विषय क्र. २ - ’लक्ष्मी देणार्‍या मावशी"

Submitted by कविन on 4 July, 2014 - 04:22

साधारण साडेपाच फूट उंचं, पाचवारी साडी, पदर डोक्यावरुन घेऊन पुढे ओढून घेतलेला, वय.. जाऊदे ना तसही ते सगळं मला कळलं नंतर जेव्हा प्रत्यक्ष समोर उभ्या ठाकल्या. आधी ऐकू आला तो स्पेशली ट्रेनमधे विक्री करणाऱ्या प्रत्येकाने कमावलेला असतो तोच खास आवाज.

"दिलवाले दुल्हनीया ले जायेंगेऽऽऽ, दिलवाले दुल्हऽऽनीया ले जायेंगे.." असं चिरफाड करत दोन तीन वेळा आळवत मग पुढच्या लाईनमधे "आऽऽप भी सोनाऽऽ लेऽऽ जाओऽऽ" असं समेवर येणं. हे आधी आलं ऐकू मला.

सकाळची ऑफीसवाल्यांची वेळ म्हणजे एकदम पीक पिरीएड त्यात कर्जत लोकल म्हणजे खच्चून ह्या शब्दालाही मागे टाकेल अशी गर्दी. आपले केस मानेवरुन पुढे घ्यायला जावं तर दुसरीचीच वेणी हातात यावी इतकी खेटलेली गर्दी आणि गर्दी म्हंटलं की असायचाच असा खास सगळे चॅनल एकत्र फ़ुल्ल वॉल्युम मधे लावल्यावर होतो तसा आवाज सगळीकडे भरून राहीलेला असताना मावशींचा आवाज लक्षवेधून घेत होता म्हणजे त्यांचा आवाज किती कमावलेला असेल विचार करा!

आवाजाच्या दिशेने बघायला ठाणे स्टेशन जाऊ द्यावं लागणार होतं म्हणून तोपर्यंत माझं अंदाज बांधणं हे आवडतं काम चालू होतं. आवाजावरुन मावशी वयाने ४५ च्या आसपासच्या, साडी नेसलेल्या, अंगापिंडाने धिप्पाड असाव्यात असा आपला एक अंदाज बांधून मी आता तो बरोबर निघतो की चूक हे कळण्याची वाट बघत होते.

ठाणे स्टेशन आलं आणि ठाणेकरांसोबतच त्या "दिलवाले मावशींनी" आमच्या किचन कंपार्टमेंट मधे प्रवेश केला. माझा अंदाज प्रचंड आपटलेला. साडी नेसलेल्या असतील हा एकमेव अंदाज खरा ठरला फक्त. आवाजावरुन ४५ च्या वाटणार्‍या मावशी प्रत्यक्षात ६०+ च्या आज्जी कॅटेगरीमधल्या होत्या, पण एकंदर ऍटीट्युड "आज्जी मत कहोना" असाच होता त्यामुळे मी मावशी हेच बिरूद चालू ठेवलं.

त्या आत आल्या, येऊन उभ्या राहील्या तोपर्यंत सगळं तसं नॉर्मल होतं पण जेव्हा त्यांनी हातातले कानातल्याचे बॉक्स उघडायला सुरूवात केली तेव्हा त्या एक विक्रेत्या आहेत हे आजुबाजूच्या तायाबायांना कळलं आणि मग नूरच बदलला.

एकीला त्यांचा थोडा धक्का लागला, मोबाईलवर गेम खेळताना व्यत्यय आला म्हणून तिने त्यांच्यावर खेकसून घेतलं. दुसर्‍या एकीने आकसून स्पर्श टाळत "ह्या लोकांवर बंदीच घातली पाहीजे" असा टोमणा मारला. "अच्छा है यार इनका तो, अपनेको पासका पैसा बढाया. ये लोग तिकीट भी नही निकालता होगा" असा परस्पर निश्कर्ष तिसरीने काढला. तर चौथ्या एकीला घ्यायचेच होते कानातले आणि नेमकं योग्य वेळी मावशी आल्या म्हणत तिच्या गृपकडून मावशींवर कौतूकाचा वर्षाव झाला. थोडक्यात काय तर स्वागताला ही अशी सगळ्या प्रकारची फुले उधळून झाली.

