स्विट्झर्लंडचे अनुभव.. ४

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
Time to
read
<1’

अरे मला वाटलं की कशाला जर्मनीवर आपलं स्वीस पुराण लावायचं म्हणुन लिहित नव्हते.... चला सुरू करुया तू म्हणतोयस तर!

कुठून लिहायला सुरुवात करू... इथला निसर्ग... खरोखरच अतिशय सुंदर आहे, जास्वन्दने 'मी काढलेले फोटो'मध्ये टाकलेला फोटो पहा. तुम्ही तसे बॉलिवूडमध्येही पाहिले असणारच. मला तर इथला पानझडीचा ऋतु फारच आवडतो. लाल पिवळ्या झाडांच्या पानांवर सुर्याची तिरपी व सोनेरी किरणं पडली की एक अलौकिक मंत्रमुग्ध दृष्य निर्माण होतं. माझ्यामते हा एक देवदत्त प्रदेश आहे... त्या त्या ऋतुमध्ये हा प्रदेश निरनिराळी रुपे धारण करतो, सगळीच सरस!

गावं, टेकड्या, डोंगर, रस्ते, घरं आखिव व रेखिव.... त्याला कारण शिस्त. हे मी जाड अक्षरांत लिहिलंय मुद्दाम! एखाद्या गावचा पंचायतीने गावाची जशी रुपरेखा ठरवलेली असते त्याबरहुकुम चालायचं ही शिस्त पाळली जाते... प्रत्येक गावाच्या घराच्या छताचा कोन गांवपंचायतीने ठरवून दिलेला असतो. नव्या घराचं छत तसंच होईल याची घर बांधणार्‍याला काळजी घ्यावीच लागते. त्यामुळेच स्वीस खेडी व गावं रेखिव दिसतात. आम्ही घर बांधताना हा अनुभव घेतलाय. आर्किटेक्टला जेव्हा आम्ही घराच्या छताचा कोन बदलता येणार नाही का असं विचारलं होतं तेव्हा त्याने हा कायदा दाखवला होता.

घर दार एवढंच नव्हे तर शाळा पटांगणं, सार्वजनिक बागा अतिशय स्वच्छ ठेवलेली असतात. हे लोक लहानपणापासुन स्वच्छतेचं धडे गिरवीत असतात. उदाहरण द्यायचं तर स्वीस घरी जेवायला आले तर एकही अन्नाचा कण इथे तिथे सांडला जात नाही... अगदी लहान मुलं देखिल न सांडता लवंडता जेवतात. मी एकदा आपला चिवडा मुद्दाम ड्रिंक्सबरोबर ठेऊन पाहिलं... एकही पोहा, दाणाच काय पण फोडणीतील मोहरी - जिरं देखिल सांडत नाही!

स्वीसमध्ये त्या त्या गांवाची किंवा शहरातील म्यूनिसीपालीटीसारखी (Gemeinde) सरकारी संस्था स्वायत्त असते. प्रत्येक गांवपंचायत सर्व प्रकारचे कर नागरिकांकडून गोळा करते. केंद्राचा पण वेगळा आयकर असतो. या कराच्या भांडवलातून नागरिकांना प्रामाणिकपणे सर्व सुविधा पुरवल्या जात असतात. मुलांचे शिक्षण याच सरकारी कोषागारातून होतं. पाठ्यपुस्तके, वह्या, सर्व प्रकारच्या लेखण्या, कॅल्क्युलेटर मोफत पुरवले जातात. अर्थात मुलांना दुसर्‍याच्या प्रॉपर्टीचा मान राखणे शिकवीत असल्यामुळे अगदी चार पाच वर्षे या सामानाचं हस्तांतर होऊनही नग धडधाकट परिस्थितीत असतात! जर सरकारी वस्तू हातून खराब झाली तर त्याची किंमत वसूल केली जाते. स्वीसना पैसे गेल्याचं भारी दु:ख होतं, त्यामुळे वस्तू नीट हाताळणं आलंच. शाळा किंवा युनिव्हरसिटी फी आकारत नाहीत. ती सरकारची जबाबदारी असते.

इतकं असुनही फार कमी स्वीस लोक उच्च शिक्षणाच्या भानगडीत पडतात. अभ्यास व पाठ्यक्रम खूप असतो, परिक्षा काटेकोर असतात. अर्थात् कुठलीही वशिलेबाजी शिक्षणक्षेत्रांत नाही. एखाद्या शाखेची ऍप्रेन्टिसशीप करून कष्ट व बुद्धीकौशल्यावर बहुसंख्य स्वीस प्रगती करताना दिसतात. या शाखा म्हणजे विविध औद्योगिक, वैज्ञानिक, शेती वगैरे वगैरे. अगदी फुलांचे गुच्छ करून विकायला देखिल ऍप्रेन्टिसशीप करुन सर्टिफिकेट मिळवावे लागते

तरीही सर्व आलबेल असतं अशी समजूत करून घेऊ नका... व्यक्ती तितक्या प्रकृती! भ्रष्ट्राचार नाही असं म्हणणं धारिष्ट्याचं होईल. पण सामान्य माणसाला त्यापासून उपद्रव होत नाही. आम जनतेची गरज विनासायास पुरविली जाते... सरकारी, निमसरकारी संस्थांतून कामें चटकन होतात. फक्त त्यांची भाषा आत्मसात केली पाहीजे!

क्रमश: .....

प्रकार: