चर्निंग ऑफ द सिटी (पुस्तक परिचय)

Submitted by आतिवास on 6 July, 2014 - 07:09

तो लेखक आहे. आणि चित्रकारही. त्याचं नाव भारत. (की भरत? इंग्रजी अनुवाद वाचताना नावांची ही अशी पंचाईत होते! पण बहुधा ‘भारत’ असावं!)

ब-याच दिवसांनी तो घराबाहेर पडतो तर त्याला शहर बदललेलं दिसतं. काय आहे भवताली?

आता शहराच्या हद्दीत हसायला बंदी आहे.

‘कुणालाही मदत करू नका, कारण एकदा मदत केली की लोक तुमच्या मदतीवर अवलंबून राहतात’ असं सांगणा-या मुलांसारख्या दिसणा-या मुली आहेत; मुलीच्या वेशात नोकरीचा शोध घेणारा मुलगा आहे. खरं सांगायचं तर स्त्रिया आणि पुरुष यांच्या दिसण्यातला फरक नाहीसा झाला आहे आता.

दुकानांत दिव्यांचा झगमगाट आहे, रस्त्यांवर आता माणसांना नाही तर वाहनांना प्राधान्य आहे असा नवा नियम झाला आहे. संगीतकार असण्यासाठी तुम्हाला संगीत कळायला पाहिजे अशी सक्ती नाही, खांद्यावर हस्तिदंत घेऊन संगीतकार असल्याचा आविर्भाव असला तरी पुरे. असे बदललेले हजारो नियम ज्यात कालचं ओळखीचं शहर नष्ट झालंय.

समुद्रमंथनातून तर विष निघालं होतं म्हणतात; मग या शहरमंथनातून काय बाहेर पडेल?

ज्या शहरात भारत राहतो, तिथं नेमकं काय घडतंय? कोणते बदल होताहेत? या बदलांचा शहरातल्या लोकांवर काय परिणाम होतो आहे? या सगळ्याबद्दल बोलायचा, रडायचा त्याला अधिकार का नाही? त्याच्यावर शांत बसण्याची सक्ती का केली जातेय?

पहिल्या एक दोन पानांतच कादंबरी मनाची पकड घेते. ही कादंबरी थोडी जॉर्ज ऑर्वेलच्या “१९८४” ची आठवण करून देतेय का? का यात त्याच्याच “अ‍ॅनिमल फार्म”चे पण धागे आहेत? मनात प्रश्न येत राहतात.

या कादंबरीत रुढार्थाने पात्रं नाहीत आणि पारंपारिक शैलीतली वर्णनंही नाहीत. आहेत त्या एकामागोमाग घडणा-या घटना; त्या घटनांबद्दल प्रश्न निर्माण करणारा भारत. जणू आपला सभोवताल आणि आपली जाणीव यांची ही दोन्ही प्रतीकं. काहीकाही आठवतं. वाचलेलं; पाहिलेलं; अनुभवलेलं; घुसमट करणारं; दंगली, बॉम्बस्फोट यांच्यातून तगताना हतबल करणारं – काहीतरी जे लिंपून टाकलंय आपण सगळ्यांनी, पण अविरत आपला हिस्सा असणारं! जे प्रश्न विचारतं राहतं... ते .. आपल्यामधलं एक आवर्तन..

हे शहर ‘आपल्या’ शहरासारखंच आहे – गरीब आणि श्रीमंत यांच्यासाठी वेगवेगळं; दुभंगलेलं! इथं मुखवटे विकले जाताहेत; लोक ते धारण करताहेत त्यामुळे माणसा-माणसांतील फरक नाहीसा होतोय; सगळे अनोळखी वाटताहेत. मुखवटे माणसांच्या फक्त चेह-याचा नाही तर विचारांचा ताबा घेताहेत; मुखवटा पुरवणा-यांचा तोच उद्देश आहे. एकदा मुखवटा चढला की जबाबदारी आपली वाटायला लागते, मुखवटा विकणा-या गटाने फसवलं तरी लक्षात येत नाही; कल्पना आणि वास्तव यातल्या सीमारेषा पुसट होत जातात.

लेखकाला काही प्रश्न पडतात आणि हे प्रश्न जाऊन इतरांना विचारायची जबाबदारी त्याचा शेजारी घेतो. हा शेजारी सावलीसारखा सतत लेखकाच्या सोबत आहे. पण त्याला नाव नाही. हा सतत लेखकाला वास्तवाची जाणीव करून द्यायचा प्रयत्न करतो, लेखकाला जपायचा प्रयत्न करतो आणि तरीही लेखकाचे प्रश्न बाहेर जाऊन विचारायला तयार होतो.

तर प्रश्न असे आहेत: तुम्ही स्वत:च्या जवळ आहात की स्वत:पासून दूर? तुम्ही कुटुंबाच्या जवळ आहात की कुटुंबापासून दूर? तुम्ही शेजा-यांच्या जवळ आहात की दूर? तुम्ही रस्त्यांच्या, झाडांच्या, गल्लीच्या, भिंतीच्या, विटांच्या जवळ आहात की त्यांच्यापासून दूर आहात? जर तुम्ही जवळ असाल तर त्याने (तुम्ही स्वत:, कुटुंब, रस्ता, झाड ...) तुमच्यासाठी काय केलंय? तुम्ही त्याच्यासाठी काय केलंय?

