मुझे चलते जाना हैं, पंचम !

Submitted by रसप on 29 June, 2014 - 04:43

जुन्या जीन्सच्या खिश्यातुनी, जशी मिळावी नोट जुनी
तसाच आनंद लाभतो, तुझा शोध पण खरा हवा

अनपेक्षितपणे मिळालेली एखादी दहाची नोटही आनंदाच्या उकळ्या आणते. असाच एक काल अनुभव आला.
एके ठिकाणी बरेच दिवस पैसे अडकून राहिले होते. एखादा मध्यमवर्गीय सुशिक्षित माणूस जितक्या तीव्रतेने भांडू शकतो, तितकं भांडून झाल्यावरही काही परिणाम झाला नव्हता. शेवटी अक्कलखाती नुकसान जमा करून मी नाद सोडून दिला होता.
अचानक काल ते पैसे मिळाले. तो काही हजारांचा चेक मला काही करोडोंचा वाटत होता !
आता शुक्रवारच्या दिवशी असं काही अनपेक्षित आनंददायी घडणं म्हणजे अपरिहार्यपणे सेलिब्रेशन करावंच लागतं ! आरक्षण मिळाल्यावर आपल्यासाठी आपणच राखून ठेवलेल्या रंगाचा झेंडा फडकवावा, तसा घरी आल्याबरोब्बर मी तो चेक घरच्यांसमोर फडकवला आणि 'झिंदाबाद'च्या आविर्भावात एक घोषणाही करून टाकली की.. 'आज पार्टी करायची!' सहसा झेंडा आणि त्याखाली आवाज असेल, तर मध्यमवर्गीय माणूस जास्त डोकं लावत नाही. घरच्यांनीही तेच केलं आणि मी परवानगी गृहीत धरून तयारीला लागलो.
पण बायकोच्या कपाळावर एक अस्पष्टशी आठी दिसत होती आणि बारीक पंक्चर असलेल्या टायरमधून जशी थोडी थोडी हवा कमी होत जात असते, तसंच काहीसं मला जाणवू लागलं. माझं पंक्चर मी शोधत होतो, पण मिळत नव्हतं. उत्साहाची हवा उतरत होती आणि माझ्याच दोन मनांचं आपसांत होकार-नकाराचं एक द्वंद्व जुंपलं होतं.
इतक्यात फोन वाजला. ताई होती.
'आज आरडीचा प्रोग्राम आहे, लक्षात आहे नं ?'

आह्ह !
एक ठोका चुकला. त्या चुकलेल्या ठोक्याचा हिशोब जुळवण्यात दोन मनं गुंतली आणि त्याच बेसावधपणी मी टीव्ही लावला. प्रोग्राम सुरु होत होता.
'ब्रम्हानंद सिंग' ह्यांनी 'राहुलदेव बर्मन'वर बनवलेली एक फिल्म - "पंचम - मुझे चलते जाना हैं".

download.jpg

अमीन सयानी बोलत होता.
'घर आजा घिर आये' मधला लताबाईंचा आवाज.. रखरखाटात पोळलेल्या अंगावर पावसाचे थेंब पडावे, तसं मला मोहरल्यासारखं वाटलं, अंकुरल्यासारखं वाटलं.
मग शम्मी कपूर आला. आशाताई मस्टच होत्या. मन्ना डे आले. मनोहारी सिंग, भूपिंदर, पंचमचे सहाय्यक, मित्र, अनेक जण आले. आजच्या पिढीचे काही संगीतकार आले. विशाल भारद्वाजने जेव्हा म्हटलं की, 'माझी अर्धी उर्जा माझ्या संगीतातून पंचमदांना वेगळं करण्यात जाते'; तेव्हा त्याच्या डोळ्यातली कृतज्ञता तीच होती जी शांतनू मोइत्राच्या डोळ्यात 'पियू बोले'वर पंचमची छाप कशी आहे, हे सांगताना होती. शंकर महादेवनने अगदी मनातलं वाक्य म्हटलं.. 'He was ahead of time.'