"मावशीलाबी पोट आहे. पोटासाठी करत्ये वो ताई. धक्का लागला तर सोरी बर्का." असं म्हणत मावशी जागा करुन उभं रहाता रहाता आपला टार्गेट कस्टमर शोधू लागल्या.

त्यांना त्यांचा टार्गेटेड कस्टमर गृप दिसला असावा कारण पुन्हा एकदा त्या स्पेशल कमावलेल्या आवाजामधे तेच गाणं आळवून समेवर येत "आप भी सोना ले लो" म्हणून झालं.

त्यांच्या गाण्याच्या स्टाईलमुळे आणि यमक जुळवायचा प्रयत्न करण्यामूळे सगळ्या डब्याच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या होत्या. मोबाईलवर गेम खेळणारी आणि धक्का लागू नये म्हणून आक्रसणारी मंडळीही काम थांबवून त्यांच्याकडे एक एन्टरटेनमेन्ट म्हणून बघायला लागली होती.

मावशींनी हेरलं "हीच ती वेळ.. हाच तो क्षण" आणि त्यांनी लागलीच हातातला बॉक्स समोर उभ्या असलेल्या एका तरुण मुलीकडे दिला.

"घे ग ताई सोना घेऽ चाऽंदी घे, हिरा घेऽ मोऽती घे" असं परत एकदा यमक जुळवत आळवून झालं. एकीकडे डोक्यावरुन ओढून पुढे घेतलेला पदर घट्ट लपेटणं चालू होतं.

त्या मुलीने एक कानातलं घेऊन आमच्या कंपार्टमेंट मधलं खातं उघडलं.

"कितने का मौसी?" तिने विचारलं.

"सिर्फ़ पाच का सोना ताई. घे की मॅचिंग मॅचिंग. हे बघ ह्ये बी गोड दिसतील" म्हणत त्यांचं मार्केटिंग करणं चालू होतं.

तिने दहाची नोट दिली. मावशींनी तिला एका झिपलॉक बॅग मधे घालून ते कानातलं, दोन जास्तीच्या फिरक्या आणि अजून एक बोनस कानातलं असं सगळं दिलं"

"दस का नही चाहीये" म्हणत ती पाच रुपये परत मागणार तोपर्यंत मावशींनी ब्लाऊज मधे हात घालून पैशाचं छोटं पाकीट काढलं त्यातून पाचचं नाणं काढून तिला दिलं आणि दहाची नोट आत ठेवली. वर तिला ऐकवलं "ठेव त्ये जादाचे कानातले. मावशीनी दिल्येत. लक्ष्मी आहे ती. ठ्येव ती"

ती खूष, एका कानातल्याच्या किंमतीमधे दोन मिळाली म्हणून. कितीही गर्दी असली आणि इतरवेळी कोणाला काय दुखतय खुपतय हे गर्दीमुळे ह्या टोकाचं त्या टोकाला कळत नसलं तरीही मावशी एकावर एक फ़्री ची स्कीम चालवतायत हे मात्र बरोब्बर ह्या खिडकीपासून त्या खिडकीपर्यंत सगळ्यांना कळलं. मावशी एकदम डिमांड मधे आल्या.

एकीकडे "ऐसा कैसा कोई फ़्री देगा? माल अच्छा नही रहेगा. चोरी का माल तो नही होगा?" अशी सगळी कुजबूज होऊन पण "देखे तो क्या है" ह्या भावनेने मात करत मावशींकडच्या मालाची मागणी वाढली.

त्यादिवशी बर्‍याचजणींनी मावशींकडून "लक्ष्मी" घेतली. चार दिवस चघळायला बातमी मिळाली.

मी ही घेतली. म्हणजे चांगलं अख्खं पाकीट घेतलं. झालं असं की मी दहाची नोट दिली आणि दोन कानातले निवडले. मावशी म्हणे, पंधरा दे आणि अख्खं पाकीटच घे."

मी व्यवहारी नजरेने आधी अख्ख्या पाकीटात किती कानातले आहेत ते मोजून बघीतलं. पंधराची तीन घेऊन वर मावशींनी प्रत्येकी १ असे तीन कानातले "लक्ष्मी" म्हणून दिले असते तरी ६ कानातलेच मिळाले असते. पाकीटात तर १० कानातले होते. मी लागलीच घेऊन टाकलं पाकीट. मावशींनी त्यावर पण एक कानातलं "लक्ष्मी" म्हणून दिलं.

दुसर्‍या एका मुलीला "लक्ष्मी" वालं कानातलं बदलून हवं होतं. त्यावर, "ती लक्ष्मी हाय ना? मंग बदलून बिदलून मिळणार नाही. प्रेमाने दिलय त्ये जपून ठिवावं" ह्या शब्दात मावशींनी तिची बोळवण केली.

मावशी सॉल्लीड स्कीलवाल्या सेल्सपर्सन होत्या. गाडी घाटकोपर कुर्ल्याच्या मधे होती. ठाण्यापासून हे डिस्टन्स जेमतेम १५ ते २० मिनिटं. तेव्हढ्यात त्यांच्याकडचा निम्म्याच्या वर माल संपलाही होता.

आपला बराचसा माल संपलाय हे बघीतल्यावर मावशी रिलॅक्स झाल्या आणि बसायला जागा हेरू लागल्या. तेव्हढ्यात फ़ोर्थसीट वर बसलेली एक दादरकरीण उठली आणि तिची सीट जिने सांगितलेली ती बसायच्याही आधी मावशींनी स्वत:ची वर्णी त्या जागेवर लावली.

"मावशी सीट सांगितलेय" ह्या वाक्यावर "म्हातारी मावशी दादरला उतरणारच आहे ग. बसूदे की दोन मिनिटं" म्हणत तिला पुढे काही बोलायला संधीच दिली नाही त्यांनी.

त्या जिथे बसलेल्या त्यांच्या समोरच्या आठसीटर जागेवर एक गृप बसलेला. त्या गृपमधल्या एका मुलीचा वाढदिवस होता म्हणून त्यांची पार्टी चालू होती. मावशी बसल्या तेव्हा जरा गर्दी कमी झाल्यामुळे त्यांना ही पार्टी दिसली.

"का ग पोरींनो, मावशीला नाही का द्यायाचं काही खायाला पियाला? मावशीचा गाऊन गाऊन घसा सुकला असंल, तिला भूक लागली असंल असं नाय वाटलं का?" मावशींनी त्यांना हा प्रश्न केला आणि सगळ्यांच्या भूवया उंचावल्या.

मॅनरिझमची काळजी करणार्‍या आपल्या जगात मावशींचा हा प्रश्न आगाऊपणा/हावरटपणा ह्या कॅटेगरीतच टाकला जाईल, पण मावशींच्या गावी ह्यातलं काहीही नव्हतं. त्यांच्या नजरेत कुठेही हावरेपणा, ओशाळलेपणा नव्हता.

गृपमधल्या एकीने एका पेपरप्लेट मधे त्यांच्यासाठीही एक समोसा, केकचा तुकडा, वेफर्स असं भरलं आणि डीश त्यांच्या हातात दिली.

कुणाचा आहे वाढदिवस? त्यांनी प्लेट हातात घेता घेता विचारलं.

वाढदिवस जिचा होता ती मुलगी कोण हे कळल्यावर मावशींनी तिला तोंडभरुन आशिर्वाद दिला. "घे मावशी कडून भेट" असं म्हणत बॉक्समधल्या कानातल्यांपैकी एक कानातलं काढून तिच्या हातावर ठेवलं.