या प्रश्नांचा शोध घेताना शेजा-याला विविध अनुभव येतात. एक स्त्री सांगते, “ मी स्वत:पासून फार दूर आहे. मी माझ्यातला दुसरा भाग कधी माझ्यातल्या पहिल्या भागाशी जोडू शकले नाही. माझ्यातल्या एका भागाला या जगाचा आणि जगण्याचा प्रचंड कंटाळा आला आहे पण दुसरा भाग मात्र जगण्याची लालसा राखून आहे. ..... इतका दुभंग घेऊन मी कशाच्या जवळ असणार आहे?”

हे वाचताना सार्त्र, काम्यू असं काहीबाही मला आठवलं असतं एरवी (आत्ता लिहिताना ते आठवले), पण वाचताना स्वत:च्या आरपार कट्यार घुसल्यागत वेदना झाली. ती क्षणिकच होती, पण खरी होती. असे प्रश्न, अशी वेदना निर्माण करणं हे या कादंबरीचं वैशिष्ट्य. वाचकाला स्वत:कडे पाहायला ही कादंबरी भाग पाडते हे या कादंबरीचं वैशिष्ट्य! यातलं काहीही अवास्तव वाटत नाही; उलट हे आपल्याभोवती घडतंय आणि आपल्याला त्याची जाणीवही नाही याचं भान ही कादंबरी जागं करते – हेही तिचं वैशिष्ट्य! ही कादंबरी आत्ममंथन करायला उद्युक्त करते – आपल्याही नकळत.

मग ती कादंबरी फक्त ६३ पानांची आहे याचं महत्त्व राहत नाही.
ती मूळ डोगरी भाषेत आहे; ही भाषा जम्मू परिसरात (आणि लगतच्या पाकिस्तानमध्ये) बोलली जाते, तिथे कुठे असलं शहरीकरण झालंय असा तार्किक प्रश्न महत्त्वाचा राहत नाही.
या कादंबरीला १९७९ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे यात नवल वाटत नाही.

“नग्न रुख” – श्री ओ. पी. शर्मा ‘सारथि’.
इंग्लीश अनुवाद श्री शिवनाथ यांनी केला आहे: ‘चर्निंग ऑफ द सिटी’ या नावाने.
प्रकाशक आहे साहित्य अकादमी, दिल्ली.
किंमत? १९९१ मध्ये मी विकत घेतलेल्या प्रतीची किंमत फक्त दहा रुपये आहे.

(१९९१ नंतर आजच मी ही कादंबरी पुन्हा वाचली.)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुस्तक परिचय आवडला.
'ओ पी शर्मा' हे एक विविधांगी व्यक्तिमत्त्व. लेखक, कवी, चित्रकार तर होतेच पण संगीत आणि उर्दू काव्याचाही खूप सखोल अभ्यास असणार्‍या या कलावंताला ' नंगा रुख ' कादंबरीत पडणारे प्रश्न जीवनभर विचारप्रवण करत राहिले ज्यांचा शोध त्यांनी विविध माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीची काही वर्षे भारतीय सैन्यदलातही (रंगारी म्हणून) नोकरी केलेल्या ओ पी शर्मांचे वाङ्मय अनेक भारतीय भाषांतून अनुवादित झालेले आहेच. 'मरुस्थल' या दीर्घ कवितेच्या वाचनानंतर त्यांचे इतर प्रकाशित साहित्य मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मराठी अनुवादांबद्दल फारशी माहिती मिळू शकली नव्हती. नंगा रुख कदाचित मराठीत भाषांतरितही झालेले नाही.
विचारवंताचा - कलावंताचा प्रवास हा वर्तमानाच्या निकषांना स्वत:च्या प्रामाण्याशी तपासून पाहत चाललेला असतो आणि त्याच्या रचना किंवा कलाकृती एक प्रकारे त्याला जाणवलेल्या तफावतीची कैफियत असते. कुणी प्रश्नांची उकल करण्याचा यत्न करतो तर कुणी प्रश्नांची व्यापकता मांडण्याचा! यादृष्टीने ऑरवेल आणि कामू आठवणे साहजिकच आहे.
ओ पी शर्मांचे वैशिष्ट्य असे की 'डोगरी'सारख्या मर्यादित वाचकवर्ग असलेल्या बोलीभाषेत मुख्यत: लिहूनही त्यांचे लिखाण सर्वंकष झाले. याबाबतीत साहित्य अकादमीचा मंच उपकारक ठरला.
ओ पी शर्मांचे लेखननाम "सारथी" आहे हीही लक्षणीय बाब आहे. यामागे त्याना आध्यात्मिक /तात्विक अर्थ अभिप्रेत असेल असे नक्की वाटते.
विचाराला चालना देणाऱ्या सकस लेखाबद्दल आभार.

धन्यवाद : वरदा, चिनूक्स, नंदिनी, अमेय२८०८०७ आणि ललिता-प्रीति.

अमेय, ओपी शर्मा यांची अन्य पुस्तकं मी अद्याप वाचली नाहीत - आता ती मिळवून वाचली पाहिजेत. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आभार.

'साहित्य अकादमी'ने असे अनेक "नवे" लेखक माझ्यासमोर आणले आहेत. एक वर्ष फक्त अकादमीची पुरस्कारप्राप्त पुस्तकं वाचावीत असा बेत आहे - कधी जमतंय ते पाहायचं!