गाण्यांच्या जन्मकथा उलगडल्या जात होत्या. किस्से सांगितले जात होते. काही ऐकलेले, माहित असलेले; तर काही नवीन होते. सगळेच भरभरून बोलत होते. त्या त्या काळात, त्या त्या दिवसांत प्रत्येक जण घेऊन जात होता आणि परत आणत होता. मी झोके घेत होतो. शब्द वेचत होतो.
गुलजार आणि जावेद अख्तरचे शब्द मात्र वेचावे लागले नाहीत. ते रुतलेच काळजात.
'आयुष्यातल्या सर्वोत्तम सृजनात्मक दिवसांत जेव्हा एक कलाकार स्वत:च्या शोधात असतो तेव्हा तो मला भेटला होता.' हे म्हणणारा गुलजार स्वत:च एक कविता झाला होता. ती त्याची कविता त्याच्या नकळत, त्याच्या डोळ्यांतून, त्याच्या राखाडी मिशीपर्यंत वाहिली. कॅमेरा फार क्रूर असतो. त्याने ती टिपलीच.
कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात, पंचमला इंडस्ट्रीने कसं नाकारलं हे ऐकताना - 'सच कहता हूँ सारी दुनिया दुश्मन हो जाती हैं' - आठवलं.
पंचम गेल्यावर लोकांना पंचम दुप्पट, चौपट, किती तरी पट आवडायला लागला. त्याची उणीव जाणवायला लागली. एक पोकळी कायमस्वरूपी निर्वात झाल्याचं कळायला लागलं. जावेद अख्तरने त्याच्या काव्याच्या 'थेट'पणाप्रमाणेच अगदी सरलतेने म्हटलं, 'Time is kind with great people.' आणि क्षणभर मला सचिनदांनी सजवलेले नीरजचे अप्रतिम शब्द आठवले -

हमसे है ज़िंदा वफ़ा और हम ही से है तेरी महफ़िल जवाँ
जब हम न होंगे तो रो रो के दुनिया ढूँढेगी मेरे निशाँ

रडले. सगळे रडले.
तो गेला. वयाच्या ५५ व्या वर्षी.
आज त्याचा फक्त ७५ वा वाढदिवस असता. आपल्या आजूबाजूला देशाला, समाजाला जळू किंवा वाळवीसारखे लागलेले अत्यंत नालायक लोक मरता मरत नसताना आयुष्यभर लोकांना फक्त आनंदच देणारा एक कलाकार मात्र फुंकर मारून पणती विझवावी, तसा संपला ?
तो एकटाच नाही, ह्या गेल्या २० वर्षांतली किती तरी गाणी न जन्मता मेलीत. अस्वस्थ विचार भंडावून सोडत होते.

गुलजार साहेब,
तुमचा हात अचानक सोडून निघून गेलेल्या मित्रासाठी तुम्ही म्हणता 'मैं अकेला हूँ धुंद में पंचम'. तुम्ही म्हणाल हो ! अगदी सहज म्हणाल. कारण म्हणायची, लिहायची आणि त्या शब्दांनी इतरांना झपाटायची तुम्हाला सवयच आहे. पण आम्ही ? आम्ही ज्या पोकळीत दिशाहीन झालो आहोत, त्यातून बाहेर कसे येणार ? आमची व्यथा आम्हाला सांगताच येत नाही. बस्स, फक्त पिळवटलेलं काळीज घेऊन, अनाहूत आसवं गिळून आम्ही पुन्हा आमचा गाडा ढकलत जात राहतो. Because this life just moves on and on and on..

ह्या सगळ्या वैचारिक आवर्तांत हेलकावत सोडून ती फिल्म संपली.

घर, आंधी, गोलमाल, आप की कसम, किनारा, हम किसीसे कम नहीं, यादों की बारात, दीवार वगैरे सुटलेले धागे मी विणत बसलो. इक दिन बिक जायेगा, मेरा कुछ सामान, तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी वगैरे राहिलेले सूर आळवत राहिलो.
पंचम उलगडायला दोन अडीच तास खूपच कमी आहेत. आभाळ पसरायला अंतराळाचा पट हवा. जमीन फक्त आभास देते. क्षितिजाचे कुंपण जसे फसवे असते, तसेच काही वेळेच्या बंधनामुळे येणारे 'The End' हे शब्दही खोटारडे असतात विषयांच्या बाबतीत. विषय अर्धाच ठेवून फिल्म संपली.
पार्टीही संपली होती. डोळ्यांतच ग्लास भरले, रिचवले आणि रितेही झाले होते. पण तहान शमली नव्हती. ही तहान कदाचित शमणारही नाही, आयुष्यभर किंवा तो परत आल्याशिवाय.

कालचा दिवस नेहमीसारखाच सुरु झाला होता. संध्याकाळ अनपेक्षित धनलाभाने झाली होती. रात्र 'फिर वोही रात हैं' पासून सुरु झाली आणि पहाट 'बीती ना बिताई रैना' ला झाली. सकाळी नेहमीच्या कोरडेपणाने मी 'रोजमर्रा'चं ओझं पाठीवर घेतलं.

