विषय क्रमांक-२ : एमी

Submitted by मृण्मयी on 26 June, 2014 - 15:47

"माझा बेल्ट साइझ ५ आहे! हा ३ नंबराचा कुणा मुर्खानं ऑर्डर केला? बघा, इतका थोटका बेल्ट कंबरेला पुरतदेखील नाही! आता काय डोक्याला बांधून फिरू?"

तायक्वांडो शाळेतल्या ऑफिसातून आलेला हा बुलंद आवाज बाहेर उभं असलेल्या अख्ख्या वर्गानं ऐकला. पण मी सोडून बहुतेकांना या आवाजाची आणि त्याच्या मालकिणीची चांगलीच ओळख होती. कुणी ढुंकूनही बघितलं नाही.

पुढल्याच क्षणी तायक्वांडोच्या शुभ्र गणवेषातला, पिंगट केसांचा, लालबुंद चेहेर्‍याचा, साधारण दोनशे पाउंडांचा, सहा फुटी आडदांड ऐवज घाम पुसत ऑफिसाबाहेर आला.

"*** इडियट्स! या बारक्या मुलांना व्यवहार सांभाळायला बसवतात. एक काम धड करत नाहीत." मिनिटापूर्वी येणारा ढणाणा आवाज पुन्हा गरजला.

"एमी, काम डाउन! तुला वॉर्मअपआधीच घाम फुटलाय! असं चिडून लाल होइस्तोवर सारखी आरडाओरड केलीस तर ब्लडप्रेशर वाढून मरशील एके दिवशी!"

" ** ऑफ, जेम्स!" म्हणत ती गडगडाटी हसली.

मिनिटभर त्यांच्या इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्या. मग जेम्सनं माझी ओळख करून दिली. एमीपुढे मी अगदीच उंदीर दिस्तेय हे प्रकर्षानं जाणवलं. क्लासमधे सगळ्या बायकांचे आकार मापून, स्पारिंगमधे त्यातलं कोण जड जाणार, कोणाला धुता येणार याचे आडाखे बांधायची सवय झाली होती. एमीचा देह तिला जागचं हलायला, मारायला हात-पाय तरी उचलू देईल का या दुष्ट शंकेचा लवकरच सोक्षमोक्ष लागला. एमीची चपळाई देहाला अगदी विसंगत होती. त्या दिवशी स्पारिंगमधे तिच्याकडून भरपूर मार खाल्ला.

क्लासच्या शेवटी हात दाबत बसले.

"खूप लागलं का? बर्फाची बॅग आणते. सॉरी हां! माझा थोडासा धक्का लागला तरी लोक 'एअरबॉर्न' होतात" म्हणाली.

माझ्या दंडावरच्या काळ्यानिळ्या डागावर लागलीच आइसपॅक आणून लावला आणि स्वतः हाश्श-हुश्श करत, दोन्ही हातांनी वारा घेत फरशीवर बसली. मग पुन्हा नव्यानं ओळखी आणि गप्पांचा फड जमला. पहिल्या १० मिनिटांतच एमी भयंकर गप्पिष्ट आहे हे जाणवलं. कुटुंबाची, स्वतःची, शेजारपाजाराची माहिती पुरवून झाली. शिवराळ तोंडाची, ४ मुली, १ मुलगा आणि बिनकामाचा नवरा असलेली, तुफान हसायला येणारी, जगात जे खाण्यालायक आहे ते सगळं खायला आवडणारी एमी पहिल्याच भेटीत आवडून गेली.

---

'हळूहळू' एमीशी ओळख होत गेली असं म्हणताच येणार नाही. झाली तेवढी ओळख एक्स्प्रेस गतीनं झाली. पहिल्या ३-४ भेटीतच तिच्या खाजगी, ऑन लाइन, स्पिरिच्युअल, सोशल आयुष्याची इत्यंभूत माहिती कळली. कारण सोपं आहे. एमीला स्वतःबद्दल वाट्टेल ते आणि वाट्टेल तितकं सांगताना जराही संकोच होत नाही. आहे ते असं आहे! खुल्लमखुल्ला! ते सांगताना नो इनहिबिशन्स!

