विषय क्र. २ - 'ऑ-ईगो'

Submitted by हायझेनबर्ग on 2 July, 2014 - 00:21

मी एक पाय जमिनीवर असलेला नरपुंगव आहे आणि माझी व्यक्तीपुजा करणार्‍या कोट्यावधी जनांचा मी धिक्कार करतो. मी नेहमी प्रसिद्धीपरांग्मुख राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो कारण प्रसिद्धी म्हणजे प्रगतीपथातला अडथळा असे माझे स्पष्टं मत आहे. स्वस्तुती हे तर महापाप, म्हणून तिचा नेहमीच अव्हेर करीत एक शीलवान, नम्र आणि चोवीस कला अवगत असणारा सर्वगुणसंपन्न व्यक्ती बनण्याचा माझा निर्धार आहे, व त्यासाठी मी कसोशीने यत्न करीत असतो. 'मी पंतप्रधान झालो तर' किंवा 'मला लॉटरी लागली तर' अश्या ह्या किंवा कुठल्याही जन्मी अशक्य वाटणार्‍या मनोविलासात रमवून एक हीन आणि दुबळे व्यक्तिमत्व बनवण्यासाठी शैक्षणिक मंडळाने माझ्यावर नाना तर्‍हांनी मणामणाचा दबाव आणला पण माझ्या बंडखोर मनाला केवळ सत्याची एकमेव मशाल दाखवत मी माझे एक स्वयंभू व्यक्तिमत्व तयार केले आहे. त्याचाच एक परिणाम म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वाने भारावून जाऊन संयोजकांनी मला व्यक्तीचित्रण लिहिण्यासाठी मिनिटागणिक केलेल्या कळकळीच्या विनंत्या, त्यास मान देऊन मी स्वतःबद्दल दोन शब्द तुम्हाला सांगू ईच्छित आहे. -

मी एक ऊच्चकोटीचा साहित्यिक असून फिगर-स्केटिंगमध्ये ६७व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये मला दोन सुवर्ण आणि एक कांस्य पदक मिळाले आहे. एकदा आंघोळ करतांना मी सहजच गायलेल्या राग 'विश्वमोहिनीचे' सर्व जेष्ठ संगीतकारांनी पुढच्या पुनर्वसू नक्षत्रदर्शनापर्यंत सोवळ्यानिशी अहोरात्र गायन करण्यासाठी अनुष्ठान योजले आहे. मला वॉलमार्टातल्या सगळ्या प्रॉडक्ट्सचे बारकोड पर्फेक्ट वाचता येतात. मी एका गॅराज सेलमध्ये $४.०४ ला विकत घेतलेल्या अतिप्राचीन ग्रंथातील ई.स्.पूर्व २००० सालच्या चित्रलिपीवरून पिरॅमिडसच्या बांधकामाची ब्लू प्रिंट बनवली आहे, लवकरच मी 'पिरॅमिड्स फॉर डमीज' पुस्तक प्रकाशित करणार आहे. मला सर्पदंशावर एकोणावीस वेगवेगळे, कायमस्वरूपी, घरगुती, रामबाण ऊपाय माहित आहेत. वाढत्या वयानुसार केसांचे गळणे टाळण्यासाठी मी विकसित केलेली लस जन्मलेल्या प्रत्येकाला केस कापतांना घेणे कायद्याने बंधनकारक आहे. मी जापनीज लोकांसाठी बोहेमिअन म्हणी आणि ऊखाण्यांचे पॉकेट-बुक प्रकाशित केले आहे, ज्याच्या नऊ आवृत्ती हातोहात विकल्या गेल्या. दारूच्या अंमलाखाली फोनवर बोलतांना ऐकणार्‍याला तुमचा नेहमीचा प्रसन्न आवाज ऐकवण्यासाठी मी तयार केलेले अ‍ॅप प्रत्येक अ‍ॅपल आणि अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन वर प्रीलोडेड असते.