क्यूँ की, मुझे भी चलते जाना हैं...........

....रसप....
http://www.ranjeetparadkar.com/2014/06/blog-post_28.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुस्सी ग्रेट हो पापे ! Happy
रच्याकने तुनळीवर हे मिळू शकेल काय ? नसल्यास पंचमशी संबंधीत इतर कोणतीही चांगली डॉक्युमेन्टरी सुचवणे.

यूट्युबच्या दुव्याबद्दल धन्यवाद! >>> +१०००००
शेवटची ८-९ मिनीटे मात्र ऐकू आली नाहीत... खूप चुटपुट लागून राहिली त्यामुळे. Uhoh

डॉक्युमेंटरी पाहिलेली नाही पण लेख आवडला.

कारकीर्दीच्या शेवटी (म्हणजे साधारण १९८५ नंतर धरले तर. 'सागर' ८५ चा.) त्याला इंड्रस्ट्रीने नाकारले यात किती तथ्य आहे? त्याकाळात तर हिन्दी चित्रपट संगीतात प्रचंड दुष्काळ पडला होता. ८५-९० काळ धरला तर एखादा कयामत से कयामत, एखादा मि.इंडिया सोडला तर विशेष काहीच नव्हते. अशा काळात सुद्धा आर्डी विशेष यशस्वी झाला नाही - कदाचित सिप्पी, नासिर हुसैन वगैरे त्याचे नेहमीचे दिग्दर्शकही उतरणीला लागले म्हणून असेल. किशोर गेल्यामुळे असेल - हुकमी पुरूष गायक राहिला नाही त्याच्याकडे. तसे त्याने शब्बीर कुमार (बेताब) सारख्याला सुद्धा श्रवणीय बनवले होते.

माझ्या मते आर्डीची दोन रूपे कायमच होती - एक किनारा, खूशबू ऑंधी सारख्या जरा वेगळ्या गाण्यांचा संगीतकार तर दुसरा हम किसीसे कम नहीं, यादों की बारात वगैरे वाला. १९८५ च्या सागर नंतर त्याचे हे दुसरे "प्रचंड लोकप्रिय" चाली देणारे रूप फारसे दिसले नाही. मात्र अ‍ॅक्शन पिक्चर्स मधे त्याचे पार्श्वसंगीतही जोरात असे - ते अर्जून वगैरे पर्यंत होते. नंतर काय झाले माहीत नाही.

अप्रतिम लिहीले आहे. तुनळीच्या लिंकसाठी धन्यवाद.

मी बघु शकलो नाही कारण त्याच दिवशी टिळक स्मारकचा वाढदिवस गुलजार, भुपिंदरसिंग, मिताली सिंग व आरडीच्या हजारो पंख्यांनी साजरा केला. पंचममॅजिक आरडीचा वाढदिवस अजूनही साजरा करते. www.panchammagic.org

@फारएन्ड,

८५ नंतरचं संगीत साधारण ९० पर्यंतचं म्हटलं की मला टुकार बप्पी लाहिरीच आठवतो. आणि सोबतीला कर्णकर्कश्य, गगनभेदी स्वरांत गायकांना गाववणारे लक्ष्मी-प्यारे. ह्या काळात आरडीची काही गाणी छान होती, गाजलीही; पण सिनेमे पडले. ऋषी कपूरने ह्या मुलाखतीत म्हटले आहे की... 'ये वादा रहा' चं शीर्षक गीत (तू तू है वोही) फार छान होतं, पण सिनेमा पडला, गाणीही पडली.

सुंदर आणि ओघवत लिहिले आहे. त्या दिवशी बहुतेक म्युजिक चॅनेलवर आणि एफ एम रेडियोवर पंचमदांचीच गाणी होती. खरच त्यांची गाणी आजच्या जमान्यात सुध्दा किती सदाबहार आहेत. त्यांची कुठल्या चित्रपटातील गाणी आवडली अस विचारल तर पुष्कळ पर्याय आहेत, पण मला त्यांची "१९४२ अ लव्ह स्टोरी" मधली गाणी खुप आवडतात.

सुरेख होती ती फिल्म!
विशेषतः तौफिक कुरेशी जे बोलले, ते मला फार आवडलं. त्यांनी काही गाणी घेऊन त्याची थोडक्यात केस-स्टडी करून सांगितली. ते खूप छान वाटलं. रोणू मुजुमदारही छान बोलले. (विशाल-शेखरला उगीच घेतलं होतं असं वाटलं मात्र :अओ:)

रसप,अगदी काळीज शब्दात ओतून लिहिले आहे .
विशेषत: पंचमदा आणि गुलझार ही जोडी अत्यंत आत्मीय आत्मरूपांची ..ऑफबीट शब्दांना तसाच ऑफबीट स्वरसाज ! खूपच लवकर तुटले हे सुंदर नाते पंचमदांच्या अकालमृत्यूने ..

फिल्म मलाही खूप आवडली. एखाद्या कलाकाराचा असा प्रवास पाहणं अतिशय रोचक आहे.
त्यांच्या आयुष्यातले इतरांनी सांगितलेले चढ उतार मनाला चटका लावून गेले. पण त्यातही ते पाय रोवून उभे राहिले याबद्दल अतिव आदर वाटला.

सुभाष घई नामक प्राणी मला फार आवडला नाही कधी, पण राम लखनला आधी पंचमदा संगित देणार होते, पण काही कारणास्तव त्यांनी रिप्लेस करून त्या जागी सुघ ने एल पी ना साईन केले आणि पंचमना सांगितले ही नाही, ही घटना तर मनाला अतिशय अस्वस्थ करून गेली. आणि उरला सुरला सुघ ही मनातून उतरून गेला.

माणसाला माणसासारखं वागवलं पाहिजे हे फक्त बोलून काय उपयोग? इंडस्ट्री ने इतके कलाकार निर्माण केले आणि लयाला नेले, त्यांची उदा. डोळ्यासमोर ठेवून तरी वागावे इतका बोधही घेऊ नये याचे नवल वाटते.

पण ८५ नंतर इतका मोठा ब्रेक आणि अनेको सिनेमे फ्लॉप होऊनसुद्धा १९४२ ए लव्ह स्टोरी च्या माध्यमातून पंचमनी पुन्हा एकदा आपलं अस्तित्व साबित केलं. जाता जाता सिक्सर मारून गेले असं (बहुतेक) ऋषि कपूर म्हणाले ते मनोमन पटलं.

सुरेख लिहिलंय.
या चॅनेलवर जुने चित्रपट दाखवत असल्याने नेहमी सर्च करून बघत असतो. काल आरडींनी संगीतबद्ध केलेले "हम किसीसे कम नही" आणि "गोलमाल" हे दोन चित्रपट पाहिले. त्यानंतर हा कार्यक्रम. विकएण्ड सत्कारणी लागला. Happy

तो एकटाच नाही, ह्या गेल्या २० वर्षांतली किती तरी गाणी न जन्मता मेलीत. अस्वस्थ विचार भंडावून सोडत होते.>>>अगदी अगदी Happy

तासभराकरीता त्या फिल्मला वेळ देऊ शकलो. फिल्म वगैरे ठीकच पण स्वानुभव शेअर करतो. ४ जानेवारी ९४ ला आर. डी. गेल्याच्या बातम्या आणि त्याची गाणी टी. व्ही. वर दाखवत होते तेव्हा मला रडू कोसळले होते.

रणजित, चांगला लेख!

छान होती फिल्म .. मी काल मॅक्स २ वर बघितली. ते परिंदाच्या गाण्याचा किस्सा अर्धवट राहिला.. एडिटींग बरोबर झाली नाही बर्याच ठिकाणी

ही यूट्यूब फिल्म पाहिली होती. छानच आहे. आरडीने नवा 'साउंड' आणला हिंदी सिनेमात - जसा नंतर रहमानने आणला.

बाकी कलाकाराचं दुर्लक्षित होणं चटका लावतंच, त्याला स्वतःलातर ऑक्सिजन तुटल्यासारखंच वाटत असणार यात शंकाच नाही, पण इलाज नसतो. मदनमोहनवरच्या लेखांमधे आरडीची लाट आल्यावर त्याला स्टुडिओ, वादक अ‍ॅव्हेलेबल नसायचे इ. वाचलं होतं. हे कोणी जाणूनबुजून करत असेल असंही नाही, पण उगवत्याला नमस्कार हेच अशा क्षेत्रांचं सूत्र असतं बहुधा.

कांदापोहे, मी स्वत या कार्यक्रमाला होतो, दर वर्षी panchammagic.org चे दोन्ही शो चुकवत नाही...

हॅपी बर्थडे, पंचम आज ९२.७ एफ एम वर सर्व त्याची गाणी आणि मधून मधून मुलाखती, किस्से असे चालू आहे.
लव्हींग इट.

Pages