नवर्‍याबद्दल म्हणाली, "तो हरामखोर! काय पाहून याच्या प्रेमात पडले, लग्न केलं कळत नाही! आजकाल दिवसभर टीव्हीसमोर लोळतो. मुलांचं काही कर म्हंटलं की गॉल्फ खेळायला पळतो. घरात तुटलं फुटलं तर सुधरवतो, माझ्याशी प्रामाणिक आहे आणि कर्ज करून ठेवत नाही तोवर ठेवेन घरात. नाहीतर हाकलेन बुडावर लाथ घालून!" नवर्‍याला घरात ठेवण्यासाठीच्या तिच्या अटी अशा भन्नाट होत्या!

'माझा धर्म मला डायव्होर्स घेऊ देत नाही आणि मला धर्माविरुध्द वागायला आवडत नाही म्हणून, नाहीतर कधीच काडीमोड घेतला असता' हे मात्र तिनं आवर्जून सांगितलं. या एकाच वाक्यातून नव्हे तर एकूणच तिच्या वागण्या-बोलण्यातून, मुलांवरच्या संस्कारांमधून, चर्चमधल्या सहभागातून एमी प्रचंड धार्मिक आहे हे पुन्हा पुन्हा जाणवायचं.

"मुलांसमोर फार सांभाळावं लागतं माझं अफाट तोंड! मी ही अशी शिवराळ. पण माझी पोरं मात्र फार गुणी आहेत. तोंडातून चकार वाकडा शब्द काढत नाहीत! एकमेकांशी भांडतात, पण माझ्यासारखं तोंडाचं गटार उघडत नाहीत.! छान शिकतात. शाळेकडून कधी तक्रारी नाहीत. वाद्यं वाजवतात, मैदानी खेळ खेळतात, बायबल स्टडी ग्रुपात निमूटपणे जातात. मी आणि तो रिकामटेकडा मिळून इतकी शहाणी मुलं कशी जन्माला घातली देवच जाणे." हे सांगतानाही पुन्हा गडगडाटी हसणं!
---

एमीच्या ४ मुली १६, १४, १० आणि ६ च्या. मोठा मुलगा १८ वर्षांचा. धाकटीच्या कम्युनियनला आवर्जून बोलवलं होतं तेव्हा सगळ्यांशी भेटी झाल्या. मुलं खरंच गोड होती. नवराही भेटला.

"बोलला ना अगदी छापपाडू! त्याला भेटलं की लोकांना मी अगदी खोटारडी वाटते! माझ्याइतकाच तोही धार्मिक आहे हे एक त्यातल्यात्यात जमेचं. एरवी याला समोरही उभं राहू द्यायची इच्छा होत नाही."

स्वतःच्या मित्रमंडळासमोर 'नवर्‍याला शिव्या' हे तिचं आवडतं कुरण! ती एकदा तिथे शिरली की आपण निव्वळ श्रवणभक्ती करायची! सांगून दमली की सगळ्यांना प्रेमानं मिठ्या मारून म्हणायची, " बरं वाटतं तुम्ही ऐकून घेता म्हणून. तेवढीच मोकळी होते मी. नाहीतर मुलांच्या रगाड्यात, नोकरीत, आयुष्याच्या विवंचनेत कधीच संपून गेले असते. चर्चग्रुपला सांगण्यात अर्थ नाही. माझ्या रिकामटेकड्याचा ले ऑफ झाला तेव्हा त्यांनी खूप मदत केली. पण त्याच्याविरुध्द काही सांगायला बसले तर नको तितकं प्रवचन ऐकावं लागेल."
---

एमी आली की आमच्या तायक्वांडो ग्रुपात चैतन्य यायचं. तिचा क्लास बुडला की 'का आली नाहीस' हा जाब क्लासनंतर दुसर्‍या मिनिटाला फोनवर विचारला जायचा.