समोसा तेव्हढा खाल्ला आणि बाकीचं सगळं "नातवाला लई आवडतं" म्हणत खांद्यावरच्या पिशवीत बांधून घेतलं.

वर आणीक सल्लाही दिला "आसं एकटं दुकटं खाऊ नई. सगळ्यांना देऊन खावं. हे समोसे बिमोसे बाह्येरचं महाग बी असतय आनि वाईट बी. त्यापेक्षा गोडाचा शीरा करुन आणावा. सगळ्यांना चमचाभर शीरा वाटावा. तुमी खानार आनि बकीचं तुमच्या तोंडाकडे बगणार? बरं नाई दिसत. समद्यास्नी देऊन खाल्लं तर समदे आशिर्वाद द्येतील ना?"

येव्हढ्यावरच त्या थांबल्या नाहीत तर साग्रसंगीत रेसिपी सांगून झाली शीर्‍याची. अगदी हातवारे करत सांगून झाली. म्हणजे त्यांच्या समोर ती कढई आहे, ती स्टोव्ह वर चढवलेय, त्या रवा भाजतायत इ. इ. क्रिया त्या प्रत्यक्ष तेव्हा करत असल्यासारखी अ‍ॅक्शन करत त्यांनी ती रेसिपी सांगितली.

समोश्यांच्या किमतीत इतका इतका शिरा होईल आणि चमचा चमचा प्रत्येकाला देता येईल हे त्यांनी तिथल्या तिथे पटवून दिलं.

घरी नाश्ता करायला वेळ झाला नाही तर मी बसायला मिळाल्यावर नाश्ता करते. पण त्या चमचा चमचा सगळ्यांना वाटून खावं ह्या वक्तव्यामुळे मला धीरच नाही झाला माझा डबा काढून एकटीने खायचा.

मावशी एकदम प्रवचन मोड मधेच गेलेल्या पण तोपर्यंत दादर स्टेशन आलं. मावशी उठल्या जायला. जिच्या सीटवर बसल्या होत्या तिलाही तोंडभरून आशिर्वाद दिला.

दादरला उतरायला म्हणून जाणार होत्या तेव्हढ्यात कोणीतरी "ओऽऽ कानातलं वाली" म्हणत हाक मारली.

"उतरायची येळ झाली ग ताई" असं म्हंटलं खरं पण बहुतेक "गिर्‍हाईक देवो भवं" उजवं ठरलं असणार. मावशी थांबल्या. त्यादिवशी त्या भायखळ्याला उतरल्या.

ह्या मावशींमुळे मला तिची आठवण झाली. गावी लग्न लवकर करतात म्हणून माझ्याहून लहान असूनही माझ्या लेकीपेक्षाही मोठ्या वयाच्या दोघा मुलांची ती आई आहे. ती गावाहून इथे आली लग्न होऊन आणि वस्तीतल्या इतर बायांचं बघून गाडीत टिकल्या विकायचं काम करायला लागली. आयुष्यात अशा कामाची सवय नसावी तिला कारण सुरूवातीला बुजून कोणाला आपणहोऊन ती टिकल्या दाखवायचीच नाही. मोठ्याने ओरडून जाहीरात करणं मग राहीलच बाजूला.

रोजची तिची माझी ट्रेन एक असायची. ती दिव्याला ट्रेनमधे चढायची. दोन्ही नाकात चमकी, तेल लावून घातलेली घट्ट वेणी,त्यावर एखादं फूल मस्ट, साडी, कपाळावर टिकली, वर्णाने काळीसावळी अशी ती कोणी एकदम पाचची तीन पाकिटं घेतली की पांढरे शुभ्र दात दाखवून छानसं हसायची.

रोज येऊन भीड चेपल्यावर एकदा तिने, "जुनी साडी असेल तर द्याल का?" अशी रिक्वेस्ट केली. मी जुनी साडी दिल्यावर दुसर्‍या दिवशी तीच साडी नेसून ती मला दाखवायला पण आली.

