देणे - एक कला...

Submitted by शशिकांत ओक on 17 July, 2014 - 15:37

देणे - एक कला...

अनेक गोष्टींच्या एकमेकातील व्यवहाराला एकत्रित नाव ‘देणे व दुसऱ्या बाजूने घेणे’ असे सामान्यपणे म्हणता येते.

देणे ही एक कला म्हणून पाहू जाता -

सल्ला प्रथम येतो. न मागता तो देणे ही घरच्यांची मेहेरबानी. तर सल्ला कला कला देता देता अशीलाचा खिसा रिता करायची कला वकील लोक जोपासतात. बायकोच्या भावाने दिलेला सल्ला मानभवीपणे ऐकून तो कटाक्षाने न पाळणे ही कला. सल्ल्याचे एक भाऊबंद - उपदेश. ती वरिष्ठांची जागीर, तो संतांची वचने, कवने, संस्कृत श्लोकातून खडाखड देता येणे ही कला.

दान देणे हे तर आजकालच्या प्रतिष्ठेचा मापदंड आहे. ज्यांनी आयुष्यभर धड कपडे नेसले नाहीत अशा औलियांच्या मूर्तींच्या अंगावर किलो किलोच्या दागदागिन्यांचा सोस मांडून आपल्या दानाचे अवास्तव दर्शन करवणे ही कला. या हाताचे त्या हाताला कळू न देणे म्हणजे विशुद्ध दान. पण ते अकला नसलेले कलाबाजच करतात.

हातापेक्षा पायांनी देणे ही कला जास्त प्राविण्याची. वरिष्ठांच्या पाठीवर पाय देताना त्यांच्या कलाने घ्यावे लागते. तेच गर्दभाच्या पाश्वभागी व बॉसच्या सामोरा उभे न राहण्याची कला खुबीने साध्य करावी लागते.

देणे फार काळ उधार राहिले तर नजर चुकवायला नव्या युक्त्या शोधणे ही कला. चोरून कान देणे ही माजघरातील कलहाची कला तर गुप्तहेरानी ती बिनबोभाटपार पाडणे ही चतुराईची कला. लेखी निरोप कमलदलावर देणे ही शकुंतलेची कला. मसालेदार बातमी देणे पत्रकारितेचे कलाकसब. सुंदर लकेरीला दाद देणे कला. कशालाही दाद न देणे निगरगट्टाचे लक्षण.

शिवी देणे ही एक पुढारलेली कला मानतात. सभ्यपणाच्या कक्षा ओलांडून जवळच्या नातेसंबंधांचे शिव शब्दोच्चार शिवी देऊन केलेले भावातिरेक विरेचन भाषावैभवाची कला दर्शवतात. जे मानसिक समाधान विपस्यना ध्यानानंतर मिळतेच असे नाही, ते शिवीतून खात्रीलायक मिळते. उच्च स्वरामुळे दरारा वाढतो तो वेगळाच.

जा म्हणायच्या आत निरोप देणे ही कला साध्य नाही केली तर सभास्थानी निरोपाच्या चिठ्ठ्या येऊ लागतात. वेळीच दवापाणी नाही केले तर जगाचा निरोप अवेळी द्यायची संधी प्राप्त होते.

अशी ही देता देता न संपणारी कला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users