा.
सगळ्या विभांगाबद्दल लिहिलं आहे ते चांगलं केलं.

वर ऑडीयो घोषणेबद्दल लिहिलं आहे... ऑडीयो आता काढला का? मला तो कंट्रोल दिसत नाहीये कारण.

घोषणा मस्त झाली आहे.
माझ्या आठवणीप्रमाणे टेम्प्लेटच्या सहाय्याने दिवाळी अंकाची घोषणा देण्याचे हे पहिलेच वर्ष. आणि इथेच यंदाच्या संपादक मंडळाचे वेगळेपण दिसते आहे.
सगळे विषयही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. 'हलके - फुलके' विभागाची कल्पना अतिशय आवडली. आत्तापर्यंत कुठल्याही दिवाळी अंकात 'विनोद' या विषयावर इतका भर दिला गेला नव्हता.

लोकहो, यंदा भरपूर वेळ मिळणार आहे, तेव्हा दिवाळी अंकासाठी भरभरून लेखन/ कलाकृती पाठवा.

उत्कृष्ट दिवाळी अंक सादर करण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा, संपादक मंडळ!
आमचे येथे सर्व प्रकारची मदत उपलब्ध आहे Wink

पराग, ऑफिसात ऑडिओ ब्लॉक्ड आहे का?
ऑडिओचा कंट्रोल 'कथादर्पण'च्या वर आहे, घरून ऐक.

नमस्कार मानुषी आणि कांदापोहे,

आपण पाठवलेल्या साहित्यात विषयाच्या अनुषंगाने प्रकाशचित्रे समाविष्ट करू शकता. तसेच दृक्‌श्राव्य विभागासाठी एखाद्या विशेष संकल्पनेवर आधारित चित्रमालिका पाठवू शकता. परंतु यंदाच्या दिवाळी अंकात प्रकाशचित्रांसाठी स्वतंत्र विभाग ठेवण्यात येणार नाही.

धन्यवाद!
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक २०१४

व्वा, घोषणा मस्तच झाली आहे.
लोकहो .. लिहा आणि दिवाळी अंकाला साहित्य पाठवा. !!!!
तरच 'बघायला/वाचायला' मिळेल. Happy

घोषणा एकदम जोरदार आहे.
विषयांची विविधता आवडली. ह्यावेळी अंक दर्जेदार होणार हे नक्कीच.

वॉव, महागुरुंना अनुमोदन!
सुबक मांडणी, घोषणा एका उत्तम, दर्जेदार व बहुपेडी दिवाळी अंकाला साजेशी झाली आहे. शुभेच्छा !

अरे वा मस्तच....! दिवाळी अंकासाठी शुभेच्छा...!
वी आर अल्वेज वीथ यु. Happy

-दिलीप बिरुटे

रुपरेषा केवळ दणदणीत..

अंकाचा बाज आणि काय करायचय याचा नेमका अंदाज संस ला असल्याचं आणि तेही व्यवस्थित पोहोचवल्याचं पाहून अपेक्षा वाढल्यात बरं का.. म्हणजे जेवायला बसायच्या आधीच पुढच्या सुग्रास भोजनाचा सुवास तसंच अंदाज यावा, आणि भूक चाळवावी तसं काहीसं.. Happy

खूप सार्‍या शुभेच्छा..

नमस्कार मायबोलीकरहो,

'सल्ला मेंडकेचा' या सदरासाठी प्रश्नावली प्रकाशित झालेली आपण पाहिली असेलच. जास्तीत जास्त सहभागाने या सदराची रंगत वाढवावी, अशी नम्र विनंती.

काही प्रश्न अथवा शंका असल्यास संपादक मंडळाशी या धाग्यावर, प्रश्नावलीच्या धाग्यावर अथवा sampadak@maayboli.com या ई-पत्त्यावर अवश्य संपर्क साधावा.

सस्नेह,
संपादक मंडळ,
हितगुज दिवाळी अंक २०१४

Pages