काल पौर्णिमेची रात्र मी शनिवारवाड्याच्या चार भिंतींच्या आत काढली आणि 'काका मला वाचवा' च्या तीन आरोळ्या माझ्या आयफोन-७ वर रेकॉर्ड केल्या, आजपासून माझी रिंगटोन ह्या जगात युनिक आहे. मी बनवत असलेल्या टाईम-मशिनचे काम पूर्ण झाल्यावर मी टाईम ट्रॅवल करून आदिलशहाला भेटणार आहे, मला मॉर्निंग-अलार्म म्हणून मुलुख-मैदान तोफेचे तीन बार रेकॉर्ड करायचे आहेत. माझा क्लाऊडवर ठेवलेला 'रेनमिकेंग अल्गोरिदम' गहाळ झाल्यामुळे ऊजव्या हाताने 'दास कॅपिटल'ची समीक्षा लिहितांना मी डाव्या हाताने 'रेनमेकिंग अल्गोरिदम' १३.१ मिनिटात पुन्हा लिहून काढला. कुर्दिश बंडखोरांकडून मला ग्युरिला वॉरफेअरचे प्रशिक्षण मिळाले आहे आणि ख्रिस्मस जिंगल्स वापरून मेघदुतातल्या कडव्याना चाली लावण्याचा माझ्याकडे प्रताधिकार आहे. केवळ एक गलोल आणि मोहरी चे दाणे वापरून मी एकदा शेतावर आलेली टोळधाड परतवून लावली आहे.

मी महिन्यातल्या पाचव्या रविवारी जनता दरबार भरवून विनामोबदला मॅरेज काऊन्सिलिंग करतो त्यादिवशी शहरात निरोधांचा तुटवडा भासतो. मला राग येत नाही, षडरिपूंवर मी पाचव्या ईयत्तेत शिकतांना विजय मिळवला असून माझ्या मस्तकाभोवती कायम तेजोवलय असते आणि माझ्या डोळ्यांचा रंग मोरपंखी आहे. जेवणानंतर मी न चुकता तिबेटियन पठारावर तीन फेर्‍या मारत शतपावली करतो. मला दर एकादशीला प्रचंड कंटाळा येतो तेव्हा मी रशियन आणि मंगोलियन शिव्यांचा शब्दकोष संस्कृतात भाषांतरित करायला घेतो. मला बालवाडी पासून कॉलेजपर्यंतच्या माझ्या वर्गातल्या प्रत्येक मुलीची पूर्ण माहिती नाव, गाव, पत्ता आणि परिक्षेतल्या मार्कांसहित तोंडपाठ आहे. नुकत्याच घेण्यात आलेल्या जनमत चाचणीनुसार जगभरच्या तरूण मुलींनी 'आयडिअयल बॉडी प्रपोर्शन ईंडेक्स' साठी माझ्या नंतर ह्यू जॅकमनला दुसर्‍या क्रमांकाची पसंती दिली. मी फक्त आणि फक्त आगंतुक म्हणूनच लोकांच्या घरी जातो आणि आमंत्रण मिळणे मला अपमानकारक वाटते.

मी अंतर्धान पावतो, मी प्रसन्न होतो, मी आशिर्वाद देतो पण मी नास्तिक असून 'गॉडपार्टिकलला' माझे नाव देण्यासाठी मी ३३ कोटी सह्यांची मोहिम हाती घेतली आहे. मी तयार केलेल्या गुलाबाच्या कलमाला ज्या रंगाचे पाणी घालाल त्याच रंगाचे गुलाब येतात. एकदा लंकेच्या सामुद्रधुनीत पोहतांना प्रचंड लोकाग्रहास्तव ऑलिंपिकच्या ज्योतीस मी स्वहस्ते भारतातून श्रीलंकेत घेऊन जाण्याचा मान दिला होता आणि नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर फडकविलेल्या अमेरिकन झेंड्यावर माझी स्वाक्षरी आहे. जगातल्या सगळ्या सरकारांनी आपत्कालीन मदतीसाठी एकमताने १८८१ हा फोननंबर माझ्यासाठी राखून ठेवला आहे. (सूचना - हा नंबर टोल फ्री नाही आणि माझ्याकरिता व्हॉईस मॅसेज ठेवण्याआधी कुठल्याही राष्ट्रप्रमुखास 'लाय डिटेक्टर टेस्ट' पास करणे बंधनकारक आहे.) एकदा मी भगवद-गीता, गीतारहस्य आणि गीतांजली हे तीनही साहित्यप्रकार विशाल जनसमुदायास अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितल्यानंतरही न थकता एका हास्य कवी संमेलनास ऊपस्थित राहून ऊत्तेजनार्थ बक्षीस मिळवले होते.

बाऊंसर, बीमर, गुगली आणि फ्लिपर अश्या अनेक प्रकारच्या बॉलवर मी फक्त कव्हर ड्राईवचे सलग ११९ पर्फेक्ट शॉट मारून अनेकाना अनेकवेळा अचंबित केले आहे. मी वर्षातून फक्त एकदाच खोटं बोलतो आणि जे बोलतो ते 'माझे सत्याचे प्रयोग' ह्या मथळ्याखाली जगातील सगळ्या भाषेतील वर्तमानपत्रात प्रकाशित होते. कुठल्याही फळातील पोषणमुल्ये ३००० टक्क्यांनी वृद्धींगत करून त्यापासून प्रत्येक स्वादाची वाईन बनवण्याची रेसिपी मी विकसित केली आहे. (हेल्थ टीप - ही वाईन प्रचंड पोटेंट पण कोलेस्ट्रॉल आणि कॅलरी फ्री आहे.) मी केवळ कांद्याची पात आणि हातसडीचा तांदूळ वापरून पंचपक्वान्नाचे जेवण साग्रसंगित बनवू शकतो. प्रत्येक लहान मूल माझ्याकडे येण्यासाठी आईच्या कडेवरून झेपावते. एकदा कोर्ट चालू असतांना शिंक येऊन माझ्याकडून शांततेचा भंग झाल्याने मी माझा 'नोबेल शांतता पुरस्कार' नॉर्वे सरकारला सन्मानाने परत केला. एकदा समुद्रावर फिरतांना जिंकणारे लॉटरीचे तिकिट सोडतीपूर्वीच ओळखण्यासाठीचे प्रमेय मी रेतीत मांडले होते पण नेमकी त्यावेळी त्सुनामी येऊन ते वाहून गेले. मला कधीमधी टेंशन येते आणि स्ट्रेस फ्री होण्यासाठी मी वेअरवुल्फचे रक्त कोकेनसारखे टोचून घेतो व मला आजवर मायबोलीवरच्या एकाही स्पर्धेचे विजेतेपद मिळालेले नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्मचित्रण आवडले.
माबोवरच्या प्रत्येक चक्रमाचे व्यक्तिविशेष रजनीकांतच्या रक्तात मिसळून त्याला मकरंद अनारसपुरेची फोडणी देऊन बनवलेले अर्कचित्रं वाटत आहे.
अर्थात या लोअर क्लास लोकांचे नाव आपल्याबरोबर घेऊन आपला अपमान करित आहे याची म्या पामराला कल्पना आहेव्ह, पण शेवटी आमच्या सारख्या सामान्यांची कल्पना भरारी आम्हाला ज्ञात व्यक्तिविशेषांशी तुलना करण्यापर्यंतच पोहोचणार ना!
असो, 'नरपुंगव चाहता संघ' अश्या संघाची स्थापना करून माझे नाव सदस्या म्हणून नोंदवित आहे.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

कोण मोदी? कोण रजनीकांत?

'नरपुंगव चाहता संघ' >> वाचले नाहीत का मी माझ्या व्यक्तीपुजेच्या विरोधात आहे?

छान

कृपया काही शब्दांचे अर्थ लिहाल का... आमच्या अल्प बुध्दीला झेपत नाही आहेत काही शब्द..

ही फारच तुच्छ स्वरुपाची विनंती करत आहे ..

अनेक व्यक्तिमत्वांचे मिळून एकच जोरदार व्यक्तिचित्रण ! Lol
वाचताना अनेक वेळा लेखकाच्या मनात वर्तक असतील काय असे वाटले. Wink

चमन Rofl

हे वाचून लेखकाला फिल्मफेयर आँस्कर अवार्ड द्यायची अतिव इच्छा झैलेली आहे परंतू हे कमी होईल म्हणून झुमरीतलैय्यारत्न घोषित करत आहे यात एक दुबईचे एक बेट, एयरफोर्स वन चे विमान, टाइटैनिक चे जहाज, आणि एक टाटा नैनो कार समाविष्ट असेल

फुल ना फुलाची पाकळी समजून पुरस्काराचा स्वीकार करावा
धन्यवाद

अहाहा, कसलं अप्रतिम लिहिलंय चमन तुम्ही! Lol विशेषकरून शेवटचं वाक्य फारच समर्पक आहे! Proud टोमणा मारावा तर असा!! Rofl
आ.न.,
-गा.पै.

Pages