विषय क्र. २ - 'ऑ-ईगो'

Submitted by हायझेनबर्ग on 2 July, 2014 - 00:21

मी एक पाय जमिनीवर असलेला नरपुंगव आहे आणि माझी व्यक्तीपुजा करणार्‍या कोट्यावधी जनांचा मी धिक्कार करतो. मी नेहमी प्रसिद्धीपरांग्मुख राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो कारण प्रसिद्धी म्हणजे प्रगतीपथातला अडथळा असे माझे स्पष्टं मत आहे. स्वस्तुती हे तर महापाप, म्हणून तिचा नेहमीच अव्हेर करीत एक शीलवान, नम्र आणि चोवीस कला अवगत असणारा सर्वगुणसंपन्न व्यक्ती बनण्याचा माझा निर्धार आहे, व त्यासाठी मी कसोशीने यत्न करीत असतो. 'मी पंतप्रधान झालो तर' किंवा 'मला लॉटरी लागली तर' अश्या ह्या किंवा कुठल्याही जन्मी अशक्य वाटणार्‍या मनोविलासात रमवून एक हीन आणि दुबळे व्यक्तिमत्व बनवण्यासाठी शैक्षणिक मंडळाने माझ्यावर नाना तर्‍हांनी मणामणाचा दबाव आणला पण माझ्या बंडखोर मनाला केवळ सत्याची एकमेव मशाल दाखवत मी माझे एक स्वयंभू व्यक्तिमत्व तयार केले आहे. त्याचाच एक परिणाम म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वाने भारावून जाऊन संयोजकांनी मला व्यक्तीचित्रण लिहिण्यासाठी मिनिटागणिक केलेल्या कळकळीच्या विनंत्या, त्यास मान देऊन मी स्वतःबद्दल दोन शब्द तुम्हाला सांगू ईच्छित आहे. -

मी एक ऊच्चकोटीचा साहित्यिक असून फिगर-स्केटिंगमध्ये ६७व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये मला दोन सुवर्ण आणि एक कांस्य पदक मिळाले आहे. एकदा आंघोळ करतांना मी सहजच गायलेल्या राग 'विश्वमोहिनीचे' सर्व जेष्ठ संगीतकारांनी पुढच्या पुनर्वसू नक्षत्रदर्शनापर्यंत सोवळ्यानिशी अहोरात्र गायन करण्यासाठी अनुष्ठान योजले आहे. मला वॉलमार्टातल्या सगळ्या प्रॉडक्ट्सचे बारकोड पर्फेक्ट वाचता येतात. मी एका गॅराज सेलमध्ये $४.०४ ला विकत घेतलेल्या अतिप्राचीन ग्रंथातील ई.स्.पूर्व २००० सालच्या चित्रलिपीवरून पिरॅमिडसच्या बांधकामाची ब्लू प्रिंट बनवली आहे, लवकरच मी 'पिरॅमिड्स फॉर डमीज' पुस्तक प्रकाशित करणार आहे. मला सर्पदंशावर एकोणावीस वेगवेगळे, कायमस्वरूपी, घरगुती, रामबाण ऊपाय माहित आहेत. वाढत्या वयानुसार केसांचे गळणे टाळण्यासाठी मी विकसित केलेली लस जन्मलेल्या प्रत्येकाला केस कापतांना घेणे कायद्याने बंधनकारक आहे. मी जापनीज लोकांसाठी बोहेमिअन म्हणी आणि ऊखाण्यांचे पॉकेट-बुक प्रकाशित केले आहे, ज्याच्या नऊ आवृत्ती हातोहात विकल्या गेल्या. दारूच्या अंमलाखाली फोनवर बोलतांना ऐकणार्‍याला तुमचा नेहमीचा प्रसन्न आवाज ऐकवण्यासाठी मी तयार केलेले अ‍ॅप प्रत्येक अ‍ॅपल आणि अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन वर प्रीलोडेड असते.

काल पौर्णिमेची रात्र मी शनिवारवाड्याच्या चार भिंतींच्या आत काढली आणि 'काका मला वाचवा' च्या तीन आरोळ्या माझ्या आयफोन-७ वर रेकॉर्ड केल्या, आजपासून माझी रिंगटोन ह्या जगात युनिक आहे. मी बनवत असलेल्या टाईम-मशिनचे काम पूर्ण झाल्यावर मी टाईम ट्रॅवल करून आदिलशहाला भेटणार आहे, मला मॉर्निंग-अलार्म म्हणून मुलुख-मैदान तोफेचे तीन बार रेकॉर्ड करायचे आहेत. माझा क्लाऊडवर ठेवलेला 'रेनमिकेंग अल्गोरिदम' गहाळ झाल्यामुळे ऊजव्या हाताने 'दास कॅपिटल'ची समीक्षा लिहितांना मी डाव्या हाताने 'रेनमेकिंग अल्गोरिदम' १३.१ मिनिटात पुन्हा लिहून काढला. कुर्दिश बंडखोरांकडून मला ग्युरिला वॉरफेअरचे प्रशिक्षण मिळाले आहे आणि ख्रिस्मस जिंगल्स वापरून मेघदुतातल्या कडव्याना चाली लावण्याचा माझ्याकडे प्रताधिकार आहे. केवळ एक गलोल आणि मोहरी चे दाणे वापरून मी एकदा शेतावर आलेली टोळधाड परतवून लावली आहे.