जुनी साडी, जी मी आता कधी नेसणार नव्हते ती दिलेली तिला तर शोरुम मधून १००० ची नवीकोरी साडी दिल्यासारखे भाव होते चेहर्‍यावर.

नंतर माझी नोकरी बदलली तशी ती गाडीही सुटली. एकदिवस अचानक ती मला ठाण्याहून परत येताना स्लो ट्रेनमधे भेटली. माझ्यासोबत माझी लेक होती.

"भाभी, आपकी बेटी?" म्हणत तिच्या चेहर्‍यावरुन हात फिरवून तिने कडाकडा बोटं मोडली.

मी मनाशी विचार करत होते तिला ५०-५० रुपये द्यावेत का तिच्या मुलांसाठी? योग्य राहील का असं देणं?
तोपर्यंत तिने माझ्या मुलीला टिकल्यांचा बॉक्स देऊन टिकल्या निवडायलापण सांगितल्या. त्या टिकल्यांचे तिने पैसेही नाही घेतले.

"अय्यो! बेटी पैली बार मिली ना? पैसा लेने का क्या?" असं म्हणत वर "नजर उतारना हा घर जाके" असही मला सांगून गेली.

माझ्या हातातली १०० ची नोट देऊ की नको? काय वाटेल? च्या विचारात हातातच राहीली.

ह्या मावशींनी जेव्हा बर्थडे गर्लला कानातले भेट दिले तेव्हा मला परत एकदा टिकलीवालीची आठवण झाली. नाव तर तिचही माहित नाही मला.

परत भेटल्या की विचारायचं म्हणताना राहूनच जातं नेहमी.

आता आज देखील त्या "लक्ष्मीफेम दिलवाले मावशी" आमच्या गाडीत चढलेल्या. परत एकदा त्यांच्या त्या यमक जुळवणार्‍या शब्दांमुळे लक्ष वेधलं गेलं. पण आज त्या एकावर एक फ़्री देत नव्हत्या. कदाचित त्यादिवशी त्यांचा स्टॉक क्लीअरन्स सेल असेल. दादर आलं तसं डोक्यावरुन पुढे घेतलेला पदर घट्ट ओढून घेत त्या उतरुन गेल्या देखील.

मावशींचा माझा ऋणानुबंध तेव्हढाच होता. समोर दिसल्या त्यापेक्षा जास्त काहीही माहिती मला नव्हती त्यांच्याविषयी. इथे रोज भेटणार्‍यांपैकी पण बर्‍याच जणींचं नाव माहित नसतं. वर्षानुवर्ष चेहर्‍याचीच फक्त ओळख असते. फारफारतर ती ८.०५ वाली लंबू, किंवा ७.५० मधल्या काकू इतपतच कधी कधी ओळखीचं स्वरुप असतं. मग ह्या मावशींबद्दल अधीक माहिती साठवायला कुठे जागा असणार?

इतरांना लक्ष्मी वाटणार्‍या मावशींना ह्या वयातही गर्दीत धक्के खात कमाईचा मार्ग शोधायला का लागावा? आणि "जे खावं ते सगळ्यांनी वाटून खावं" हे सुंदर तत्वज्ञान सांगणार्‍या मावशी आमच्यालेखी निव्वळ एक एन्टरटेनमेन्टचा विषय का असाव्यात? हे मला पडलेले प्रश्नही तात्पूरतेच खरतर.चार दिवसांनी तर हे देखील मी विसरून जाईन. ऑल ईज वेल म्हणत नेहमीच्या जगात मी रममाण होईन.

पर्समधे ठेवलेली "ती लक्ष्मी" तेव्हढी न दिसणार्‍या जागी ठेवायला हवी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजक शिर्षकामधला टायपो फक्त दुरूस्त केला आहे . मोबाईलमधून नीट टाईप झाला नव्हतं र्‍यतंहे अक्षर म्हणून तेव्हढं नीट केलं आहे

खूपच छान संयत लेखन
पर्समधे ठेवलेली "ती लक्ष्मी" तेव्हढी न दिसणार्‍या जागी ठेवायला हवी.>>> ही ओळ तर मस्तच...

