पायथा बांधायला आधार नव्हता जोरकस

Submitted by बेफ़िकीर on 11 July, 2014 - 13:22

पायथा बांधायला आधार नव्हता जोरकस
देणग्यांच्या जाहिराती झाकती आता कळस

सोडली देवास कन्या, पुत्र दे देवा म्हणत
त्या मुलीला पुत्र झाला, देव चुकला की नवस

आणले आहेत आपण खुद्द......हे दुर्लक्षुनी
बोलतो प्रत्येकजण की काय हे आले दिवस

पोलक्याची पाठ खेचे सभ्यतेला खालती
चेहर्‍याचा राग बोले बघ मवाल्याची हवस

ह्या समाजाला स्वतःची आसवे पुरतात की
पावसाला सांग मित्रा तू हवे तेव्हा बरस

मन असे का तडफडे हे तू विचारावेस ना
का दुराव्याची कधीही टोचली नाहीस लस

गुंतलो शोधात इतका की कळेना हे मला
पौर्णिमा होती हवी की पाहिजे होती अवस

दोन रस्ते राहिले आहेत दोघांच्यापुढे
मी इथे जाऊन फसतो तू तिथे जाऊन फस

का इथेसुद्धा असा अस्वस्थसा आहेस तू
घर तुझे आहे स्वतःचे तर जरा टेकून बस

मनगटे देतील पाठिंबा तुला तेव्हाच ही
सापडावी लागते मुर्दाड लोकांचीच नस

हेच हे अभ्यासण्यामध्ये निघाला जन्म हा
हा सरस की तो सरस की तो सरस की तो सरस

छान गझलेचा निकष इतकाच आहे राहिला
कस जगाचा लागतो अन् 'बेफिकिर' लिहितो सकस

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पायथा बांधायला आधार नव्हता जोरकस
देणग्यांच्या जाहिराती झाकती आता कळस

मन असे का तडफडे हे तू विचारावेस ना
का दुराव्याची कधीही टोचली नाहीस
लस

दोन रस्ते राहिले आहेत दोघांच्यापुढे
मी इथे जाऊन फसतो तू तिथे जाऊन फस

मनगटे देतील पाठिंबा तुला तेव्हाच ही
सापडावी लागते मुर्दाड लोकांचीच नस
>>>>

अफाटच शेर !

गझल नेहमीप्रमाणे आवडलीच . Happy

पूत्र हा शब्द पूत्र असा नसून पुत्र असा आहे हे सांगितल्याबद्दल स्वाती आंबोळेंचा आभारी आहे. Happy

सुदैवाने मात्रा बदलत नसल्यामुळे शेर अचूक राहिला हे बरे झाले Happy

(बदल केलेला आहे)

दोन रस्ते राहिले आहेत दोघांच्यापुढे
मी इथे जाऊन फसतो तू तिथे जाऊन फस

का इथेसुद्धा असा अस्वस्थसा आहेस तू
घर तुझे आहे स्वतःचे तर जरा टेकून बस

हे दोन शेर विशेष आवडले.

काय सांगू काय ठरवू वाचताना शेर हे
हा सरस की तो सरस की तो सरस की तो सरस

अख्खी मुळाजाळासहित आवडली!

दोन रस्ते राहिले आहेत दोघांच्यापुढे
मी इथे जाऊन फसतो तू तिथे जाऊन फस

व्वा व्वा

हेच हे अभ्यासण्यामध्ये निघाला जन्म हा
हा सरस की तो सरस की तो सरस की तो सरस

मस्त

मस्तच !

सोडली देवास कन्या, पुत्र दे देवा म्हणत
त्या मुलीला पुत्र झाला, देव चुकला की नवस! हे खास

हेच अभ्यासण्यामध्ये..' ह्या ओळीला अडखळलो.<<<

कारण समजले नाही अडखळण्याचे. हाच प्रतिसाद फेसबूकवरही वाचला पण तेथे काही लिहिले नाही मी!

मुळात तुम्ही ओळ लिहिताना 'जशी मी लिहिली आहे' तशी लिहिलेलीच नाही आहेत, त्यामुळे अडखळत असाल तर माहीत नाही.

ओळ अशी आहे:

हेच हे अभ्यासण्यामध्ये निघाला जन्म हा

हा ठळक केलेला 'हे' तुम्ही कॉपी पेस्ट केलेला दिसत नाही आहेत. ते जर अडखळण्याचे कारण असेल तर कृपया फेसबूकवरचा प्रतिसाद संपादीत करावात. येथे राहिला तरी हरकत नाही कारण येथे मी स्पष्टीकरण दिलेले आहे.

'हे' असं मला दिसत नाही अधूनमधून..!! Sad

मोबाईलवरुन वाचताना गफलत झाली असावी.. क्षमस्व !

"हा सरस की तो सरस की तो सरस की तो सरस"
ही ओळ 'ट्रेडमार्क' बेफिकीर ओळ आहे. कुणी नुसती निनावी जरी 'कोट' केली, तरी सांगता येईल..!!

आख्खी गझल लाजवाब !

धन्यवाद !

---------------------------------------------------------

प्रोफेसरसाहेब शेर अजिबातच नाही आवडला. .

मन असे का तडफडे हे तू विचारावेस ना
का दुराव्याची कधीही टोचली नाहीस लस>>>>आवडले.

फार भिरभिर आजवर केली, पुरे आता पुरे
बैसलो जागीच एका लावुनी आता सरस!>>>>>एका जागी प्रोफेसरसाहेब गझलान्साठी काय लावुन बसले?:अओ: समाधी?

ह्या समाजाला स्वतःची आसवे पुरतात की
पावसाला सांग मित्रा तू हवे तेव्हा बरस

..
दोन रस्ते राहिले आहेत दोघांच्यापुढे
मी इथे जाऊन फसतो तू तिथे जाऊन फस

>>>>

हे दोन शेर विषेष आवडले Happy

बेफिजी, गझल एकदम मस्त.

ह्या समाजाला स्वतःची आसवे पुरतात की
पावसाला सांग मित्रा तू हवे तेव्हा बरस

मनगटे देतील पाठिंबा तुला तेव्हाच ही
सापडावी लागते मुर्दाड लोकांचीच नस>>>>>> हे दोन शेर खुप खुप आवडले.

रश्मी,

सरस हा डिंकासरखा चिकट पदार्थ असतो. तो बुडाला लावुन बसणे याचा अर्थ घट्ट निस्चय करुन बसणे

मला तुमच्या गजल नेहमीच आवडतात. ही गजल लईच भारी.

तसे सगळेच शेर मस्त आहेत पण.......

सोडली देवास कन्या, पुत्र दे देवा म्हणत
त्या मुलीला पुत्र झाला, देव चुकला की नवस

मस्त. मस्त. मस्त.

बेफिजी तुमची भाषा भारी, तुमची गजल भारी , तुमचा शेर भारी तुमची स्टाईल भारी....................तुमच सगळच लई भारी....

संपूर्ण गझल शैलीदार
सगळे शेर छानच. आवडले .

सापडावी लागते मुर्दाड लोकांचीच नस<<< ह्यातला च आवडला नाही
घर तुझे आहे स्वतःचे तर जरा टेकून बस<<<ही ओळ सर्वोत्तम आहे माझ्या मते

"सरस" नावाचा एक चिकटवण्याचा पदार्थ असतो फेविकॉल सारखा पूरवी हाच वापरत (ऐकीव माहिती) प्रा. साहेबाना तो अपेक्षित असावा