मी महिन्यातल्या पाचव्या रविवारी जनता दरबार भरवून विनामोबदला मॅरेज काऊन्सिलिंग करतो त्यादिवशी शहरात निरोधांचा तुटवडा भासतो. मला राग येत नाही, षडरिपूंवर मी पाचव्या ईयत्तेत शिकतांना विजय मिळवला असून माझ्या मस्तकाभोवती कायम तेजोवलय असते आणि माझ्या डोळ्यांचा रंग मोरपंखी आहे. जेवणानंतर मी न चुकता तिबेटियन पठारावर तीन फेर्‍या मारत शतपावली करतो. मला दर एकादशीला प्रचंड कंटाळा येतो तेव्हा मी रशियन आणि मंगोलियन शिव्यांचा शब्दकोष संस्कृतात भाषांतरित करायला घेतो. मला बालवाडी पासून कॉलेजपर्यंतच्या माझ्या वर्गातल्या प्रत्येक मुलीची पूर्ण माहिती नाव, गाव, पत्ता आणि परिक्षेतल्या मार्कांसहित तोंडपाठ आहे. नुकत्याच घेण्यात आलेल्या जनमत चाचणीनुसार जगभरच्या तरूण मुलींनी 'आयडिअयल बॉडी प्रपोर्शन ईंडेक्स' साठी माझ्या नंतर ह्यू जॅकमनला दुसर्‍या क्रमांकाची पसंती दिली. मी फक्त आणि फक्त आगंतुक म्हणूनच लोकांच्या घरी जातो आणि आमंत्रण मिळणे मला अपमानकारक वाटते.

मी अंतर्धान पावतो, मी प्रसन्न होतो, मी आशिर्वाद देतो पण मी नास्तिक असून 'गॉडपार्टिकलला' माझे नाव देण्यासाठी मी ३३ कोटी सह्यांची मोहिम हाती घेतली आहे. मी तयार केलेल्या गुलाबाच्या कलमाला ज्या रंगाचे पाणी घालाल त्याच रंगाचे गुलाब येतात. एकदा लंकेच्या सामुद्रधुनीत पोहतांना प्रचंड लोकाग्रहास्तव ऑलिंपिकच्या ज्योतीस मी स्वहस्ते भारतातून श्रीलंकेत घेऊन जाण्याचा मान दिला होता आणि नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर फडकविलेल्या अमेरिकन झेंड्यावर माझी स्वाक्षरी आहे. जगातल्या सगळ्या सरकारांनी आपत्कालीन मदतीसाठी एकमताने १८८१ हा फोननंबर माझ्यासाठी राखून ठेवला आहे. (सूचना - हा नंबर टोल फ्री नाही आणि माझ्याकरिता व्हॉईस मॅसेज ठेवण्याआधी कुठल्याही राष्ट्रप्रमुखास 'लाय डिटेक्टर टेस्ट' पास करणे बंधनकारक आहे.) एकदा मी भगवद-गीता, गीतारहस्य आणि गीतांजली हे तीनही साहित्यप्रकार विशाल जनसमुदायास अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितल्यानंतरही न थकता एका हास्य कवी संमेलनास ऊपस्थित राहून ऊत्तेजनार्थ बक्षीस मिळवले होते.