फक्त एकदा आणि एकदाच 'ही दुसर्‍या विषयावर बोलेल तर बरं' असं झालं होतं. एमिनं कधी नव्हे ते तिच्या धर्माबद्दल सांगायला सुरुवात केली. नवं काहीतरी ऐकून घ्यायला बरं वाटत होतं, पण गाडी हळूहळू 'तुम्हाला येत्या रविवारी स्पेशल सर्विसला येणं जमेल का?' कडे वळली. नुस्ताच धर्माचा पगडा असलेली नव्हे तर कट्टर धार्मिक असलेली, कितीही कठीण परिस्थिती आली तरी 'तो तारून नेईल' अशी श्रद्धा असणारी, नोकरी आणि तायक्वांडो सोडल्यास बाकी आयुष्य मुलं आणि चर्चभोवती गुंतवलेली एमी बघितली होती. हे प्रचारकी रूप नवं होतं.

'या सगळ्यात रस नाही' हे सांगितल्यावर वाटलं गप्प बसेल. पण दुप्पट उत्साहानं प्रवचनाचा दुसरा भाग सुरू झाला. अखेरीस 'माझ्या धर्माच्या शिकवणुकीनं होमोसेक्श्युअ‍ॅलिटीसारख्या 'सिन'पासून दूर होता येतं' ऐकल्यावर 'आता पुरे' म्हणून घरी जायला उठले. एरवी प्रत्येकाला काय दुखतंय-खुपतंय बघणार्‍या एमीला आपल्या या बोलण्याचा कुणावर काय परिणाम होतोय हे तपासायची गरज पडली नव्हती.

एवढ्यानं मैत्रीत फरक पडेल असं नव्हतं, पण का कोणजाणे तिच्या व्यक्तिमत्त्वाचा हा पैलू अनाकर्षक वाटला. नंतरचे काही दिवस एकत्र व्यायाम करताना तिच्या धार्मिक गप्पांमधे उत्साहानं भाग घेऊ शकले नाही एवढं मात्रं खरं. एमी टिपिकल 'बायबल थंपर' नव्हती असं वाटायचं. पण ते वाटणं चुकीचं होतं असं जाणवायला लागलं.

---

'धर्म' या विषयावर पुढेही सतत गप्पा होत राहिल्या. अशाच गप्पांमधे एकदा जेम्सनं तिला विचारलं, "तुझ्या मुलांपैकी कुणी होमोसेक्श्युअल निघालं तर?"

"असं होणं अजिबातच शक्य नाही! माझी मुलं चर्चमधे वाढलीत!" ती प्रश्न तोडत ठासून म्हणाली. एमीकरता तो प्रश्न उत्तर द्यायला कठीण नव्हताच मुळी! तिला खात्रीच होती तिच्या मुलांपैकी कुणी अशी 'थेरं' करणार नसल्याची! पुढे जर-तरची चर्चा ऐकत मी मख्खपणे बसून राहिले.

---

तिचा आवडता पदार्थ केला की घेऊन जायचा, 'रिकामटेकड्या'बद्दलच्या तक्रारी ऐकून घ्यायच्या, मुलांची प्रगती जाणून घ्यायची हे सगळं सुरळीत चालू असलं तरी खोटं का बोला, एमीबरोबर वेळ घालवणं जिवावर येऊ लागलं. चांगल्या मैत्रीत असं व्हायला नको माहिती असूनही काहीकेल्या एमीचं 'सुपर धार्मिक' रूप पचत नव्हतं. 'तिचे विचार तिच्याजवळ, आपल्याला काय त्याचं', इतका सुज्ञ विचार करवला नाही.

...आणि एके दिवशी तायक्वांडो क्लासनंतर एमी अगदीच वेगळ्या रुपात समोर ठाकली.

"काय झालं? बरं वाटत नाहीये का?" मी विचारलं.

" आज तुम्हाला वेळ आहे का? काहीतरी सांगायचंय" म्हणाली.