मस्तं!
खूपश्या ओळखीच्या विक्रेत्या आठवल्या.
अगदी घ्या हो घ्या हो म्हणून मागे लागणार्यांपासून भाव खात खात साड्या, ड्रेस मटेरियल दाखवणार्या गुज्जुबेनपर्यंत सगळ्या.
मुंबईतल्या ट्रेनचा लेडिज डबा आणि ते पाच पाच रूपयांचे कानातले अगदी मिस करतेय.
आज सात वर्षांनीही माझ्याकडे त्यातले काही खड्यांचे कानातले आहेत.
Wink

खुप सुंदर लिहिलेय.. या लोकांकडे "काय हा त्रास" म्हणूनच बघितले जाते सहसा.. एवढा विचार केला ते फारच आवडलं.

मस्त लिहीलंय. मावशी डोळ्यासमोर आल्या अगदी.
कधी कधी अती विचार करत किती कद्रूपणा करत असतो आपणही.

धन्यवाद शैलजा, मनीमोहोर, अनघा, अश्विनी, शशांक, सुलेखा, शोभनाताई, हर्पेन, आशिका, स्नेहनील,अवल, लतांकुर,साती, असामि, नंदिनी, दिनेश, सायो Happy

@साती, खरय प्रत्येक विक्रेत्याची तर्‍हाही वेगळीच असते

@सायो, खरच ग. कद्रूपणाच Sad त्यानंतर त्या टिकलीवालीला मी दोन तीन वेळा मदत केली पण बुंद से गई वो... त्यातलीच गत. तिने कसलाही विचार न करता टिकल्यांची पाकीटं लेकीच्या हातात दिली. मी मात्र तेव्हा मध्यमवर्गीय विचार करत बसले "असं द्यावं का? बरं दिसेल का? ह्याव नी त्याव.." असो. जो बीत गई सो बीत गई ह्यात अन्डू ऑप्शन नाही.

अतिशय सुंदर लिहिलंस कविता. किती रंग बघायला मिळतात नाही का ह्या ट्रेनच्या प्रवासात. त्या मावशीचं अगदी सुरेख वर्णन केलंस आणि त्या मुलीचंही. खुप चटपटीत वाटल्या मावशी, त्यांची माणुसकीही दिसली.

लग्नाच्या आधी मी जेव्हा नोकरी करायचे तेव्हा ट्रेनमध्ये कानातले, टिकल्या घ्यायला खुप आवडायचं मला. उजाळा मिळाला त्या गोष्टींना.

फारच सुंदर. खूप आवडलं. Happy

(अवांतर : ओ ०७:५०वाल्या ताई, इतक्या वर्षांच्या ट्रेन-प्रवासात असे अगणित अनुभव तुमच्या ठायी जमा झाले असतील. ते सगळे अशा प्रकारे मांडून आम्हाला उपकृत करा की... अशी स्पर्धा जाहीर होण्याची वाट का बघावी म्हणते मी? Wink )

सुंदरच लिहिलेय, व्यक्तीचित्रणाबरोबर प्रसंगवर्णनही छान झालेय, अगदी लेडीज डब्यात फिरवून आणले तुमच्या मावशीने. Happy

धन्यवाद देवकी, जाई, सावली, अन्जू, रान्चो, अनिश्का, लले, अभिषेक,शूम्पी, महेश Happy

अने, ८.०५ वाली लंबू, तू गावच बदललस मग कशी भेट होणार त्या ट्रेनला Wink

लले, Lol जल्ला पायांवर धोंडे पाडून घ्यायची हौस किती तुला?

अभिषेक, चला प्रोहीबीटेड एरीयामधे फिरणं झालं त्यानिमीत्ताने तुझं Wink

Pages