बाऊंसर, बीमर, गुगली आणि फ्लिपर अश्या अनेक प्रकारच्या बॉलवर मी फक्त कव्हर ड्राईवचे सलग ११९ पर्फेक्ट शॉट मारून अनेकाना अनेकवेळा अचंबित केले आहे. मी वर्षातून फक्त एकदाच खोटं बोलतो आणि जे बोलतो ते 'माझे सत्याचे प्रयोग' ह्या मथळ्याखाली जगातील सगळ्या भाषेतील वर्तमानपत्रात प्रकाशित होते. कुठल्याही फळातील पोषणमुल्ये ३००० टक्क्यांनी वृद्धींगत करून त्यापासून प्रत्येक स्वादाची वाईन बनवण्याची रेसिपी मी विकसित केली आहे. (हेल्थ टीप - ही वाईन प्रचंड पोटेंट पण कोलेस्ट्रॉल आणि कॅलरी फ्री आहे.) मी केवळ कांद्याची पात आणि हातसडीचा तांदूळ वापरून पंचपक्वान्नाचे जेवण साग्रसंगित बनवू शकतो. प्रत्येक लहान मूल माझ्याकडे येण्यासाठी आईच्या कडेवरून झेपावते. एकदा कोर्ट चालू असतांना शिंक येऊन माझ्याकडून शांततेचा भंग झाल्याने मी माझा 'नोबेल शांतता पुरस्कार' नॉर्वे सरकारला सन्मानाने परत केला. एकदा समुद्रावर फिरतांना जिंकणारे लॉटरीचे तिकिट सोडतीपूर्वीच ओळखण्यासाठीचे प्रमेय मी रेतीत मांडले होते पण नेमकी त्यावेळी त्सुनामी येऊन ते वाहून गेले. मला कधीमधी टेंशन येते आणि स्ट्रेस फ्री होण्यासाठी मी वेअरवुल्फचे रक्त कोकेनसारखे टोचून घेतो व मला आजवर मायबोलीवरच्या एकाही स्पर्धेचे विजेतेपद मिळालेले नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आजवर मायबोलीवरच्या एकाही स्पर्धेचे विजेतेपद मिळालेले नाही.<<< मिळालं हां!!!!

हार्दिक अभिनंदन. हे सर्वात भारी लिहिलेलं व्यक्तीचित्र आहे.

मी नॉर्वे सरकारला सन्मानाने परत केलेला नोबेल शांतता पुरस्कार आजच दोघांना विभागून दिला गेला. हा पुरस्कार भारतातच रहावा ह्या माझ्या ईच्छेचा मान राखल्याबद्दल मी नोबेल कमिटी ला चालू आर्थिक वर्षात ३% करमाफी जाहीर करतो, तसेच परत केलेल्या नोबेल पुरस्कारामुळे शेल्फवर रिकामी झालेली जागा मायबोली पुरस्काराने पुन्हा भरल्याबद्दल मी मायबोलीला माझे मुखपत्र म्हणून जाहीर करतो.

हा लेख लिहिल्यापासून ते आजपर्यंतच्या काळात मी,
अ‍ॅमेझॉन रेनफॉरेस्टमधल्या प्रत्येक झाडाला विंडचाईम लावून टाकले, आता त्याचा मंजूळ आवाज चंद्रापर्यंत रेझोनेट होतो. माझा किडनी स्टोन मंगळयानाने पृथ्वी आणि मंगळाच्या निम्म्या अंतरावर अवकाशात प्रतिष्ठापित केला आहे आणि भविष्यातल्या मंगळप्रवासात पृथ्वीवासियांसाठी हा एकमेव थांबा असेल. माझ्या पडलेल्या दुधाच्या दाताचा पिसाच्या मनोर्‍याला टेकू देऊन ह्यापुढे मनोरा झुकणार नाही असा बंदोबस्त मी केला आहे. 'जगात माझ्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावाची लाट असून मी जगाचा कारभार एकहाती चालवणार आहे' अशी अफवा पसरवून माझी अवहेलना केल्याबद्दल मी १९६ पैकी ९९ देशांच्या अध्यक्ष आणि पंतप्रधानांना ग्वांटानोमो बे तुरुंगात काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी डांबून टाकले. प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक घरात पेट्रोलच्या नळांची सुविधा ऊपलब्ध करून देण्यासाठी पाईपलाईन टाकण्याच्या आणि वाफेवर चालणार्‍या गाड्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्मितीच्या कामाला मी कालपासूनच सुरूवात केली आहे. मोफत चिवडा आणि शंकरपाळ्यांची पाकिटे देणारी वेंडिंग मशिन्स जगातल्या सगळ्या हॉस्टेल्सवर बसवण्याचे काम मागच्याच आठवड्यात हातावेगळे करून झाले. सध्या मी माझ्या मुखपत्राच्या दिवाळी अंकासाठी 'क्रांतिकारी बदल' ह्या सदराखाली मी निर्मिलेल्या, आफ्टर मॉर्निंग पिल 'वेटाग्रा' ह्या शोधाबद्दल लिहित आहे. मुखपत्राच्या नियमानुसार पूर्वप्रकाशित लेखन चालणार नसल्याने सध्या एवढेच सांगतो की, वेईंग स्केलचा काटा तुमच्या टार्गेट वजनवर ठेऊन ही गोळी घेतल्यास दोन तासात तुम्ही तुमचे टार्गेट वजन कमावता वा गमावता. (सूचना - १० मिलिग्राम चा एरर अपेक्षित, साईड ईफेक्ट्स - ईनक्रीज्ड एनर्जी लेवल आणि ईनक्रीज्ड ब्रेन फंक्षन, फडअ अ‍ॅप्रूव्ड). वेळेभावी हा लेख अपूर्ण राहून संपदकांपर्यंत तो न पोचल्यास प्रकशित अंकात माझ्या ब्लॅ़ंक लेखाखाली प्रतिक्रिया लिहिणे सगळ्या मायबोलीकरांना बंधनकारक आहे.