"काय सांगायचंय? तू आणि रिकामटेकडा वेगळे होताय का?" जेम्सनं विचारल्यावर नेहमीसारखं '** ऑफ जेम्स' न म्हणता नुस्तीच मुंडी डोलवत ती बॅग काखोटीला मारून निघाली. तिच्यामागे आम्ही शेजारच्या कॉफीहाऊसमधे जाऊन बसलो.

कॉफीचे दोन घोट पोटात गेल्यावर थोडं बरं वाटलं असावं. "अँड्र्यू इज गे" एमीनं सांगून टाकलं. अँड्र्यू, एमिचा सगळ्यात मोठा मुलगा.

"आय ऑलवेज न्यू! ड्यूड इज बेटर ग्रूम्ड दॅन ऑल योर गर्ल्स!" जेम्स या सदगृहस्थाला पाचपोच नाही!

"त्यानं आम्हाला गेल्या वीकेंडला सांगितलं. एरवी काडीचाही उपयोग नसलेल्या त्याच्या बापानं पुढले चार दिवस त्याचा पिच्छा पुरवला. मोठीला आधीच माहिती होतं, पण घाबरून बोलली नाही."

"आता काय, तुमच्या कम्युनिटीत गोंधळ माजणार!" जेम्सनं पुन्हा तोंड उघडलंच.

"हो. अगदी खरंय! त्यांना कसं तोंड द्यायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याच्या बापाला गप्प केलंय मी."

"पण तुझ्या वॉचफुल नजरेखाली, धर्माच्या परिघात हे घडलंच कसं?" जेनानं विचारलं. एमी कसंनुसं हसली.

"बरं यावर तू काय करायचं ठरवलंयस?"

"मी? मी काय करणार? माझं माझ्याइतकंच धार्मिक पोर गे असू शकतं यावर सुरुवातीला विश्वासच बसला नाही. पण ज्या तळमळीनं त्यानं सांगितलं ना, ती तळमळ खरी आहे हो! माझ्या लेकराला त्या परमेश्वरानंच तसं तयार केलं असावं. त्याला इलाज नाही. हळूहळू कळेलच चर्चमधे सगळ्यांना. चार तोंडं बडबडतील. मला शहाणपणाचे डोज पाजतील. पण खरं सांगू का, मी बेन्जामिनाची स्थिती बघितलीय. तो गे असल्याचं कळताच त्याला कसल्याकसल्या थेरपीजमधे घालून फायदा तर नाहीच झाला, उलट वेड लागायची पाळी आलीय हे दिसतंय! मी अँड्र्यूसाठी असं काही करणार नाही. माझं बाळ मला खुश असलेलं, हसतं खेळतं बघायचंय. त्याचा बाप नसो, पण मी आहे त्याच्या पाठीशी! जो कुणी माझ्या अँड्र्यूचं आयुष्य तो गे आहे म्हणून बरबाद करू बघेल त्याची माझ्याशी गाठ आहे, अगदी चर्चमधलं कुणीही असो..!! "

..एमीतली आई पोटतिडकीनं बोलत राहिली. कॉफीहाऊसमधले आजूबाजूचे ऐकत असावेत! अगदी त्यांची पर्वा न करता....सगळ्या जगाला, धर्माला धाब्यावर बसवून...!

Judge not, that ye be not judged.

---------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झालंय. वाचायच्या नादात बेंजामिन कोण ते कळलंच नाही. तिचा कुणी मित्र्/नातलग किंवा परिचीत मे बी...असो..

आवडलं. आधी नुसत्या शिर्षकावरून एमी म्हणजे लॅबवाली जॅपनीज असावी असं वाटलं.

भारी लिहिलंय. माझी एक मैत्रिण आहे अशी. धर्माचं वेड सोडल्यास एकीला झाकून दुसरीला काढावी इतकं साधर्म्य असावं हे तू लिहिलेल्यावरून तरी जाणवतं आहे.

Pages