ध मा ल! अभिनंदन..यू डिझर्व्ह इट.

मोफत चिवडा आणि शंकरपाळ्यांची पाकिटे देणारी वेंडिंग मशिन्स

हे बेस्ट होईल जरा माझ्या घरी पण एक लावून दया.

याचा पार्ट २ पण लिहा Happy

लेख संपादित करता येत नसल्याने ईथे प्रतिसादातच लिहितो.

मी लिहिलेलं हे व्यक्तिचित्रण ओरिजिनल आहे असा वाचकांनी गृहीत धरलेला माझा दावा मी मागे घेत आहे. ह्या व्यक्तिचित्रणासाठी संयोजकांनी दिलेले प्रशस्तीपत्रकही मी सन्मानपूर्वक परत करीत आहे. ह्या स्पर्धेत मिळालेल्या पारितोषिकाचे कॅश वाऊचर मी कधीच एनकॅश केले नाही त्यामुळे तो एक गिल्ट टाळला गेल्याचे थोडेसे समाधान वाटते आहे.

व्यक्तिचित्रणात चित्रित केल्याबरहुकूम व्यक्ती खरी नाही हे मी आधीच्या प्रतिसादांमध्ये स्पष्ट करायला हवे होते. हे व्यक्तिचित्रण लिहिण्याची ओरिजिनल कल्पना माझी नाही. तिच्या मूळ कल्पनेबद्दल ह्या आधीच सविस्तर लिहायला हवे होते जे करणे मी जाणूनबुजून टाळले. क्षमस्व.

ओरिजिनल कल्पना
पूर्वी अमेरिकन सैन्यात असलेल्या माझ्या एका सहकार्‍याने त्याचा जुन्या दिवसांचा अनुभव सांगतांना हे सांगितले. सैनिक टोळक्याने बीअर प्यायला जमत तेव्हा शेवटची बीअर पितांना एक अफलातून बढाई मारून बाटली फोडणे अशी मजेशीर प्रथा त्यांच्यात रूढ होती. ही बढाई जनरली प्रथमपुरूषी अति-अश्लील विनोद असत. ज्याच्या बढाईवर कमीतकमी हशा पिकेल तो पुढच्यावेळी सगळ्यांसाठी बीअरच्या एका राऊंडचे पैसे देणार असा प्रघात होता. फिशिंग कम्युनिटी, शिकारी ते कॉलेज फ्रॅटर्निटीज अशा सगळ्याच ग्रूपमध्ये ह्या बढाई खेळाचे वेगवेगळे प्रकार अस्तित्वात आहेत. ह्या बढायांवरून मी हे व्यक्तिचित्रण ऊचलले आहे.

ही माहिती वाचकांपासून जाणूनबुजून लपविल्याबद्दल मी वाचकांची क्षमा मागतो. माझ्या ह्या कृत्याबद्दल मी अतिशय खजील आहे.

हाब, सावरा स्वतःला.
काही दिवस मायबोलीपासुन दुर रहा. स्वतःकडे घर-कुटुंबाकडे ऑफिसकडे लक्ष द्या. त्यात मन रमवा. (अर्थात ते सगळं व्यवस्थित चालु असेलच. इथल्या शुल्लक गोष्टीमुळे बाकी जीवन काही थांबत नाही. पण इथे दुर्लक्ष होण्यासाठी तिथे जास्त लक्ष द्या असा अर्थ.)
हे जे काही चाललंय (तुम्ही चालवलंय) त्याकडे जरा तटस्थ पणे / तिसरी व्यक्ती म्हणून बघा. तुमचं तुम्हाला कळेल.
किंवा हे सगळं जवळच्या कुणाला तरी सांगा. कदाचित कुणाशी तरी शेअर केल्याने/ डिस्कस केल्याने क्लोजर मिळेल.
तुम्हाला खरंच मनस्ताप झालाय म्हणून असं वागत असाल तर खरंच ह्यातुन बाहेर पडा. तुम्हाला ते जमेलच.
पण मुद्दाम जाणून्बुजुन करत असाल (असं वाटत नाहीये मला. पण खरं इथे कळणं शक्य नाही) मजा म्हणून तर मग काय बोलणार.
झालंगेलं सोडुन द्या. बाहेर पडा ह्यातुन. याउप्पर तुम्हाला जास्त कळतं. तुमची मर्जी.

Pages